चातुर्वर्ण्य
आपल्या शरीराभोवती एक तेजोवलय असते. प्रत्येक व्यक्तीच्या तेजोवलयाचा वर्ण त्याच्या गुण, कर्म, संस्कारानुरूप राहतो. व्यक्तिगणिक असे वर्ण अनंत असतील परंतु, या सर्व वर्णवलयांची विभागणी ऋषींनी प्रमुख केवळ चार उपविभागात केली आणि प्रत्येक वलयवृत्तीनुसार साधना करणे सुलभ जावे म्हणून चातुर्वर्ण्याच्या आधारावर भारतीय समाजाची पुनर्रचनाही केली. वर्ण आधारावर केलेली मानवी समाजाची रचना म्हणजेच चातुर्वर्ण्य रचना होय.ब्राह्मण
ब्रह्म जाणणारा तो ब्राह्मण! जन्मतः सारेच शूद्र असतात, असे शास्त्र सांगते. ‘जन्मना जायते शूद्रः संस्कारात द्विज उच्चते’, म्हणून वैदिक चातुर्वर्ण्यात जन्मतः कोणीच ब्राम्हण नाही. त्या त्या व्यक्तीच्या गुणकर्मानुसार त्याची जी प्रवृत्ती उत्पन्न होईल, त्या प्रवृत्तीला धरूनच व्यक्तीच्या वलयाचा वर्ण असेल. शुद्ध सात्विक वृत्तीच्या साधकांचे वलय शुक्ल वर्णाचे असते. शुक्ल वर्णाचे असतात, म्हणून ते ब्राह्मण असे वेद व उपनिषदे सांगतात. पण, त्या शुक्ल वर्णाचा अर्थ कातडीचा गोरा वर्ण नसून तेजोवलयाचा आहे. एखाद्या काळ्या रंगाच्या परंतु, सात्विक वृत्तीच्या व्यक्तीचे वलय पूर्ण शुक्ल राहू शकते, तर गोर्या कातडीच्या व्यक्तीचा दिव्य वलयवर्णसुद्धा कृष्ण राहू शकतो. वर्णव्यवस्था शरीराचे भोवताल पसरलेल्या दिव्य प्रकाश वलयाच्या वर्णावर अवलंबून आहे, कातडी वा व्यवसायावर अवलंबून नाही. म्हणून गीता सांगते, ‘चातुर्वर्ण्य मया सृष्टं गुणकर्म विभागशः।’ वृत्तीनुरूप वर्ण असतो, तर चातुर्वर्ण्य वर्णभेदावर आधारित आहे. वृत्तीचा परिणाम माणसाच्या शरीराभोवतालच्या तेजोवलयावर निश्चितच होतो. शुक्ल वलयाच्या व्यक्तींची वृत्ती सात्विक, सौम्य व आध्यात्मिक असते. असल्या शुक्लवर्णीय तेजोवलयाच्या व्यक्तींना चातुर्वण्यात, वृत्तीनुसार ब्राह्मणाचे उच्च स्थान आहे. आजही ज्या व्यक्तीची वृत्ती उच्च आहे, अशा साधूसंताच्या पायी सर्वच लागतात. चातुर्वर्ण्यात म्हणूनच ब्राह्मणांना पूजनीय मानले आहे. उच्च वृत्तीचा कोणीही ब्राह्मण बनू शकतो, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो. यादृष्टीने गोरा कुंभार, तुकाराम महाराज, संत नामदेव, संत कबीर ब्राह्मणच होत.
क्षत्रिय ज्यांची वृत्ती झुंझार व आक्रमक असते, अशांच्या तेजोवलयाचा वर्ण लाल असतो. असली लाल तेजोवलये ज्यांची असतील, त्या सर्वांना चातुर्वण्यात क्षत्रियाचे स्थान दिले आहे. देशरक्षण करण्यास असल्या आक्रमक वृत्तींच्या लोकांची आवश्यकता असतेच. म्हणून लाल वर्णाच्या लोकांना क्षत्रिय संबोधून त्यांना देशरक्षणाचे, वृत्तीरक्षणाचे कार्य दिले. ही तेजोवलये पाहण्याकरिता कठीण साधना करावी लागते. सामान्य माणसाला ही तेजोवलये दिसत नाहीत. लाल कातडीचा नव्हे, तर लाल तेजोवलयाचा माणूस चातुर्वण्यात क्षत्रिय मानला आहे.
वैश्य
वेद उपनिषदात वैश्याचा वर्ण पीत सांगितला आहे. त्यावरून वरवर विचार करणारे कथित विद्वान पीतवर्णीय वैश्य मानतात. पण, त्यांच्या या कल्पना बिनबुडाच्या आहेत. ज्यांची वृत्ती आपल्यालाच लाभ मिळावा अशी असते, त्यांच्या त्या वृत्तीनुसार त्यांच्या वलयाचा वर्ण पीत असतो. त्यामुळे तो वैश्य. वैश्य वृत्ती असते आणि वृत्तीनुसार व्यक्ती कर्म करीत असते. म्हणून वैदिक परंपरेत लाभसमयी, शुभसमयी पीतवस्त्र वापरतात. जसे लग्न प्रसंगी, भौतिक साधनेच्या वेळी पीत वस्त्र वा रंग वापरतात. पीत वृत्तीचे ते वैश्य होत.
शुद्रशुद्र वृत्तीचा वर्ण कृष्ण असतो. ज्याच्या तेजोवलयाचा वर्ण कृष्ण असेल, तो वरून कितीही गोरा वा उत्तम राहणीचा असो त्याची वर्गवारी शुद्रांतच होईल. सर्व दिखाऊ भंपक माणसे वृत्तीने शुद्र असल्यामुळे त्यांच्या त्या कृष्ण वृत्तीचा त्यांच्या तेजोवलयावर परिणाम होऊन, त्यांच्या कृष्ण वलयानुसार त्यांना कृष्णवर्णीय शुद्र मानण्यात आले. भारतातील अनार्यांच्या शूद्र वर्णाशी चातुर्वर्ण्यातील शुद्रवर्णाचा सुतराम संबंध नाही. विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी चातुर्वर्ण्याचे चुकीचे अर्थ सामान्यांना सांगून, या वैदिक समाजात व्यर्थ फूट पाडणे सुरू केले आहे. शूद्र गौर कातडीचे, तर ब्राह्मण कृष्ण कातडीचे राहू शकतात. यात कातडीचा कोणताही संबंध नाही.
मुष्टीप्रयोग-कुमार्ग साधना
शरीराच्या तेजोवलयावरून वैदिक परंपरेत चातुर्वर्ण्याची समाजरचना उत्पन्न झाली परंतु, त्या समाजरचनेचा पाया अध्यात्म हा होता. जीवांना थोड्या प्रयत्नांत अधिक उन्नती करता येईल, याबद्दलचे ते अतींद्रिय शास्त्र होते. परंतु, अवैदिक म्हणजे दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी तेजोवलयचा भंग करून, जीवांना त्रास देण्याचे एक कुमार्गी तंत्र शोधून काढले. त्याला ‘मुष्टीप्रयोग’ म्हणतात. मंत्रतंत्र याचा वापर करून, कुमार्गी तेजोवलयाला चरे पाडून जीव घेण्याचे तंत्र आरंभिले. त्याला मराठीत मूठ मारणे म्हणतात. ज्याच्यावर या मूठीचा प्रयोग केला जातो, त्याचे सभोवतालचे तेजोवलय प्रथम भंग केले जाते. हे तेजोवलय सुस्थितीत असले, तर त्या शरीरात राहणारा जीव सुखेनैव राहू शकतो. पण, तेजोवलय जर भंग पावले किंवा त्याला चरा गेला, तर त्या देहधारकाला मरणप्राय त्रास होऊन शेवटी तो देह सोडतो. वरून पाहिल्यास त्या शरीराला कोणताच रोग नसतो. त्यामुळे बाह्य लक्षणावरून रोग्याला काहीच झाले नसल्याचा निर्वाळा डॉक्टर देतात. परंतु, शरीराभोवतालचे तेजोवलय भंग पावल्याने तो रोगी भयंकर यातना भोगीत शेवटी मरण पावतो. असा वाईट प्रयोग करणाराही अपंग होऊनच मरतो आणि मृत्यूनंतरही प्रेतयोनीत खितपत पडतो.
वैदिक परंपरेत या वर्णवलयाचा उपयोग उच्च आध्यात्मिक साधनेकरिता केला, तर अवैदिक परंपरांनी त्याचा उपयोग जीवांना अतिशय कष्ट देऊन मारण्याकरिता केला. आईनस्टाइनने परमाणू फोडला गेल्यास त्यातून भयानक शक्ती निघते, असा सिद्धांत शोधला पण, त्याचा उपयोग नंतरच्या वैज्ञानिकांनी भलताच करून लक्षावधी माणसांचा संहार केला. यावरून हे सिद्ध होते की, शरीरात राहणार्या जीवांचे अस्तित्व केवळ जडशरीरावरच अवलंबून नसून, त्यावर असणार्या अतींद्रिय तेजोवलयावरही अवलंबून असते. मृत्यूचे कारण केवळ जडशरीराच्या व्यवहारावर अवलंबून नसून, त्यावरील उच्च स्तरांवर असणार्या अतींद्रिय तेजोवलयावरसुद्धा अवलंबून असते. जीवात्म्याचा प्रकाश म्हणजे हे दिव्य तेजोवलय होय. जीवात्म्याची परत जाण्याची वेळ आली की, त्याला धरून जडशरीरात विकृती उत्पन्न होतात आणि जीवात्मा शरीराचा त्याग करून निघून जातो. मृत्यूची सूत्रे केवळ जडशरीरातून हालत नसतात, तर ती तेथून त्या अतींद्रिय जगतातून हलविली जातात. (क्रमशः)
योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
9702937357