हिमालयातील योगी
भारतात इंग्रजांचे राज्य होते त्यावेळची घटना. त्यावेळी प्रसिद्ध विदुषी अॅनी बेझंट यांनी एका पुस्तकात, एका श्रेष्ठ योग्याची अतिशय रोचक माहिती लिहिली आहे. समाधी अवस्थेचे रहस्य सांगणारी कथा पुढीलप्रमाणे. हिमालयातील एका गुहेमध्ये एक महान योगी राहात असे. तो प्रतिदिन बराच काळ समाधी अवस्थेतच राही. नित्याप्रमाणे तो योगी समाधीत असताना, त्याच मार्गाने दोन इंग्रज सैनिक जात होते. त्यांचे लक्ष त्या समाधिस्थ योग्याकडे गेले. त्या योग्याजवळ गेल्यावर त्याचे पद्मासनात बसलेले निश्चल शरीर पाहून त्या सैनिकांना आश्चर्य व जिज्ञासा उत्पन्न झाली. त्यांना या सर्व साधनांची काय माहिती असणार? त्यांनी योग्याला गदागदा हालवून उठविण्याचा प्रयत्न केला, पण योगी काही बोलेना की प्रतिसाद देईना. योग्याचा श्वास नाकाजवळ हात लावून पहिला तर बंद! हृदय पहिले तर तेसुद्धा धडधडत नव्हते; म्हणजे बंद असल्याचे त्यांना आढळून आले. एक तर ब्रिटिश व त्यावर सैनिक आणि एका दुष्ट संस्कृतीचे असल्यामुळे, त्यांनी मौजेखातर त्या समाधीस्थित योग्याच्या शरीरात संगिन थोडीशी टोचून पाहिली. काही प्रतिक्रिया न मिळाल्यामुळे ते चिडले व दोघांच्या संगिनी त्याच्या शरीरात खुपसल्या. पण, आश्चर्याची गोष्ट अशी की, त्या योग्याच्या शरीरातून रक्ताचा एकही थेंब बाहेर येत नव्हता व तो योगी वेदनेने कळवळत नव्हता वा दुःखाचा साधा सुस्कारादेखील टाकत नव्हता.
त्या निर्दयी शिपायांनी योग्याच्या शरीराची संगिनींनी चाळण केली आणि मोठ्या दिमाखात विजयी मुद्रेने ते त्या ठिकाणाहून निघून गेले. कालांतराने विश्वात्मक झालेला योग्याचा जीवात्मा समाधी अवस्थेतून देहभावावर आला व त्याचे शरीररूपी उपकरण पुन्हा कार्यरत झाले. शरीराचे कार्य पुन्हा सुरू झाल्याबरोबर संगिनीच्या प्रत्येक घावागणिक रक्ताच्या चिरकांड्या सुरू झाल्या. अतिशय वेदनेमुळे योगी तडफडत होता. थोड्याच वेळात योग्याच्या विद्ध शरीरातून बरेच रक्त वाहून गेले. अशा विफल अवस्थेत शरीर टिकवणे किंवा तसल्या विद्ध शरीरात राहणे योग्याला योग्य वाटले नाही. आपले ते भग्न शरीर सोडून तो श्रेष्ठ महापुरुष अनंतात विलीन झाला. दुरुस्त न होणार्या भग्न शरीरात राहून दुःख भोगण्यापेक्षा, त्या देहाचाच त्याग करणे योग्याला श्रेयस्कर वाटले. योगी मृत्यूद्वारे निघून गेला.
शरीर यंत्र आणि मृत्यू
काही वैज्ञानिक शरीराच्या अंतर्गत असलेल्या धातूंच्या कमी-अधिकपणातून, जन्म आणि मृत्यूचे अन्वेषण करू इच्छितात. तसेच मातेच्या उदरातील स्त्रीबीजाणूचा पितृउदरस्थ रेतबीजाशी संयोग झालेल्या क्षणापासून जन्माची घटना झाली, असे मानतात. त्यांच्या त्या समजुतीला पोषक अशी कारण परंपरा अशांना वरवर निरीक्षण केल्यास सापडतेही, परंतु वरील परंपरा केवळ जडशरीरापर्यंतच व जडशरीराचीच घटना आहे, असा त्यातून आशय काढणे योग्य होईल असे वाटत नाही. सूर्यावर अधेमधे काळे डाग येतात, त्यामुळे पृथ्वीस्थित रेडिओ लहरींच्या वातावरणात बिघाड उत्पन्न होतो. सूर्यावरील या डागांचा पृथ्वीस्थित रेडिओ लहरींशी संबंध आहे हे लक्षात येण्यापूर्वी, त्या रेडिओ लहरींच्या विघटनाचे कारण वैज्ञानिकसुद्धा केवळ पृथ्वीस्थित परिस्थितीतच पाहात असत. तशी त्यांना त्यावेळेच्या त्यांच्या ज्ञानानुसार कारणेदेखील सापडत. परंतु, त्या रेडिओ लहरींच्या विघटनाचे कारण सूर्यावरील डागातच असते.
तद्वत् मृत्यूच्या कारणाची परंपरा केवळ जडशरीरातच पाहिल्यास तशी ती जडशरीरात सापडेलही, परंतु असे म्हणता येईल की, असल्या प्रकारचे संशोधन त्या त्या व्यक्तीच्या मर्यादित ज्ञानावर अवलंबून असू शकते. परंतु, ती वास्तविकता असेलच असे नव्हे. अतींद्रिय शास्त्राचा अनुभव असल्यास जडशरीराची कारण परंपरा, जडशरीराच्या पलीकडील अतींद्रिय अवस्थेत व जीवात्म्याच्या परतीच्या प्रवासात दिसून येईल. ज्यांना या अतींद्रिय अवस्थांचा अनुभव नसेल, त्यांना मृत्यूचे कारण अतींद्रिय अवस्थेत असू शकते, हे पटवूनही पटणारे नाही. कारण, जडशरीरापलीकडे काही आहे हे अधिकतर लोकांना माहीतच नसते. ते जाणून घेण्याची सुबुद्धीही त्यांना नसते.
याबाबतीत पाश्चात्य वैज्ञानिकांची भूमिका अनुकरणीय असते. ज्याचा त्यांना अनुभव नसतो म्हणून हे खोटे आहे, असा धाडसी शेरा ते मारतात. पण तरीही ते जाणण्याचा प्रयत्नसुद्धा करतात. पण आपण भारतीयांचे सर्व मुलुखावेगळे असते. एकतर नित्याच्या अशास्त्रीय, बुद्धीला न पटणार्या गोष्टी आपण सोडायला तयार नसतो. जे त्यावर जाऊन वैज्ञानिक दृष्टीचा अवलंब करतात, त्यांपैकी बहुतेक अतींद्रिय शास्त्रावर विश्वास ठेवायला तयार नसतात. बरे त्याकरिता लागणारे आवश्यक कष्ट घेण्यास वा साधना करण्यासही ते तयार नसतात व असल्या अतींद्रिय ज्ञानाला ते सरसकट मूर्ख कल्पना समजून, आपल्या अज्ञानी व अशास्त्रीय वृत्तीवर पांघरून घालून स्वस्थ बसतात. दोन्ही टोके वर्ज्यच मानायला हवीत. अतींद्रिय ज्ञानप्राप्ती विशाल शास्त्र आहे.
एक असे अनुभवास आले आहे की, स्वस्थ शरीराला सजीव राहण्याकरिता शरीरांतर्गत असलेल्या गोष्टी ज्या प्रमाणात आवश्यक असतात, त्यापेक्षा त्या कमीअधिक प्रमाणात असल्या तरी काही साधकांची शरीरे सजीव व कार्यक्षम राहू शकतात. लेखकाचे एक मित्र काही साधना करीत होते, त्यामुळे त्यांचा रक्तदाब जवळ जवळ दुप्पट झाला होता. डॉक्टरांना दाखविल्यावर ते गृहस्थ त्या कठीण अवस्थेत कसे काय जिवंत आहेत, असे आश्चर्य डॉक्टरांना वाटले. त्याही विलक्षण अवस्थेत त्या गृहस्थाला दूरश्रवणाची सिद्धी आपोआप साधनेमुळेच प्राप्त झाली होती. पण ती सिद्धी साधनेमुळे झाली असेल, असे डॉक्टरांना किंवा त्या गृहस्थालासुद्धा वाटले नाही. त्या गृहस्थाच्या दूरदर्शन आणि दूरश्रवण किमयेची परीक्षा पाहण्याकरिता डॉक्टर महोदयांनी आता या समयी त्यांच्या घरी त्यावेळेस काय घडत आहे, याबद्दल त्या गृहस्थास विचारले. गृहस्थाने सांगितले की, त्यांची मुलगी व मुलगा दोघांमध्ये जोरदार भांडण चालू असून मुलाने मुलीच्या थोबाडीत मारली आहे. टेलिफोन करून पाहिल्यावर ही गोष्ट अक्षरशः खरी निघाली. पण, डॉक्टरांनी त्याबद्दल विशेष कुतूहल न दाखविता, त्या गृहस्थाला जुजबी औषध देऊन त्याची बोळवण केली. त्या गृहस्थाची लेखकाशी गाठ पडली, त्यावेळेस लेखकाने त्याला साधनेत आवश्यक ते मार्गदर्शन केले. बिहारमध्ये लेखकाने एक असा योगी पाहिला की, जो बोलता बोलता आपल्या नाड्या आणि हृदय बंद करू शकत असे. साधनेमुळे दुसर्या एका साधकाचे अर्धे शरीर थंड, तर अर्धे शरीर गरम राहात असे. ती परिस्थिती साधनेत आवश्यक प्रगती झाल्यावर पालटली. पुढच्या भागात आणखी काही रोचक कथा पाहू.(क्रमशः)
शब्दांकन : राजेश कोल्हापुरे