
नकाब हा खरं तर अनैसर्गिक पोषाख. नव्याने उदयास आलेल्या अतिरेक्यांनी देशातील महिलांवर हा हिजाब लादला. हिजाब देशाच्या संस्कृतीच्या विरुद्ध आहे. चेहरा झाकण्यापेक्षा देशाची ऐतिहासिक सांस्कृतिक अस्मिता दर्शवेल, असा पोषाख परिधान करावा,” असे खुद्द मुस्लीमबहुल कझाकस्तानचे राष्ट्रपती कासिम जोमार्ट तोकायेव यांनी म्हटले आणि आता नुकतेच सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांनी देशात चेहरा झाकणार्या हिजाब परिधानावर बंदी आणली आहे. विशेष म्हणजे, कझाकस्तानमध्ये ७० टक्के लोकसंख्या मुस्लीम आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
राष्ट्रपती कासिम जोमार्ट तोकायेव यांच्या आदेशाद्वारे चेहर्याची ओळख होण्यासाठी अडथळा आणणार्या सर्व प्रकारच्या वस्त्रांना सार्वजनिक ठिकाणी बंदी घातली आहे. मात्र, वैद्यकीय कारणांसाठी तसेच, प्रतिकूल हवामान परिस्थितीत, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये हा नियम शिथिल केला आहे. मात्र, कझाकस्तानमध्ये ही बंदी काही अचानक लादली नाही. त्यापूर्वी २०१७ साली शाळेमधील विद्यार्थिनींसाठी हिजाब घालण्यावर बंदी घातली होती. ‘आपला देश धर्मनिरपेक्ष असून, शाळा शिक्षणाची केंद्र आहेत. इथे सर्व समान असल्याने सर्वांनी समान गणवेश परिधान करणे अनिवार्य आहे,’ असा त्यावेळी कझाकस्तान प्रशासनाने नियम केला होता. कझाकस्तानच्या जनतेने याला म्हणावा तितका विरोध केला नाही. कारण, या देशामध्ये मुस्लीम कट्टरता भिनलेली नाही. नवव्या शतकात इथे मुस्लीम आक्रांता आले आणि नेहमीप्रमाणे हिंसक पद्धतीने धर्मांतरण घडवून आणले. पण, येथील नागरिकांनी त्यांचे मूळचे संस्कार कायम जपले. जन्म, विवाह आणि इतर मुख्य प्रसंगामधले रितीरिवाज कायम राखले. त्यामुळे कागदोपत्री कझाकस्तान मुस्लीमबहुल झाला. मात्र, त्यांची मूळची संस्कृती समाजजीवनात कायम अंतरप्रवाहित होती. दुसरे असे की, या देशाचे क्षेत्रफळ जवळजवळ भारताइतके. मात्र, देशाची लोकसंख्या अवघी दोन कोटी. हा देश तसा नैसर्गिक संसाधनांनीही श्रीमंत. त्यामुळे देशात आर्थिक सुबत्ताही नांदते. या सुबत्तेमुळे आधुनिक भौतिकतेची वाढ झालेली. तसेच, कझाकस्तानच्या नागरिकांमध्ये एक चलन निर्माण झाले ते म्हणजे, इस्लाम त्यागून स्वतःला ‘एक्स मुस्लीम’ म्हणून घोषित करणे. हे सगळे बदल घडण्याचे एक कारण असेही आहे की, हा देश निसर्गसंपन्न असल्याने इथे जगभरातील पर्यटकांचा कायमच राबता असतो. त्यामुळे कझाकस्तानच्या नागरिकांना जगभरातल्या संस्कृतीची ओळख झाली.
असो, कझाकस्तानमध्ये हिजाबबंदीसंदर्भात चिंता कुणी व्यक्त केली, तर ती मानवाधिकारवाल्यांनी. त्यांचे म्हणणे कझाकस्तानमध्ये ७० टक्के लोक मुस्लीम आहेत. हिजाबवर बंदी म्हणजे मुस्लिमांच्या धार्मिक जीवनपद्धतीवर घाला, असे त्यांचे म्हणणे. उलट कझाकस्तानच्या राष्ट्रपतींनी म्हटले की, हिजाब हा कझाकस्तानचा पोषाख नाही, तर परेदशी पोषाख आहे आणि तो महिलांनी परिधान करावा म्हणून दहशतवादी दडपशाही करतात. थोडक्यात, पण कझाकस्तानच्या सरकारने त्यांना काडीचीही किंमत दिली नाही. तसेही कझाकस्तान पाकिस्तानसारखा मुस्लीम देश नाही, तर कायद्याने एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे.
मुस्लीमबहुल कझाकस्तान धर्मनिरपेक्ष न राहता ‘इस्लामिक राष्ट्र’ बनावे, यासाठी धर्मांध शक्ती प्रयत्नशील असतातच. पाकिस्तानची ‘तब्लिगी जमात’ आणि ‘हिज्ब-उत-तहरीर’ या संघटनांनी कझाकस्तानमध्ये हातपाय पसरायचे प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी लोकांना कट्टरपंथीपणाचे धडे देऊ लागले. ‘तब्लिगी जमात’ने तर रस्त्यावर नमाज पढायला सुरुवात केली. त्यांना वाटले नमाज पढायला कोण विरोध करेल. पण, कझाकस्तान सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई केली. इतकेच नाही, तर दहशतवादी दिसतील तिथे गोळ्या मारण्याचे आदेशही दिले. हिजाबबंदी करणारा कझाकस्तान काही पहिले मुस्लीम राष्ट्र नाही. यापूर्वी अल्जेरिया, ट्युनीशिया, ताजिकिस्तान, उज़्बेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, चाड या देशांनीही हिजाबसह बुरख्यांवर प्रतिबंध लादले आहेत. बहुंसख्य मुस्लीम लोकसंख्या असलेल्या देशाने हिजाबवर बंदी घातली, या विचाराने जगभरातले धर्मांध बिथरले आहेत. येणार्या काळात कझाकस्तानमध्ये त्यांच्या हालचाली वाढतील, यात शंका नाही. तूर्तास कझाकस्तानचे अभिनंदन!