आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा, ही सनातन संस्कृतीतील एक अत्यंत पावन पर्वणी मानली जाते. अखिल मानवसमाजाच्या कल्याणासाठी ज्यांनी अनंत वेदराशीचे चार शाखांमध्ये विभाजन केले, पुराणे व महाभारत अशा लोकोत्तर ग्रंथांना शब्दबद्ध करून एक शाश्वत ज्ञानदीप प्रज्वलित केला, त्या महर्षी वेदव्यासांचे तसेच त्यांचे पाईक असणार्या समग्र गुरुपरंपरेचे पूजन आजच्याच दिवशी केले जाते. समाजाला शाश्वत कल्याणाचा मार्ग दाखविणार्या ‘गुरु’तत्त्वाविषयीची भक्ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आपल्या पूर्वसूरींनी आजच्या या दिनविशेषाची योजना केलेली असावी. याच दिवशी संन्याशांच्या चातुर्मास्य नियमांंचा प्रारंभ होतो. या काळामध्ये यति-संन्यासी शक्यतो एकाच ठिकाणी निवास करून शास्त्राध्यापन, शास्त्रचर्चा आणि धर्मप्रचाराच्या कार्याला वेळ देतात. प्राचीन काळात जैन व बौद्ध संप्रदायांमध्येही श्रमणमुनींच्या वर्षावासाचा प्रारंभ याच सुमारास होत असे. अशा या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ‘गुरुततत्त्वचिंतनाची’ लहानशी शब्दपूजा बांधण्याचा हा अल्पसा प्रयत्न...
जय जय देव श्रीगुरो। अकल्पनाख्यकल्पतरो ।
स्वसंविद्द्रुमबीजप्ररो- । हणावनी ॥ (ज्ञानेश्वरी 18/10)श्रीज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंचा जयजयकार करताना भावार्थदीपिकेत ‘अकल्पनाख्यकल्पतरु’ आणि ‘स्वसंविद्द्रुमबीजप्ररोहणावनी’ अशी दोन विशेषणे योजली आहेत. यातील पहिल्या विशेषणाचा अर्थ आहे, जो स्वतः कल्पनातीत असून साधकाला ज्याची कल्पनाही करता येणार नाही, असे परमपद मिळवून देणारा कल्पवृक्षासारखा दाता, तर दुसर्या विशेषणाचा अर्थ, स्वरूपाच्या म्हणजेच आत्मरूपाच्या पूर्ण जाणिवेचा वृक्ष जिथे मूळ धरतो, ती आधारभूमी म्हणजे गुरु आहे. गुरुपौर्णिमेच्या या पावन प्रसंगी, गुरूंचे हे रूपलक्षण प्रत्येक शिष्याने आणि साधकाने हृदयावर कोरून ठेवण्यासारखे आहे.
गुरु कोण?
भारतीय संस्कृतीत ‘गुरू’ या विषयीचा विचारविश्व अत्यंत समृद्ध आहे. परंतु, या सर्व विचारांचे सारसर्वस्व ज्ञानेश्वर महाराजांनी वरील दोन विशेषणांत समाविष्ट केले आहे. ‘गुरू’ शब्दाच्या अनेक व्युत्पत्ती आणि व्याख्या सांगितल्या गेल्या आहेत:
‘गिरत्यज्ञानम्’ - जो अज्ञान दूर करतो तो गुरू.
‘गृणाति धर्ममिति’ - जो धर्माचा उपदेश करतो तो गुरू.
‘गीर्यते इति’ - ज्याचे स्तवन केले जाते तो गुरू.
गुरुगीतेतील एक समावेशक व्याख्या:
गुकारस्त्वन्धकारस्तु रुकारस्तेज उच्यते।
अन्धकारनिरोधत्वात् गुरुरित्यभिधीयते॥
भावार्थ: ‘गु’कार हा अज्ञानरूपी अंधकार दर्शवितो, तर ‘रू’कार तेज (प्रकाश) सूचित करतो. जो अज्ञानाचा अंधकार नष्ट करून ज्ञानाचा प्रकाश पसरवितो, तोच खरा गुरू होय.
आजच्या युगात गुरूचे महत्त्व -
आजच्या डिजिटल युगात ज्ञानाचा प्रवाह हा फक्त क्लिकवर उपलब्ध आहे, असे दिसत असले तरी मी कोण? या मूलभूत प्रश्नाचे उत्तर देणारा गुरू अजूनही अपरिहार्य आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि इंटरनेट माहितीचे भांडार उपलब्ध करून देऊ शकतात पण, ते स्वत्वाचा साक्षात्कार करून देऊ शकत नाहीत. गुरूची खरी भूमिका ही केवळ माहिती देण्यापलीकडे असते. तो शिष्याच्या अंतरंगातील अज्ञानाचा अंधकार दूर करतो आणि आत्मप्रज्ञेचा दिवा पेटवतो.
तंत्रज्ञान माहिती देते पण, गुरू अनुभवाचा मार्ग दाखवतो. ‘चॅटजीपीटी’सारख्या साधनांद्वारे आपण वेदांताचे सिद्धांत वाचू शकतो पण, त्याचा ‘अहं ब्रह्मास्मि’ हा भाव ’हृदयंगम’ करून घेण्यासाठी गुरूच्या सान्निध्याची आणि मार्गदर्शनाची गरज असते. गुरू हा शब्दातील अर्थ, अनुभवातील सत्य समजावून देतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला ध्यानाचे तंत्र युट्यूबवरून शिकता येईल पण, मनाच्या चंचलतेवर नियंत्रण मिळवण्याची कला ही गुरूमुळेच प्राप्त होते.
याचे कारण अगदी स्पष्ट आहे, ज्ञान हे केवळ माहिती नसून परिवर्तन आहे. गुरू शिष्याला केवळ शास्त्रार्थ शिकवत नाही, तर स्वतःला ओळखण्याची दृष्टी देतो. ज्ञानेश्वरीमध्ये समर्थ ज्ञानेश्वर म्हणतात ’स्वसंविद्द्रुमबीजप्ररोहणावनी’. म्हणजेच, गुरू ही ती जमीन आहे जिथे स्वतःच्या स्वरूपाचे बीज रुजते. ‘एआय’ हे तुम्हाला डेटाचे विश्लेषण करू शकते पण, आत्मचिंतनाची प्रक्रिया सुरू करू शकत नाही.
म्हणूनच, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे गुरूचे महत्त्व कमी होत नाही, तर त्याची भूमिका अधिक स्पष्ट होते. डेटा हा ज्ञान नाही आणि माहिती हा बोध नाही. स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणार्या प्रत्येक साधकाला एखाद्या क्षणी गुरूच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाची गरज भासतेच. कारण, अंतिम सत्याचा अनुभव हा शब्दांपलीकडचा आहे आणि तोच दाखवणे हे गुरूचेच अद्वितीय कार्य आहे.
‘स्वसंविद्द्रुमबीजप्ररोहणावनी’ या शब्दांमध्ये हा सर्व अर्थ सामावलेला आहे. गुरूचे खरे कार्य म्हणजे शिष्याला ‘मी कोण?’ याची जाणीव करून देणे, केवळ माहिती देणे नव्हे. ‘एआय’ तुम्हाला डेटा देईल पण, आत्मसाक्षात्कार करून देणार नाही. गुरू तुमच्या अस्तित्वाचा मूळ प्रश्न सोडवतो आणि ज्ञानाचा अनुभव घेण्यास शिकवतो. प्राचीन भारतीय शास्त्रांमध्ये गुरूंच्या कार्यपद्धतीनुसार त्यांचे सहा विशिष्ट प्रकारांत वर्गीकरण केलेले आहे. ते प्रकार म्हणजे प्रेरक, सूचक, वाचक, शिक्षक, दर्शक आणि बोधक.
1) प्रेरक गुरू: या प्रकारातील गुरू शिष्याच्या अंतरंगातील प्रेरणा जागृत करतात.
2) सूचक गुरू : अप्रत्यक्षपणे संकेत देऊन, शिष्याला स्वतःचा मार्ग शोधायला प्रवृत्त करतात.
3) वाचक गुरू : वेद-उपनिषदे, शास्त्रे इत्यादींचे अध्यापन करून ज्ञानाचा प्रसार करतात.
4) शिक्षक गुरू : नियम, पद्धती आणि अनुशासन यांद्वारे शिष्याला व्यवस्थित प्रशिक्षण देतात.
5) दर्शक गुरू : शिष्याच्या अभ्यासाचे, साधनेचे साक्षीभावाने परीक्षण करून वेळोवेळी मार्गदर्शन करतात.
6) बोधक गुरू : शिष्याच्या मनातील मी कोण? या प्रश्नाचे उत्तर आत्मबोधाद्वारे त्याला करवून देतात.
गुरूच्या भूमिकेचे तीन स्तर -
उत्तम गुरू : शिष्याला स्वतःला ओळखण्याची दृष्टी देऊन, त्याला ‘गुरुपदी’ (आत्मज्ञान) पोहोचवितात. तुकाराम महाराज म्हणतात,
आपणांसारिखे करिती तत्काळ।
नाही काळवेळ तयांलागी ॥
मध्यम गुरू : शिष्याला व्यावहारिक ज्ञान-विज्ञान देऊन सक्षम बनवितात. पण, शिष्य अंततः गुरूवरच अवलंबून राहतो.
अवम गुरू : केवळ अनुयायी निर्माण करतात. शिष्य बाह्य अनुकरण आणि व्यक्तिपूजेतच अडकून राहतात.
आपण आतापर्यंत जी गुरू संकल्पना पाहिली, त्याला अजून एक दुसरा आयामदेखील आहे. गुरू कसा असावा? हे आपण पाहिले. पण, शिष्य जर तयारीचा असेल, तर अवघं जग त्याच्यासाठी गुरू होतं हेही तितकंच सत्य आहे. संत एकनाथांनी आपल्या एकाकार भागवत टीकेमध्ये, यदू-अवधूत संवादातून गुरू संकल्पनेचा हा पदरही स्पष्ट उलगडून दाखविला आहे.
जो जो जयाचा घेतला गुण ।
तो तो गुरु म्यां केला जाण ।
गुरूसी आलें अपारपण ।
जग संपूर्ण गुरु दिसे ॥
ज्याचा गुण घेतला ।
तो सहजें गुरुत्वा आला ।
ज्याचा गुण त्यागरूपें घेतला ।
तोही गुरु झाला अहितत्यागें ॥
एवं त्यागात्यागसमतुकें ।
दोहींसी गुरुत्व आलें निकें ।
राया तूं पाहें पां विवेकें ।
जगचि अवघे गुरु दिसे ॥
-एकनाथी भागवत, 7.341-43
(अवधूत-यदू संवाद)यांत प्रामुख्याने गुरुत्वाच्या दोन वाटा निर्देशिलेल्या आहेत -
1. गुणग्रहणात्मक : एखाद्याच्या सद्गुणांचे अनुकरण केल्यास तो आपला गुरू होतो. उदा. मुंगीपासून परिश्रम, सूर्यापासून निःस्वार्थता शिकणे. हे सकारात्मक ग्रहणाभिमुख शिक्षण आहे.
2. दोषत्यागात्मक - एखाद्याचे वाईट गुण पाहून हे करू नये अशी प्रेरणा मिळाली, तर त्या व्यक्तीचेही ‘गुरुत्व’ संस्कृतीने स्वीकारले आहे.कसं असावं हे सांगणारा, दाखविणारा आदर्श गुरू मिळाला पाहिजे, तसंच कसं असू नये याचंही प्रात्यक्षिक दाखवणारा गुरू आयुष्यात भेटावाच लागतो. तैत्तिरीय उपनिषदामध्येदेखील दीक्षान्त उपदेशामध्ये आचार्य शिष्याला सांगतात,
यान्यस्माकं सुचरितानि तानि त्वयोपास्यानि नो इतराणि॥
अर्थात, आमच्या आचरणांत जे चांगल उदात्त आढळलं असेल, ते तू आत्मसात करावे आणि जे हीन आहे त्याचे मात्र अनुकरण तू करू नये.
या सगळ्या वर्णनांतून वेळप्रसंगी अधिकारी गुरू न मिळाल्यास, जिज्ञासू शिष्याने आपला विवेक जागृत केला तर अवघं विश्वच त्याला ज्ञानबोध करवून देण्यासाठी गुरुरूपाने आहे, हे तथ्य एकनाथ महाराजांनी स्पष्ट केले आहे. किंबहुना आपल्याकडे लघुत्व घेण्याची तयारी असेल, तर अवघ्या विश्वाला तुमचं ‘गुरुत्व’ घ्यावंच लागतं.
आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूंच्या या कल्पनातीत आणि स्वसंविद्बीजप्ररोहण करणार्या भूमिकेचे चिंतन करणे, प्रत्येकासाठी आवश्यक आहे.
प्रणव गोखले
(लेखक ‘धर्मकोश’ प्रकल्पामध्ये संपादक आहेत) जय जय देव श्रीगुरो