पूर्णत्वाचा ध्यास - वेरूळचे कैलास

    12-Jul-2025
Total Views |

नुकतेच महाराष्ट्रातील १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान मिळाले. महाराष्ट्रामध्ये अशी अनेक स्थळे आहेत, ज्यांना ही कीर्ती प्राप्त होणे आवश्यक आहे, तर काहींना ती लाभली आहे. त्यापैकी एक म्हणजे वेरूळ येथील कैलास लेणी. या लेण्यांबाबत असणारे कुतूहल आजही कायम आहे. हे लेणी म्हणजे तत्कालीन स्थापत्य प्रगतीचा जिवंत नमुनाच! या लेण्यांच्या स्थापत्य सौंदर्याचा घेतलेला आढावा...

जागतिक वारसा स्थळांच्या यादीत एखाद्या वास्तूचा, वारसा स्थळाचा समावेश होणे ही त्या गावासाठी, राज्यासाठी आणि पर्यायाने देशासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असते. आपल्या महाराष्ट्राला लाभलेले असेच एक जागतिक कीर्तीचे वारसास्थळ म्हणजे, छत्रपती संभाजीनगरमधल्या वेरूळ गावातले कैलास लेणे. जगाने स्वीकारलेले हे स्थळ हजारो लोकं बघायला जातात; पण आपल्याला खरोखर या जागेचा परिचय आहे का? आपण तेवढी नीट ही जागा समजून घेतली आहे का? त्या अनामिक कलाकारांनी उभे केलेले वैभव समजून घेण्याची दृष्टी आपल्याला मिळाली आहे का? या सर्व प्रश्नांचा ऊहापोह करण्यासाठी आजचा लेखनप्रपंच.

या मंदिराशी संबंधित एक सुंदर कथा आहे. महाराष्ट्रामध्ये राज्य करणार्या राष्ट्रकूट राजघराण्याने कांचीपुरमवरती विजय मिळवला. यानंतर राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला याची राणी माणकावती हिने, कांचीपुरमसारखे कैलासनाथाचे मंदिर आपल्याकडेही व्हावे यासाठी आग्रह धरला. शेवटी जोपर्यंत या मंदिराचा कळस आपण बघत नाही, तोपर्यंत आपण अन्नग्रहण करणार नाही असा पणदेखील स्वीकारला. त्यामुळे राजाबरोबर इतर सर्वच मंडळी चिंताग्रस्त झाली. त्यावेळी पैठण गावातल्या एका स्थपतीने हा विडा उचलला. काहीच दिवसांत मंदिराचा कळस हा राणीला दाखवला. पण, बाकीचे मंदिर कुठे आहे? असा प्रश्न आल्यावर खाली दगडातच आहे, फक्त नको असलेला दगड आता काढून टाकायचा राहिला आहे, असा विचार त्या स्थपतीने व्यक्त केला असेल आणि वरून खालपर्यंत हे अखंड मंदिर म्हणजेच एक अखंड शिल्प त्या स्थपतीने चिरंजीव केले असेल. या कथेमधली सत्यता आपल्याला माहिती नसली, तरीही वरपासून खालपर्यंत एवढे प्रचंड मोठे वैभव अनेक दशके काम करून ज्याने तयार केले, तो स्थपती म्हणजे विश्वकर्माचा अवतारच मानावा लागेल.

३०० फूट लांब, १७५ फूट रुंद आणि जवळपास १०० फूट उंच एवढे प्रचंड काम या कैलास मंदिराचे आहे. या स्थपतींनी फक्त छिन्नी आणि हातोडा यांच्या माध्यमातून, हे साध्य करून दाखवले. भारतीय मंदिर स्थापत्यात पूर्णत्व साध्य करण्यासाठी केलेला हा सर्वोत्तम प्रयत्न होय. काही दशके सलग या ठिकाणी काम चालू होते पण, एकाही कलाकाराने एकही चूक केली नाही आणि घेतलेले देवकर्म पूर्ण केले. द्राविड स्थापत्यशैलीमध्ये या मंदिराचे स्थापत्य असून, मंदिराची रचना दोन मजली आहे. नंदी मंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह हे सर्व भाग वरच्या मजल्यावर आपल्याला बघायला मिळतात.

दोन मजली गोपुरातून आपण, शिवाला अर्पण केलेल्या एका वेगळ्या विश्वात प्रवेश करतो आणि समोर आपल्याला दिसते ती गजलक्ष्मी. तिच्या शेजारी असणारे हत्ती, आपल्या सोंडेमध्ये कुंभ धरून तिला अभिषेक करत आहेत, असे हे शिल्प आहे. इथूनच डावीकडे आणि उजवीकडे मोकळ्या पटांगणात दोन मोठे हत्ती कोरलेले आपल्याला दिसतात. आज दुर्दैवाने ते क्षतीग्रस्त आहेत. या दोन्ही हत्तींच्या जवळच दोन मोठे कीर्ती स्तंभ कोरलेले दिसतात. आपण आज वापरणार्या २० रुपयाच्या नोटेवर यातला एक कीर्तीस्तंभही दिसतो.

डावीकडून जाताना महिषासुरमर्दिनी, मदन आणि रती यांची शिल्प बघत आपण सरिता मंदिरात प्रवेश करतो. गंगा, यमुना आणि सरस्वती यांना अर्पण केलेले हे मंदिर आहे. गंगेकडून पावित्र्य, यमुनेकडून आत्मसमर्पण आणि सरस्वतीकडून ज्ञान या गोष्टी घेऊनच आपण मंदिरात प्रवेश करावा, असा प्रगल्भ विचार कदाचित या स्थपतींना आपल्यासमोर मांडायचा असेल. मुख्य मंदिराच्या उत्तरेच्या बाजूला मोठे महाभारताचे युद्ध कोरलेले आहे. यामध्ये किरत रूपामध्ये आलेल्या शिवाबरोबर युद्ध करणारा अर्जुन, चक्रव्युहात अडकलेला अभिमन्यू, गदा घेऊन दुर्योधनाच्या मागे गेलेला भीम, असे अनेक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. इथून पुढे आपल्याला दिसतो तो भव्य असा गज थर. या संपूर्ण मंदिराचे सगळे वजन या हत्तींनी आपल्या पाठीवर तोलून धरलेले आहे. या कलाकारांनी दगडांमधल्या हत्तींमध्येदेखील प्राण ओतलेले आपल्याला दिसतात.

मंदिराच्या उत्तर भिंतीवर महाभारत कोरले आहे, तर दक्षिणेच्या भिंतीवर रामायण. खाली दिलेले एक श्लोकी रामायण जसेच्या तसे डोळ्यासमोर घडावे, असा तो संपूर्ण पट कोरलेला आपल्याला दिसतो.

आदौ राम तपोवनादि गमनं, हत्वा मृगं कांचनम्|
वैदेहीहरणं जटायुमरणं, सुग्रीवसंभाषणम्॥
वालीनिर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरीदाहनम्|
पश्चाद् रावण कुम्भकर्ण हननम्, एतद्धि रामायणम्॥


मंदिराच्या वरच्या मजल्यावर मुख मंडपाच्या भागात जे वितान आहे, म्हणजेच मंदिराचे जे छत आहे, तिथे आजही हजार वर्षे जुनी काढलेली चित्र आपल्याला बघायला मिळतात. दोन मोठे द्वारपाल मंदिराच्या मंडपात आपले स्वागत करतात. इथे गेल्यावर हे किती गूढ आहे, याची कल्पना आपल्याला येते. या मंडपाला ‘नवरंग मंडप’ असे म्हणतात. इथल्या वितानावर अत्यंत सुंदर नटराजाचे शिल्प आणि अंतराळाच्या जवळ असलेल्या वितानावर, अन्नपूर्णेचे शिल्प कोरलेले दिसते. गर्भगृहात असणार्या शंकराच्या पिंडीला नमन करून, आपण प्रदक्षिणापथावर जातो.

मंदिराच्या शिखराचा भाग इथून अगदी व्यवस्थित बघता येतो. बाह्य भिंतीवर असणारी शिल्प आणि वर चालू होणार्या शिखराचा भाग याच्या मधल्या पोकळीमध्ये, गंधर्वांची शिल्प कोरलेली आहेत. अंधार पडायच्या आत परत येण्याच्या बोलीवर मंदिर बघायला आलेले हे गंधर्व एवढे रममाण झाले की, ते कायमचे तिथेच राहिले. साक्षात गंधर्वदेखील एवढा मोहन जाऊ शकतो असे हे मंदिर आहे, तर आपण तर साधे मनुष्य आहोत!

प्रदक्षिणापथावर अर्धनारी आणि नटराजाची काही शिल्प बघत, आपण परत नवरंग मंडपात प्रवेश करतो. त्या काळामध्ये गावांमध्ये कशी घरे असतील? लोक काय करत असतील? यांची उत्तरे देणारी छोटी छोटी शिल्पेही या खांबांवर कोरलेली आहेत. इथेच डावीकडच्या बाजूला एक मोठी चौकट असून, तिच्या वरच्या बाजूला अतिशय सुंदर नटराजाचे चित्र काढलेले आहे. इतर गोष्टी बघण्याच्या प्राथमिकतेपोटी या नटराजचित्राकडे लोकांचे थोडे दुर्लक्ष होते; पण तुम्ही आत गेलात तर हे चित्र बघायचे अजिबात विसरू नका.

कैलास मंदिर हे केवळ एका पाषाणातून घडवलेले भव्य वास्तुशिल्प नाही, तर ते मानवी चेतना, श्रद्धा आणि आध्यात्मिक उन्नती यांचे शाश्वत प्रतीक आहे. या मंदिराची रचना आपल्याला शून्यातून पूर्णत्वाकडे, पाषाणातून परमात्म्याकडे आणि बाह्यतेतून अंतर्मुखतेकडे जाण्यासाठी प्रेरित करते. ही प्रक्रिया आपल्या जीवनाला अर्थ देणारी प्रक्रिया आहे.

कैलास मंदिर पाहणे म्हणजे केवळ ऐतिहासिक किंवा कलात्मक सौंदर्याचा अनुभव घेणे एवढ्यापुरते मर्यादित नाही, तर ती एक यात्रा आहे. ही यात्रा आपल्याला मनाकडून आत्म्याकडे आणि मर्त्यतेकडून अमर्त्यतेकडे घेऊन जाते. कैलास मंदिराच्या गोपुरातून आत प्रवेश करणे, म्हणजे पृथ्वीतत्त्वाकडून अवकाशतत्त्वाकडे जाण्याचा आरंभ होय.

कैलास मंदिरामध्ये भक्ती, ज्ञान आणि कला अशा तीन गोष्टी एकत्र येऊन आपल्याला दिव्य अनुभव देऊन जातात. मग मंदिर हे फक्त दर्शनापुरते मर्यादित राहत नाही, तर आपला स्वतःचा शोध घेण्यासाठीचे महत्त्वाचे केंद्र होऊन जाते. या उद्देशाने आणि ध्यासाने आपण आपली मंदिरे समजून घेणे अपेक्षित आहे, तुम्ही ज्या वेळेला परत वेरूळ बघायला जाल, त्यावेळेला या गोष्टी नक्की मनामध्ये ठेवा आणि एक सजग दृष्टीने ही मंदिरे, शिल्प बघण्याचा प्रयत्न करा!

इंद्रनील बंकापुरे