उघडली दृष्टी इंद्रिया सकट वैंकुठाची वाट पंढरी जाणा

    05-Jun-2025
Total Views |
 
Saint sopandev Palkhi tradition
 
पावसाळा सुरू झाला की आषाढी एकादशीचे वेध लागतात. पांडुरंगाच्या भक्तिरसात अवघा महाराष्ट्र न्हाऊन निघतो. प्रत्येक हृदयाच्या गाभार्‍यातून ’पांडुरंग हरी, वासुदेव हरी’चा निनाद उठतो. पंढरीच्या वाटा जिवंत होतात, त्या वाटेवरून चालत असतात संत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताई, एकनाथ, नामदेव, तुकाराम... त्यांच्या पाऊलखुणा म्हणजेच महाराष्ट्राच्या आध्यात्मिक वारशाची गाथा. संतांच्या या पालख्या म्हणजे चालती-फिरती भक्तीची विद्यापीठे, जिथे श्रद्धा हा श्वास आहे आणि समर्पण हा धर्म. या विशेष तीन भागांच्या सदरातून आपण या संतांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहोत. प्रत्येक संतांची पालखी, त्याचे वेगळेपण, मार्गिका आणि या पालख्यांमागची परंपरा उलगडत जाणार आहोत. आजच्या पहिल्या भागात संत सोपानदेवांच्या पालखी परंपरेविषयी... 
 
भक्त आणि भगवंताच्या भेटीचा नयनरम्य सोहळा म्हणजेच वारी होय. अनेक संतांचे पालखी सोहळे यानिमित्ताने पंढरपुरात येतात, त्यामध्ये संत सोपानदेवांचीही पालखी असते. संत ज्ञानेश्वरादि भावंडांत तिसर्‍या क्रमांकाचे स्थान संत सोपानदेव यांचे. संत सोपानदेवांची समाधी पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र सासवड येथे असून या ठिकाणी समाधीची पूजा व्यवस्था गोसावी मंडळींकडे आहे. साधारण 125 वर्षांपूर्वी पंढरपूर येथील फडकरी धोंडोपंतदादा अत्रे यांच्या पुढाकाराने या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. पुढे काही कारणाने त्यांनी अंग काढून घेतल्यावर पालखी सोहळ्याची सर्व जबाबदारी गोसावी मंडळींकडे आली. तेव्हापासून गोसावी मंडळी हा पालखी सोहळा पार पाडत आहेत.
 
ज्येष्ठ वद्य द्वादशीला संत सोपानदेवांच्या पालखीचे प्रस्थान होते. यावर्षी दि. 23 जून रोजी सोपानदेवांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. द्वादशीच्या दिवशी प्रस्थानसमयी ’माझ्या वडिलांची मिराशी गा देवा’ हा अभंग म्हटला जातो. त्यानंतर सोपानदेवांच्या पादुका पालखीत आणून ठेवल्यानंतर, सर्व मानकर्‍यांना नारळ प्रसाद दिल्यानंतर पालखी सोहळा मार्गस्थ होतोे. पांगारे, मांडकी, निंबूत, सोमेश्वरनगर, कोर्‍हाळे, माळेगाव, बारामती, लासूर्णे, निरवांगी, अकलूज, बोंडले, भंडीशेगाव, वाखरीमार्गे ही पालखी पंढरपूरला पोहोचते. या पालखीच्या प्रवासादरम्यान एक गोल आणि दोन उभ्या रिंगणाबरोबरच एक बकरी रिंगणही होते. बकरी रिंगण हे सोपानदेवांच्या पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य. या रिंगणात पिंपळी गावातील धनगर समाज त्यांच्या शेळ्या घेऊन सोपानदेवांच्या पालखीच्या इथे येतात. या शेळ्या पालखीच्या सभोवताल गोलाकार फिरल्यानंतर विठ्ठल नामाच्या गजर होतो आणि रिंगण पूर्ण होते. तसेच टप्पा येथे होणारी संत ज्ञानेश्वर महाराज व संत सोपानदेवांच्या पालखीची भेट ही बंधू भेट म्हणूनही प्रसिद्ध आहे.
 
आषाढ शुद्ध दशमीला सोपानदेवांची पालखी पंढरपुरात प्रवेश करते. दशमी ते चतुर्दशी पालखीचा मुक्काम पंढरपूर येथील सोपानदेव संस्थानच्या मठात असतो. त्यानंतर एकादशीच्या दिवशी ही पालखी पंढरपुरात नगरप्रदक्षिणेला निघते. चंद्रभागास्नानही होते. पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपूर येथे काला झाल्यानंतर, सोपानदेवांची भेट विठ्ठल-रुक्मिणी यांच्याशी होते. या भेटीनंतरच पालखीचा परतीचा प्रवास सुरू होतो. आषाढ वद्य षष्ठीला पालखी सासवडला परत येते. सोपानदेवांची पालखी परत मूळ मुक्कामी परत आल्यानंतर थोड्याच वेळात, ज्ञानेश्वर माऊलींची पालखीही सोपानदेव समाधी मंदिरात मुक्कामी येते.
 
हभप त्रिगुण महाराज गोसावी
संत सोपानकाका पालखी सोहळा प्रमुख