वेद हे निरर्थक मंत्र नसून जन्मापूर्वी व मृत्यूनंतरच्या गूढ ज्ञानाचे वर्णन करणारे सूत्रमय वर्णन होत. वेदांकडे या दिव्य ज्ञानप्राप्तीच्या दृष्टीने पाहिल्यास त्यातून बरेच गहन ज्ञान जगासमोर येईल, अशी लेखकाला स्वानुभवाने खात्री आहे. मृत्यू झाल्यानंतर पुन्हा जिवंत झाल्याचे प्रत्यक्ष अनुभव अनेकांना असतील. पण, त्याचे व्यवस्थित संकलन करून जगासमोर मांडण्याचे काम भारतात अद्याप सुरू झाले नाही.
प्रत्यक्ष घडलेल्या काही आश्चर्यकारक घटना
तीन गृहस्थांनी सांगितलेली माहिती पुढीलप्रमाणे देत आहे. त्यांची खरी नावे सध्या देता येत नाही. त्यामुळे खालील नावे काल्पनिक आहेत.
श्री देशपांडे निवृत्त झालेले, नागपूर येथे राहणारे व साधारणतः 62 वर्षे वयाचे गृहस्थ. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे साधारणतः दहा वर्षांपूर्वी त्यांना दुर्धर आजार होऊन ते प्राकृतिकदृष्ट्या मरण पावले. घरची मंडळी घाबरली. डॉक्टरांना पाचारण केले. डॉक्टरांनी व्यवस्थित तपासले आणि सांगितले की, ते गृहस्थ मरण पावले. रडारड सुरू झाली. अंत्येष्टीचे सामान आणण्याकरिता काहींना पाठविण्यात आले. मात्र, नंतर त्या गृहस्थाने आपला त्यावेळचा अनुभव सांगितला तो असा.
खाली माझे शव पडलेले आणि सभोवताली बसलेली मंडळी रडत होती. माझ्याभोवती त्यावेळेस धुम्र फिकट हिरवा दिव्य वर्ण पसरला होता. मीही त्याच वर्णात अंतर्बाह्य न्हाऊन निघालो होतो. अतिशय हलके वाटत होते. दिव्य आनंदात होतो. जड शरीर नसल्यामुळे वेदनादेखील नव्हत्या. परंतु, खालची मंडळी रडताना पाहून मी मेलो नाही, असे त्यांना सांगत होतो. माझी वाणी त्यांना ऐकू जात नसावी असे दिसले. आता काय करावे ते सूचेना. माझी देहात परत जाण्याची तशी इच्छा नव्हती. कारण, मी काही वेगळा आहे असे मला वाटेना. मी आपल्या मृत देहाच्या वर साधारणतः दोन हात अंतरावर तरंगत होतो. कुणालाच माझे म्हणणे ऐकू येत नव्हते. तिरडी आणली गेली आणि शवाला उचलण्याकरिता माणसे समोर आली. मात्र, तोच माझ्या अंतराळातील जीवात्म्याला एक झटका बसला आणि मी जमिनीवर होतो आणि माझ्या मृत शरीरात हालचाल करू लागलो. सर्वजण आश्चर्याने व आनंदाने उद्गारले, जिवंत झाले, जिवंत झाले! बरेच दिवस त्यांना औषधोपचार करावा लागला. नंतर ते चांगले फिरू लागले.
श्री सावंत हे औरंगाबादचे राहणारे इंजिनिअर आहेत. फार बुद्धिमान असून त्यांनी विद्युत तांत्रिक विभागात अप्रतिम संशोधने केली आहेत. खाणावळीत विषारी पदार्थ पोटात गेल्यामुळे त्यांना विषबाधा झाली. औषधे लागू पडेनात. शरीर काळे ठिक्कर पडले. सर्वांनीच आशा सोडली होती. रुग्णालयात होते. जवळ नातेवाईक नव्हते. एके दिवशी दुपारी त्यांना असे आढळले की, ते त्यांच्या शरीराबाहेर साधारणतः तीन फुटावर तरंगत आहेत. खाली त्यांचे मृत शरीर पडलेले पाहून ते आणखी घाबरले. आपण मरण पावलो व आता आपले कसे होणार? मृत्यू आल्यास हाती घेतलेली कामे कशी पूर्ण होणार या विवंचनेत होते. मरण्याची इच्छा नसतानासुद्धा त्यांना मरण यावे, याचे त्यांना अतिशय वाईट वाटले. पण, आता जिवंत कसे व्हायचे? इतक्यात त्यांना एक जोरदार झटका बसला आणि ते एकदम आपल्या खाली पडलेल्या मृत शरीरात शिरले. मृत्यूच्या भयाने ते इतके घाबरले की, जडशरीरात प्रवेश केल्यावर अंगात तिळमात्र शक्ती नसतानासुद्धा ते बिछान्यावरून उठून वेगाने रुग्णालयाच्या बाहेर पळाले. आरडाओरडा झाला व त्यांना रुग्णालयाच्या फाटकापाशी धरण्यात आले. नंतर त्यांना बरे व्हायला वेळ लागला नाही. त्यांची भेट झाल्यावर लेखकाने त्यांना काही प्रश्न विचारले.
प्रश्न : शरीराबाहेर जाताना काय अनुभव आले? श्वास बंद होणे, रक्तप्रवाह बंद होणे, एखादे अतिशय तेजस्वी वलय गरगर अपसव्य गतीने फिरताना दिसणे इत्यादी अनुभव आला का?
उत्तर : मी स्वतःला वर पाहीपर्यंत मला काहीच जाणीव नव्हती. पण, मध्यंतरी केव्हा तरी आपण अतिशय दाट काळोखातून वेगाने चाललो आहोत असा मला अनुभव आला.
प्रश्न : तुम्हाला आणखी काय दिसले?
उत्तर : माझ्या खाली पडलेल्या मृत शरीराशिवाय अन्य काहीच दिसत नव्हते.
प्रश्न : शरीरात पुन्हा शिरताना काय अनुभव आले?
उत्तर : मला आठवत नाही. पण, एक झटका बसून मी खाली ओढला गेलो, एवढेच मला आठवते. त्यानंतर मी घाबरून जीव घेऊन पळत सुटलो.
प्रश्न : तुम्ही काही आध्यात्मिक साधना करता का?
उत्तर : मी नियमित ध्यान करतो.
त्यांची साधना अवस्था चांगली आहे. त्यानंतर त्यांना मुंबईत असताना ‘षटचक्र भेदन’ (ध्यान प्रक्रिया) व ‘योगनिद्रा’ शिकविण्यात आली. योग वर्गाला ते पाच दिवस उपस्थित होते. साधी योगनिद्रा लावताना त्यांचा श्वास बंद पडायला पाहतो व रुधिरप्रवाह जवळ जवळ बंद पडल्यासारखा असतो. त्यांना कसलीच जाणीव होत नाही, असे ते म्हणतात. योगनिद्रा संपल्यावर त्यांच्या भ्रमध्यावर बोटाने आघात केल्यावर मग ते जागृत होत होते व उठून बसत होते. त्यांना त्या अवस्थेत बाह्य जगाची व्यवस्थित जाणीव यायला पाच ते सहा मिनिटे लागायचे.
श्री कदम हे नागपूर जवळील हिंगणघाटचे राहणारे एक व्यापारी होते. एकदा लेखकाची व्याख्याने तेथे असताना त्यांची व लेखकाची भेट झाली. त्यांचे म्हणणे असे की, काही वर्षांपूर्वी हृदयविकाराने ते मरण पावले असता, डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. डॉक्टरांनी अनेक उपाय करून त्यांचा श्वास पुन्हा सुरू केला. या अवधीत 15-20 मिनिटे निघून गेली. हे गृहस्थ डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे पुनर्जिवित झाले. त्यांना प्रश्न केल्यावर त्यांनी अशी माहिती दिली की, माझा श्वास बंद पडत चालला होता वा माझा गळा कोणीतरी दाबल्यासारखा मला अनुभव आला आणि दूरवर एक काळी व्यक्ती उभी असल्यासारखी वाटले. पण, भयामुळे मी त्या व्यक्तीकडे पाहण्याची हिंमत करू शकत नव्हतो. मी कोठे, कसा होतो, हे मला कळत नव्हते. माझे हृदय अतिशय धडधडत होते.
अशी अनेक उदाहरणे आहेत. तात्पर्य हेच की, जगभरात मानवी मेंदूला अतर्क्य व अनाकलनीय अशा अनेक घटना घडत असतात. अशा घटनांचा अभ्यासू वृत्तीने मागोवा घेतल्यास त्या निश्चितच ज्ञानात भर टाकणार्या ठरतील यात शंका नाही. तसे प्रयत्न मात्र झाले पाहिजेत. तरुणांनी ध्यान आणि योगनिद्रेचा अभ्यास करून यात अधिक अन्वेषण करावे.
शब्दांकन : राजेश कोल्हापुरे