महाराष्ट्रातील भाषावादाच्या पार्श्वभूमीवर, “देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा असून, प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावे,” अशी रा. स्व. संघाची जाहीर भूमिका परवा अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी प्रांत प्रचारकांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मांडली. त्यामुळे ‘मातृभाषेतून शिक्षण’ हा मूलभूत विचार अधोरेखित करण्याबरोबरच, संघ हिंदी भाषा अन्य भाषकांवर लादू इच्छितो, या अपप्रचारही आता धुळीस मिळाला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून आग्रही मानतो व ही संघटना हिंदीभाषक नसलेल्यांवर हिंदी लादू इच्छिते, अशा प्रकारच्या अफवा यापूर्वीही बर्याचदा पसरवल्या गेल्या. पण, मुळात डिसेंबर 1957 सालच्या दरम्यान संघाचे द्वितीय सरसंघचालक प. पू. गोळवलकर गुरुजी यांनी एका मुलाखतीदरम्यान स्पष्टपणे सांगितले की, “मी आपल्या सर्व भाषांना राष्ट्रीय भाषा मानतो. त्या आपल्या राष्ट्रीय वारसा आहेत. देशभरातील वापरामुळे हिंदी राज्यभाषा म्हणून स्वीकारली गेली असली, तरी केवळ हिंदीचे राष्ट्रीय भाषा म्हणून वर्णन करणे चुकीचे ठरेल. आपल्या संस्कृतीचे समान महान विचार व्यक्त करणार्या या देशातील सर्व भाषा 100 टक्के राष्ट्रीय आहेत,” असे श्रीगुरुजी म्हणाले होते. त्यांनी असेही सांगितले की, “जर हिंदीला विरोध करणारे सर्व लोक संस्कृतवर एकमत झाले, तर मला खूप आनंद होईल. देशातील बहुतांश भाषांवर संस्कृतचा खोलवर प्रभाव आहे आणि तो ऐतिहासिक, व्याकरणिक, धार्मिक, सांस्कृतिक, भौगोलिक अशा विविध घटकांवर दिसून येतो. बहुतांश भारतीय भाषांमध्ये (मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, तामिळ) संस्कृतमधून थेट शब्द घेतले गेले आहेत. संस्कृतने भारतीय भाषांमध्ये एक प्रकारची सांस्कृतिक एकसूत्रता निर्माण केली. संस्कृत ही भारतीय भाषांची जननी म्हणून ओळखली जाते आणि तिचा प्रभाव शब्दसंपत्तीपासून ते संस्कृतीपर्यंत, धर्मापासून विज्ञानापर्यंत, भाषिक एकतेपासून ते लोकसाहित्यापर्यंत अखंड आणि सार्वत्रिक आहे.”
जागतिकीकरणाच्या काळात मातृभाषेचे महत्त्व अधिकच वाढलेले दिसते. केवळ भावनिक नाही, तर बौद्धिक, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक दृष्टिकोनातूनही मातृभाषा महत्त्वाचीच. आपली मातृभाषा कोणतीही असो, कोणत्याही विषयांतील मूलभूत संकल्पना समजण्यासाठी मातृभाषा हे सर्वांत प्रभावी माध्यम. मातृभाषेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, आकलनशक्ती आणि विचारशक्तीही अधिक विकसित होते. प्राथमिक शिक्षण जर मातृभाषेतून झाले, तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास दुणावतो. मातृभाषेमुळे आपण आपल्या परंपरा, लोककथा, म्हणी, भावविश्व, श्रद्धा, सामाजिक व सांस्कृतिक मूल्ये यांच्याशी जोडलेले राहतो. एखादी व्यक्ती कितीही निरनिराळ्या भाषा शिकली, तरीही तिचा अंतरात्मा मातृभाषेतच बोलतो. याचा अर्थ इंग्रजीसारख्या जागतिक भाषांचे महत्त्व नाही, असे कदापि नाही, ते आहेच. परंतु, मूलभूत शिक्षण मातृभाषेत आणि माध्यम भाषांमध्ये कौशल्य ही आजच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी कसरतच म्हणावी लागेल.
जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजीसारख्या जागतिक भाषांना अपरिमित महत्त्व दिले जात असले, तरी मातृभाषेचे जागतिक स्तरावर विशिष्ट स्थान आहे. खुद्द ‘युनेस्को’सारख्या जागतिक संस्था मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित करतात. ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ का साजरा केला जातो, तर त्यामागचा उद्देश हाच की, मातृभाषांचे संरक्षण व भाषिक वैविध्याचे व पर्यायाने अनुभवाधिष्ठित पारंपरिक ज्ञानाचे जतन होते. मात्र, आजचे चित्र असे दिसते की, युवकांमध्ये मातृभाषेचा आग्रही वापर होत नसल्याने त्याचे अस्तित्व धोक्यात आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर मातृभाषेला केवळ स्थानच नव्हे, तर सन्मान देणे ही काळाची गरज!
भारतीय ज्ञानपरंपरांमध्ये मौखिक ज्ञानाला खूप मोठे महत्त्व आहे. हे लिपीत दस्तावेजीकरण झालेले ज्ञान असतेच असे नाही. मात्र, ते व्यक्ती व समाज यांच्या अनुभवप्रामाण्यावर पक्के होते. भाषेचा जैवविविधतेशी काय संबंध? असा विचार जर आपण केला तर, स्थानिक भाषा आणि बोली भाषा या निसर्गाबद्दलचे पारंपरिक ज्ञान जपताना दिसतात. जनजाती समाजात अनेक औषधी वनस्पतींची माहिती त्यांच्या मातृभाषेतूनच पुढे जाते. पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी आवश्यक असलेली सांस्कृतिक जैवविविधता ही स्थानिक भाषांमध्ये कोडबद्ध स्वरूपात असते. त्यामुळे मातृभाषा म्हणजे केवळ संवादाचे माध्यम नाही, तर तो निसर्गाशी, समाजाशी आणि संस्कृतीशी जोडलेला एक ज्ञानकोश आहे. अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा एक विशाल मराठी पक्षीकोश प्रसिद्ध आहे. त्याची खासियत अशी की, या पक्षीकोशात भारतात आढळणार्या विविध पक्ष्यांची माहिती असून प्रत्येक पक्ष्याला मराठी, इंग्रजी, प्राकृत, हिंदी, संस्कृत, गुजराती, तेलुगू, कन्नड, तामिळ, कोकणी त्याचप्रमाणे गोंडी, माडिया गोंड, कोरकू, पारधी, कचारी, नेपाळी, बंगाली, भूटानी, मल्याळी, लेपचा, सिक्किमी, सिंहली इत्यादी स्थानिक जनजाती भाषांमध्ये दिलेली नावे त्यांनी दस्तावेजीत केली आहेत. ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या डॉ. सालिम अली यांनी इंग्रजी व लॅटिन भाषेत पक्ष्यांची अशीच सूची 19व्या शतकात केली होती व पक्षीनिरीक्षणातला तो महत्त्वाचा दस्तावेज ठरला. मात्र, त्यांच्यापूर्वीच भाषिक परंपरामध्ये स्थानमाहात्म्यानुसार पक्ष्यांची नावे लोकांनी निश्चित केली आहेत. मातृभाषेचे महत्त्व काय आहे, हे अरण्यऋषींनी पूर्वीच ओळखले होते.
मातृभाषेतील चित्रपट त्या-त्या वर्गापर्यंत सहज का पोहोचतात. कारण, ती त्यांची आत्मभाषा आहे. काही वेळा चित्रपट बनवणार्यांना वाटते की, इंग्रजी किंवा हिंदी वापरल्यास ‘ग्लोबल अपील’ वाढतो. पण, त्यामुळे मातृभाषेचा प्रभाव कमी होतो आणि लोक हळूहळू आपलीच भाषा परकी समजू लागतात. ‘कांतारा’ यशस्वी होतो, सर्व भारतीय भाषांत भाषांतरित होतो. मात्र, मराठीत देवचार किंवा वेताळ, वेतोबा या लोकदेवतेवर सिनेमा काढण्यासाठी कुणी मायचा लाल पुढे येत नाही. संकल्पनांचे हे दारिद्य्र सांस्कृतिक तुटकपणातून येते. मग मराठी प्रेक्षक अन्य चित्रपटांकडे वळतो. पण, आपल्याच भाषेतील चित्रपट बघायला त्याची पाऊले चित्रपटगृहाकडे वळत नाही, अशी रडारड आहेच.
‘युनेस्को’चा अहवाल असेही सांगतो की, मातृभाषेत शिक्षण घेतलेल्या मुलांची आकलन क्षमता, आत्मविश्वास आणि सहभाग अधिक चांगला असतो. बालवयातील शिकण्याची प्रक्रिया मातृभाषेतूनच सर्वांत प्रभावी होते. जर गुणवत्तापूर्ण शिक्षक, आधुनिक पद्धती आणि सुसज्ज सुविधा चांगल्या मराठी शाळांमधून दिल्या गेल्या, तर त्याही श्रेष्ठ पर्याय ठरू शकतात. केवळ भाषिक पातळीवर शिक्षण न देता, मूलभूत शिक्षण कशापद्धतीने देता येईल, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. जर विद्यार्थ्यांना सुरुवातीपासूनच मराठी शाळांमधून चांगले शिक्षण मिळाले नाही, तर मराठी भाषा हळूहळू त्यांच्या शिक्षणातून व नंतर आयुष्यातूनही हद्दपार होत जाईल, तो दिवस दूर नाहीच! चांगल्या मराठी शाळा हव्या असल्यास, कुठल्या राजकीय पक्षाची गरज नाही. आधुनिक काळाच्या गरजा समजून शिक्षण देणार्या संस्था त्यासाठी लागतील. जर्मनी, स्वित्झर्लंड, रशिया, जपान यांनी हे प्रयोग केले. त्यांची सर्वोत्तम उत्पादने आजही त्यांच्या भाषेतील सूचनापत्रासह येतात.
राजकीय पक्षांनी प्रचाराच्या व्यासपीठावर भाषेचा नारा देणे पुरेसे नाही, तर त्यांनी मातृभाषेच्या दृष्टिकोनातून सकारात्मक सामाजिक वातावरण तयार करणेदेखील तितकेच आवश्यक आहे. मातृभाषेचा विकास म्हणजे केवळ भाषेचा नव्हे, तर सामाजिक मूल्यांचा विकास आहे. मातृभाषा टिकली, तर ओळख टिकेल, संस्कृती टिकेल आणि मानवी समाजाचे वैविध्यही टिकून राहील. मातृभाषेवर प्रेम करणारा व्यक्ती इतर भाषाही आत्मसात करू शकतो; पण स्वतःचा आत्मसन्मान हरवून नाही!