छत्रपती संभाजीनगर : जेव्हा जेव्हा निवडणूका येतात तेव्हा ईव्हीएम बिघडते आणि जेव्हा विरोधक विजयी होतात तेव्हा ईव्हीएम चांगले असते, असे प्रत्युत्तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना दिले आहे. गुरुवार, ७ ऑगस्ट रोजी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "जेव्हा जेव्हा निवडणूका येतात तेव्हा ईव्हीएम बिघडते आणि जेव्हा विरोधक विजयी होतात तेव्हा ईव्हीएम चांगले असते. एकनाथ शिंदेजींनी उद्धवजींकडचे आणि अजितदादांनी शरद पवारांकडचे सगळे लोक घेतले. त्यामुळे त्यांच्याकडे लढण्यासाठी माणसं नाहीत. आमच्याकडे रोज काँग्रेस पक्षातील लोक प्रवेश करत आहेत. अनेक नेत्यांनी काँग्रेस सोडली. आता पराभव निश्चित आहे, हे त्यांना माहिती आहे. निवडणूक लढवायला माणसं लागतात. त्यांच्या ट्रेनचे इंजिन निघून गेले आहे. त्यामुळे मुंबई महापालिका हातातून निसटताना दिसत आहे. आपल्या कार्यकर्त्यांना थांबवण्याकरिता हे सुरु आहे. ज्यावेळी तुम्ही वैचारिक पद्धतीने पक्ष पुढे नेऊ शकत नाही, तुमची कार्यकर्त्यांसोबतची बांधिलकी संपलेली असते त्यावेळी असे विषय काढून कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. राहुल गांधींनीसुद्धा हेच सुरु केले आहे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनीसुद्धा हेच सुरु केले आहे. पावसाळी अधिवेशनानंतर शेवटची पत्रकार परिषद आम्ही महायूती म्हणून एकत्रितपणे घेतली. पण महाविकास आघाडीने तीन वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेतल्या. अधिवेशन काळात त्यांचा काहीही अजेंडा नव्हता. सामना रोज आमच्याबद्दल वाईटच लिहिणार आहे. त्यामुळे सामनावर बोलण्यापेक्षा महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. आम्हाला जनतेला अपेक्षित विकास देण्यासाठी काम करायचे आहे."
"शेतकरी कर्जमाफीचा विषय लांबणीवर नाही. देवेंद्र फडणवीसजींनी आणि महायूतीने विधानसभेच्या निवडणूकीत योग्य शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, अशा शब्द दिला आहे. काही लोक फार्महाऊस बांधतात, मोठमोठे घरे बांधतात. तेसुद्धा शेतकरी कर्जमाफीमध्ये येतात. शेतकऱ्यांचे असे सर्वेक्षण झाले पाहिजे ज्यातून खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे. यासाठी समिती नेमण्यात आली असून त्या माध्यमातून लवकरच राज्याचे सर्वेक्षण होणार आहे. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची आहे. लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. कुठलीही कर्जमाफी किंवा विकास मेरिटवर झाला पाहिजे. ज्याला गरज नाही त्याला कर्जमाफी देऊन उपयोग नाही. त्यामुळे समाजातील शेवटच्या गरीब शेतकऱ्याला आम्ही मदत करणार आहे," असेही त्यांनी सांगितले.