१४ ऑगस्ट : अखंड भारत संकल्प दिन-विभाजन विभीषिका दिवस

    14-Aug-2025
Total Views |

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सांगता होऊन स्वातंत्र्याचा अमृतकाळ सुरू झाला. आपल्या सर्वांसाठी हा गौरवशाली प्रवास आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानात मागील तीन वर्षे आपण सर्वांनीच अभिमानाने आणि आनंदाने सहभाग घेतला आहे, याची खात्री आहेच! तसाच यावर्षीसुद्धा घ्याल अशी अपेक्षा! अर्थात, यातही खोडा घालण्याचे काम विघ्नसंतोषी आणि ‘भारत तोडो’ मानसिकतेची मंडळी करत आहेतच. यानिमित्ताने आजच्या अखंड भारत संकल्प दिन-विभाजन विभीषिका दिनाचे औचित्य साधून असाच एक वेगळा विषय मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...


रताला दि. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. पण, हे स्वातंत्र्य खंडित करणारे ठरले.पाकिस्तानच्या निर्मितीसाठी भारतभर मुस्लिमांनी केलेले दंगे, लाखो अबालवृद्ध हिंदूंच्या कत्तली, हजारो महिलांच्या अब्रूंचे धिंडवडे, पाकिस्तानातील निर्वासित हिंदूंच्या कत्तली सारेच रक्तरंजित होते. लाहोरवरून भारतात आलेली रेल्वे पूर्णपणे हिंदूंच्या प्रेताने भरलेली होती. जे त्यातूनही जे वाचले, त्यांची अवस्थेचे वर्णनही भयावह होते. त्यावेळी भारतात आलेल्या महिलांच्या शरीरावर अत्याचाराच्या खुणाही होत्या आणि यावर कडी म्हणून की काय, दिल्लीतल्या महात्म्याने या मंडळींना आधार देण्यासही नकार दिला. एवढेच काय, त्यांना साधी सहानुभूतीसुद्धा दाखवली नाही. धर्मनिरपेक्षतावादाचा जीवघेणा कळस या मंडळींनी अनुभवला. रक्ताचे अश्रू सहन केलेल्या आमच्याच हिंदू बांधवांना दिल्लीत झिडकारले जात होते आणि आमचे नेते खंडित स्वातंत्र्याचा आनंदोत्सव करत होते; महात्म्याचे गुणगान गात होते. ‘दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल,’ रक्ताचा थेंबही न सांडता मिळालेले स्वातंत्र्य, अशी भलामण करत होते! हे आपल्या स्वातंत्र्याचे वास्तव आहे. पंतप्रधान मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी जाहीर केले की, दि. १४ ऑगस्ट रोजीचा हा दिवस फाळणीच्या या जखमांची आठवण जागवणारा ‘विभाजन विभीषिका दिवस’ म्हणून पाळला जावा. त्यातही याला लिबरल, डावे, फुटीरवादी मानसिकतेचे पत्रकारांनी विरोध करायला सुरुवात केली. फाळणीच्या वास्तवावर एक मालिका दाखवल्याबद्दल दूरदर्शनचे आभार मानायलाच हवेत. ज्यांना त्या दिवसाचे वास्तव जाणून घ्यायची इच्छा असेल, त्यांनी प्रशांत पोळ यांनी लिहिलेले ‘वे पंद्रह दिन’ हे पुस्तक वाचावे. यामध्ये त्या दिवसांचे यथार्थ वर्णन आले आहे. देशाची फाळणी माझ्या शरीराच्या तुकड्यावरून होईल, असे सांगणारा महात्मा फाळणीला दुजोरा देता झाला. नेहरूंसारख्या नेेत्यांना खंडित स्वातंत्र्याचीच घाई लागली होती आणि त्यासाठी लाखो हिंदूंना वार्यावर सोडून देण्याची तयारी होती. ज्यांनी हिंदुस्तान अखंड राहावा यासाठी प्रयत्न केले, त्यांना जातीयवादी ठरवून आधीही अवहेलना केली आणि आजतागयत जातीयवादी हाच शिक्का मारत आहेत. काही नेते आणि संघटना यांना संपविण्याचाही प्रयत्न झाला. तशी फाळणीच्या वास्तवावर बोट ठेवणारी अनेक पुस्तके आज उपलब्ध आहेत परंतु, प्रश्न आहे तो आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करण्याचा. इंग्रजांनी भारत एकसंध केला वगैरे संकल्पना, आपल्या माथ्यावर मारल्या गेल्या आहेत. मागील ७५ वर्षांत तेच माथी मारल्यामुळे तीन-चार पिढ्या हेच घोकत आल्यामुळे, तेच सत्य वाटू लागले आहे.

वास्तविक भारत हा हजारो वर्षांची समृद्ध परंपरा असलेला, सांस्कृतिक, वैज्ञानिक, स्थापत्य शास्त्र, अध्यात्म अशा सर्वांच क्षेत्रात अग्रेसर असलेला देश. जगभरातील मानवजातीला ज्ञान आणि विज्ञानाने, सांस्कृतिक वारशाने समृद्ध करणारा देश म्हणजे भारत होय. अखंड भारताचे मानचित्र पाहिले, तर त्याच्या प्रचंड विस्ताराची कल्पना येते. इथे अनेक महापुरुष, वैज्ञानिक, योद्धे आणि शासक होऊन गेले. त्यांनी जगाला ज्ञान आणि संस्कृतीद्वारे बांधण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर डाव्या लिबरल मंडळींनी हा गौरवपूर्ण वारसा दडपून टाकला. मेकॉलेचीच री ओढत, भारत हे कधी एक राष्ट्र नव्हतेच हेच सांगितले. भारताचा इतिहास मुघलांपासूनच सुरू होतो हेच बिंबवले. जाणूनबुजून हिंदूंना न्यूनगंडाच्या भावनेत ढकलले गेले. परंतु, आता या गौरवशाली इतिहासाचा अभ्यास सुरू झाला आहे. मोठ्या प्रमाणात पाश्चात्य मंडळीही पुराव्यासह सत्य मांडू लागली आहेत. हा विषय बराच गहन आणि मोठा आहे. मात्र, यातून एक बाब सिद्ध होते की, भारत हे फार पूर्वीपासूनच एक सांस्कृतिकरित्या समृद्ध राष्ट्र होतेे. अगदी मुघल काळातसुद्धा या राष्ट्राला मुघल आक्रमणापासून वाचवण्यासाठी, आसेतु हिमाचलमधील अनेक वीरांनी प्राणांची आहुती दिली. त्यामुळेच मुघल कधीही संपूर्ण भारतवर्षावर राज्य करू शकले नाही. इंग्रजांनी सांस्कृतिक दृष्टीने अखंड असलेल्या भारताचे तुकडे केले. म्यानमार, श्रीलंका, नेपाळ, तिबेट, अफगाणिस्तान भाग आधीच वेगळे केले आणि जो काही भाग शिल्लक होता, त्याचे धार्मिक आधारावर विभाजन घडवले. त्यानंतर राहिलेला भूभागही खंडित करून, भारताला खंडित स्वातंत्र्य दिले. अजूनसुद्धा याच पठडीतल्या मंडळींकडून भारत तोडण्याची कारस्थाने, इथल्याच मंडळींच्या आधाराने सुरू आहेत. देशाला मिळालेले स्वातंत्र्य, प्रचंड संघर्षानंतर मिळालेले आहे. दुर्दैवाने त्यालाही विकृत स्वरूप दिले गेले. हजारो स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचे बलिदान करणार्या अनेक अनाम वीरांना, विस्मृतीत घालविण्याचे काम मात्र इमाने इतबारे केले गेले. एक परिवार आणि महात्मा सोडून अन्य सर्वांचेच योगदान नाकारले गेले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचेे स्वातंत्र्य चळवळीत त्यांचे योगदान काय ?हा प्रश्न ते आजही उपस्थित करतात. याहूनही गलिच्छ आरोप सावरकरांवर आजही सुरु आहेत.

आणखीन एक वास्तव समजून घ्यायची आवश्यकता आहे की, स्वातंत्र्यसंग्राम हा विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर आणि मुघल साम्राज्य बस्तान बसवू लागले तेव्हापासूनच सुरू झाला, तोे १९४७ साली ब्रिटिश इथून जाईपर्यंत सुरूच होता. मात्र, आपल्याला स्वातंत्र्यसंग्राम हा फक्त इंग्रजांविरुद्ध होता असेच सांगितले जाते. तेव्हापासून असंख्य नररत्नांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, हजारो महिलांनी जोहार केला, हजारो साधू-संतांचेही यात योगदान आहे. हे सारे एकाच प्रांतातले नाही बरं का! असेतू हिमाचल पसरलेल्या भारतवर्षातील सर्वांचा सर्व समाजातील, सर्व वर्गातील स्त्री पुरुषांचा यात सहभाग आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रेरणेने त्यावेळच्या लष्करामध्ये पुरुषांबरोबर महिलाही सहभागी झाल्या होत्या पण, हा इतिहास शिकवला जात नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, आमच्या तथाकथित नेते मंडळींची राष्ट्र आणि राष्ट्रवादासंबंधी भ्रामक संकल्पना, आणि त्याचबरोबर संस्कारांनी इंग्रज असलेल्या मंडळींचा राजकारण आणि समाजकारणावर असलेला भक्कम विळखा आणि त्याचबरोबरीने आत्माविस्मृत हिंदू भारतीय समाज!

आपल्याला स्वातंत्र्य सहज मिळालेले नाही. असे कितीतरी अगणित ज्ञात-अज्ञात ज्यांनी देशासाठी आपल्या घरादाराची राखरांगोळी केली आहे. या सर्वांचे योगदानही माहीत नाही आणि शिकवलेही नाही. ‘नाही चिरा नाही पणती’ अशीच स्थिती आहे. या सर्वांच्या, बलिदानावरच आपले स्वातंत्र्य उभे आहे, हे आपण विसरता कामा नये. तेव्हाच्या काँग्रेस नेत्यां एवढेच किंबहुना काकणभर जास्तच प्रयत्न या क्रांतिकारकांचे आहेत.स्वतंत्र भारतात जन्मालेल्या आजच्या पिढीला हा छद्म इतिहास शिकवला गेला आहे; त्यांना या सर्व पराक्रमाची, त्यागाची माहिती करून देणे आवश्यक आहे.

स्वातंत्र्याचा आनंद आहेच परंतु, ते खंडित असल्याचे शल्यही आहे. भारतमातेला पुन्हा अखंड स्वरूप प्राप्त करून देणे, हे आपले सर्वांचेच स्वप्न असले पाहिजे. आजचे आपले राज्यकर्ते कणखर निर्णय घेणारे आहेत. काश्मीरचे ‘कलम ३७०’ रद्द झाले, ‘३५ ए’ रद्द झाले. राष्ट्रीय विचारांचा पाठपुरावा करणार्या मुस्लिमांच्या संघटना उभ्या राहात आहेत. मला आठवते की, आम्ही महाविद्यालयात असताना ‘कलम ३७०’ रद्द करा, ‘जिस काश्मीर को खून से सिंचा वह काश्मीर हमारा हैं|, काश्मीर से कन्याकुमारी तक भारत देश हमारा हैं|’ अशा घोषणा देत सायकल रॅली काढल्या आहेत आणि ‘काय ही मुलं मूर्खपणाच्या घोषणा देत आहेत,’ असे रस्त्यावरील मंडळी, खिडकीतून आणि गॅलरीतून डोकावणारी मंडळी म्हणायची. हे खरंच होईल का? काय वेडेपणाचे आहे हे? आणि आज तेच खरं झालेले आपण पाहतो आहोत. आतातर पाकव्याप्त प्रदेश आमचाच भाग आहे, हे सुद्धा ठणकावून सांगितले जात आहे. पाकिस्तानही दुहीच्या आणि फुटीच्या मार्गावर आहे. बलुच क्रांतिकारी मंडळींनी तर जणू तर स्वातंत्र्य युद्धालाच सुरुवात केली आहे. गंमत म्हणजे, ज्यांनी पाकव्याप्त काश्मीर निर्माण होऊ दिला, तीच मंडळी ‘पाकव्याप्त काश्मीर परत कधी घेणार,’ असे विचारत आहेत. खरं खोटं माहिती नाही; पण श्रीलंका, नेपाळ इथली मंडळीही भारताशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणे. या आपसूक घडून येणार्या बाबी नक्कीच नसाव्यात. असो! इस्रायलने २००० वर्षे पाठपुरावा करत, अखेर आपला प्रदेश मिळवत एक बलशाली राष्ट्र निर्माण केले. आजही इस्रायल आजूबाजूच्या इस्लामी कट्टरवादी राष्ट्रांशी समर्थपणे लढत आहे. विभाजित जर्मनीही एक झाला, ही उदाहरणेही समोर आहेतच. मंडळी, सहज, सोपे असे काहीच नसते आणि ते सोपे नसते म्हणूनच, ते आव्हानात्मक आणि करणीय असते. फाळणी टाळण्यासाठी प्रयत्न करणार्या असंख्य मंडळींचे पाय खेचण्याचे काम तथाकथित नेते मंडळींनी केले नसते, तर कदाचित ही फाळणीसुद्धा टळली असती.

मंडळी, ‘अखंड भारत’ हे आपल्या पूर्वजांनी आपल्याला सोपविलेले संचित होते. आपला भौगोलिक आणि सांस्कृतिक ठेवा होता आणि तो पुन्हा वास्तवात आणणे हे काल कदाचित स्वप्नरंजन वाटत असेल पण, आता घडणार्या सामाजिक आणि राजकीय घटनांनी पुन्हा एकदा या स्वप्नाला आकार द्यायला सुरुवात केली आहे. आज या संस्कृतीचा पाईक असलेला हिंदू समाज जागृत होत आहे. गरज फक्त दुर्दम्य मानसिकतेची आहे. आपल्या देशाप्रति, संस्कृतीप्रति असलेला अभिमान जागृत ठेवायला हवा. हे सहजसाध्य नाही; पण असाध्यही नक्कीच नाही. हे स्वप्नरंजन नाही, तर आपल्या मातृभूमीचे गतवैभव परत मिळवून द्यायचा दुर्दम्य आशावाद आहे. आपल्या इतिहासात डोकावून पाहिले, तर भारताकडे शक्तिशाली राष्ट्र म्हणून गौरवाने पाहिले जायचे. हिंदू समाज हा शक्तिशाली, सामर्थ्यसंपन्न, वैभवशाली होता. तो आज आत्मविस्मृत झाला आहे. मागील १०० वर्षांत अनेक धुरिणांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आता थोडीफार जागृती दिसत आहे हे सुचिन्ह! अजूनही बराच पल्ला गाठायचा बाकी आहे. हिंदू समाज जागृतीचे, संघटनांचे प्रयत्न यांची व्याप्ती आणि वेग वाढवावा लागेल, हिंदू तत्त्वज्ञान आणि अध्यात्म यथार्थ स्वरूपात समाजात रुजवयाचा प्रयत्न अधिक गतीने करावा लागेल. हे घडेल तेव्हा हिंदू समाज बाजूच्या सर्व आव्हानांना पुरून उरेल यात शंका नाही. अर्थात यासाठी किती वेळ लागेल याचे गणित आज मांडता येणार नाही पण, तोपर्यंत हे स्वप्न जागृत ठेवायला हवे ना. आमच्या पूर्वजांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प प्रत्येक पुढील पिढ्यांकडे स्वप्नपूर्ती होईपर्यंत वारसा म्हणून गेला पाहिजे. दुर्दम्य आशावाद आणि आश्वासक प्रयत्न याला पर्याय नाही. याला आणखीन बाजू म्हणजे ‘अखंड भारत’ फक्त पाकिस्तान, बांगलादेश नव्हे. ‘अखंड भारता’चा नकाशा पाहिला, तर त्याचा पसारा बराच मोठा आहे. महाभारतकालीन संदर्भ लक्षात घेतले, तर अफगाणिस्तान, जावा, सुमात्रा, मलेशिया, इंडोनेशिया, मालदीव आणि आसपासची बेटे, श्रीलंका, इराण आणि आशिया खंडाचा बराचसा भाग. नेपाळ तर आता आतापर्यंत एकमेव हिंदू राष्ट्र होते. आताही पुन्हा हिंदू राष्ट्र व्हावे म्हणून, तेथील जनता आंदोलन करत आहे. आजचे भूराजकीय स्वरूप पाहता राजकीयदृष्ट्या ‘अखंड भारत’ ही कल्पनाच शक्य नाही परंतु, सांस्कृतिक धाग्याने जोडलेला प्रदेश ज्याचे सांस्कृतिक नेतृत्व भारत करू शकेल या दृष्टीने पाहावे लागेल. हिंदू संस्कृतीने कधीही तलवारीच्या जोरावर प्रदेश बळकावण्याचा प्रयत्न केला नाही आणि या पुढेही असे होण्याची सुतराम शयता नाही. त्यामुळे सांस्कृतिक धाग्याच्या आधारावर एकत्र येत, एकमेकांच्या साहाय्याने एकमेकांना आधार देत, आर्थिक आणि सामाजिक उन्नत्ती असा व्यापक विचार होऊ शकतो. पण जोवर राष्ट्रप्रेमी हिंदू संघटित होत नाही, त्याच्यात विजिगिशू वृत्ती निर्माण होत नाही, तोपर्यंत याचे सत्यात येणे दूरच. पण, आम्ही संकल्पच केला नाही, तर त्यादृष्टीने प्रयत्न कसे होणार? हे स्वप्न प्रत्यक्षात यायला किती वेळ लागेल याचा अंदाज नाही पण, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू ठेवले तर जेव्हा केव्हा हे साध्य होईल, तेव्हाची पिढी आपल्या आधीच्या पिढ्यांप्रति नक्की कृतज्ञ भाव ठेवेल. उद्या दि. १५ ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करूयातच. पण, ते करताना या भारतमातेला तिचे अखंडत्व पुन्हा मिळवून द्यायचे आहे, हा संकल्प मनात जागवू या. भारत पुन्हा अखंड करण्यासाठी कटिबद्ध होऊयात.
भारत माता की जय


अरविंद जोशी
९९३०३०९४५१