मृत्यूचे रहस्य

    03-Jul-2025
Total Views |

mystery of death
 
 
याच संबंधात एका गोष्टीचा विचार करणे लाभप्रद होईल. अति दुःखामुळे त्या हिमालयातील योग्याला त्याचे शरीर सोडावे लागले. रामकृष्ण परमहंस यांच्या बाबतीतही असाच अनुभव आहे. एकदा केशवचंद्र सेन यांच्या घरी गेले असता, रामकृष्णांना उभ्या उभ्याच भावसमाधी लागली. परंतु, ते खाली पडतील याचे भय वाटून रामकृष्णांचा भाचा हृदय धावला आणि त्याने रामकृष्णांना सांभाळले. अशा तर्‍हेने रामकृष्ण देहातील अवस्थेत असताना अनेक वेळा हृदयने सांभाळले होते. परंतु, यावेळेस निराळाच अनुभव आला. हृदयने हात लावताच रामकृष्ण परमहंस जोराने किंचाळले. ते किंचाळले याबद्दल रामकृष्णांना मुळीच माहीत नव्हते, कारण ते त्यावेळेस मुळी देहभावावर नव्हतेच. परंतु, त्या दिव्य अवस्थेत हृदयने हात लावला, असे कळण्यावरून ते उद्गारले, “बरोबर आहे. हृदयच्या डोक्याला फोड झाला असून त्यावर डॉक्टरांनी चिरा दिला आहे. माझ्या त्या दिव्य उच्च अवस्थेत सुख वा दुःखाची भावना मृत्यू लोकापेक्षा फार जास्त असते. म्हणूनच हृदयचा स्पर्श झाल्यावर मी ओरडलो असेन.”
 
योग्याला दुःख नसते, ही सामान्य कल्पना चुकीची दिसते. त्यांचे सुख वा दुःख सामान्यापेक्षा अनेक पटींनी जास्त असते, कारण त्या अवस्थेतील योग्याचा आवेग अधिक असतो. सूतक असताना क्षौर कर्म करू नये वा खेळू नये असे सांगतात. पण त्याचे खरे कारण असे आहे की, मृतकाच्या आप्तांचा मृतामुळे सूक्ष्म अशा पितृलोकांशी संबंध येतो. अशा नाजूक अवस्थेत जर त्या आप्तीयांना दुखापत झाली तर त्यांच्या संबंधित मृतात्म्याला त्यामुळे कितीतरी पटींनी अधिक दुःख होते, याची अतींद्रिय जाणीव ठेवून आपल्या ऋषिमुनींनी वरील नियम बसविले आहेत. नियम वरवर पाहता विचित्रच वाटतात, पण त्यात असले अतींद्रिय दिव्य शास्त्र असते, मग तुम्ही ते शास्त्र माना अथवा मानू नका.
 
परकाया प्रवेश
 
साधारणतः 25 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. नागपुरातील बुधवारी वेटाळात एक हेडावू नावाचे कुटुंब राहात होते. त्यांना राजू नावाचा एक अतिशय सुस्वरुप व गोरापान मुलगा होता. मुलाचे त्यावेळचे वय 14 वर्षे असेल. तो शाळेत शिकत होता. तो रोज मधल्या सुटीत घरी काही खायला येत असे. एक दिवशी नित्याप्रमाणे मधल्या सुटीत घरी आल्यावर त्याला असे आढळून आले की, त्याची आई शेजारणीकडे गेली आहे. राजू तिथे जाऊन आईला ताबडतोब घरी चल व काही खाण्याकरिता दे म्हणून आग्रह करू लागला. आईने त्याला आपल्या हाताने घेण्यास सांगितले. पण राजू ऐकेना. तो आईकडे हट्ट करू लागला. शेवटी त्याची आई चिडली. तिने राजूला गालावर एक थापड मारली. आईचे मारणे ते काय! पण परिणाम भयंकर झाला.
 
राजू खाली पडला तो पुन्हा उठलाच नाही. आई आता घाबरली. वेटाळाचे लोक गोळा झाले. डॉक्टर आले. त्यांनी राजूचे हृदय पाहिले तर ते बंद! श्वास बंद! डॉक्टरांनी ‘तो मेला’ असे जाहीर केले. पण, माया खोटी असते. काही रोगराई नसताना राजू कसा वारला याचे आश्चर्य वाटून पंचाक्षरींना बोलावून मंत्र जादूचा प्रयोग झाला, पण राजू उठेना. आता सर्वच घाबरले. रडारड चालू असतानाच राजूच्या हातापायांची हालचाल सुरू झालेली दिसली. आश्चर्य! सर्वजण बघायला लागले. कोणी भयाने तर कोणी आश्चर्याने. आई मायेने राजूजवळ धावली ‘माझा राजू, माझा राजू’ आई उद्गारली. राजू आतापर्यंत बोलायला लागला. पण, आता तो मराठीऐवजी हिंदीत बोलायला लागला. तो म्हणाला, ‘कोण राजू? मी तर हिमालयातील फटीचरबाबा आहे’. आई चमकली. ‘माझा राजू मग कोठे आहे?’ आई विचारती झाली. ‘तुमचा राजू वर गेला’ उत्तर आले. ‘मग तुम्ही कोण?’ आई विचारते. उत्तर येते, ‘मी हिमालयातील 200 वर्षांचा योगी आहे. कडा कोसळल्याने माझे तेथील शरीर छिन्नविच्छिन्न झाले. पुन्हा जन्म घेऊन वेळ घालवण्यापेक्षा मी तेथून येऊन या राजूच्या शरीरात प्रवेश केला. आता या देहात मी आहे.’
 
आणि खरोखरच राजूच्या नंतरच्या जीवनात बराच फरक दिसून आला. मांस सेवन करणारा राजू आता एखाद्या तपस्व्याप्रमाणे केवळ दुधावरच राहू लागला. ही स्पष्टपणे परकायाप्रवेशाची घटना होती. लेखकाने ती त्वरित जाणली, म्हणून त्या राजूच्या शरीरातील हिमालयीन योग्यासोबत त्याच्या परकायाप्रवेशाबद्दल व अतींद्रिय अनुभवाबद्दल बोलायला लेखक गेला असता, तो राजूस्थित योगी अतिशय घाबरला आणि घरात पळून गेला. आता शरीर राजूचे, पण जीवात्मा हिमालयीन योग्याचा अशी त्या राजूस्थित अस्तित्वाची अवस्था आहे. एकाच घटनेतून राजूचे मरण, तर योग्याचा जन्म घडला. जन्म-मृत्यूची ही एक आगळी तर्‍हा पाहायला मिळाली.
 
शरीराचे तेजोवलय 
आपल्या जडशरीराभोवताल एक प्रकाशवलय असते. मस्तकाच्या सभोवतालचे तेजोवलय आणखी मोठे व दिव्य असते. या दिव्य वलयावरच सर्व प्राण्यांचे जीवन अवलंबून असते. प्रत्येक वस्तू अनंत ओतप्रोतांच्या विलक्षण गतींनी युक्त असते. गती आली की त्यासह प्रकाश आलाच. म्हणून प्रत्येक वास्तूमात्राच्या सभोवताली थोडा तरी प्रकाश असतोच. आत्मतत्त्वाच्या प्रकाशाची त्यात भर पडल्यामुळे ते प्रकाशवलय अधिक स्पष्ट दिसते. मनुष्य प्राणी सर्व प्राणीमात्रांमध्ये अतिशय उच्च असल्यामुळे त्याचे प्रकाशवलय इतर प्राण्यांपेक्षा अधिक मोठे व कार्यशील असते. माणूस जेवढा उच्च संस्कारांनी युक्त असेल, तेवढे त्याचे प्रकाशवलय अधिक तेजस्वी व वृत्तीला धरून शुक्ल, धुसर, रक्तवर्णाचे, शुभ्र वर्णाचे वा पीत, कृष्ण वर्णाचे असते. व्यक्ती जेवढी सुसंस्कारित असेल, तेवढे तिचे वलय शुक्ल वर्णाचे असेल. म्हणून उपनिषदात ब्राह्मणांचा (ब्रह्मं जानाति इति ब्राह्मणः) प्रकाशवलयाचा वर्ण शुक्ल असा सांगितला आहे. वर्ण हे व्यक्तीच्या चांगल्या वाईट वृत्तींवर अवलंबून असतात. जशी वृत्ती तसा वर्ण! उपनिषदात क्षत्रियांचा रक्तवर्ण, वैश्यांचा पीत तर शुद्रांचा वर्ण कृष्ण सांगितला आहे. काही विद्वान सांगतात की उत्तरेकडील शुक्लवर्णीय आर्य भारतात आले आणि त्यांनी ब्राह्मण जीवन स्वीकारले. काही रक्तवर्णी लोक भारतात येऊन स्थाईक झाले. त्या रक्तवर्णीय लोकांना क्षत्रियत्व दिले गेले. भारतातील मूळचे जे आदिवासी त्यांचा वर्ण काळा असल्यामुळे त्यांना जिंकणार्‍या गौर आर्यांनी त्यांना शूद्र स्थान चातुर्वण्यात दिले. परंतु, खरे कारण ते नाही. चातुर्वर्ण्याची रचना एका अतींद्रिय शास्त्रातून झाली आहे.
 
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)