नाटक कलाकाराचे चरित्र घडवते. त्याची सर्वांगीण प्रगती नाटकामुळे होते. जीवनातील विविध क्षेत्रांवर नाटकाचा प्रभाव पडतो, त्याचा फायदा नक्कीच कलाकाराला आयुष्यात सर्वत्र होतोच. बालनाट्यामध्ये भूमिका साकारणार्या कलाकारांच्या आयुष्यात नाटकाच्या प्रभावाचा त्यांच्याच भाषेत घेतलेला आढावा...
आयुष्यात कोणाला नायकाची भूमिका करायला आवडणार नाही? पण, आजकालच्या मुलांना खलनायकाचे आकर्षण जास्त असल्याचे मी पाहिले आहे. मी जेव्हा बालपणी नाटकात काम करायचे, तेव्हा बालनाट्य शिबिरात हा प्रश्न हमखास विचारला जायचा की, कोणाला नायक बनायचे आहे? तर ९८ टक्के मुला-मुलींना नायक होण्यातच रस असे. पण, आज तीनपैकी किमान दोन मुलांना खलनायकाचीच भूमिका करायची असते. का? ते अजूनही स्पष्ट झालेले नाही. बहुदा चांगले, गोड, शहाणे वागण्याचा कंटाळा आला असावा. मी खलनायक साकारतो आहे म्हटल्यावर, तुलनेत नायकाच्या बरोबरीची भूमिका ठरते हे मुलांना कळलेले आहे. तसेच, सध्या सिनेमा आणि समाजमाध्यमांमध्ये खलनायकालाच जास्त प्रसिद्धी आणि ग्लॅमरस दाखवले जाते. त्याचे महत्त्व वाढवून, चढवून दाखवले जाते आहे. रावणाला जास्त मोठे आणि प्रभू श्रीरामाला कमी महत्त्व देत, चर्चासत्र घेतलेली मी पाहिली आहेत. त्यामुळेच मुलांना खलनायकाचे कुतूहल जास्त वाटू लागले आहे. चांगल्या आणि वाईट मधली जी रेषा स्पष्ट होती, ती आता पुसट किंवा हलकी ओढली जात आहे? ‘सब चलता हैं,’ गैर काय आहे, हे आपल्याला कळेनासे झाले आहे. चांगले आणि वाईटाला समान तराजूत तोलायला लागलो आहोत का आपण? म्हणजे अगदी साधे उदाहरण घ्यायचे झाले, तर अंगविक्षेप, लहान कपडे घालून, अश्लील शब्दांचा वापर असलेल्या गाण्यावर, चेहर्यावर विचित्र हावभाव आणत नृत्य करणार्या लहान मुला-मुलींसाठी लोकांनी टाळ्या वाजवलेल्या आपण बघतो आहोत. जग अधोगतीला जाते आहे, त्यातले एक कारण हेसुद्धा ठरू शकेल. आज जी मुलं मी तुमच्या भेटीस घेऊन आली आहे, ते माझे विद्यार्थी आहेत. तीनपैकी दोनजणांनी बरेचदा खलनायकाची भूमिका केली आहे, तर एकाने आमच्यातल्या नायकाची भूमिका केली आहे. माझे विद्यार्थी आहेत म्हटल्यावर, चांगल्या आणि वाईटामधली रेष स्पष्ट असते. ती का स्पष्ट हवी, याची कारणे चर्चेतून स्पष्ट करण्यात येतील.
कार्तिक, दिक्षीत वयवर्षे नऊ. हा आमच्या नाटकातला निवेदक आणि नायक, याने नेहमीच सकारात्मक भूमिका साकारल्या. इंद्राक्षी, विश्वकर्मा वयवर्षे १२, विहान दारवेकर वयवर्षे नऊ यांना बहुतांश वेळेला खलनायकाची भूमिका मिळाली आहे. ऐकूया त्यांच्या नाटकाच्या प्रवासाबद्दल. ते त्यांची भूमिका कशी करतात, भूमिकेकडे ते कसे बघतात, याविषयी जाणून घेऊया. या तिघांचाही दोन ते तीन वर्षांचा अनुभव आहे आणि त्यांनी तीन ते सहा बालनाट्यांमधून भूमिका केल्या आहेत. विहानला लघुपटाचासुद्धा अनुभव आहे. पण, आज आपण इथे त्यावर भाष्य करणार नाही. मुलांना बोलते करण्यासाठी ऑनलाईन कॉन्फरन्स कॉल घेऊन केलेल्या चर्चेतून मिळालेली उत्तरे पुढीलप्रमाणे...
नाटकात काम करण्याअगोदरचे तुमचे आयुष्य आणि आताचे कसे वाटते तुम्हाला? विचार करून, वेळ घेऊन सांगा हं.
कार्तिक - मला नाटकात काम करतो का म्हटल्यावर भीती वाटायची. म्हणजे नकोच वाटायचे. पण, ‘सियावर रामचंद्र की जय’ केल्यानंतर ती भीती तर गेलीच, म्हणजे आता शून्य टक्के राहिली आहे. आपल्या महानाट्यामध्येे अभिनय सोडून बाकीच्या गोष्टी पण करायला लागायच्या. जसे की कपडे स्वतःचे स्वतः घडी करून ठेवणे आणि तेसुद्धा वेळेत. आता मी गोष्टी पटापट करतो. नाहीतर अरे कर रे, असे सारखे माझ्या मागे लागायला लागायचे. शिस्त लागली आहे मला. अभिनय म्हणजे काय तेही समजले.
इंद्राक्षी - मला मराठी आवडायचे नाही आणि त्यामुळे मराठीत बोलणारी शाळेतली मुलेसुद्धा आवडेनाशी झाली होती. मला ते काय बोलत आहेत ते कळायचे नाही आणि मग माझी चिडचिड व्हायची. पण, मी मराठी शिकायला तयार नव्हते. काय करायचे आहे मराठी शिकून? असेच वाटायचे. पण, तू म्हणालीस की, तुला मराठी शिकायला लागेल. तू मला वेळ दिलास, मदत केलीस, कोणी माझ्यावर हसणार नाही याची काळजी घेतलीस आणि आश्चर्य म्हणजे, मी मराठी बोलायला लागले. माझ्या आईच्या तर डोळ्यात पाणी येणेच बाकी राहिले होते. मी करून दाखवणार असे ठरवले होते. याआधी मी असे कधी ठरवले नव्हते. आता असे झाले आहे, मराठी का येऊ द्या! आने दो! आणि तुला माहिती आहेच, आता माझे मित्र-मैत्रिणीसुद्धा वाढले आहेत. आधी मी मुलांना आवडायची नाही. पण, आता मी सगळ्यांना आवडते आणि मलाही मी आवडायला लागले आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझ्या अभिनयातही सुधारणा झाली आहे.
विहान - माझ्यात खूप ऊर्जा आहे, तुला तर माहितीच आहे. सुरुवातीला मला एका ठिकाणी बसवून ठेवणे किती कठीण होते, सगळे थकले माझ्या पुढे! मला कुठलीही गोष्ट फार काळ आवडलेली नाही. मी खूप लासेस लावले आजपर्यंत. पण, नाटक सोडले नाही. आता मला तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. मला अजूनही करावेसे वाटते. माझे पण मित्र-मैत्रीणही वाढले आहेत आणि आता मी एका ठिकाणी स्वस्त बसून कामही करू शकतो. हे सगळे मला नाटकानेच शिकवले.
आधी खूप बोअर व्हायचे, पण आता थोडं कमी बोअर होते. म्हणजे नाटकात बोअर होत नाही, बाकी ठिकाणी मी शांत बसतो. निरीक्षण करतो. नाटकात कसे आपले वाय, प्रवेश येईल तोवर वाट पाहायचो अगदी तसेच. याचा सगळ्यात मोठा फायदा मी तर म्हणेन की, माझ्या घरच्यांना माझ्यावर विश्वास बसला की, मी काहीतरी करू शकतो. नाटकातही मी चांगले काम करतो आहे, ही सर्वांत जमेची बाजू आहे. नाहीतर त्याआधी मला कोणीही गंभीरपणे घ्यायचे नाही.
एकूण तुमच्या लिखाणात बदल जाणवतो आहे का तुम्हाला? म्हणजे निबंध लिहिताना मी चांगला लिहू शकतो, असा विश्वास आला आहे का?कार्तिक - अं, मी एक गोष्ट लिहिली आहे. माझ्या घरच्यांना ही माहिती नाही. म्हणजे त्यात एक मुलगा असतो, एक बाई असते आणि एक भाजी विकणारा असतो. या पुढचे मी तुला काही सांगू शकणार नाही. अजून सुरुवातच आहे. पण लिहून पूर्ण झाल्यावर नक्की सांगेन. याबाबत कोणालाच काहीही माहिती नाही आहे.
इंद्राक्षी - आपले नाटक ‘देवघर’ आहे ना, त्याचाच आधार घेऊन मी एक निबंध लिहिला. माझ्या टीचरला तो इतका आवडला की, तोच निबंध ती दुसर्या लासच्या विदयार्थ्यांना पण दाखवते आहे, निबंध कसा असावा म्हणून. पण खरं सांगू रॅडी, तो निबंध म्हणजे ‘देवघर’ नाटकाची थोडयात माहिती आहे. माझी काही दिवस हिंमत होत नव्हती, टीचरला सांगायची; पण माझे खूप जास्तच कौतुक होते आहे, पाहून एक दिवस मी तिला हळूच सांगितले की, निबंधातली कल्पना माझी स्वतःची नाही आहे. मी ज्या नाटकात काम केले होते तिथून उचलली आहे. ती रागावली नाही, हरकत नाही असे म्हणाली.
विहान - माझ्या शाळेत एक नाटक तयार करायचे होते. शेतकर्याचा प्रवास दाखवायचा होता, तो कशी पेरणी करतो आणि शेवटाला त्याने पिकवलेली भाजी आपल्यापर्यंत कशी पोहोचते, असा. मी गोष्टरूपात नाटकाची कथा सांगितली आणि नाटकात असतात तसे प्रवेश पाडले. सगळ्यांना खूप आवडली आणि मग सगळे म्हणाले, आता तूच लिहून काढ. मग मी ती लिहिली आणि आम्ही नाटक सादरही केले.
तुमच्या भाषेवर, बोलण्यावर, तुम्ही केलेल्या भूमिकेतून तुम्ही काय शिकलात? कुठल्या नाटकात काम करायला आवडेल? असे अनेक प्रश्न मी विचारले. मुलांनी फार सुंदर उत्तरं दिली. त्यांची उत्तरं पुढच्या भागात. असेही काही प्रश्न विचारले आहेत, जे या अगोदर मी मागील लेखांमध्ये विचारले नाहीत, नक्की वाचा. लहान मुलांना वाचूनही दाखवा. कारण, मुलांना मोठ्यांवर उशिरा आणि त्यांच्या वयातल्या मुलांवर लवकर विश्वास बसतो. नाटक का केले पाहिजे? हे तुम्हाला त्यांना सांगायची गरजच पडणार नाही.
रानी राधिका देशपांडे