
पावसाळा सुरू झाला की आषाढी एकादशीचे वेध लागतात. पांडुरंगाच्या भक्तिरसात अवघा महाराष्ट्र न्हाऊन निघतो. प्रत्येक हृदयाच्या गाभार्यातून ’पांडुरंग हरी, वासुदेव हरी’चा निनाद उठतो. पंढरीच्या वाटा जिवंत होतात, त्या वाटेवरून चालत असतात संत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताई, एकनाथ, नामदेव, तुकाराम... त्यांच्या पाऊलखुणा म्हणजेच महाराष्ट्राच्या आध्यात्मिक वारशाची गाथा. संतांच्या या पालख्या म्हणजे चालती-फिरती भक्तीची विद्यापीठे, जिथे श्रद्धा हा श्वास आहे आणि समर्पण हा धर्म. या विशेष तीन भागांच्या सदरातून आपण या संतांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहोत. प्रत्येक संतांची पालखी, त्याचे वेगळेपण, मार्गिका आणि या पालख्यांमागची परंपरा उलगडत जाणार आहोत. आजच्या पहिल्या भागात संत ज्ञानेश्वर पालखी परंपरेविषयी...
वारकरी संप्रदायाचा उगम नाथ संप्रदायातून झाला. वारकरी संप्रदायाचा पाया जेव्हा ज्ञानदेवांनी रचला, तेव्हा त्याला देवता मिळाली ती पांडुरंग! पांडुरंग हे दैवत भक्ताच्या भेटीसाठी कायम उत्साही असते. भक्त आणि भगवंतामधील असे सुंदर नाते ज्ञानदेवांनी गुंफले. त्यानंतर वारकरी संप्रदायामध्ये वारीचे अधिपत्य सुरू झाले. ज्ञानदेवांच्या आधीपासून वारी सुरू होतीच. आता संप्रदायाला तत्त्वज्ञान पाहिजे म्हणून ज्ञानेश्वरीची रचना केली. वारकरी हा लोकसंप्रदाय असल्याने पांडुरंगाच्या भेटीसाठी जाण्याची परंपराही सुरू झाली. काही काळ हभप नारायण महाराज देहुकर हे तुकाराम महाराजांचे वंशज देहूवरून आळंदीला येत आणि दोन्ही संतांच्या पादुका घेऊन पंढरीची वारी करत.
कालौघात देहुकरांनी हैबतराव बाबा या शिंदे सकरातील सेनापतींना स्वतंत्र पालखी सोहळ्याबाबत सूचवले. हैबतरावबाबांचा भक्तिमार्गातील अधिकारही मोठाच. इ.स. 1832 पासून ज्ञानोबांच्या पालखी सोहळ्याला श्रीगुरू हैबतरावबाबांनी लष्करी शिस्त लावली. यामध्ये ज्ञादोबांच्या पालखीबरोबर छत्रचामर, जरीपटका, हत्ती, अश्व असण्याची परंपरा सुरू झाली. अत्यंत राजसी थाटामध्ये ज्ञानोबांची पालखी आजही हैबतरावबाबांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करते. ज्ञानदेवांची पालखी ज्येष्ठ वद्य अष्टमीला प्रस्थान करते. यावर्षी दि. 19 जून रोजी हे प्रस्थान असणार आहे.
ज्ञानोबांच्या पालखी सोहळ्याचे विशेष म्हणजे प्रस्थान झाल्यापासून पंढरीला जाईपर्यंत ज्ञानोबाराय भक्तांना 24 तास दर्शन देतात. पुणे, सातारा, सोलापूर अशा अंदाजे 223 किमीच्या प्रवासात 14 मुक्काम ज्ञानोबारायांचे होतात. ज्ञानोबांबरोबर अधिकृत 280 दिंड्या, 150 दिंड्या तात्पुरत्या आणि तेवढ्याच मोकळ्या म्हणजे एकूण जवळपास 450 दिंड्यांचा समुदाय असतो. हा पालखीसोहळा स्वयंशिस्तीसाठी ओळखला जातो.
पालखी सोहळ्यामध्ये उभे तीन आणि गोल तीन अशी सहा रिंगणे होतात. यांपैकी रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला प्रत्येकी तीन रिंगणे होतात. ज्ञानोबांची भेट रस्त्यात फक्त संत सोपानदेवांशी होते. पालखी सोहळ्यात होणारी समाज आरती ही पाहण्यासारखीच. ज्ञानोबांची समाज आरती ही उघड्या आकाशाखाली होते. ज्ञानोबांच्या रथाच्या पुढच्या बजूला 27 दिंड्या असतात. यात आघाडीवर 27 क्रमांकाची दिंडी असते. त्यामागे ज्ञानोबांचा जरीपटका, त्यमागे अश्व आणि मग उतरत्या क्रमाने उरलेल्या 25 दिंड्या असतात. बाकी दिंड्या रथाच्या मागे असतात. माऊलींच्या पालखी सोहळ्याचे अजून एक विशेष म्हणजे ज्ञानोबांची पालखी सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ आल्यानंतर त्या मंदिराचा कळस हलतो. त्यानंतरच पालखी सोहळा प्रस्थान करतो.
योगी निरंजननाथ प्रमुख विश्वस्त
संत ज्ञानेश्वर महाराज समिती, आळंदी देवाची