संतांचा सहवास कायमच अतुलनीय आनंद देणारा असतो. जसा संतांचा सहवास, तद्वतच त्यांचे सहित्य. श्री संत एकनाथ महाराजांच्या कार्याचा प्रसार करण्याचे कार्य ‘शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन’च्या माध्यमातून मागील दोन दशकांपासून सुरू आहे. अनेक संताचे कार्य, त्यांचे चरित्र यांचाही प्रसार करण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे. अनेक उपक्रमांनी भागवतधर्माची ध्वजा उंचावण्याचे कार्य ही संस्था करते. संत साहित्याचे महत्त्व, संस्थेचे कार्य, हिंदू धर्मासमोरील समस्या अशा विविध प्रश्नांचा मिशनचे संस्थापक अध्यक्ष श्री योगीराज महाराज गोसावी पैठणकर यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून घेतलेला आढावा...
‘शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन’ स्थापनेमागची प्रेरणा काय होती?
शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या कार्याची तसेच साहित्याची व्यापकता फार मोठी आहे. मात्र, महाराजांच्या विचारांचा व्हावा इतका प्रसार आणि प्रचार आजवर झाला नाही. आजच्या काळात तुम्ही लोकांपर्यंत पोहोचला नाहीत, तर लोक स्वतःहून तुमच्याकडे येत नाहीत. संतसाहित्याचा प्रसार साधरणपणे कीर्तनातून होतो मात्र, त्याचा लाभ फक्त कीर्तनाला जाणार्यांनाच मिळतो. आता कालपरत्वे कीर्तनाच्या शैलीमध्येही प्रचंड बदल होत असून, त्यातून विषयांची विविधता कमी होत आहे. त्याचबरोबर श्रोत्यांमधील वाचनसंस्कृतीचाही र्हास होत आहे. परिणामी अनेक संतांच्या साहित्याचा, कार्याचा प्रसार कमी होत असल्याचे लक्षात आले. अशांपैकी एक म्हणजे नाथ महाराजांचे कार्य! त्यामुळे एक ध्यास घेऊन नाथ महाराजांचे साहित्य, विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचे निश्चित केले. ध्येयनिश्चिती करून त्याच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न करण्याला ‘मिशन’ म्हणतात. अशीच ‘शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन’ची 2006 मध्ये स्थापना झाली. एकनाथ महाराज जसे आहेत तसे लोकांपर्यंत पोहोचावेत, ही प्रेरणाच संस्थेच्या स्थापनेमागे आहे.
जी उदिष्टे समोर ठेवून या मिशनची स्थापना झाली, त्याला समाजाकडून कशा प्रकारे प्रतिसाद मिळाला?
नाथ महाराजांचे कार्य समाजापर्यंत नेण्यासाठी आम्ही सर्वप्रथम ुुु.ीरपींशज्ञपरींह.ेीस या संकेतस्थळाची निर्मिती केली. यामाध्यमातून लोकांना नाथ महाराजांचे चरित्र, इतिहास यांविषयी माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे पैठण क्षेत्री चालणारे नाथषष्ठी, गोकुळाष्टमी, दत्तजयंती, पालखीसोहळा अशा उत्सव-परंपरांचीही माहिती संकेतस्थळावर आहे. त्याचबरोबरीने श्री एकनाथ महाराजांचे निवडक साहित्य, इतर संतांनी नाथ महाराजांची वर्णिलेली थोरवीदेखील लोकांना संकेतस्थळावर अभ्यासायला मिळते. देशभरात नाथ महाराजांच्या संदर्भात कोणीही केलेल्या उत्तम कार्यालाही प्रसिद्धी, या संकेतस्थळावर देण्यात येते. परमसंगणकाचे निर्माते डॉ. विजय भाटकर यांच्या उपस्थित, पैठण येथे नाथ महाराजांच्या साक्षीने या संकेतस्थळाचे उद्घाटन झाले होते. आज या संकेतस्थळाला मिळणारा लोकांचा प्रतिसाद नक्कीच अभूतपूर्व आहे.
‘शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन’च्या माध्यमातून कोणते उपक्रम राबवले जातात?
ही संस्था धर्मादाय विभागाकडे नोंदणीकृत असल्याने अनेक उपक्रम, इतर सर्व संस्थांप्रमाणे आमच्या संस्थेकडूनही राबविले जातात. त्याहीपेक्षा काही वेगळे म्हणाल, तर नाथ महाराजांच्या कार्याचा प्रसार समाजमाध्यमांवर करण्यासाठी आवश्यक अशा आशयनिर्मितीचे कार्यही मिशनमार्फत सुरु आहे. नाथ महाराजांचे भागवत हे वारकरी संप्रदायाच्या प्रमुख तीन ग्रंथांपैकी एक. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकाराम महाराजांची गाथा याला वारकरी संप्रदायाची ‘प्रस्थान त्रयी’ म्हणतात. ज्ञानेश्वरीचा विस्तार म्हणजे एकनाथी भागवत असून, एकनाथी भागवताची सूत्ररुपाने मांडणी म्हणजेच तुकाराम महाराजांची गाथा. मिशनमार्फत सध्या व्हॉट्सप समूहनिर्मितीच्या माध्यमातून एकनाथी भागवताच्या दहा सार्थ ओव्या दररोज सकाळी 9 वाजेपर्यंत प्रसारित केल्या जातात. सध्या 20वा अध्याय सुरू असून, अनेकांचे नवीन समूहनिर्मितीसाठी संदेश आले आहेत. भविष्यात नाथ महाराजांच्या इतर साहित्याचाही प्रसार करण्याचा मानस आहे. या कार्यादरम्यान आलेला अनुभव म्हणजे, सर्वच संतांवर लोकांची श्रद्धा प्रचंड मोठी आहे. एखाददिवशी ओव्या प्रसारित करण्यास किंचत विलंब झाल्यास, लोक संपर्क करून हक्काने विचारतात. अनेकजण तर हे वाचल्याशिवाय अन्न ग्रहण करत नसल्याचेही लक्षात आले. ‘कोविड’काळात 31 नामवंत वक्त्यांकडून नित्यनेमाने एकनाथी भागवतावर चिंतन करण्याचा उपक्रमही, मिशनच्या माध्यमातून राबवण्यात आला. तसेच, नाथ महाराजांचे मूळ चरित्रदेखील आता छापून घेतले आहे. या चरित्रातील प्रत्येक अध्यायावर कीर्तनेदेखील आयोजित करण्याचा उपक्रमही ‘कोविड’काळातच राबवला. लाखो लोकांनी ‘फेसबुक’वर याचा आनंद घेतल्याची नोंद आहे. आज संस्था लाखो लोकांपर्यंत पोहोचली आहे.
तसेच सहा पुरस्कारही मिशन मार्फत दिले जातात. ’भानुदास एकनाथ’ हा सर्वोच्च पुरस्कार असून अण्णा हजारे, पांडुरंग महाराज घुले, स्वामी गोविंददेव गिरीजी, तसेच यावर्षी सदानंद मोरे अशा अनेक महान लोकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तसेच, खासगी आयुष्यात नाथषष्ठीच्या दिवशी 66 वारकर्यांची पाद्यपूजा आम्ही कुटुंबीय स्वतः करतो. ‘जन नव्हे अवघा जनार्दन’ हाच नाथ महाराजांचा विचार जपतो.
युवावर्गाला या कार्याशी जोडण्यासाठी मिशन कशा प्रकारे कार्य करते?
युवावर्गाला जोडण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर मिशनने केला आहे. आजकालची पिढी त्यांच्या खासगी आयुष्यात कमालीची व्यस्त असल्याने, इच्छा असूनही त्यांना संतसाहित्याच्या अध्ययनासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे लोक संतसाहित्याकडे येतील याची वाट बघण्यापेक्षा, आम्ही संतसाहित्यच लोकांपर्यंत घेऊन जाण्याचे ठरवले. यामध्ये सुरुवातीला पारंपरिक दूरस्थ अभ्यासक्रमाचा विचार केला होता मात्र, नंतर त्यातील अडथळ्यांमुळे वेगळ्या मार्गाचा विचार सुरु केला. मिशनचे अनेक शिष्य प्रणाले व्यवस्थापन क्षेत्रात अग्रेसर असल्याने, त्यांनी मोठ्या उत्साहाने एका प्रभावी प्रणालीची निर्मिती केली. पुढे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण वारकरी संतपरंपरेवर आधारित अभ्यासक्रमनिर्मितीही केली. यामध्ये तीन वर्षांचा अभ्यासक्रम असून, दर चार महिन्यांनी एक परीक्षा होत असते. परीक्षेचे स्वरुप बहुपर्यायी प्रश्न असेच असते. लोकांची सोय लक्षात घेऊन परीक्षेचा दिवस निश्चित केला जातो. तसेच, परीक्षेची वेळ ही सकाळी 9 ते रात्री 11 अशी संपूर्ण दिवस असते. तसेच परीक्षा झाल्यावर लगेचच गुणपत्रिकादेखील स्पष्टीकरणासहित विद्यार्थ्यांना मिळते. दरवर्षी प्रत्येक उत्तीर्ण विद्यार्थ्याला प्रमाणपत्र दिले जाते. तसेच तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणार्या विद्यार्थ्याला ‘संतसाहित्य प्राज्ञ’ ही पदवी मिशनमार्फत दिली जाते. आज गृहिणींपासून सीमेवर लढणार्या सैनिकांपर्यंत अनेक जण या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. विदेशांतूनही अनेकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे. 2016 मध्ये सुरू केलेल्या या उपक्रमाचा आतापर्यंत 12 ते 15 हजारजणांनी लाभ घेतला आहे. या उपक्रमामुळे अनेक तरुणांना संतसाहित्याची नव्याने माहिती झाली आणि धर्माकडे बघण्याची त्यांची दृष्टीही परिवर्तित झाली. आता नव्या वर्षाचे प्रवेशही पुढच्या आठवड्यापासून सुरू होत आहेत.
हिंदू धर्मात अनेक संप्रदाय असून ते सारेच स्वतःला सनातन हिंदू धर्माचे पाईक मानतात. मात्र, आज समाजातील काही प्रवृत्ती अनेक संप्रदायांना हिंदू धर्मापासून भिन्न दाखवण्याचा प्रयत्न करतात; याविषयी आपले मत काय?
आजकाल लोकांचे वाचन कमी झाले आहे. त्यामुळे आपल्या धर्माचे मूळ तत्त्वज्ञान लोकांना माहीत नाही. परिणामी, ‘ऐकू तेच सत्य’ ही भावना बळावली आहे. याचा फायदा दृष्टप्रवृत्ती घेतात. त्यामुळे कोणत्याही संप्रदायाचे मूळ तत्त्वज्ञान काय आहे, हे वाचले की, समोरच्याच्या बुद्धिभेदाचा प्रयत्न लगेच लक्षात येतो. उदाहरणार्थ वारकरी संप्रदायाला ‘भागवतधर्म’ असे म्हणतात. त्यामुळे उद्या कोणी असे म्हणले की, भागवतधर्म हा हिंदू धर्मापेक्षा वेगळा आहे, तर काहींना ते खरे वाटेलही. मात्र, त्यांनी ‘एकनाथी भागवत’ आणि त्यातील भागवतधर्म काय आहे हे वाचल्यास, होणारी चूक चटकन लक्षात येईल हे निश्चित. यासाठीच संतांचे साहित्य जनसामान्यांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे.
समाजामध्ये ‘लव्ह जिहाद’चे विष पसरत असताना हिंदू धर्मीयांनी काय काळजी घेतली पाहिजे? याविषयी काय मार्गदर्शन कराल?
संगतीचा परिणाम लहान मुलांवर होत असतो. त्यामुळे आपला मुलगा कोणाच्या संगतीमध्ये आहे, याबाबत पालकांनी सजग असले पाहिजे. तसेच त्याला वाईट संगतीपासून परावृत्तही केले पाहिजे. आपल्या धर्मांतील परंपरा, आचारविचार यांचे संस्कार लहानपणापासूनच मुलांवर होणे आवश्यक असते. त्यासाठी रामरक्षा, गीतेचा 15वा अध्याय म्हणण्याचा आग्रह पालकांनी धरला पाहिजे. त्यातून नकळतच स्वधर्माविषयी प्रेम निर्माण होते. सर्व ‘जिहाद’मध्ये ‘लव्ह जिहाद’ हा अतिघातक आहे. त्यामुळे एखाद्याचे आयुष्यच उद्ध्वस्त होते. त्यामुळे घरात या विषयावर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे चर्चा झाली पाहिजे. लहान मुलांचे कळत नकळत घरातील चर्चांमध्ये लक्ष जात असतेच, त्यातून ते हवा तो बोध घेतातही. मात्र, सध्याच्या काळातील प्रलोभनांपासून प्रयत्नपूर्वक मुलांना दूर करावे लागेल, हे निश्चित!
- कौस्तुभ वीरकर
(श्री योगीराज महाराज गोसावी पैठणकर
हे शांतिब्रह्म संत श्री एकनाथ महाराज यांचे 14वे वंशज, तर वैष्णववीर भानुदास महाराज यांचे 18वे वंशज आहेत)