संत चालले पंढरी मुखी रामकृष्ण हरी...

    03-Jul-2025
Total Views |
 
Dindi sohala
 
 
संत श्री रुपलाल महाराज दिंडी
 
संत गाडगे महाराजांना कोणी ओळखत नाही, असा विरळच! याच गाडगे महाराजांचे शिष्य म्हणज अंजनगाव सुर्जी येथील रुपलाल महाराज. महाराजांना संत गाडगेबाबांचा अनुग्रह. महाराजांनी 12 वर्षे हिमालयामध्ये तपाचरण केले. त्यामुळे अनेक सिद्धीही त्यांना प्राप्त झाल्या, मात्र त्यांनी त्याचा स्वार्थासाठी कधीही वापर केला नाही. त्यांनी भारतभ्रमण करत, गाडगे महाराजांचा स्वच्छतेचा संदेश जनतेपर्यंत नेण्याचे कार्य केले. त्यांना कोणी भेटण्यास आले असता, ते प्रत्येकाला पांडुरंगाला एकदा तरी भेटण्याची विनंती करत. त्यांनी जन्मभर वारी केली, नियमाप्रमाणे वारी कधीही चुकवली नाही. आयुष्यभरात त्यांनी 100 यज्ञदेखील पूर्ण केले. मूळतः जळगावमधला जन्म असून विदर्भ हीच त्यांची कर्मभूमी होती. स्वच्छतेच्या बाबतीत महराज फारच आग्रही. श्रीधर महाराजांचे कीर्तन पंचक्रोशीत असल्यास महाराज ब्रह्म मुहूर्तावर तिथे जाऊन सर्व परिसरात झाडलोट करत. त्यावेळी अनेक सामान्य जनांनी ही जबाबदारी घेण्याचे महाराजांना सांगितलेही. तसेच नामस्मरण पहाराही महाराजांनी सलग आठ आठ दिवस केला आहे. पाय सुजले तरीही कधीही वीणा खाली ठेवली नाही. पंढरीचा पांडुरंगही त्यांनी अंजन गाव येथे आणला आणि पांडुरंगाचे सुंदर मंदिर उभारले. मंदिर पूर्ण होईपर्यंत नवे कपडे आणि गोड पदार्थांचाही त्यांनी त्याग केला होता. आयुष्यभर भक्तिसुखाची अनुभूती घेतलेल्या महाराजांनी 1994 मध्ये समाधी घेतली. महाराजांच्या समाधीनंतर त्यांचा वारीचा वारसा त्यांच्या भक्त मंडळींनी अखंड सुरू ठेवला आहे.
 
आज सलग 30 वर्षे ही परंपरा सुरू असून 300 ते 400 मंडळी या वारीमध्ये सहभागी होतात. आषाढीनिमित्ताने वारीला जाणार्‍या दिंडीसमवेत ही मंडळी दररोज 25 किमी अंतर चालतात. विशेष म्हणजे, महाराजांच्या स्वच्छतेच्या कार्याला अनुसरून दिंडीमधील विसाव्याच्या अथवा रस्त्यात कचरा होऊ नये, याचीही काळजी महाराजांचा शिष्य परिवार घेतो. दिंडीमध्ये दररोज कीर्तन, भजन, प्रवचन होते. दिंडी जेव्हा पंढरपूरसाठी पायी निघते, तेव्हा गावागावातून अनेक भक्तमंडळी दर्शनासाठी गर्दी करतात. दिंडीचा हा कालावधी 28 दिवसांचा असतो. महाराजांच्या समाधी मंदिरातून ही दिंडी निघते. त्यानंतर आषाढ अष्टमीच्या दिवशी दिंडीचा पंढरपुरात प्रवेश होतो. पंढरपुरात गेल्यावर पांडुरंगाचे दर्शन घेतले जाते. त्यानंतर पौर्णिमेपर्यंतचा विसावा पंढरपुरातच असतो. याकाळात नगर प्रदक्षिणा, कीर्तन, भजन, प्रवचन अव्याहतपणे सुरू असते. पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपुरीला काला झाल्यानंतर दिंडीचा परतीचा प्रवास सुरू होतो.
 
-पुरुषोत्तम महाराज नेमाडे, संत रुपलाल महाराज दिंडी प्रमुख
 
संत जनाबाई दिंडी
 
परभणीमधील गोदावरीच्या काठी असलेले गंगाखेड हे जनाबाईंचे गाव. त्या स्वतःला ‘नामयाची दासी’ म्हणवून घेत असत. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासमोर त्यांचा वाडा असल्यामुळे जनाबाईंना पांडुरंगाचे नित्य दर्शन घडे. नामदेवांच्या घरीही विठ्ठलभक्तीचा जागर असल्याने साहजिकच जनाबाईंच्या आयुष्यातही पांडुरंग भक्तीला विशेष स्थान होते. नामदेवांच्या मार्गदर्शनातच जनाबाईंनी भक्तिमार्गाचा स्वीकार केला. पांडुरंगाच्या भक्तीचा ध्यास घेतला. संत नामदेव स्वतः जनाबाईंचे पारमार्थिक गुरू झाले. जनाबाईंच्या मनामध्ये गुरूस्थानी असलेल्या नामदेवांविषयी अपार भक्ती होती. ही भक्तीच त्यांची खरी शक्ती होती. आयुष्यभर नामदेवांच्या भक्तिमार्गाच्या पाऊलखुणांवरून प्रवास करणारी जनाबाई अखेरच्या क्षणीदेखील गुरूची सावली बनून राहिली. इ.स. 1350 मध्ये आषाढ महिन्यात, कृष्ण पक्षात त्रयोदशीच्या मुहूर्तावर नामदेवांनी देह ठेवला. संत जनाबाईदेखील त्याचवेळी नामयाच्या पायरीवर विसावून पांडुरंगात विलीन झाल्या. जनाबाईंच्या भक्तीचा महिमा एवढा मोठा की त्यांना भेटण्यासाठी खुद्द कबीर महाराज पंढरपुरात आले होते. त्यावेळी जनाबाईंनी कबीरांना शेणाच्या गोवर्‍यांमध्ये विठ्ठलाचे नाव ऐकवले. गवर्‍या-शेण्या वेचताना, घरातील इतर कामे करत असताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत अशी त्यांची उत्कट भक्ती होती. जनाबाईंच्या नावावर एकूण सुमारे 350 अभंग आहेत.
 
जनाबाईंच्या पालखी सोहळ्याचे हे 53वे वर्ष. मराठवाड्यातील प्रसिद्ध संत मोतीराम महाराज यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गंगाखेडचे प्रभू महाराज गिरी, त्यांचे सहकारी, शिष्य मंडळी आणि ग्रामस्थ यांनी या पायी पालखी सोहळ्याची सुरुवात केली. संत मोतीराम महाराजांनीच गंगाखेड येथे संत जनाबाई यांच्या पादुकांची स्थापना केली. ही दिंडी परळी, अंबेजोगाई, कळंब, कुर्डुवाडी, पंढरपूर असा पालखीचा प्रवास असतो. या दिंडीबरोबर 400 ते 500 वारकरी दिंडीबरोबर चालतात. दहा दिवसांचा हा संत जनाबाईंचा पालखी सोहळा असतो. आषाढ शुद्ध अष्टमीला पंढरपुरात पालखी पोहोचल्यानंतर सोयीनुसार प्रत्येकजण पांडुरंगाचे दर्शन घेतो. पंढरपूर मुक्कामी असताना चंद्रभागा स्नान, कीर्तन, प्रवचन आणि भजन दररोज असते. संत जनाबाईंच्या पादुकांनाही चंद्रभागा स्नान घातले जाते. दिंडी पंढरपुरात गेल्यानंतर नगर प्रदक्षिणा केली जाते. एकादशीच्या दिवशीही सर्व संतमंडळींबरोबर नगर प्रदक्षिणा केली जाते. संत नामदेव मठामध्येही ही पालखी जाते. पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपुरीला काल्याचे कीर्तन होते आणि प्रत्येकजण परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो.
 
-संत जनाबाई पालखी सोहळा, गंगाखेड
 
संत श्री सखाराम महाराज दिंडी
 
श्री सखाराम महाराज हे बुलढाण्यातील एक महान संत. सुरुवातीपासूनच ते वैरागी स्वभावाचे होते. भजन, कीर्तनाकडे त्यांचा ओढा होता. त्यांनी मुक्ताईनगरच्या मुक्ताई संस्थानाच्या पालखीबरोबर वारीला जाण्यास सुरुवात केली. श्री नागोजी महाराजांनी सखाराम महाराजांना अनुग्रह दिला. श्री संत सखाराम महाराज यांनी 60 वर्षे संपूर्ण पायी वारकरी संप्रदायातील प्रमुख स्थाने असलेली पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, पैठण, मुक्ताई संस्थान, मुक्ताईनगर अशा वार्‍या केल्या. त्यांनी हे सगळे निष्काम भावनेने केले. लोकांना धर्माचरणाबरोबरच शुद्ध आचरणाचा संदेशही महाराज देत असत. यानंतर महाराज अनंतात विलीन झाले. महाराजांच्यानंतर त्यांचे शिष्य श्रीराम महाराज ही जबाबदारी सांभाळली. श्री सखाराम महाराजांनी दत्तपौर्णिमेच्या दिवशी श्रीराम महाराजांच्या गळ्यात माळ घालून ‘आमचे कार्य हा पुढे नेईल’ असे भाकित वर्तवले. पुढे श्रीराम महाराजांनी आळंदीला त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर महाराजांचे कार्य पुढे नेण्यासाठी त्यांनी बुलढाण्यातच 1952 मध्ये वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. एके ठिकाणी कीर्तनाला जात असताना श्रीराम महाराज सखारामपूर येथे आले. त्यावेळी तिथे फक्त लहानशा बांधकामावर असलेल्या सखाराम महाराजांच्या पादुका पाहून महाराजांचे मंदिर बांधण्याचे श्रीराम महाराजांनी निश्चित केले. त्यावेळी समाजातील अनेक प्रतिष्ठित लोकांनी श्रीराम महाराजांकडेच याची जबाबदारी दिली. मंदिर पूर्ण झाले, त्यानंतर सखाराम महाराजांची वसंत पंचमीच्या दिनी यात्रेचे आयोजन केले.
 
त्यावेळी अनेक गावातून कीर्तनकार, प्रवचनकार, दिंड्या तिथे आल्या होत्या. सखाराम महाराजांची पालखीसह दिंडी पंढरपूर, आळंदी, पैठण, मुक्ताबाई संस्थान मेहूण या वार्‍या सुरू केल्या. मेहूण मुक्ताई संस्थानाची पालखी श्रीराम महाराजांनी सुरू केली. सखाराम महाराजांच्या दिंडी सोहळ्याला जवळपास 125 वर्षे झाली आहेत. सखाराम महाराजांची दिंडी ज्येष्ठ वद्य प्रतिपदेला ही दिंडी सखारामपूरवरून निघाली असून ती आषाढ शुद्ध नवमीच्या दिवशी पंढरपूरला पोहोचेल. या दिंडीला सखारामपूर ते पंढरपूर हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 23 दिवसांचा अवधी लागतो. खामगाव, चिखली, जालना, बीड, बार्शी आणि पंढरपूर या मार्गाने दिंडीचा प्रवास होतो. या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे दिंडीच्या प्रवासात होणार्‍या कीर्तन, प्रवचनामध्ये व्यसनी लोकांचे व्यसन सोडवण्यात येते. तसेच ज्यांचे संसार मोडण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे संसारही उत्तम करण्यासाठी त्यांचे प्रबोधन करण्यात येते. पंढरपुरात आल्यावर चंद्रभागा स्नान, कीर्तन, प्रवचन, काकडा असे असंख्य विधी दररोज चालतात. प्रत्येकजण सोयीनुसार पांडुरंगाचे दर्शन घेतात. पंढरपुरातही अध्यात्माबरोबर समाजाचे उत्थानाचे कार्य चालते. पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपुरीला काला होतो. त्यानंतर सर्व मंडळी परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात.
 
-गुरुवर्य हभप श्री तुकाराम महाराज सखारामपुरकर
 
- संकलन:कौस्तुभ वीरकर