
रामोशी समाजाच्या उत्थानाचे कार्य करणारे दत्तात्रय जमादार. आयुष्यात असंख्य समस्या, पण तरीही त्यांनी आजपर्यंत १३ जणांचा जीव वाचवला. त्यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा हा लेख...कुंडमळाला चक्कर मारून यावी, म्हणून तो तरुण त्यादिवशी इंद्रायणी नदीच्या पुलावर गेला. पण, अचानक पूल कोसळला. लहान मुलं, माता-पिता, तरुण-तरुणी नदीमध्ये पडले. जीवाच्या आकांताने ते ओरडू लागले, "वाचवा, वाचवा...” या तरुणाने क्षणात नदीत उडी मारली. एक एक करून सहा लोकांना पाण्याबाहेर काढले. त्यांच्या पोटात गेलेले पाणीही काढले. त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला. ते सहाजण वाचले. भयंकर घटनेत सहाजणांचे जीव वाचणारा तो तरुण आहे, दत्तात्रय जमादार.
दत्तात्रय यांनी आजपर्यंत १३ जणांचा जीव वाचवला आहे. तसेच नदीमध्ये, तलावामध्ये आत्महत्या झाल्यानंतर किंवा खून करून मृतदेह नदीत फेकल्यानंतर ते मृतदेह बाहेर काढणे म्हणजे कठीण काम. मात्र, पोलिसांना मदत म्हणून त्यांनी चार मृतदेह नदीच्या तळातून बाहेर काढले आहेत. उत्तम जलतरणपटू, धावपटू, बॉक्सर आणि अॅथेलेटिक म्हणून दत्तात्रय यांचा लौकिक आहे. तेे ‘बेडर बेरड रामोशी संघटने’चे ते सक्रिय कार्यकर्ता आहेत. संघटनेच्या माध्यमातून समाजातील तरुणांचे संघटन करणे, मूळ सामाजिक प्रवाहात येण्यासाठी त्यांना सहकार्य करणे, असे काम दत्तात्रय करतात. स्वारगेट येथे आद्यक्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांचे समाधीस्थळ आहे. या समाधीस्थळाची स्वच्छता राखणे, सुरक्षा पाहणे याकडे दत्तात्रय स्वतः वेळ देऊन काम करतात. रामोशी समाजाबद्दल अनेक चुकीच्या धारणा आजही आहेत. समाजात रामोशी समाजाच्या वैभवशाली इतिहासाबद्दल जागृती करण्यासाठीही दत्तात्रय प्रयत्न करतात. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसर्यांचा जीव वाचवण्यासाठी नेहमी तत्पर असणार्या दत्तात्रय यांच्या जीवनाचा मागोवा घेऊ.
मूळचे धाराशिवचे माणिक आणि कलावती जमादार या रामोशी समाजाच्या कुटुंबाला चार अपत्ये. त्यापैकी एक दत्तात्रय. कामानिमित्त जमादार कुटुंब मुंबईत बोरिवली येथे राहू लागले. माणिक हे हमाली करायचे, तर कलावती या चार घरच्या धुणीभांडी करायच्या. त्यावरच घर चालायचे. २००७चे साल होते आणि दत्तात्रय सात वर्षांचे असतानाच माणिक यांचा मृत्यू झाला. घरावर आकाश कोसळले. आईचा आक्रोश पाहून सात वर्षांच्या दत्तात्रय यांना अवेळीच प्रौढत्व आले. आईला मदत व्हावी म्हणून त्यांनी सकाळी वर्तमानपत्र घरोघरी टाकणे आणि दुपारी धान्याच्या दुकानात धान्य भरण्याचे काम करणे सुरू केले. त्यातून कुटुंबाचे एकवेळच्या जेवणाचा खर्च निघे. याच काळात त्यांना पोहण्याचाही छंद लागला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये ते आणि त्यांचे मित्र पोहायला जाऊ लागले. या सगळ्या काळात त्यांचे आयुष्य म्हणजे काम आणि शाळा. पण, त्याचवेळी बोरिवलीच्या त्या कष्टकर्यांच्या वस्तीमध्ये नशा आणि भांडण, मारामार्या यांचा सुळसुळाट होता. त्यामुळे कलावतीबाईंनी मुलांच्या शिक्षणासाठी, सुरक्षित संस्कारांसाठी पुण्याला भावाकडे मुळशीच्या पुनावळे गावी आल्या. त्यांचे घर पवना नदीच्या बाजूला होते. दत्तात्रय पवना नदीत पोहण्याचा छंद जोपासू लागले. पुढे दत्तात्रय यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला. दिवसभर ते नोकरी करत, त्यातून घर सांभाळत. तसेच, त्यांनी पोहण्याचा अधिकृत कोर्सही केला. त्यांना स्विमिंग प्रशिक्षक म्हणून अर्धवेळ नोकरीही लागली. उरलेल्या वेळेत ते सैन्य भरतीच्या प्रशिक्षणाचा तसेच, धावणी आणि इतर क्रीडा प्रकारांचा सराव करायचे. सैन्य भरतीच्या क्रीडा स्तरावरच्या प्रक्रियेत ते गुणवत्तेने उत्तीर्ण झाले. मात्र, उंची कमी पडल्यामुळे सैनिक होण्याची त्यांची संधी हुकली. मग त्यांनी पोलीस भरतीसाठी प्रयत्न केले. तीन वेळा त्यांनी पोलीस भरतीची परीक्षा दिली. मैदानी स्तरावरच्या परीक्षेमध्ये त्यांचे नाव गुणवत्ता यादीत आले. मात्र, लेखी परीक्षेमध्ये त्यांची निवड झाली नाही. दत्तात्रय यांच्यासाठी हा काळ मोठा दुखद होता.
असो. अनेक तरुणांना पोलीस होण्याची इच्छा असते. मात्र, मैदानी परीक्षेत त्यांचा टिकाव लागत नाही. दत्तात्रय यांनी अशा तरुणांना विनामूल्य पोलीस भरती प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. दत्तात्रय हे लेखी परीक्षेमध्ये एक गुण कमी पडला म्हणून पोलीस भरती प्रक्रियेतून तीन वेळा वगळले गेले. पण, त्यांच्या प्रशिक्षणातूनच अनेक तरुणांची पोलीस म्हणून नियुक्ती झाली. स्वतःजवळ जे जे उत्तम आहे, ते दुसर्यांना देण्याचा हा ध्यास दत्तात्रय यांचे मोठेपण सांगून जातो. त्यांना गोव्याच्या ‘आयर्न मॅन’ स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे. ती स्पर्धा जिंकेन, असा आत्मविश्वास आणि त्यांची तयारीही आहे. पण, दुर्दैव असे की, नोकरीमध्ये एक दिवसही रजा घेतली, तर भाकरीचा प्रश्न पडतो. तरीही दत्तात्रय खचले नाहीत. त्यांनी पोलीस परीक्षेचा सराव कायम ठेवला आहे. ते पुन्हा पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. ते म्हणतात, "आमचा समाज देशाभिमानी होता आणि आहे हे सिद्ध करायचे आहे. आजपर्यंत आमच्या समाजाला कायदा तोडणारे म्हणून ओळखले जायचे. पण, मला कायदा-सुव्यवस्थेचा भाग व्हायचे आहे. त्या माध्यमातून समाज-देशसेवा करायची आहे.” दत्तात्रय यांच्याबाबत वाटते की, रामवंशी समाजाच्या कायदाप्रेमी प्रतिमेसाठीतरी दत्तात्रय यांची इच्छा पूर्ण होवो. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!