मुंबई - पश्चिम दृतगती महामार्गांवर शौचालयांची सुविधा नाही. मुंबईहून दहिसर, विरारला जाण्यासाठी दीड-दोन तास लागतात. त्यामुळे प्रवाशांची अडचण होते. याचा आढावा घेऊन पश्चिम दृतगती महामार्गांवर ज्या जागा आहेत तिथे शौचालयांची सुविधा प्रवाशांसाठी करणार का? अशी विचारणा आज सभागृहात बोलताना आ. दरेकर यांनी शासनाला केली.
विधानपरिषद सदस्य सुनील शिंदे यांनी शौचालयांबाबत लक्षवेधी उपस्थित केली. या चर्चेत सहभाग घेत आ. दरेकर म्हणाले की, प्रजा नावाची संस्था आहे. ही संस्था आणि वस्तुस्थिती यात फरक असतोच. अशा संस्थांची चौकशी झाली पाहिजे. एका संस्थेचा अहवाल म्हणजे वस्तुस्थिती नाही. या संस्थेने आतापर्यंत जेवढे अहवाल केले त्याचा आढावा घेऊन पटलावर ठेवणार का? ईस्टर्न सबर्ब हायवेला बऱ्यापैकी शौचालय आहेत. परंतु दृतगती महामार्गांवर शौचालय सुविधा नाही. तिथे ज्या जागा उपलब्ध होतील तिथे शौचालयाची सुविधा महापालिका आढावा घेऊन करणार का? असे प्रश्न दरेकरांनी उपस्थित केले.
यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, ज्या संस्थेने अहवाल मांडला आहे त्यात आणि महापालिकेच्या अहवालात प्रचंड तफावत आहे. प्रजा संस्थेने केलेल्या अहवालाची नक्की चौकशी केली जाईल, तसेच त्यामागील त्यांचा हेतू काय होता हेदेखील शोधून काढले जाईल. त्याचबरोबर महापालिकेने ५०० शौचालये मंजूर केली आहेत. पश्चिम दृतगती मार्गांवर जास्तीत जास्त शौचालय कशी होतील अशा सूचना दिल्या जातील.