आनंदाचा झरा अंतर्मनातून उगम पावतो, बाहेरून नव्हे हे तत्त्व माणसाला समजून देणारे कार्य जीवनविद्या मिशन गेली शतकभर अविरतपणे करत आहे. आज समाजात तणाव, असंतोष, स्पर्धा आणि अपयश यामुळे माणूस अस्वस्थ झाला आहे. अशा काळात ‘जीवनविद्या’ हा विचार एक संजीवनी ठरतो. जीवनातील समस्या दूर करण्याचा, आत्मशांतीचा आणि खरे सुख शोधण्याचा मार्ग ‘आत्मज्ञानात’ आहे, यावरच जीवनविद्येचा भर असतो. जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै यांनी ‘मुंबई तरुण भारत’च्या वाचकांसाठी आत्मिक आनंदाच्या प्राप्तीसाठी साधलेला हा संवाद...
१) जीवनविद्येच्या प्रसाराचे नेमके उदिष्ट आणि त्याचा नेमका संदेश काय?
समाजामध्ये आज अनेक प्रलोभने आढळतात. ती कालही होती, आजही आहेत आणि उद्याही असणारच आहेत. कारण, पैशाने येणार्या सुखसोयी प्रत्येकाला हव्याशा वाटतात. विषयसुखामध्ये माणूस अडकतो. आज सुखाची अपेक्षा असणार्या प्रत्येकाला ते सुख पैशाने मिळते, असेच वाटते. त्यासाठी वाटेल ती धडपड तो करतो. पैशाचे आकर्षण आबालवृद्धांमध्ये आपल्याला सहज दिसते. ज्या प्रलोभनांना माणूस ‘सुख’ म्हणतो, त्याला जीवनविद्या ’सुखसोयी’ म्हणते. या प्रलोभनांच्या उपभोगाने आपली उत्तम सोय होते; त्यातून सुख मिळत नाही. मन:शांतीची गरज प्रत्येकालाच आहे. ही मनःशांती पैसा, अधिकार यांनी मिळण्याची माणसाला आशा असते. त्यामुळे उत्तम आरोग्य, पुढच्या पिढीचे कल्याण, गाडी, बंगला यांनी सुख मिळेल, असा विचार कायमच मनात येतो. मात्र हे शाश्वत नाही. मानवाची हाव एवढी असते की, माणूस धड पडेपर्यंत धडपड करतो! माणसाला देव पाहिजे, म्हणजे नेमके काय, हेच माहीत नाही. माणूस प्रापंचिक असो अथवा आध्यात्मिक; दोघांनाही शाश्वत सुखाची आस आहेच. हे सुख म्हणजे काय आणि ते मिळवायचे कसे, हेच जीवनविद्या शिकवते.
२) तुमचं नशीब तुम्हीच घडवता, ही जीवनविद्येची शिकवण एखाद्या सामान्य माणसाने दैनंदिन आयुष्यात कशी आचरणात आणावी?
रोजच्या जीवनामध्ये ही शिकवण आचरण्यासाठी, त्याचे पूर्ण ज्ञान आवश्यक आहे. सद्गुरू म्हणतात की, सुख ही मिळवण्याची गोष्ट नाही, तर ती देण्याची गोष्ट आहे. याचा बारकाईने विचार केल्यास आपल्या लक्षात येईल की, आपल्याला पैसा मिळवता येतो, पण सुख नाही. आज जगातील प्रत्येक श्रीमंत सुखी आहेच, असे नाही. ज्या आनंदाचा अनुभव घेतो, तो आनंद म्हणजे नेमके काय, असे विचारल्यास आपण सांगू शकत नाही. कोणतेही सुख इंद्रियांच्या माध्यमातूनच अनुभवता येते; पण सुखाची परिभाषा करता येत नाही. सुखाची आस पुन्हा लागते, कारण ते शाश्वत नाही. शाश्वत सुख मिळवावे लागत नाही, ते आपल्याकडेच असते. आपण सुखीच असतो; उगाच सुखाच्या शोधात बाहेर फिरतो. ‘तुज आहे तुजपाशी, परि तू जागा चुकलासि’ अशी माणसाची अवस्था असते. कारण, त्याला रोजचं सुख नको असत, तर रोज नवीन सुख हवं असत. विषयसुख हे प्रपंचाच्या आनंदासाठी हवेच. मात्र, त्यात अडकणे टाळता आले पाहिजे. थांबायचे कुठे हे समजले पाहिजे. आत्मानंद हेच शाश्वत सुख आहे, जे आपल्यापाशीच आहे. अध्यात्माचे उदिष्ट स्वस्वरुपाची जाणीव करणे आहे; मानवाने हा आनंद अनुभवला पाहिजे. यासाठीच साधनेची आवश्यकता असते. म्हणूनच प्रत्येकाला शय होईल, असा सुलभ उपाय सद्गुरूंनी सांगितला. सुख ही मिळविण्याची गोष्ट नाही तर सुख हे देण्यानेच मिळते, म्हणून सुख दया सुख घ्या.
३) कुटुंबव्यवस्था ही भारतीय समाजाचे वैशिष्ट्य आहे. असे असतानाही, आज अनेक घरांमध्ये सतत भांडणे, मतभेद, तणाव वाढत आहे. त्यामुळे कुटुंबव्यवस्था धोयाच्या पातळीकडे सरकत आहे. अशा वेळी नात्यांमध्ये प्रेम टिकण्यासाठी काय उपाय सूचवाल?
कुटुंबव्यवस्था ही कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकलीच पाहिजे. आज नवरा आणि बायको दोघेही घरामध्ये कमावते आहेत. ‘करिअर’ या गोंडस नावाखाली दोघेही पैसे कमावण्याच्या मागे लागलेले आहेत. करिअरचे उद्दिष्ट हे उच्च पदप्राप्ती आणि अमाप पैसा हेच असल्याने, दोघांमधील संवाद आणि सहवास कमी झाला आहे. परिणामी, कुटुंबव्यवस्थेला हानी पोहोचत आहे. मग असा प्रश्न निर्माण होतो की, करिअर करूच नये का? तर तसे नाही. देशाच्या विकासासाठी प्रत्येकाचे करिअर महत्त्वाचे आहेच. मात्र, दोघांनी एकमेकांच्या साथीने कुटुंब आणि करिअर यांचा समन्वय साधला पाहिजे. दोघेही बाहेर असल्याने, मुलांवर संस्कार कोण करणार, हा प्रश्न निर्माण होतो. आजी-आजोबा घरात असतील, तर दोघांनाही करिअरला उत्तम वेळ देता येेतो. आजी-आजोबा लहानग्यांवर संस्कार करतात. एकत्र कुटुंबपद्धतीचे अनेक फायदे आहेत.
४) आयुष्यात अपयशी झाल्यावर माणूस रागावतो. इतरांना, नशिबाला दोष देतो. अशा वेळी आध्यात्मिक दृष्टिकोन कसा मार्गदर्शक ठरू शकतो?
यशापयशाचे चक्र आयुष्यात सुरूच असते. अशा वेळी अपयश आल्यावर निराश न होता, अपयशाच्या कारणांचे चिंतन केल्यास, यशाचा मार्ग सुकर होतो. अपयश कोणालाच चुकले नाही. यशाचा मार्ग चालताना आलेले अपयश आपल्याला आधी स्वीकारता आले पाहिजे. सद्गुरूंनी याबाबत मार्गदर्शन करताना एक सिद्धांत मांडला की, वस्तुस्थितीचा स्वीकार करून त्याला सुरेख आकार देण्यामध्येच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. आज अपयश स्वीकारण्यात अडचणी येतात. अपयशाची जबाबदारी दुसर्यांवर ढकलण्याने तणाव अधिक वाढतो. त्यामुळे अपयशाचा स्वीकार महत्त्वाचा, तेवढेच चिंतनातून यशाचा मार्ग शोधणेही महत्त्वाचे. जीवनविद्या यावर अधिक सखोल भाष्य करते. वस्तुस्थितीचा स्वीकार करायचा म्हणजे काय? यात मन शांत करणे महत्त्वाचे आहे. आपल्या मनामध्ये विचारांची चक्रे अव्याहत सुरू असतात. आपल्यातील ईश्वरी शक्ती ही अंतर्मनात असते. ही शक्ती आपल्याला योग्य-अयोग्याचे मार्गदर्शन करते. पण बहिर्मनातील गोंधळामुळे अंतर्मनाचा कौल समजत नाही. त्यामुळे अपयश आल्यावर पहिल्यांदा मन स्थिर असणे आवश्यक आहे. त्यामुळे अंतर्मनाचा कौलही समजेल आणि योग्य मार्गही सापडेल. म्हणून मनस्थिती बदला की परिस्थितीही बदलेल.
५) आपण अनेक गोष्टी करण्याचे ठरवतो. मात्र, त्या प्रत्यक्ष कृतीत आणणे कठीण होते. हे अंतर कसे मिटवता येईल?
संकल्प करणार्यांची संख्या फार पूर्वीपासूनच खूप आहे, तो सिद्धीस नेणार्यांची संख्या कमी आहे. कोणत्याही साध्यासाठी साधना महत्त्वाची. शिकण्यासाठी अभ्यास, आरोग्यासाठी व्यायाम ही साधना झाली. संकल्पसिद्धीसाठी स्वतःमध्ये लहान लहान सकारात्मक बदल करत जाणे आवश्यक ठरते. जपानमध्ये या तंत्राला ‘कैझन’ म्हणतात. बदल घडवण्यासाठी आधी इच्छा हवी. बदल एका रात्रीत घडत नाहीत. त्यामुळे लक्ष्ये लहान लहान ठेवावी. जसे की, एखद्याला राग येत असेल, तर तो स्वयंसूचना करू शकतो की, मी दिवसेंदिवस शांत होत आहे. जीवनविद्येच्या माध्यमातून आम्ही हे शिकवतो. तसेच, जसे उपवास करतो, तसेच एक दिवस रागाचाही उपवास करायचा आणि हळूहळू दिवसांची संख्या वाढवत नेता येते. यासाठी जे ज्ञान आवश्यक आहे, ते आम्ही जीवनविद्येच्या माध्यमातून देतो. दररोज २० मिनिटे विश्वप्रार्थना लक्षपूर्वक केल्यासही चित्त स्थिर होते. म्हणून घरी मुलांसमवेत सर्वांनीही विश्वप्रार्थना केली पाहिजे.
६) दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वाचकांना काय संदेश द्याल?
आनंद वाटा आणि आनंद लुटा, हा सद्गुरूंचाच संदेश सर्वोत्तम आहे. यामुळे सगळ्या जगात सुख, शांती, समाधानाचे वातावरण निर्माण होईल. सर्वसामान्यांसाठी ही साधना अतिशय उपयुक्त आहे. साक्षात्कारी महापुरुष सतत आनंदी दिसतात आणि आनंदाचे दानच करतात. तुम्ही प्रत्येक क्षणाला आनंद वाटत राहा, म्हणजे तुमचा प्रत्येक क्षण सण होईल! प्रपंचात राहून करता येण्यासारखी ही साधना आहे. सद्गुरूंनी प्रेमाचीही व्याख्या केली आहे, एकमेकाला सुखी करण्याची भावना म्हणजे प्रेम होय! असे प्रेम आपण प्रत्येकावर केले तर कुटुंबात,समाजात,देशात आणि जगामध्ये सुखाचा प्रसार होणे सहजशय आहे. म्हणूनच सद्गुरूंचा सदेश आहे आनंद वाटा आणि आनंद लुटा...
प्रल्हाद वामनराव पै
इ.ढशलह, खखढ र्चीालरळ
आजीव विश्वस्त, जीवनविद्या मिशन