शेगाव म्हटले की, साहजिकच महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर उभे राहते ते अनंत कोटि ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराज यांचे नाव. महाराजांच्या वास्तव्याने शेगाव पुनित झाले. महाराजांच्या कृपाशीर्वादाने अनेक त्रस्त जीवांचा उद्धार झाला, तर अनेकांना भक्तिमार्गाचा लाभही झाला. आजही अनेक भक्त महाराजांच्या कृपाशीर्वादाचा अनुभव घेत आहेत. महाराजांनी कायमच भक्तीचा मार्ग लोकांना सांगितला.
विषय जेव्हा जेव्हा भक्तीचा येतो, तेव्हा आषाढी एकादशीचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. आषाढी एकादशीचे दिवस जवळ आले की, संपूर्ण महाराष्ट्रच भक्तीरसामध्ये न्हाऊन निघतो. महाराष्ट्रातून सर्वदूर संताच्या पालख्या परब्रह्म पांडुरंगाच्या भेटीसाठी चंद्रभागेच्या तीराकडे चालू लागतात. मजलदरमजल करत मुखाने पांडुरंगाला आळवत त्याच्या ‘याचि देही याचि डोळा’ दर्शनाची आस प्रत्येकाला लागलेली असते. अशा अनेक संतांच्या पालखींमध्ये शेगावच्या श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा हा विशेष! ‘श्री गजानन महाराज संस्थाना’ने 1968 सालापासून वारकरी संप्रदायाच्या महान परंपरेची ओळख व्हावी, यासाठीच आषाढीची पद्धत सुरू केली. याच वारकरी संप्रदायाची अधिकाधिक वृद्धी व्हावी, यासाठी ‘शेगांव संस्थाना’ने सन 1964 पासूनच ‘वारकरी शिक्षण संस्थे’चा श्रीगणेशाही केला आहे. येथे विद्यार्थी गीता, भागवत, ज्ञानेश्वरी यांसारख्या ग्रंथांचा अभ्यास करतात. त्याचबरोबर पखवाज, वीणा, मृदुंग, टाळ अशी वाद्येदेखील वाजवण्याची कला त्यांना शिकवली जाते.
मुळातच शेगांव संस्थान जसे गजानन महाराजांच्या कृपाप्रसादासाठी प्रसिद्ध तसेच, ते येथील सेवाव्रतींचा सेवाभाव आणि शिस्त यासाठीही प्रसिद्ध. संस्थानाची ही शिस्त आणि भव्यता जर पालखी सोहळ्यातून दिसली नसती, तरच ती नवलकथा!
गजानन महाराजांच्या पालखीचे प्रस्थान दि. 2 जून रोजी शेगांव येथून झाले असून, दि. 4 जुलै रोजी पालखी पंढरपुरात पोहोचेल. पालखीसोबत 700 वारकरी दोन अश्व आणि नऊ वाहने आहेत. या पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे जणू वारकर्यांचे शिस्तबद्ध संचलनच या वारीसोहळ्यामध्ये दिसते. महाराजांच्या पालखी सोहळ्याचे हे 56वे वर्ष आहे. वेगवेगळ्या नऊ जिल्ह्यांमधून 700 किमीचा प्रवास करत गजानन महाराज पंढरपुरात पांडुरंगाच्या भेटीसाठी येतात. या पालखी सोहळ्यामध्ये 700 वारकरी, 250 पताकाधारी,250 टाळकरी आणि 200 सेवाधारी सहभागी झाले आहेत. गावोगावी महाराजांच्या पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत होते. पंढरपुरात महाराजांच्या पालखीचा मुक्काम चतुर्दशीपर्यंत असतो, त्यानंतर काल्याचे कीर्तन झाले की, पालखीचा परतीचा प्रवास सुरू होतो.
-श्री गजानन महाराज संस्थान
पाण्यात द्वारका दुधात खारका विठोबा सारखा देव नाही
आषाढी एकादशी म्हटले की, संपूर्ण महाराष्ट्राच भक्तिरसामध्ये न्हाऊन निघतो. मग त्यात खान्देश कसा मागे राहील? खान्देशातही या भक्तिमार्गाची मोठी परंपरा आहे. खान्देशामधील जळगावातल्या अंजाळे येथील जग्गनाथ महाराजांची पालखी हे त्याचेच एक उदाहरण. या पालखीची परंपरा झेडूंजी महाराज यांच्यापासून सुरू होते. झेंडूजी महाराज वारकरी संप्रदायाचे खान्देशातील मूळ पुरुष. त्यांनी खान्देशात भागवत धर्माची पताका रोवली. झेंडूजी महाराज हे चरितार्थासाठी शेती करत. काशी क्षेत्राची वारी करून महादेवांचे दर्शन घ्यावे, अशी त्यांना तीव्र इच्छा झाली. त्यानुसार त्यांनी काशी पदयात्रेला सुरुवात केली. वाटेतच त्यांना साक्षात भगवान महादेवांनी दृष्टांत देऊन पंढरपुरात जाण्यास सांगितले. इष्ट दैवताचा आदेश शिरसावंद्य मानत झेंडूजी महाराज माघारी फिरले आणि त्यांनी कार्तिकीला पंढरपूर गाठले. त्यावेळी चंद्रभागेच्या वाळवंटात हभप विठोबा भास्कर यांचे कीर्तन सुरू होते. मधुर वाणीतील कीर्तन ऐकून झेंडूजी महाराजांच्या डोळ्यातून नकळत पाणी वाहू लागले. विठोबा भास्करांनी त्यांना रडण्याचे कारण विचारले. झेंडूजी महाराजांनी सांगितले की, महाराज तुम्ही कीर्तनात सांगता असा परमार्थ आमच्या भागात नाही.
विठोबा भास्करांनी तुळशीची माळ झेंडूजी महाराजांच्या गळ्यात घातली आणि त्यांना भागवत धर्माचा प्रचार खान्देशात करण्यास सांगितले. विठोबा भास्करांचा आदेशानुसार त्यांनी भक्तीचा प्रसार सुरू केला. खान्देशात एकादशीची प्रथा सुरू केली. हळूहळू झेंडूजी महाराजांच्या मार्गदर्शनानुसार खान्देशातील लोक भक्तिमार्गाला लागले. पुढे झेंडूजी महाराजांनी खान्देशातील जनतेला आषाढी, कार्तिकी, पैठण आणि संत मुक्ताई समाधी स्थान अशा वर्षातून चार वार्या करण्यासही सांगितल्या. झेंडूजी महाराजानंतर वारीची ही परंपरा धनजी महाराज, नागोजी महाराज तोताराम महाराज यांनी समर्थपणे सांभाळली. तोताराम महाराज यांनी जगन्नाथ महाराज यांना ही परंपरा दिली. जगन्नाथ महाराज यांनी 1928 ते 2011 सालापर्यंत वारी केली. 2011 साली वारीच्या परतीच्या वाटेवरच त्यांचे वैकुंठगमन झाले. त्यानंतरही ही परंपरा अखंड सुरू आहे. ही दिंडी जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, धाराशीव आणि सोलापूर असा 28 दिवस प्रवास करते. या दिंडीचे प्रस्थान ज्येष्ठ शु. नवमीला होते तर, आषाढ शु. पंचमीच्या दिवशी पंढरपुरात पोहोचते. पंचमी दिवशीच भगवान पांडुरंगांचे दर्शन घेतले जाते. त्यानंतर एकादशीपर्यंत नामसंकीर्तन सुरू असते. एकादशीला सर्व संतांसमवेत नगर प्रदक्षिणा होते, त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी काल्याचे कीर्तन झाल्यावर दिंडीचा परतीचा प्रवास सुरू होतो.
- दिंडी प्रमुख हभप धनराज महाराज अंजाळेकर
दिंडी चालली चालली मुखी रामकृष्ण हरि
महाराष्ट्राच्या अनेक प्रांतापैकी एक म्हणजे वर्हाड प्रांत! तापी आणि पूर्णा या नद्यांनी येथील परिसर समृद्ध केला. वर्हाड प्रांतात अनेक संत झालेे. भागवत धर्माच्या परंपरेचा प्रसार करत, भक्तीच्या माध्यमातून लोकांना सुखी करण्याचे कार्य त्यांनी केल्याचे पाहायला मिळते. आज वर्हाडातील अनेक दिंड्या आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी करतात. त्यापैकीच एक म्हणजे पांडुरंग महाराज यांची दिंडी! टाकळी बु, खिरपुरी ते पंढरपूर चालणार्या या दिंडी सोहळ्याला 85 वर्षांची परंपरा लाभली आहे. सध्या या दिंडीची परंपरा श्री मनोहरराव लावळे समर्थपणे सांभाळत आहेत.
पंढरपुरात चातुर्मास्ये महाराजांची परंपरा साधारण 275 वर्षांहून अधिक कालखंड झाली, सुरू आहे. पांडुरंग महाराज पाटकर यांनी पंढरपुरात चातुर्मासी महाराजांच्या मठासमोर त्यांचे गुरू विठोबादादा महाराज चातुर्मासे यांच्याकडून अनुग्रह घेतला. आजही विठोबादादा महाराजांची चातुर्मासी परंपरा टाकळीमध्ये म्हैसने यांच्या वाड्यामध्ये गेली 161 वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. विठोबादादा गुरूंचा अनुग्रह झाल्यानंतर पांडुरंग महाराजांनी टाकळी या गावामध्ये भागवत धर्माचा प्रचारचे कार्य जोमाने सुरू केले. यासाठी पांडुरंग महाराजांनीही नवविधा भक्तीमधील कीर्तन हाच प्रकार निवडला. पांडुरंग महाराज आपल्या रसाळ वाणीतून भक्तीचे महत्त्व श्रोत्यांना सांगत असत. त्यांच्या कीर्तनाने अनेकजणांनी जीवनामध्ये भक्तिमार्ग स्वीकारला. पांडुरंग महाराजांनी सामाजिक एकोपा जोपासण्यासाठी त्यांनी फार मोठी जबाबदारी स्वयंप्रेरणेने पार पाडली. पांडुरंग महाराजांचा अधिकार वर्हाड प्रांतात बहुश्रुत होता, त्यामुळे अनेक गावचे सरपंच त्यांचा आदर करत. अशावेळी या अनेक गावातील टोकाचे वाद सोडवण्याचे कार्य पांडुरंग महाराजांनी केले.
धर्म आणि समाजाच्या उन्नत्तीचे कार्य करणार्या पांडुरंग महाराजांचा पालखीसोहळा पूर्वी लोकसहभागातून पार पडत असे. पांडुरंग महाराजांचे 1976 साली वैकुंठगमन झाले. त्यानंतर हभप नारायण महाराज तराळे यांनी 1977 ते 2015 सालापर्यंत या पायी दिंडीची गौरवशाली परंपरा सांभाळली. आज ते जवळपास 98 वर्षांचे आहेत. तसेच, या दिंडीचे वीणेकरी 80 वर्षांचे श्रीराम महाराज हे आजही मोठ्या हौसेने दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होतात. या दिंडीमध्ये साधारणतः 100 ते 150 वारकर्यांचा सहभाग असतो. यावर्षीच्या दिंडी सोहळ्याची सुरुवात दि. 31 मे रोजी झाली असून, दि. 1 जुलै रोजी पालखी पंढरपुरात प्रवेश करणार आहे. जवळपास 30 दिवसांच्या या प्रवासात चंद्रभागेच्या स्नानाचा सोहळादेखील पार पडतो. यानंतर एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत दररोज प्रदक्षिणा होते आणि पौर्णिमेला काल्याचे कीर्तन होऊन सोहळ्याची सांगता होते.- डॉ. सचिन म्हैसने, अध्यक्ष, वारकरी सदन श्री क्षेत्र पंढरपूर
डॉ. सचिन म्हैसने, अध्यक्ष वारकरी सदन श्री क्षेत्र पंढरपूर