अकलूज - पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातच मगरीचा ठिय्या

    09-Aug-2025
Total Views |
crocodile rescue



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमधील पाणीपुरवठा करणाऱ्या तलावामधून दि. ९ आॅगस्ट रोजी मगरीचा बचाव करण्यात आला (crocodile rescue). वन विभाग आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट यांनी सात फूट लांब मगरीचा बचाव केला. हा तलाव अकलूज शहर व आसपासच्या परिसरासाठी महत्त्वाचा पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत आहे. (crocodile rescue)
 
अकलूज पाणीपुरवठा तलावात गेल्या काही महिन्यांपासून मगरीचे दर्शन घडत होते. तलावाची क्षमता वाढवण्यासाठी होणाऱ्या बांधकामामुळे तिच्या सुरक्षित स्थानांतरणाची विनंती स्थानिक प्रशासनाने वन विभागाला केली होती. त्यानुसार प्रधान वन्यजीव रक्षक यांच्या परवानगीनंतर सोलापूर वन विभागाने या मगरीला पकडण्याची तयार सुरू केली. त्यासाठी रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टची मदत घेण्यात आली. “ही मगर तलावात कशी आली हे निश्चित सांगता येत नसले तरी, ती काही महिन्यांपासून येथे वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली होती. स्थानिक वनविभागाने केलेल्या प्राथमिक पाहणीनंतर रेस्क्यूच्या तज्ज्ञांनी पकड मोहिमेला गती देण्यासाठी तलावातील पाणी कमी करण्याची शिफारस केली," अशी माहिती पुण्याचे मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी दिली. रेस्क्यूच्या टीमने २ आॅगस्ट रोजी मगरीला पकडण्यासाठी तलाव परिसरात पिंजरे लावले.
 
याविषयी सोलापुरचे उपवनसंरक्षक कुलराज सिंह यांनी सांगितले की, “पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने लगेचच ही कृती करून आवश्यकतेनुसार पाणी कमी केले. यामुळे पथकाला मगरीची उपस्थिती निश्चित करण्यास व तिच्या जास्त वावरणाऱ्या भागांचे निरीक्षण करण्यास मदत झाली. २ ऑगस्ट २०२५ रोजी तीन पिंजरे योग्य ठिकाणी लावण्यात आले आणि शनिवारी मगरीला पकडण्यात यश मिळाले.” रेस्क्यूच्या नेहा पंचमिया म्हणाल्या, "आज सकाळी मगर पिंजर्‍यात अडकलेली आढळली. सध्या तिला पुण्यातील बावधन येथील वन्यजीव ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये शारीरिक तपासणी व आरोग्य तपासणीसाठी आणले जात आहे. मोठ्या खुल्या जलाशयातून मगर पकडणे नेहमीच आव्हानात्मक असते. त्यासाठी संयम आणि परिस्थितीनुसार योजना बदलण्याची गरज असते. वनविभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग आणि आमच्या पथकातील समन्वयामुळे ही जटिल मोहीम सुरक्षितपणे पार पडली.” मगर कुठल्या योग्य नैसर्गिक अधिवासात सोडायची याचा अंतिम निर्णय महाराष्ट्र वनविभाग घेणार आहे.