आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः।
तस्य फलानि तपसा नुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः॥ 6 ॥
बिल्वः-बेलाचे झाड आंब्यासारखे मोठे होते, उन्हाळ्यात त्याची फळे तयार होतात. उत्तर हिंदुस्थानात हा वृक्ष जास्त सापडतो. हा वृक्ष श्रेष्ठ मानला जातो. कवठाएवढ्या लहान फळापासून ते लोटीएवढी मोठी फळे आढळतात. या फळाचे कवच नारळासारखे कठीण असते व आतला गर पिवळट रंगाचा तुरट-गोड असतो. हे पोटासाठी मोठे औषध आहे. उत्तर हिंदुस्थानात उन्हाच्या त्रासापासून संरक्षणासाठी या फळांचा चांगला उपयोग होतो, पाने कडू असतात. पण याची फुले कधीच दृष्टीस पडत नाहीत. वड, पिंपळ, औदुंबर, अंजीर यांचीही फळे क्वचितच दृष्टीस पडतात. याच्या अस्तित्वासाठी विशिष्ट उष्ण तामानाची गरज असते, ती अग्नीमुळे निर्माण झाली, म्हणून तपसोऽधिजातो. वनस्पतीसृष्टी प्राणीसृष्टीच्या अगोदर निर्माण झाली आहे. वनस्पतींची उत्क्रांती होत होती, तेव्हा अजून फूल आणि फळ यांचे वेगळेपण निर्माण झालेले नव्हते, तेव्हाच हा वृक्ष अस्तित्वात आला. याला ‘अधिजात’ ’र्डीिीशाश लेीपश’ असे म्हटले आहे. हा वृक्ष लक्ष्मीला फार प्रिय आहे व याच्या आसपास श्रीसूक्त म्हणावे, अशी प्रथा आहे. यामुळे माझी अलक्ष्मी दूर होवो.
उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह।
प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे॥7॥
देवसखा-कुबेर हा देवांचा मित्र आहे. त्यांचा खजिनदार आहे. मी या देशात जन्मलो, या ठिकाणी ऋद्धी-योग्य प्रकारे मिळवलेली समृद्धी व कीर्ती, हे देवसखा तुझ्यामुळे मला हे मिळो आणि कुबेराने-मणी-चिंतामणीही द्यावा.
क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम्।
अभूतिमसमृद्धिं च सर्वां निर्णुद मे गृहात्॥8॥
तुझी मोठी बहीण अलक्ष्मी हिच्यामुळे हाव, लोभ, पिपासा, दारिद्—य, दुःख व दुर्भाग्य यांचे अस्तित्व येते. सत्ता-संपत्ती यांचा लोभही आवरत नाही. याबरोबर अनारोग्यही येते तरी, हिला दूर करण्याचे सामर्थ्य मला दे. या सर्वांना माझ्या घरातून, देशातून घालवून टाक.
गंधद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम्।
ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम्॥9॥
गंध हा पृथ्वीचा गुण आहे. निरनिराळ्या वनस्पतींचा सुगंध आहे. करी-हत्ती. श्रीसूक्त लिहिले गेले, त्याकाळी गाय, बैल, घोडे, हत्ती यांनाही धन मानत होते. या सर्व पशुधनाला पुष्ट ठेवणे कठीण आहे, पण तू यांना पुष्ट ठेव. या सर्व पृथ्वीवरची तू मुख्य देवता ईश्वरी असलेल्या तुला मी आवाहन करतो.
मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि।
पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीः श्रयतां यशः॥10॥
माझे मनाची प्रवृत्ती नेहमी सत्याकडेच असावी, त्यामुळे नुसते मनच नाही तर वाणी आणि कायिक सत्याकडेच असावी. त्यामुळे सर्व व्यवहार सफळ होत राहोत. तसेच पशुसंपत्ती व अन्नसंपत्तीही असो. यश, कीर्ती माझा आश्रय करो.
कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम।
श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम्॥11॥
कर्दम म्हणजे चिखल. जेथे पृथ्वीतत्त्व, जलतत्त्व, उष्णता यांचे अस्तित्व असेल, तेथेच चिखलाची निर्मिती होऊ शकेल. या गोष्टी असल्याशिवाय कोणतेही बीज अंकुरणार नाही. बी अंकुरल्याशिवाय वनस्पतीसृष्टी, प्राणीसृष्टी अस्तित्वात येऊ शकणार नाही. म्हणून हे कर्दमा-कर्दम हा लक्ष्मीचा-श्रीचा पुत्र समजला जातो, तू माझ्या कुळामध्ये-वंशामध्ये म्हणजे पिढ्यान्पिढ्या राहावेस. तू असलास म्हणजे फुलांच्या माळा घातलेली लक्ष्मी-श्री नेहमी आमच्या बरोबर राहील.
आपः सृजन्तु स्निग्धानि चिक्लीत वस मे गृहे।
नि च देवीं मातरं श्रियं वासय मे कुले॥12॥
अन्नाच्या अस्तित्वाने ओलावा-आपलेपणा निर्माण होतो. त्यामुळेच ती शक्ती निर्माण होते. त्यामुळे उत्तम-मंगल कार्ये आमच्याकडून घडो. हे चिक्लीत तू माझ्या घरी राहिलास की, तुझी माता श्री ही सुद्धा आमच्या घरी निरंतर वास करील.
आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीम्।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह॥13॥
पुष्कर-दुष्काळाचे ढग, पिंगल-कुबेराच्या खजिन्याचे नाव. जी लक्ष्मी आर्द्र आहे-कुबेराच्या खजिन्याचे, जिने दुष्काळाचे ढगसुद्धा पाण्याने पुष्ट केले आहेत, जी बिजांनी परिपूर्ण, शीतल आहे, तिला हे जातवेद आमंत्रित कर.
आर्द्रां यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीम्।
सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह॥14॥
यष्टी-काठी. हे सर्व सूत्र व्यवस्थित चालावे, यासाठी धाक असण्यासाठी, हातात लाठी घेतलेली-सूर्यशक्तीने भरलेली, त्याच्यासारखी झळाळणारी, लक्ष्मी, जातवेदा तू आमंत्रि कर.
तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम्।
यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योऽश्वान्विन्देयं पुरुषानहम्॥15॥
हे जातवेद अग्नी जी लक्ष्मी अपगामिनी नाही, उत्तमप्रकारे मार्ग पाहून येते, तिला आमंत्रित कर. प्रभूतं-निर्माण होणे. जिच्यापासून निरनिराळे पशुधन, दासदासी निर्माण होतात, जिच्यामुळे मिळतात, त्या लक्ष्मीला आमंत्रित कर.
यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्य मन्वहम्।
श्रियः पञ्चदशर्चं च श्रीकामः सततं जपेत्॥16॥
आज्य-तूप, आहुतीत देण्याची वस्तू. जो कोणी शुचिर्भूत होऊन तसेच मनाला ताब्यात ठेवून, तुपाचा किंवा दुसरी आहुती देऊन यथाशक्ती जप व होम करील त्याला श्रीची पूर्ण कृपा मिळेल.
ॐ श्रीसुक्ताच्या देवतेच्या ध्यानाचा श्लोक
या सा पद्मासनस्था विपुलकटितटी पद्मपत्रायताक्षी।
गम्भीरा वर्तनाभिः स्तनभर नमिता शुभ्र वस्त्रोत्तरीया।
लक्ष्मीर्दिव्यैर्गजेन्द्रैर्मणिगण खचितैस्स्नापिता हेमकुम्भैः।
नित्यं सा पद्महस्ता मम वसतु गृहे सर्वमाङ्गल्ययुक्ता॥
पद्म म्हणजे कमळ. लक्ष्मीचा निवास हा कमळात आहे. कमळ म्हणजे फूल-पाण्यांत उमलणारे. पण जमिनीवरही पाण्याशिवाय फुलाचे अस्तित्व असू शकत नाही. कोणत्याही झाडाला पाणी दिले नाही, तर त्याला फूल येणार नाही. आर्द्रता आणि उष्णता असल्याशिवाय, परागीकरणाची शक्ती फुलात निर्माण होऊ शकत नाही. पद्मासनस्था-पद्म हेच जिचे आसन, बसण्याची जागा आहे ती. तिचे डोळे कसे आहेत, तर कमळाचे पान कसे विस्तीर्ण असते, तसे तिचे डोळे मोठे व तीक्ष्ण आहेत. सर्व जगाची माता असल्यामुळे कटी विस्तीर्ण आहे, वर्तनाने गंभीर आहे. सर्व जगाचे पोषण करायचे असल्यामुळे स्तनभार मोठा आहे. सर्वांना सामावून घेण्यासाठी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केले आहे. या लक्ष्मीला दिव्य गज-इरोवान मेघ, इरा म्हणजे विज म्हणून इरोवान मेघ म्हणजे, वीजयुक्त मेघ-गजेंद्र हिला हेमकुंभाने पाण्याचा अभिषेक करत आहेत. हे कुंभ चमकणार्या विजेमुळे रत्नखचित आहेत, असे वाटते. अशी ही लक्ष्मी, पद्महस्ता लक्ष्मी सदैव माझ्या-आमच्या घरी राहो.
- सुजीत भोगले