वेदांमध्ये गूढ ज्ञान लपले आहे, असे आपण कायमच म्हणतो आणि ते सत्यही आहे. वेदांचे, त्यातील सुक्तांचे सखोल अध्ययन कमी झाले आहे. वेदातील देवीस्तुती म्हणून प्रसिद्ध असलेल्या शी सूक्ताचा विज्ञानाधिष्ठित अन्वयार्थ...
श्री सूक्त ऋग्वेदातील खिलभागात (ऋग्वेद संहिता-अष्टक-पाच, अध्याय-पाच) मांडले गेले आहे. हे सूक्त आदिमाया महालक्ष्मी देवीचे स्तवन करणारे असून धन, वैभव, समृद्धी, शांती आणि ऐश्वर्य यांच्या प्राप्तीसाठी जातवेदाला केलेले आवाहन म्हणजे श्रीसूक्त. श्री सूक्ताचे काही अंश यजुर्वेद आणि पद्मपुराणात आढळतात. शंभराहून अधिक मंत्रांमध्ये श्रीसूक्ताच्या विविध आवृत्त्या आढळतात पण, सर्वसामान्यतः 15 किंवा 16 मंत्रांचे श्रीसूक्त सर्वाधिक प्रचलित आहे. भृगु ऋषी यांना श्री सूक्ताचे जनक मानले जाते. श्री सूक्तावर आमच्या गुरू माऊलींनी चिंतनपर लेखन केले आहे. अत्यंत वेगळे आणि सघन असे हे चिंतन, आपल्या श्लोक स्तोत्रांकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देणारे आहे. सामान्यतः आपण कोणत्याही श्लोक किंवा स्तोत्राकडे पठण करून, त्या ईश्वरी शक्तीच्या कृपेला पात्र होणे या दृष्टीने बघतो. परंतु, तुम्हाला या चिंतनात एक अत्यंत वेगळा आयाम अभ्यासायला मिळेल.
ऋग्वेदाच्या परिशिष्टात ‘श्रीसूक्त’ लिहिले आहे. मत्स्यापासून उत्क्रांती होत होत मानवाची निर्मिती झाली. नुसती निर्मितीच झाली असे नाही, तर बुद्धी प्रगल्भ झाली. शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक, सामाजिक प्रगती झाली. ऋग्वेदाची अस्तित्वताच हे सांगते आणि मग मानवाला वाटले की, ही उत्क्रांती कशी होते? ही उत्क्रांती होणे ही केवढी मोठी गोष्ट आहे! निर्जीव वस्तूंपासून सजीव सृष्टी निर्माण झाली, हे केवढे आश्चर्य! हे कसे होते? हे कोण निर्माण करते? ही किमया कशी घडते? तपन (सूर्य) शशी (चंद्र) वैश्वानर या सर्वांची यासाठी गरज आहे.
‘वैश्वानर’ हा अन्न पचविणारा अग्नी म्हटला जातो, तर जातवेदाचे अस्तित्व आवश्यक आहे. जातवेद म्हणजे काय? जात-जन्मलेला, वेद-जाणणारा. जातवेद हे अग्नीचे नाव आहे. जीवसृष्टी निर्माण होण्यास काही विशिष्ट गोष्टींची आवश्यकता असते. त्या सर्व जर व्यवस्थित जमल्या, तरच जीवसृष्टी निर्माण होईल. त्यांचा विचार करता येईल पण, विस्तार फारच मोठा होईल म्हणून त्याचा विचार नको. पंचमहाभूते, सूर्य, सोम, अग्नी या जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी मूळ गोष्टी होत. सूर्यावरून येणारी फ्युजन एनर्जी स्वयंनिर्मित शक्ती. चंद्रावरून येणारी रेडिएशन शक्ती. सोम, सूर्य व पंचमहाभूतांचा योग्य मिलाफ झाला, म्हणजे अस्तित्वात येणारा जातवेद वैश्वानर हा अग्नी अन्न पचवणारा आहे. वैश्वानराअगोदर जातवेद अस्तित्वात आला पाहिजे. जातवेद हा जडाला चैतन्यावस्थेत आणतो व वैश्वानर ही क्रिया चालू ठेवतो. गीतेत म्हटलेच आहे,
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् ॥
यावरून असे दिसते की, जड व शक्ती याचा योग्य तर्हेने समन्वय झाला, तरच ही जीवसृष्टी निर्माण होऊ शकते. श्रीसूक्तात ही किमया घडल्यावर ती चालू राहावी, चांगल्या तर्हेने चालू राहावी यासाठी चराचराची प्रार्थना आहे. जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी लागणार्या सर्व गोष्टी नित्य नांदाव्यात, समतोल राखून नंदाव्यात म्हणून प्रार्थना आहे. यामध्ये लक्ष्मीला ‘माझ्या घरी तू राहा’ असे म्हटले असले, तरी यातील ‘मी’ म्हणजे मी व्यक्ती नव्हे, तर या सर्व विश्वाचा एक घटक मी आहे. ही प्रार्थना एवढ्या उदात्त कल्पनेतून केलेली आहे. ‘हे विश्वची माझे घर।’ या अनुभूतीवर ती आधारलेली आहे. ‘पुनरपि जननं पुनरपि मरणं, पुनरपि जननीजठरेशयनं’ याबद्दल कोणी कितीही तिरस्कार व्यक्त केला, तरी मानव शरीरालाच परमेश्वराची अनुभूती येते. मग ती पंचेंद्रियांमार्फत असो किंवा त्यापलीकडून.
ही जाणीव झाली की माणूस म्हणतो, हे जातवेदा, लक्ष्मीला आमंत्रित कर. जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी उष्णतेची, अग्नीची गरज आहे म्हणून त्यालाच मानवाने ‘दूत’ बनवला. जीवसृष्टी निर्माण करण्यासाठी तेजाची आवश्यकता असून, तेजस्विता हा अग्नीचा गुण आहे. सूर्यापासून येणारी शक्ती शपशीसू ही सुवर्णाप्रमाणे झळाळणारी, तर चंद्रावरून येणारी सौम्य आहे. जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी दोन्हींची आवश्यकता आहे. ही शक्ती नित्य चंचल असणेही आवश्यक आहे. दिवस, रात्र श्वास घेणे, खोकणे, भूक लागल्याची जाणीव झाल्याशिवाय पोट भरल्याचे सुख होणार नाही. म्हणून लक्ष्मी चंचल, हरिणीच असली पाहिजे. या सूक्तात फक्त चंद्राचाच प्रत्यक्ष उल्लेख केला आहे, तरी सूर्यमालेतील इतर ग्रहही यात अंतर्भूत आहेत. चंद्र हा पृथ्वीच्या सर्वांत जवळचा व म्हणून जास्त परिणामकारक म्हणून फक्त त्याचा उल्लेख असला, तरी बाकी ग्रहांचे तो प्रतिनिधित्व करतो. सूर्यशक्ती, सोमशक्ती व यांच्या समतोलाने येणारी वैश्वानर शक्ती, या शक्तींनी समतोलात राहावे म्हणजे जीवसृष्टी व्यवस्थित नांदेल, यासाठी जातवेद अग्निमार्फत लक्ष्मीला ‘श्री’ला मानवाने आमंत्रित केले आहे. श्री ही भगवती आहे.
ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस: श्रिय: ।
ज्ञान वैराग्ययोश्चेव षण्णां भग इति गुणा: ॥
हे सहाही गुण ज्याच्याजवळ आहेत, तो भगवान किंवा ती भगवती. गीतेच्या सोळाव्या अध्यायात सांगितलेले दैवी संपत्तीचे सर्व गुण यांत येतात. ‘श्री’ या शब्दात लक्ष्मी येते पण, लक्ष्मी या शब्दात ‘श्री’ असेलच असे नाही. अशी ही लक्ष्मी श्री विष्णुशिवाय राहूच शकत नाही. जडाचे अधिष्ठान असल्याशिवाय शक्ती राहू शकत नाही.
- सुजीत भोगले