संत चालले पंढरी मुखी रामकृष्ण हरी...
पावसाळा सुरू झाला की आषाढी एकादशीचे वेध लागतात. पांडुरंगाच्या भक्तिरसात अवघा महाराष्ट्र न्हाऊन निघतो. प्रत्येक हृदयाच्या गाभार्यातून ’पांडुरंग हरी, वासुदेव हरी’चा निनाद उठतो. पंढरीच्या वाटा जिवंत होतात, त्या वाटेवरून चालत असतात संत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताई, एकनाथ, नामदेव, तुकाराम... त्यांच्या पाऊलखुणा म्हणजेच महाराष्ट्राच्या आध्यात्मिक वारशाची गाथा. संतांच्या या पालख्या म्हणजे चालती-फिरती भक्तीची विद्यापीठे, जिथे श्रद्धा हा श्वास आहे आणि समर्पण हा धर्म. या विशेष तीन भागांच्या सदरातून आपण या संतांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहोत. प्रत्येक संतांची पालखी, त्याचे वेगळेपण, मार्गिका आणि या पालख्यांमागची परंपरा उलगडत जाणार आहोत. आजच्या पहिल्या भागात संत निवृत्तीनाथ पालखी परंपरेविषयी...
संप्रदायामध्ये संतपरंपरा ही अवतारी संतांची आहे. संत निवृत्तीनाथ हे भगवान महादेवांचा अवतार मानले जातात. संत निवृत्तीनाथांना वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ म्हटले जाते. वारकरी संप्रदायात वारीचे महत्त्व अनन्यसाधारण असेच. वारी करणे हा वारकर्यांचा प्रधान आचार धर्म आहे. वारी ही आपली वैदिक परंपरा आहे. वारी हे वारकरी संप्रदायाचे वैभव आहे. सर्व संतांप्रमाणेच श्री संत निवृत्तीनाथांचाही पालखी सोहळा परंपरेनुसार संपन्न होतो.
संत निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्याला जवळपास २५० वर्षांचा इतिहास आहे. त्यावेळी परंपरेमध्ये श्री रामानंद गोसावी यांच्याकडे पूजनाची जबाबदारी होती. छत्रपती शिवरायांच्या राज्यभिषेकानंतर स्वराज्याचे प्रधानमंत्री मोरोपंत पिंगळे हेसुद्धा निवृत्तीनाथांच्या वारीमध्ये सहभागी झाले होते. पूर्वी निवृत्तीनाथांच्या पादुका हाती घेऊन वारी करण्याची परंपरा होती. पुढे वामनबुवा चिंतामण गोसावी, भानुदास महाराज बेलापूरकर, देहूकर फडाचे त्यावेळेचे वंशज यांनी हा पालखी सोहळा सुरू केला.
श्री संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे प्रस्थान त्र्यंबकेश्वरहून तिथीनुसार ज्येष्ठ शुद्ध १४/१५ या दिवशी होते. यावर्षी दि. १० जून रोजी महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. त्यानंतर आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी हा पालखी सोहळा पंढरपूरमध्ये पोहोचतो. आषाढ शुद्ध एकादशी अर्थात आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी संत निवृत्तीनाथांची पालखी पंढरपुरात नगर परिक्रमेकरिता निघते. आषाढ शुद्ध पोर्णिमेला संत निवृत्तीनाथ आणि पांडुरंगाच्या भेटीचा सोहळा संपन्न होतो. त्यानंतर गोपाळपूरला काला केला जातो. यानंतरच पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरू होतो. श्रावण शुद्ध तृतीयेला निवृत्तीनाथांचा हा पालखी सोहळा पुन्हा त्र्यंबकेश्वरला स्वस्थानी येतो. संपूर्ण पालखी सोहळा हा ४८ ते ४९ दिवसांचा असतो. या पालखी सोहळ्यामध्ये दोन गोलकार आणि एक उभे अशी तीन रिंगणेही होतात. निवृत्तीनाथांनी ज्येष्ठ वद्य द्वादशीला संजीवन समाधी घेतली. पालखी सोहळ्यादरम्यान संत निवृत्तीनाथांचा समाधी सोहळादेखील साजरा केला जातो.
या सोहळ्यामध्ये मुक्कामाच्या ठिकाणी दररोज पहाटे ४ वाजता निवृत्तीनाथांचा काकडा होतो. त्यानंतर ४.३० ते ६ वाजेपर्यंत पादुकांचे षोडशोपचार पूजन होऊन त्यानंतर पालखी पुढील मुक्कामास जाते. मुक्कामास आल्यानंतर समाज आरती, परंपरेप्रमाणे कीर्तन होते. पालखी सोहळ्यामध्ये रथाच्या पुढे एक, मागे एक अशा एकूण ५० दिंड्या सहभागी होतात. चोपदाराच्या आदेशाप्रमाणेच पालखी सोहळा संपन्न होतो.
- श्री जयंत महाराज गोसावी
वहिवाटदार व वंशपरंपरेने