मंत्र मातृका पुष्पमाला स्तोत्र

    10-Jul-2025
Total Views | 94

चराचरातील ऊर्जेचा स्रोत असलेल्या आई जगदंबेच्या स्तवनाची अनेक स्तोत्रे आदि शंकराचार्य यांनी रचली. या स्तोत्रांच्या माध्यमातून त्यांनी सामान्य जनांसाठी आई भगवतीच्या उपासनेचा मार्ग सुलभ केला. आईची मानसपूजा करणार्‍या मंत्र मातृका पुष्पमाला स्तोत्राचा हा भावानुवाद...

पंचदशाक्षरी हा श्रीविद्येचा महामंत्र मानला जातो. या मंत्रातील प्रत्येक अक्षराला पुष्प समजून, आचार्यांनी या पंचदशी मंत्राची माला देवीच्या चरणी स्तोत्ररूपाने गुंफून अर्पण केली आहे. त्याचे नाव ‘मंत्र मातृका पुष्पमाला स्तोत्र.’

आदि शंकराचार्यांनी रचलेली ही अत्यंत अनुपम अशी 17 श्लोकांची एक विलक्षण स्तुतिमाला आहे. या स्तोत्रातील प्रथम 15 श्लोकांचे प्रारंभीचे अक्षर हे पंचदशाक्षरी मंत्राची बीजाक्षरे आहेत. 16वा श्लोक हा षोडशाक्षरी मंत्राच्या अत्यंत गुप्त बीजाक्षराने सुरू होतो, तर 17वा श्लोक संपूर्ण स्तोत्र मातेच्या चरणी स्वतःला समर्पण म्हणून रचला आहे. यामध्ये संसाराच्या बंधनांपासून मुक्ती व अंतःकरणाची शुद्धी याची प्रार्थना केली जाते.

या स्तोत्राने श्रीललितामहात्रिपुरसुंदरीच्या सगुण स्वरूपाचे चिंतन आणि ध्यानवाहनादि मानसोपचार द्रव्यांनी केले जाणारे पूजन, अशा दोन्ही गोष्टी सहजच घडतात. या स्तोत्राची रचना करताना आचार्यांनी अशा भक्तांचा विचार केला, जे पंचदशाक्षरी किंवा षोडशाक्षरी मंत्रात दीक्षित नाहीत परंतु, तरीही त्यांची श्रीललिता देवीवर अनन्यसाधारण अशी श्रद्धा आहे. ज्यांना शक्ती उपासनेचा लाभ घ्यावासा वाटतो. परंतु, शक्ती उपासना हा गुरुकृपाश्रित साधनामार्ग आहे. असाच आपल्या संस्कृतीत उल्लेख आहे. शक्ती उपासना परंपरेत साधकाला महागणेश मंत्राची दीक्षा देतात; नंतर बाला मंत्राची दीक्षा दिली जाते; नंतर त्याच्या साधनेनुसार पंचदशाक्षरी आणि शेवटी षोडशाक्षरी मंत्रात दीक्षित केले जाते.
आजच्या काळात, स्वतः आत्मसाक्षात्कार लाभलेले पूर्ण गुरू शोधणे फारच कठीण झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य भक्तांनाही पराशक्तीच्या कृपेचा अनुभव घेता यावा, म्हणून शंकराचार्यांनी हे स्तोत्र निर्माण केले. या श्लोकांमध्ये पराशक्तीचे आवाहन, तिची स्तुती आणि अखेरीस तिच्या पवित्र चरणी समर्पण आहे.

या स्तोत्राचे वैशिष्ट्य म्हणजे, यात कोणतेही बाह्य अनुष्ठान नाही. केवळ शुद्ध अंतःकरण, अश्रुपूर्ण नेत्र आणि समर्पणभावना आवश्यक आहे. विशेषतः शेवटच्या श्लोकाच्या पठणावेळी साधकाचे अष्टसात्विक भाव जागृत होऊन, त्याच्या नेत्रातून अश्रू वाहू लागतात. इतकी परम श्रद्धा आणि सामर्थ्य या स्तोत्रात आहे. हे स्तोत्र म्हणजे शंकराचार्यांच्या आराधनेचे अंतरंग रूप असून, हे त्यांनी या स्तोत्ररूपाने जगासमोर ठेवले आहे. त्यामुळे कोणत्याही सामान्य भक्ताने केवळ श्रद्धेने आणि भक्तीने हे स्तोत्र मनापासून म्हटले, तरी ते अत्यंत शक्तिशाली आध्यात्मिक अनुभव देऊ शकते किंवा साधकाचा आत्मउन्नतीचा मार्ग प्रशस्त करू शकते.

हे स्तोत्र आत्मसात करण्यासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण मानसिक बैठक विकसित करणे आवश्यक आहे. ईश्वरी शक्तीच्या विराट आणि व्यापक स्वरूपाची आपण केवळ कल्पना करू शकतो. आचार्यांसारखा उच्च कोटीचा साधक आपल्याला केवळ शब्दांच्या माध्यमातून देवीच्या स्वरूपाची कल्पना करून देऊ शकतो. आचार्य इथे जे आपल्या शब्दसामर्थ्याच्या बळावर देवीच्या स्वरूपाचे चित्र निर्माण करत आहेत, आपण त्याला पूर्ण श्रद्धेने आत्मसात करून मानसपूजा म्हणून, देवीच्या चरणी लीन होत या स्तुतीला आत्मसात करणे अभिप्रेत आहे. आचार्य जणू आपले प्रतिनिधी होऊन देवीच्या चरणी आपल्या श्रद्धेची ही सुमनांजली अर्पण करत आहेत. त्यामुळे हे स्तोत्र श्रद्धायुक्त अंतःकरणाने पठण केले, तर आपोआप अष्ट सात्विक भाव जागृत होतात.

श्लोक क्रमांक 1
कल्लोलोल्लसितामृताब्धिलहरीमध्ये विराजन्मणि-
द्वीपे कल्पकवाटिकापरिवृते कादम्बवाट्युज्ज्वले ।
रत्नस्तम्भसहस्रनिर्मितसभामध्ये विमानोत्तमे
चिन्तारत्नविनिर्मितं जननि ते सिह्मासनं भावये ॥ 1॥


शब्दार्थ

श्लोक क्रमांक 1 - श्रीमातेस अर्पण केलेले दिव्य आसन-ध्यानधारा
कल्लोल-उल्लासित अमृताब्धि लहरीमध्ये म्हणजे अमृतमय आनंदसागराच्या तेजस्वी आणि उंच लाटांमध्ये; विराजत-मणिद्वीपे म्हणजे अशा महासागराच्या मध्यभागी वसलेल्या आणि रत्नांनी सजलेल्या दिव्य मणिद्वीपावर; कल्पकवाटिका-परिवृते म्हणजे कल्पवृक्ष आणि दिव्य औषधी वनस्पतींनी वेढलेल्या सुंदर उद्यानांनी घेरलेले; कदंबवती-उज्वले म्हणजे कदंब वृक्षांच्या सान्निध्यात झळाळणारे; रत्नस्तंभ-सहस्र-निर्मित सभामध्ये सहस्त्रावधी मौल्यवान रत्नांनी बनवलेल्या दिव्य सभागृहाच्या मध्यभागी; विमानोत्तमे म्हणजे अत्युच्च आणि दिव्य विमानावर; चिंतारत्न विनिर्मितं सिंहासनम् सर्व इच्छांची पूर्तता करणार्‍या चिंतामणि रत्नापासून बनवलेले सिंहासन; जननी ते भावये हे जननी! हे माता! मी माझ्या मनाने तुला हे सिंहासन अर्पण करतो आहे. हे जगन्माते कृपया तू इथे आसनस्थ हो.

भावार्थ :

या श्लोकात साधकाच्या अत्युच्च ध्यानावस्थेचा परमोच्च बिंदू व्यक्त होतो. आदि शंकराचार्यांनी हा श्लोक असा रचला आहे की तो प्रत्येक सश्रद्ध साधकाच्या अंतःकरणातून प्रकट होणार्‍या भक्तिभावाला व्यक्त करतो. साधक म्हणतो आहे, हे माते! मी तुला मनोमन चिंतामणिरत्नांनी बनवलेले दिव्य सिंहासन अर्पण करतो आहे, त्याचा कृपा करून स्वीकार कर. येथे ‘जननी’ हे संबोधन फक्त वात्सल्याचे नाही, तर पूर्ण समर्पणाचे आहे. ‘श्रीमाता’ हे ललिता सहस्रनामात आलेले पहिलेच नाम आणि त्यामुळे साधकाची देवीच्या विराट अशा स्वरूपाशी असणारी आत्मीयता इथे प्रकट झाली आहे.

‘चिंतारत्न’ हे इच्छापूर्ती करणारे रत्न आहे. येथे प्रतीकात्मक रूपात साधक आपल्या सर्व इच्छा, भोग, अपेक्षा यांना एकवटून, देवीच्या पायाशी समर्पित करत आहे. तो म्हणतो, मी तुझ्यासाठी असे आसन निर्माण करतो, जे माझ्या सर्व इच्छांची परिणती आहे. आता त्यांचा उपयोग फक्त तुझ्या पूजनासाठी.

हे सिंहासन एका दिव्य विमानावर ठेवलेले आहे. ‘विमान’ म्हणजे चेतनेच्या सप्त स्तरांच्या पातळीवर बनवलेला एक उत्कृष्ट आध्यात्मिक मंडप आहे. त्याच्या खाली हे रत्नमय सिंहासन आहे. संपूर्ण रचना एक विशाल सभा किंवा प्रांगणाच्या मध्यभागी आहे, जिथे हजारो रत्नस्तंभ आहेत. हे संपूर्ण सभागृह मणिद्वीप नावाच्या द्वीपावर आहे. हा मणिद्वीप क्षीरसागराच्या मध्यभागी आहे. त्या महासागरात आनंदमय लाटा उसळत आहेत. क्षीरसागराच्या या परम आनंदमय स्वरूपाचा विचार इथे केला आहे. ‘सौंदर्यलहरी’च्या आठव्या श्लोकातही अशाच प्रकारे या मणिद्वीपाचे वर्णन आले आहे.

मानसपूजा हे बाह्य कर्मकांड नाही, हा एक ‘मनोमय यज्ञ’ आहे. यात साधक आपली सर्व सृष्टी देवीच्या चरणी समर्पित करतो. हे आसन, हे विमान, हे द्वीप, हे महासागर हे सर्व त्याच्या अंतर्मनातून उत्पन्न झाले आहे. ते सगळे तो देवीच्या चरणी अर्पण करून, तिला आसनस्थ होण्याचे आवाहन साधक करतो आहे. मानसपूजेत लीन असणारा साधक हा आपल्या उपास्य ईश्वरीशक्तीला, स्वतःच्या सन्मुख कल्पून तिच्या चरणी आपली सेवा परम श्रद्धेने आणि भक्ती भावाने अर्पण करतो. मानसपूजा ही अन्य कोणत्याही उपासना पद्धतीपेक्षा अधिक उच्च कोटीची साधना मानली गेली आहे.

या स्थितीत साधकाचे मन पूर्णपणे देवीच्या स्वरूपाच्या चिंतनमय विचारांनी व्यापलेले असते. साधक देहाने जरी स्थूल जगात असला, तरी मन त्या परम आनंदमय आणि दिव्य संस्कारांची अनुभूती घेण्यात लीन असते. चेतना पूर्णपणे अंतर्मुख झाल्यावरच, या उच्च पातळीची अवस्था प्राप्त होऊ शकते. सामान्य साधकही या स्तोत्रावलीला आत्मसात करून ही अनुभूती मिळवू शकतो, हे या स्तोत्राचे सामर्थ्य आहे. क्रमशः

सुजीत भोगले
9370043901

'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121