उल्हासनगर : शिवभक्तांसाठी एक ऐतिहासिक, अद्वितीय आणि परमपवित्र अध्यात्मिक पर्वणी उल्हासनगर-अंबरनाथच्या भूमीत साकार होणार आहे. उल्हासनगर - अंबरनाथच्या सीमेवर असलेल्या प्राचीन शिवमंदिरात ११ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत “सव्वा कोटी पार्थिव शिवलिंग निर्माण व शिवमहायज्ञ” या महायज्ञाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, यामध्ये दररोज तब्बल १२ लाख पार्थिव शिवलिंग तयार करून विधीवत पूजन व विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी उल्हासनगरात आयोजीत पत्रकार परिषदेत केली.
या महायज्ञाचे अधिष्ठाता पूज्य बृजेशानंदजी महाराज (मनकामेश्वर धाम, प्रयागराज) असून, त्यांच्या पावन मार्गदर्शनात संपूर्ण यज्ञ पार पडणार आहे. भारतभरातील ही ५० वी पार्थिव शिवलिंग महापूजा असून उल्हासनगर-अंबरनाथच्या भूमीत होणाऱ्या या आयोजनामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालेला आहे. या महान अध्यात्मिक उपक्रमाचे संरक्षक धनंजय बोडारे आणि आयोजक अध्यक्ष संजय गुप्ता असून त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तयारी अत्यंत भव्य स्वरूपात सुरु आहे.
महायज्ञाची सुरुवात ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता उल्हासनगर कॅम्प ४ येथून निघणाऱ्या २१०० महिलांच्या भव्य कलश यात्रेने होणार आहे. ही यात्रा अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात पोहोचेल आणि तेथून पार्थिव शिवलिंग पूजनाचा विधिवत शुभारंभ केला जाईल. हा सोहळा ढोल-ताशे, शंखध्वनी, मंत्रोच्चार आणि भक्तीमय वातावरणात संपन्न होणार आहे. महायज्ञ दररोज सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालेल. यामध्ये देशभरातून येणारे हजारो शिवभक्त सहभागी होणार असून, पूजनानंतर दुपारी ३ ते ५ या वेळेत संगीतमय शिवमाहात्म्याचे रसपूर्ण वर्णन पूज्य ब्रजेशानंदजी महाराजांच्या सुमधुर वाणीतून केले जाईल. पूजेनंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसाद व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपाचे राष्ट्रीय नेते संजय जोशी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी, साधू-संत, महंत आणि लाखो शिवभक्त सहभागी होणार आहेत. हा सोहळा पूर्णतः सार्वजनिक असून सर्व नागरिकांना आपल्या कुटुंबासह सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. संपूर्ण यज्ञ ११ दिवस अखंड चालणार असून, यामध्ये भक्तांना शिवलिंग निर्मिती, पूजन, संगीतमय प्रवचन व महाप्रसाद यांचा अनुभव एकत्र मिळणार आहे. ही संधी केवळ पुण्यप्राप्तीच नव्हे तर एकात्मता, सेवा आणि श्रद्धेचा संगम असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे.
पार्थिव शिवलिंग पूजनाचे महत्त्व :
बृजेशानंदजी महाराज यांनी सांगितले की, पार्थिव शिवलिंग पूजन ही सनातन धर्मातील अत्यंत प्राचीन आणि फलदायी आराधना आहे. या पूजनाचा प्रारंभ माता पार्वती यांनी केला होता. रावण, सप्तऋषी आणि प्रभू श्रीराम यांनीही पार्थिव शिवलिंगाची पूजा केली होती. श्रीराम यांनी रामेश्वरधाम येथे याच पूजेमुळे विजय प्राप्त केला होता.
यज्ञाची वैशिष्ट्ये :
• दररोज १२ लाख पार्थिव शिवलिंगांची निर्मिती, पूजन आणि विसर्जन
• सव्वा कोटी पार्थिव शिवलिंगांची आराधना - भारतातील ५०वे पूजन
• महाप्रसाद व भंडारा : दररोज सर्व भक्तांसाठी दुपारी
• संगीतमय शिवमाहात्म्याचे वर्णन : दररोज दुपारी ३ ते ५ पूज्य बृजेशानंदजी महाराज यांच्याद्वारे