शरणागती कशाला म्हणतात, त्याची असंख्य उदाहरणे काँग्रेसनेच देशासमोर ठेवलेली आहेत. बांगलादेशच्या युद्धात पाकिस्तानचे विभाजन करूनही पाकव्याप्त काश्मीर आणि भारताचे युद्धकैदी इंदिरा गांधी यांना परत मिळविता आले नाहीत. उलट, पाकिस्तानचा जिंकलेला भूभाग आणि त्याचे ९३ हजार सैनिक यांना भारताने पाकिस्तानला परत केले. त्याला ‘शरणागती’ म्हणतात. चिनी कम्युनिस्ट पार्टीबरोबर केलेला गुप्त समझोता, हे काँग्रेसच्या आणखी एका शरणागतीचे ताजे उदाहरण. त्यामुळे मोदींनी पाकिस्तानलाच नव्हे, तर अमेरिकेलाच शरणागती पत्करायला लावली आहे.
पहलगाम हत्याकांडानंतर भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या तडाख्याने केवळ चार दिवसांतच पाकिस्तानला दाती तृण धरायला लावले आणि त्याने भारताची लष्करी कारवाई थांबविण्याची याचना केली. पण, ही याचना खरे म्हणजे अमेरिकेने केली होती. कारण, पाकिस्तानात दडवून ठेवलेल्या आपल्या अण्वस्त्रांना भारत नष्ट करू शकतो, याची कल्पना अमेरिकेला आल्यावर त्यांनी पाकिस्तानमार्फत भारतापुढे युद्धबंदीची विनंती केली, अशाही चर्चा नंतर रंगल्या. भारताने या लष्करी कारवाईद्वारे आपले लक्ष्य साध्य करून पाकिस्तान, अमेरिका आणि जगाला योग्य तो संदेश पोहोचविला होता. त्यामुळे भारताने आपली कारवाई तात्पुरती स्थगित केली. हा सारा घटनाक्रम भारताच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने जगातील अनेक देशांपर्यंत पोहोचविला आणि भारताच्या भूमिकेला जागतिक पाठिंबा मिळविला. कोणत्याही देशप्रेमी भारतीयाचे मन या घटनेने अभिमानाने भरून जाईल. दुर्दैवाने भारताला देशद्रोही वृत्तीच्या लोकांचा शाप पुरातन काळापासून मिळाला आहे. आजही देशभक्त नागरिकांप्रमाणेच भारतात काही देशद्रोही नागरिकही आहेत. त्यांनी मात्र या कारवाईचा उफराटा अर्थ काढून भारताला कमीपणा आणण्याचा प्रयत्न चालविलेला दिसतो. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे अशा भारतविरोधी गटाचे मेरूमणी ठरले आहेत.
राहुल गांधी यांनी आजपर्यंत ‘ऑपरेशन सिंदूर’च्या बाजूने एकही वक्तव्य केलेले नाही. उलट, त्यांची या कारवाईवरील पहिली प्रतिक्रिया होती की, ‘भारताची किती लढाऊ विमाने शत्रूने पाडली,’ ही! म्हणजे, त्यांना भारतीय सैन्यदलांनी केलेल्या दिग्विजयाचे कसलेच कौतुक नव्हते. उलट भारताची हानी किती झाली, याचीच त्यांना उत्सुकता अधिक. हे वक्तव्य देशप्रेमी भावनेचे द्योतक नक्कीच म्हणता येणार नाही. अलीकडेच त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने मात्र त्यांच्या आजवरच्या विरोधी वक्तव्यांवरही ताण केली. राहुल गांधी यांनी नुकतेच भोपाळमध्ये भाषण करताना अमेरिकेच्या दबावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानपुढे शरणागती पत्करल्याचा दावा केला. त्यासाठी त्यांनी ‘नरेंदर सरेंडर’ असा भडक शब्दप्रयोगही केला. आपण काहीतरी चटकदार, दिव्य आणि नाट्यपूर्ण वक्तव्य केल्याची राहुल गांधी यांची समजूत झाली असावी. पण, त्यांच्या या वक्तव्याने त्यांनी काँग्रेसचे जे भयंकर नुकसान केले आहे, ते लवकर भरून येणार नाही. त्यांनी या वक्तव्याने आपल्या पक्षाला सामान्य जनतेपासून बर्याच प्रमाणात तोडले आहे, त्याची त्यांना कल्पना आलेली नाही. आगामी निवडणुकीत त्यांच्या पक्षाला याचे उत्तर मिळेल. अर्थात, त्यामुळे राहुल गांधी यांना काहीच फरक पडणार नाही. असो.
भारताने आपली भूमिका आणि पाकिस्तानचा खरा दहशतवादी चेहरा जगापुढे सादर करण्यासाठी अनेक देशांमध्ये खासदारांची शिष्टमंडळे पाठविण्याचा निर्णय घेतला. या आठ शिष्टमंडळांमध्ये सर्व पक्षांच्या खासदारांचा समावेश होता आणि काही शिष्टमंडळांचे नेतृत्व तर विरोधी पक्षांच्या खासदारांनी केले. परिणामी, या कारवाईला भारतातील सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे आणि भारत या कारवाईत एकजुटीने उभा आहे, असे चित्र जगापुढे उभे राहिले. या शिष्टमंडळांतील काँग्रेस, तृणमूल काँग्रस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांसारख्या पक्षांच्या नेतृत्त्वाखालील खासदारांनी पक्षाची भूमिका बाजूला ठेवून भारताची बाजू ठाशीवपणे जगापुढे मांडली. पण, नेमकी हीच गोष्ट राहुल गांधी यांना खटकली असून, त्यांनी या शिष्टमंडळातील आपल्याच पक्षातील अनुभवी आणि ज्येष्ठ खासदारांना एकटे पाडले. राहुल गांधी यांनी आजवर इतकी टोकाची आणि उघडपणे भारतद्रोही भूमिका घेतलेली नव्हती. या ताज्या वक्तव्याने त्यांनी भारताच्या हितशत्रूंपुढे लोटांगण घातल्याचे जनतेला दाखवून दिले. चिनी कम्युनिस्ट पक्षाशी केलेल्या गुप्त समझोत्याचाच हा कदाचित परिणाम असावा.
शरणागती कशाला म्हणतात, ते भाजपचे विद्वान खासदार व प्रवक्ते डॉ. सुधांशु त्रिवेदी यांनी स्पष्ट केले आहे. भारताने पाकिस्तानशी केलेल्या सर्व युद्धांमध्ये विजय मिळविला, पण युद्धानंतर केलेल्या तहाच्या बोलण्यात या विजयावर पाणी फेरले. बांगलादेश युद्धात तत्कालीन पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि बांगलादेशची निर्मिती केली. पण, त्यानंतर शिमला करारात पाकिस्तानकडून काहीच पदरात पाडून घेतले नाही. ना पाकव्याप्त काश्मीरचा भूभाग परत मिळविला, ना भारताच्या ५४ युद्धकैद्यांना मुक्त करविले. इतकेच नव्हे, तर पश्चिम पाकिस्तानात जिंकलेला हजारो किलोमीटरचा प्रदेशही पाकिस्तानला परत केला. पाकिस्तानच्या ९३ हजार शरणागत सैनिकांना बिनशर्त पाकिस्तानच्या स्वाधीन केले. याला ‘शरणागती’ म्हणतात. १९६५च्या युद्धातही लाहोरपर्यंतचा जिंकलेला मुलुख पाकिस्तानला बिनशर्त परत करून टाकला. त्यापूर्वी चीनने तिबेटवर आक्रमण करून त्या स्वतंत्र देशावर कब्जा केल्यावर, तिबेट हा चीनचाच भाग असल्याचे तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरू यांनी मान्य केले. याला ‘शरणागती’ म्हणतात. मुंबईवर दि. २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भीषण हल्ल्यात १७७ नागरिकांचे बळी गेले. त्यानंतर पाकिस्तानकडे केवळ कागदी निषेध व्यक्त करून त्या देशावर कोणतीही लष्करी कारवाई केली नाही, याला ‘शरणागती’ म्हणतात. पण, राहुल गांधी यांची शरणागतीची व्याख्याच वेगळी आहे.
या शिष्टमंडळातील काही प्रादेशिक पक्षांच्या खासदारांनीही जी भावना व्यक्त केली, ती काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाला व्यक्त करणे जमले नाही. यावरून हा पक्ष आता देशाच्या हितसंबंधांपासून किती दूर गेला आहे, ते दिसून येते. भारताला विश्वगुरू बनविण्याचे नरेंद्र मोदी यांचे स्वप्न हे आता प्रत्येक भारतीयाचे स्वप्न बनले आहे. पण, विश्वगुरू म्हणजे जगाचा हुकुमशहा बनणे, ही भारताची कल्पना नाही. जागतिक व्यवहाराच्या केंद्रस्थानी भारताला ठेवणे आणि सार्या जगाला आपल्याबरोबर घेऊन विकास साध्य करणे, ही भारताची विश्वगुरुत्वाची संकल्पना आहे. प्रस्थापित महासत्तांना भारताचे हे वर्चस्व नको असल्याने त्यांनी भारताला आतून पोखरण्यासाठी राहुल गांधी यांच्यासारखे नेते पाळले आहेत. पण, मोदी यांनी प्रत्येक भारतीयात जागविलेला आत्मविश्वास हा इतका प्रबळ आहे की, त्यापुढे राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्यांचा टिकाव फार काळ लागणे शय नाही.