‘स्वप्नील’ संघर्षातून यशाचा मार्ग

    09-Jun-2025
Total Views |
inspirational story of dr. swapnil tambe

ही प्रेरणादायी कहाणी आहे, डॉ. स्वप्नील तांबे यांची; एका वंचित पार्श्वभूमीतून आलेल्या तरुणाची; ज्याने अपयश, उपेक्षा आणि अडथळ्यांतून जिद्दीने मार्ग शोधला.


स्वप्नील तांबे यांची कहाणी ही केवळ एका माणसाच्या यशाची नाही, तर ती हजारो तरुणांच्या मनात आशेचा नवा किरण पेरणारी एक जिवंत प्रेरणागाथा आहे. स्वप्नील यांच्या आयुष्यात आरंभापासूनच संघर्षाचा वावर होता. वडील भारतीय नौदलात कार्यरत असल्यामुळे त्यांचे बालपण सतत शहरांमधून फिरण्यात गेले. त्यामुळे त्यांना कोणतीही जागा घरासारखी वाटली नाही, कोणतेही नाते खोलवर रुजले नाही. त्यात समाजाकडून आणि जवळच्या नातवाईकांकडून मिळालेली उपेक्षा ही वेगळीच! ते अनुसूचित समाजाच्या पार्श्वभूमीतून आलेले असल्यामुळे त्यांच्या स्वप्नांकडे लोकांनी तुच्छतेने पाहिले. पण, त्यांनी अपमान गिळून, न थांबता, तोच अपमान आत्मिक इंधन बनवून आपला प्रवास सुरू ठेवला. लहान वयातच पेन ड्राईव्ह, अगरबत्ती आणि किरकोळ वस्तू विकण्यास सुरुवात केली. गरज केवळ स्वतःची नव्हती, तर कुटुंबाला उभे करण्याचीही होती. दहावीच्या परीक्षेनंतर इतर मुलांप्रमाणे महाविद्यालयांच्या माहितीपत्रकांकडे न पाहता, ते नोकरीच्या जाहिराती शोधत होते. पण, जीवन सरळसोट नसते. अपुर्या मार्गदर्शनामुळे ते चुकीच्या संगतीत पडून अमली पदार्थ व दारूच्या आहारी गेले. यामुळे त्यांना शिक्षणात अपयश येऊन एका दूरध्वनी केंद्रात केवळ तग धरून राहण्यासाठी काम करावे लागले. भोळेपणाचा फायदा घेत अनेकांनी त्यांची फसवणूक केली. ते तुटले, हरले, पण पूर्णपणे कोसळले नाहीत. मात्र, त्यांच्या अंतरात्म्यात एक आग सतत पेटलेली होती. केवळ आठ हजार रुपये महिना पगारावर ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ची नोकरी करत असतानाच, त्यांनी पुन्हा शिक्षण सुरू केले. पदवी घेतली आणि नंतर व्यवस्थापनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले आणि अखेर ‘डॉटरेट’ही मिळवली. हे सर्व करतानाच त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा करून स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचे ठरवले.

मोठ्या पगाराची नोकरी नाकारून त्यांनी स्वबळावर व्यवसाय सुरू केला खरा. पण, प्रारंभीच दोन भागीदारांकडून त्यांची फसवणूक झाली. तेव्हाही त्यांनी हार मानली नाही. लहानसहान कार्यक्रम स्वीकारले. कारण, हेतू केवळ कमाई नव्हता, तर मोठे काही घडवायचे होते. नंतर आलेली ‘कोरोना’ची महामारी ही त्यांच्यासाठी नवी कसोटी ठरली. व्यवसाय टिकवण्यासाठी कर्मचारी कपात करावी लागली. हा निर्णय त्यांच्या मनाला टोचणारा होता. त्यांनी वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करून व्यवसाय सावरण्याचा प्रयत्न केला. पण, संकटे थांबली नाहीत. महामारीनंतरही एका मोठ्या प्रकल्पात तब्बल एक कोटी रुपयांचे नुकसान झाले. अशा वेळी बहुतांश लोकांनी हात टेकले असते. पण, त्यांनी पुन्हा नवे स्वप्न पाहिले. आज डॉ. स्वप्नील तांबे हे ‘स्वप्नील तांबे समूह’(एसटी ग्रुप) या उद्योगसमूहाचे अध्यक्ष आहेत. या समूहांतर्गत ‘नियोजन प्रयोगशाळा’, ‘डिझाईन प्रयोगशाळा’, ‘बंधन’, ‘तर्ष एन्टरप्रायझेस’ आणि ‘त्रिशला रिऍलिटी’ यांसारख्या विविध शाखा कार्यरत आहेत. ते केवळ व्यवसाय करीत नाहीत, तर शेकडो लोकांसाठी रोजगार, संधी आणि आधार उभा करीत आहेत. ते जेव्हा म्हणतात की "मी कुठून आलो हे विसरलो नाही, तेव्हा त्यांच्या नम्रतेची आणि सामाजिक बांधिलकीची आपसुकच जाणीव होते.

वंचित आणि उपेक्षित मुलांसाठी ते धर्मादाय उपक्रम चालवतात. कारण, उपेक्षेचे दुःख काय असते, हे त्यांनी स्वतः अनुभवले आहे. म्हणूनच ते म्हणतात, "मला दुसर्यांसाठी विश्वास बनायचे आहे.” ते आज देशातील तरुणांना, विशेषतः मागास समुदायातून आलेल्यांना सांगतात, "तुमचं स्वप्न वैध आहे. तुम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही. तुमच्यातच शक्ती आहे.”

स्वप्नील तांबे यांचे आयुष्य घडवण्यात त्यांच्या आईवडिलांचाही मोलाचा वाटा. त्यांच्या वडिलांनी मूल्यांची शिकवण दिली, तर त्यांच्या आईने जिद्दीने संगोपन केले. त्यांचे प्रेम, प्रेरणा आणि आधार यांमुळेच आज स्वप्नील प्रत्येक टप्प्यावर खंबीरपणे उभे राहू शकले. हे शब्द त्यांच्या मनापासूनच्या भावना आहेत. यासोबतच स्वप्नील तांबे यांच्या यशस्वी प्रवासामागे त्यांच्या पत्नी स्वप्नल तांबे यांचेही मोलाचे योगदान आहे. ‘कोविड’च्या कठीण काळात त्यांनी डॉ. स्वप्नील यांना फार्मा कंपन्यांशी समन्वय साधून व्यावसायिक संपर्क मिळवून दिले, धैर्य दिले आणि वैद्यकीय उपकरणांचा व्यवसाय उभा करण्यासाठी खंबीर साथही दिली. आज त्या स्वतः डॉ. स्वप्नील यांच्या उद्योग समूहातील ‘इंटिरियर डिझायनिंग’चा व्यवसाय सांभाळून, अन्य व्यवसायांमध्येही पूर्ण पाठिंबा देतात. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात स्वप्नाली तांबे या प्रेरणादायी, समर्पित आणि कुटुंबाचा आधारस्तंभ ठरल्या आहेत. स्वप्नील यांच्या यशामागे त्यांच्या मेहनतीइतकेच स्वप्नल यांचेही योगदान आहे. स्वप्नील हे तरुणांसाठी मार्गदर्शक, प्रेरणास्रोत आणि जिवंत उदाहरण आहेत की, कसोटी कितीही मोठी असली, तरी माणूस जर ठाम असेल, तर यश अनिवार्य आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करणे म्हणजे केवळ एका यशस्वी उद्योजकाचे कौतुक नाही, तर संघर्ष करत असलेल्या लाखो तरुणांना आश्वासक दिशा देणे आहे. कारण, भविष्य त्यांचेच असते, जे कधीही विश्वास ठेवणे थांबवत नाहीत.


सागर देवरे 
९९६७०२०३६४