वैदिकसणांचे योग रहस्य - भाग १

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Oct-2020
Total Views |

Vedik_1  H x W:
 
 
 
वैदिक परंपरा  ज्ञान म्हणजे काय?
’विद्’ म्हणजे जाणणे. जाणून वागण्याची रीत म्हणजे वैदिक परंपरा होय. ‘जाणणे’ हा मराठी शब्द ’ज्ञान’ या संस्कृत शब्दाचे अपत्य आहे. ‘ज्ञान’ या शब्दाचा उच्चार मराठीत ’द्न्यान’ असा आहे. परंतु, तो चुकीचा आहे. त्याचा खरा उच्चार ‘ज्याँन’ असा आहे. या ‘ज्याँन’ शब्दापासून मराठीत ‘जाणणे’ हा धातू आला आहे. म्हणून ‘जाणणे’ याचा अर्थ ज्ञानप्राप्ती करणे होय. ज्ञानप्राप्ती करणे म्हणजे केवळ पुस्तके वाचणे आहे का? आज जरी आम्ही पुस्तके वाचून ज्ञानी होण्याचा सवंग मार्ग शोधून काढला असला तरी वैदिक परंपरा असल्या बहुवाचकाला ‘बहुश्रुत’ म्हणते, ‘ज्ञानी’ म्हणत नाही.
 
 
ज्ञानप्राप्ती साधनेने होते, ज्ञानप्राप्ती तपस्येने होते, ज्ञानप्राप्ती योगसंसिद्ध आहे. भगवद्गीतेत म्हणतात, ‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते। तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विंदति।’ (श्लोक ३८ अ. ४ ) उपनिषदेही असेच सांगतात, ‘नायमात्मा प्रवचनेन लभ्या: न मेधया न बहुना श्रुतेन।’ ‘जाणणे’ या शब्दात ज्ञानप्राप्तीचा अर्थ निहित आहे. म्हणून जाणून वागण्यातही ज्ञानाचा आविष्कार येतोच. मग त्या ज्ञानाच्या कक्षा कमी-अधिक का असेनात, साधारण अळीलासुद्धा तिच्या जीवनयापनाकरिता आवश्यक असे ज्ञान असते. ते ज्ञान त्या अळीला स्वभावत:च असते एवढेच!
 
 
अडाणी बाईलाही आपल्या मुलांचे संगोपन कसे करावे, याचे जन्मत:च ज्ञान असते. हे ज्ञान त्या-त्या योनीला नियतीतून प्राप्त झालेले असते. ते ज्ञान म्हणजे त्यांचे सुप्त संस्कार होत. मानव प्राणी उत्क्रांतीमधील अतिउच्च आविष्कार असल्याने त्याच्या ज्ञानाच्या कक्षा त्याच्या स्वभावाच्या अवस्थेलाच मर्यादित न राहता त्यांचा विस्तार अधिकाधिक होत जातो. या ज्ञानकक्षा जेवढ्या विशाल, तेवढा तो मानव अधिक ज्ञानी होय. ज्ञानप्राप्ती अनुभवात आहे, ज्ञानप्राप्ती वृत्तीत आहे. केवळ पुस्तके वाचून वृत्ती उत्पन्न होत नसतात, तर त्या-त्या अवस्थेत जाऊन त्यांचा अनुभव घेणे आणि त्या अनुभवांची स्वतः अनुभूत अवस्था प्राप्त करणे म्हणजे ‘ज्ञान’ होय.
 
 
भक्त प्रल्हादाला स्तंभ आणि माणूस यात ईश्वरतत्त्वाचे दृष्टीने भेद नाही आणि म्हणून हिरण्यकश्यपूने स्तंभाला लाथ मारताच भगवान प्रकटले. फॅरेडला ज्ञान झाले की यच्चयावत् अस्तित्वात विद्युत भरली आहे. तद्नुसार त्याने विजेच्या तारा चुंबकातून फिरविल्या आणि त्यात त्याला विद्युत प्राप्त झाली. सुश्रुतांचे चित्तवल्ली चित्तातही एकरूप होत असे. म्हणून वल्लीचे गुणधर्म त्याला आपोआप कळत असत. भृगु ऋषींचे चित्त अखिल तारांगणांशी एकरूप होत असे, म्हणून त्यांना तारांगणांच्या अवस्था आणि गती आपोआप कळत असत. ज्ञानदेवांचे चित्त रेड्याच्या चित्ताशी एकरुप झाल्याकारणाने रेड्याच्या अंगावर मारलेले व्रण त्यांच्या सुकुमार अंगावर उठत असत. ज्ञानाच्या कक्षा अशा आहेत.
 
 
संस्कारांचे महत्त्व
 
मग हे ज्ञान आपणहून प्राप्त होते की, त्याकरिता काही प्रयत्न करावे लागतात? उत्तर सरळ आहे, त्याकरिता प्रयत्न करावे लागतात. परंतु, हे प्रयत्न वाटेल तसे करून ज्ञानप्राप्ती होणार नाही. कोणत्याही प्राप्तीला एक निश्चित धारणा मार्ग असतो, तो प्राप्त केल्याशिवाय ज्ञान नाही. ज्ञान आपणहून प्राप्त होते, पण त्याकरिता भगवंताला सर्वस्व अर्पण करावे लागते. असे सर्वस्व अर्पण केल्यानंतर भगवंत त्याच्या त्या ज्ञानप्राप्तीचा मार्ग आपणहून मोकळा करतात. त्या मार्ग मोकळा करण्याच्या प्रक्रियेला भगवंत ‘योगक्षेम’ म्हणतात. ‘योगक्षेम’ या शब्दाचा अर्थ आम्ही अतिशय चुकीचा घेत असतो. ठीकच आहे, जशी ज्याची बुद्धी, तसे त्याचे ज्ञान. भगवंत म्हणतात, अनन्याश्चिन्तयन्तो माम् ये जना: पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्॥ (श्लोक २२ अ. ९) अशा भगवत प्रसादाने ज्यांचा योगक्षेम म्हणजे ज्ञानप्राप्तीचा मार्ग सुलभ झाला आहे, त्यांनाच आपोआप ज्ञानप्राप्ती होईल.
 
 
पण, अशी सर्वस्व समर्पणाची अवस्था किती लोकांची असते? अगदी नगण्य लोकांची! म्हणून इतरांना ज्ञानप्राप्तीकरिता योग्य प्रयत्न करावे लागतात. असल्या प्रयत्नांचेही एक शास्त्र असते. त्या शास्त्रालाच ‘योगशास्त्र’ म्हणतात. म्हणून वैदिक परंपरेत योगशास्त्राला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक धर्म, संस्कृती आणि परंपरा यांचा पायाच मुळी ‘योगशास्त्र’ आहे. म्हणून वैदिक जीवनातील सर्व व्यवहार योगशास्त्रावरच आधारित असतात. मानव समाज म्हटला की, त्याला आनंदोत्सव करावेसे वाटणारच. परंतु, आनंदोत्सव कसेही न करता शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्यास त्या समाजाची आपोआपच उन्नती होत असते. आनंद झाला की, साधारण माणूसच काय, पण जनावरेसुद्धा नाचू-ओरडू लागतात. परंतु, कसेही ओरडणे आणि उड्या मारणे म्हणजे उन्नत अवस्था नव्हे. त्यात शास्त्रीयता ओतली म्हणजे त्या आनंदाला गायनकला येते तर नृत्यकलेने परमेश्वरसुद्धा प्रसन्न होतो आणि स्वत:च तांडवनृत्य करु लागतो. वैदिक परंपरेने हे रहस्य ओळखले होते, म्हणून एक शास्त्रीय जीवनाचा समाज उत्पन्न करण्याकरिता वैदिकांनी त्यांचे सामाजिक सण आणि आनंदोत्सवही एका निश्चित शास्त्रावर आधारले आहेत. ते शास्त्र म्हणजे ‘योगशास्त्र’ होय.
 
 
संस्कार म्हणजे वळण
 
जी गोष्ट आपल्याला साधायची आहे ती वारंवार नजरेसमोर असेल, वागणुकीत असेल तर व्यक्तीची उन्नती अधिक लवकर होत असते. सैनिक इतरवेळी चालतानासुद्धा एकमेकांचे पाय जुळवत चालतात. त्यामुळे सैनिक संचलनात चुका करीत नसतात. अशी संस्कारांची सहजावस्था उत्पन्न केल्याने समाज अथवा व्यक्तीचे उन्नयन वा उत्क्रांती लवकर होत असते. तुकाराम महाराज म्हणतात, पडिले वळण इन्द्रियां सकळा। भाव तो निराळा नाही दुजा। ।
 
 
क्रमशः-
 
 
- योगिराज हरकरे
 
 
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
@@AUTHORINFO_V1@@