विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परिवहन विभागाची शालेय बस तपासणी

    07-Aug-2025
Total Views |

खानिवडे : 
प्रादेशिक परिवहन कार्यालय, वसई तर्फे जुलै २०२५ मधी शालेय विद्यार्थ्यांची वाहतू‌क सुरक्षितपणे होण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम राबविण्यात आली.

यामध्ये स्कूल बस म्हणून नोंदणी झालेल्या ४३६ एकूण स्कूल बसेसची तपासणी करण्यात आली, यामध्ये दोषी आढळून आलेल्या ८५ बसेसवर वायुवेग पथकामार्फत कार्यवाही पेऊन १४,२८०००/- रु. एवढी दंड वसुली करण्यात आलेली आहे. स्कूल बस तपासणी करताना वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र (fitness), परवाना (permit) वैध आहे किंवा कसे याबाबत तसेच स्कूल बसमध्ये प्रथमोपचार साहित्य (First Aid Box) अग्निशमन यंत्र (Fire Extinguisher), स्त्री सहवर्ती (Lady Attendant) आहे किंवा नाही याबाबत तपासणी करण्यात आली.

मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम ६६ अन्वये भाडेतत्वावर व्यवसाय करणाऱ्या वाहनाकडे विधीग्राह्य परवाना (permit) असणे आवश्यक आहे. या विशेष मोहिमेदरम्यान परवाना नसलेल्या खाजगी वाहनांतून विद्यार्थी वाहतूक होणाऱ्या एकूण ५८ वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे.

ही मोहीम यापुढेही सुरु ठेवण्यात येणार असून ज्या वाहनधाराकांने योग्यता प्रमाणपत्र, वाहन परवाना नुतनीकरण केले नसेल त्यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहनांची कागदपत्रे वैध करून घ्यावीत तसेच वाहन कराचा भरणा करावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्या पाल्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कूल बस परवाना नसलेल्या वाहनांतून त्यांची वाहतूक होणार नाही याबाबत काळजी घ्यावी.

स्कूल बस धोरण २०११ च्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक १४/०९/२०११ च्या शासन निर्णयातील तरतुदींचे पालन होत असल्याबाबत शालेय व्यवस्थापनाने खात्री करावी. शालेय परिवहन समितीच्या नियमित बैठकांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षितपणे होत असल्याचे सुनिश्चित करावे.