मुंबई (विशेष प्रतिनिधी) - इगतपुरी सामाजिक वनीकरण विभागाने २०२४-२५ या वर्षात रोपविक्रीमधून जवळपास साडे पाच लाख रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे (igatpuri social forestry). राज्य शासनाने बांबू लागवडीवर लक्ष केंद्रीत केले असताना विभागाने विकलेल्या रोपांमध्ये बांबू रोपांची संख्या सर्वाधिक आहे (igatpuri social forestry). या पार्श्वभूमीवर सामाजिक वनीकरण विभागाकडून इगतपुरी सामाजिक वनीकरण विभागातील कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले आहे. (igatpuri social forestry)
इगतपुरी सामाजिक वनीकरण विभागाअंतर्गत मुकणे येथे एकिकृत रोपवाटिका तयार करण्यात आली आहे. या रोपवाटिकेमध्ये दरवर्षी साधारण दोन लाखांहून अधिक रोपांची लागवड केली जाते. त्यासाठी शाकीय प्रजनन पद्धतींसारख्या अनेक पद्धतींचा वापर करुन याठिकाणी रोपांची लागवड होते. यामाध्यमातून समाजातील वेगवेगळ्या घटकांमध्ये रोपांची विक्री केली जाते. २०२४-२५ या आर्थिक वर्षात मुकणे रोपवाटिकेमधून तब्बल ३८ हजार ३२१ रोपांची विक्री झाली आणि त्यामाध्यमातून शासनाला पाच लाख ६१ हजार ५६८ रुपयांचा महसूल प्राप्त झाला.
कर्मचाऱ्यांनी रोपवाटिकेतून वृक्षारोपण करण्यासंदर्भात स्थानिक उद्योगसमूह, कंपन्या, उद्योजक, बिगर शासकीय संस्था, शासकीय यंत्रणा, संरक्षण दल, ग्रामपंचायती, शाळा-महाविद्यालय, विद्यार्थी, शेतकरी बांधव आणि वृक्षप्रेमींमध्ये वृक्ष लागवडीविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. तसेच रोपवाटिकेमधून सवलतीच्या दरात विविध प्रजातींची दर्जेदार रोपे उपलब्ध करुन दिली. आम्ही रोपवाटिकेच्या माध्यमातून बांबू लागवडीवर विशेष भर दिला असून तुल्डा आणि मानवेल बांबू या दोन प्रजातींची लागवड बांबू प्रजातीचे डीएनए प्रोफ्लायिंग करुन आम्ही करत असल्याची माहिती इगतपुरी सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांनी दिली. याशिवाय आम्ही विविध औषधी प्रजातीची स्थानिक रोपे आणि फळवर्गीय रोपांच्या लागवडीवर भर देत असल्याचेही त्यांनी सांगितले.