पाहता सूर्य... जगू आनंदे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Oct-2020
Total Views |

adya aradhya_1  


माणूस येन-केन प्रकारे धन मिळवून मोठ-मोठाली घरे बांधतोय, जमीन-जुमला व मोटारगाड्या आणि अनेक महागड्या वस्तू घेऊन संपत्तीचे प्रदर्शन करीत आनंदी बनण्याचा व सुमनस होण्याचा प्रयत्न करतोय, पण हा शाश्वत आनंद नाही. जोपर्यंत आत्मज्ञानाचा, वैदिक सत्य ज्ञानाचा सूर्य पाहणार नाही, तोवर तो खर्‍या सुख व आनंदापासून तो वंचित राहणार...!


विश्वदानीं सुमनस: स्याम पश्येम नु सूर्यमुच्चरन्तम्।
तथा करद् वसुपतिर्वसुनां देवाँ ओहानोऽवसागमिष्ठ:॥
(ऋग्वेद-६.५२.५)


अन्वयार्थ

(वयं) आम्ही (विश्वदानीम्) नेहमी, सर्वकाळी (सुमनस:) आनंदी व प्रसन्न मनाने (स्याम) राहावे. (नु) आणि (उच्चरन्तम्) उगवत असलेल्या (सूर्यम्) सूर्याला (पश्येम) पाहत राहावे. (वसुनाम्) संपूर्ण सृष्टीवरील ऐश्वर्य प्रदान करणार्‍या व वसवून घेणार्‍या तत्त्वांचा (वसुपति:) तो महान ऐश्वर्याचा स्वामी (देवान्) सर्व प्रकारच्या दिव्य गुणांना, देवतांना (ओहान:) वहन करणारा आहे. (अवसा आगमिष्ठ:) रक्षणशक्तीसमवेत सर्वत्र येणार्‍या, चहुकडे पसरणार्‍यांमध्ये सर्वश्रेष्ठ असलेला तो परमेश्वर (तथा करत्) तसेच करो. (तशा प्रकारचे कार्य करीत राहो.)

विवेचन

मानवी जीवन म्हणजे एक महासंग्राम होय. कारण यात अनेक द्वंद्वे येतात. उदा. सुख-दु:ख, हानी-लाभ, जय-पराजय, ऊन-पाऊस, गरिबी-श्रीमंती! या सर्व द्वंद्वांना समान दृष्टीने अनुभवावयाचे आहे. या दोन्ही प्रकारच्या द्वंद्वांमध्ये एकसारखी समदृष्टी ठेवत हा जीवनसंग्राम यशस्वी करावयाचा आहे. परमेश्वरीय वेदवाणी मानवाला याकरिता स्फूर्ती व प्रेरणा देते-
“विश्वदानीं सुमनस: स्याम।”


आम्ही सदा सर्वकाळ ‘सुमनस’ म्हणजेच अतिशय आनंदी व प्रसन्न राहावे. आमचे सर्वांग सुमन (फुलासमान) बनावे. कितीही दु:खे आली तरी त्यांना धैर्याने तोंड द्यावे. कारण, सुखाचे व दु:खाचे प्रसंग हे चिरकाळ टिकून राहत नाहीत. ती स्वल्पकालीन असतात. ‘चक्रवत्परिवर्तन्ते सुखानि च दु:खानि च’ ईश्वराच्या या व्यवस्थेकडे पाहा! निसर्गात होणारे बदल... हवा, पाणी, अग्नी, आकाश, पृथ्वी या पंचमहाभूतांमध्ये सतत परिवर्तन आढळते. पृथ्वीवरील समुद्र, पर्वत, नदी-नाले, लता-वेली, झाडे-झुडपी या सर्वांकडे दृष्टिक्षेप टाकल्यास आपणास लक्षात येईल की, ही सर्व तत्त्वे कितीही संकटे आली तरी आनंदी व प्रसन्न राहतात. सर्व पशू-पक्षीदेखील आलेल्या परिस्थितीशी तोंड देत आनंदाचे जीणे जगतात. पण दुर्दैव हे की, अपार बुद्धीचे वरदान लाभलेला मानव मात्र थोड्या-थोड्या गोष्टीने दु:खी होतो. मनाने खचून जातो. नैराश्यामुळे जगण्याची आस सोडून देतो. परिणामी आत्महत्येकडे वळतो.


आजकाल विविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणात आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. त्याचे कारणच हे की, आम्ही आलेल्या प्रसंगांना हसतमुखाने सामोरे न जाता खूपच निराश होतो. धैर्य हरवून बसतो. पण याला जगणे म्हणत नाहीत. हा तर एक प्रकारे मृत्यूच होय. एका कवीने म्हटले आहे-
जिंदगी जिंदा दिली का नाम है। मुर्दादिल क्या खाक जिया करते हैं॥
सांसारिक नैराश्याने ग्रासलेल्या मानवसमूहाला जगण्याचे नवे बळ देत महाराष्ट्रवाल्मिकी, कविवर्य ग. दि. माडगुळकर आपल्या प्रेरक गीतातून म्हणतात-
झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा,
फुलला पाहा सभोती आनंद जीवनाचा!
होईल ताप काही मध्यान्हिच्या उन्हाचा,
अविचार सोड असला कोल्हाळ कल्पनांचा,
आस्वाद घे सुखाने येत्या नव्या क्षणांचा!


काही जरी झाले तरी आपण सर्वस्वी आनंदी असावयास हवे. दु:ख व निराशेचे तिमिर नाहीसे करून नेहमी उत्साही बनावयास हवे. आम्ही आनंदाने, प्रसन्नतापूर्वक व हर्षमनाने जगावे, हे खरे! पण असे हे जगणे तेव्हाच सार्थक ठरेल, जेव्हा आमचा संबंध ज्ञानाशी, सत्यविद्येशी, आत्मकल्याणाशी येईल! अन्यथा या जगात अज्ञानात व अविद्येत रममाण होणारे पामरदेखील इंद्रिय सुखात वावरताना दिसतील. अशा या भौतिक सुखालाच ते शाश्वत आनंद समजतात. पण, हा खरा आनंद नव्हे. या आनंदाच्या मुळाशी अज्ञान जडल्याने त्याचा शेवट दु:खातच होतो. सदरील मंत्रात पुढे म्हटले आहे - “पश्येम नु सूर्यमुच्चरत्।” आम्हाला जर काय चिरस्थायी व चिरकाळी आनंदी राहावयाचे असेल, तर आम्ही दररोज उगवणार्‍या सूर्याकडे पाहत राहावे...! सूर्य हा प्रखर तेजस्वी, गतिमान, प्रकाशमान आणि आपल्या उत्पादक शक्तीने जगाला उत्पन्न होण्यासाठी प्रेरणा प्रदान करणारा आहे. सूर्य हा तेजाचे प्रतीक! जसजसा तो वर सरकतो, तसातसा अंधार नाहीसा होतो आणि सर्वत्र प्रकाश पसरतो. मग काय सार्‍या सृष्टीत आनंदाचे वातावरण निर्माण होते. कवयित्री शांता शेळके यांच्या समधुर काव्यातून सूर्याचा महिमा किती प्रेरणादायक आहे, हे उमगते-
बघ आई आकाशात सूर्य हा आला,
पांघरुन अंगावरी भरजरी शेला।
निळ्या याच्या महालाला खांब सोनेरी,
मोतियांच्या लावियेल्या आत झालरी।
केशराचे घातलेले सडे भूवरी
त्यावरून येई त्याची डौलाने स्वारी।



पण, आकाशातील या बाह्य सूर्याबरोबरच आमचा आंतरिक ज्ञानसूर्य उगवला पाहिजे. यासाठीच संत ज्ञानेश्वर म्हणतात- ‘विश्व स्वधर्म सूर्ये पाहो!’ सार्‍या जगाने आपल्या स्वकर्तव्याचा सूर्य पाहावा. अज्ञानरूपी काळोखात जगणारे असंख्य जीवही जगतातच. नानाविध अंधश्रद्धा, विविध दुर्गुण-दुर्व्यसने, कामक्रोधादी षड्रिपूंना बळी पडून त्यातून मिळणार्‍या आसुरी, तामसी सुखामध्ये आनंद मानून व्यर्थपणे चाचपडत राहणे योग्य नव्हे. आज सारे जग सर्व प्रकारच्या अज्ञानाला बळी पडत आहे. मग ते धार्मिक क्षेत्रातील असो की सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील! तर दुसरीकडे येन-केन प्रकारे धन मिळवून मोठ-मोठाली घरे बांधतोय, जमीन-जुमला व मोटारगाड्या आणि अनेक महागड्या वस्तू घेऊन संपत्तीचे प्रदर्शन करीत आनंदी बनण्याचा व सुमनस होण्याचा प्रयत्न करतोय, पण हा शाश्वत आनंद नाही. जोपर्यंत आत्मज्ञानाचा, वैदिक सत्य ज्ञानाचा सूर्य पाहणार नाही, तोवर तो खर्‍या सुख व आनंदापासून तो वंचित राहणार...! शेवटी या मंत्रात ऐश्वर्याचा तो अधिपती परमेश्वर दिव्य गुणांचा वाहक असल्याचे विशद केले आहे. खरोखरच भगवंत अनेक दिव्यतत्त्वांना धारण करतो. तो आपल्यामध्ये महद्गुणांना वसवून घेतो. तो समग्र ऐश्वर्याचा स्वामी आहे. त्याच्याकडे समग्र जगाचे रक्षण करण्याचे सामर्थ्य आहे. अशा महान परमेश्वराच्या सान्निध्यात राहून बुद्धिमान मानवाने आपलेही भौतिक व आध्यात्मिक ऐश्वर्य वाढविण्याचा प्रयत्न करावयास हवा. असे झाले तर निश्चितच जीवन सुखी-समृद्ध व आनंदी बनते. यामुळे आपली जीवनयात्रा सफल ठरते.

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
@@AUTHORINFO_V1@@