जलालउद्दीन पिर छांगूरबाबा हिमनगाचे टोक

    13-Jul-2025   
Total Views |

नितू आणि नवीन रोहरा यांना धर्मांतरित केल्यावर जलालउद्दीन उर्फ छांगूरचे धर्मांधांमध्ये प्रस्थ वाढले. हिंदूंचे धर्मांतरण तसेच, नेपाळमार्गे मुस्लीम घुसखोरांना देशात वसवायचे, हेच त्याचे काम. छांगूर हे का करत होता? तर त्याला बलरामपूर १०० टक्के मुस्लीमबहुल परिसर करायचा होता. असे करता करता, पूर्ण भारत इस्लाममय आणि ‘शरिया’च्या अंतर्गत यावा असे या छांगूरचे स्वप्न होते. त्याने आजपर्यंत एक हजार, ५०० हिंदू महिलांचे धर्मांतरण केले. या धक्कदायक षड्यंत्राचा मागोवा घेणारा हा लेख..

ब्राह्मण आणि शीख मुलींचे धर्मांतरण केले तर १५ लाख, ओबीसी समाजाच्या मुलीला फसवले तर दहा ते १२ लाख आणि मागासवर्गीय समाजाच्या मुलीला धर्मांतरित केले, तर सात ते आठ लाख रुपये ठरलेले. या पद्धतीने तीन ते चार हजार मुलींना जाळ्यात ओढण्यात आले आणि त्यातील जवळपास एक हजार, ५०० मुलींचे धर्मांतरणही करण्यात आले. या सगळ्याचा कर्ताधर्ता होता उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथील जलालउद्दीन उर्फ छांगूरबाबा. यासाठी त्याने परिसरातील मुस्लीम युवकांना हाताशी घेतले. त्यांना हिंदू मुलींना कसे फसवायचे याचे प्रशिक्षणही दिले, या तरुणांना पैसे पुरवले, चारही बाजूने मदत पोहोचवली. हे युवक हिंदू असल्याचे भासवत, हिंदू मुलींशी मैत्री करू लागले. ही हिंदू मुलगी किंवा महिला कोण असायची, तर गरीब, विधवा, घटस्फोटितच. मानसिकरित्या एकाकी थकलेल्या मुली-महिलांना हे मुस्लीम तरुण मदतीचा हात द्यायचे, तिच्याशी ठरवून मैत्री करायचे. भावनिकरित्या तिला पूर्णतः स्वत:मध्ये गुंतवायचे. तिच्याशी लैंगिक संबंध सुरू झाल्यानंतर, ते स्वतःची खरी ओळख म्हणजे ते मुस्लीम असल्याचे सांगायचे. पण, तोपर्यंत या मुलींचे भावनिक आणि इतरही परतीचे दोर तुटलेले असायचे. मग हे तरुण त्या महिलांसमोर निकाहचा पर्याय ठेवायचे आणि निकाहच्या आडून तिला धर्मांतरण करायला लावायचे.

यातल्या काही घटना- गुंजा गुप्ता या तरुणीची मैत्री अमितशी झाली. पुढे मैत्री प्रेमात बदलली. अमितवर तिचा स्वतःपेक्षा जास्त विश्वास होता. त्यामुळे जेव्हा तिला कळले की, तिचा प्रियकर अमित नसून अबू अंसारी आहे, तेव्हाही तिला काही फरक पडला नाही. अबूने एकेदिवशी तिला छांगूर पिरबाबाकडे नेले. तिथे गेल्यावर तिला नसरीन नावाची महिलाही भेटली. ती महिला तिला म्हणाली, तीसुद्धा हिंदूच होती मात्र, छांगूरबाबाकडून मुस्लीम धर्म स्वीकारल्यानंतर तिच्या जीवनात सर्व सुख, संपत्ती आली. छांगूर बाबानेही तिला सांगितले की, तिने इस्लाम धर्म स्वीकारला, तर तिला लाखो रुपये मिळतील. तिला अबूशी निकाह करायचा असल्याने, तिने धर्मांतर केले. मात्र, पुढे तिला कळून चुकले की, अबूचे तिच्यावर प्रेम नव्हते, तर तिला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिचे धर्मांतरण करून, त्या बदल्यात पैसे मिळवायचे होते.

उत्तर प्रदेशचीच दुसरी महिला मानवी शर्मा. तिचा पती दारूडा होता, ती त्याला वैतागली होती. तेव्हा रुद्र शर्मा नावाचा तरुण तिला भेटला. तो म्हणाला, पिर छांगूरबाबाच्या मदतीने तुझ्या पतीची दारू सोडवू शकतो. त्याने तिच्याशी सलगी वाढवली. खूप पुढे गेल्यावर तिला कळले की, हा रुद्र शर्मा नसून मेराज अंसारी आहे. पण, आता तीही त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली, दोघांनी निकाह केला. त्याआधी मानवीचे धर्मांतरण करण्यात आले आणि तिचे नाव जैनब ठेवण्यात आले. मात्र, तिलाही कळले की, त्याचे काही प्रेम नव्हते, तर केवळ तिचे धर्मांतरण करण्याचेच त्याचे उद्दिष्ट होते.

दुसरीकडे मदत करण्याच्या बहाण्याने गोड बोलून छांगूरची माणसे, गरीब असाहाय्य हिंदू व्यक्तींना छांगूरबाबाकडे आणायची. छांगूर त्यांना आर्थिक मदत करत असे. कर्जही द्यायचा आणि पुढे त्यांचे धर्मांतरण घडवून आणत असे. काही लोक नकार द्यायचे, तर छांगूर या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करायचा. दुर्दैव असे की, स्थानिक पोलीस आणि न्यायालयामध्येही त्याने काही माणसांना पैसे देऊन भ्रष्ट केले होते. त्यामुळे छांगूरने कुणावरही खोटा गुन्हा दाखल केला, तर त्यावर कसलीही शहानिशा न करता त्यावर कारवाई होत असे. तिथल्या स्थानिक न्यायालयात कामाला असलेल्या राजेशच्या पत्नीच्या नावे पुण्यात १६ कोटींची मालमत्ता आहे आणि त्यात छांगूर हा भागीदार आहे. दुर्दैव! या छांगूरच्या संपत्तीचा हिशोब ठेवणार्या अहमद नावाच्या व्यक्तीची पुण्यात १०० कोटींची मालमत्ता आहे, असेही उत्तर प्रदेश पोलिसांचे म्हणणे आहे. पुण्यात धार्मिक उन्माद आणि गुन्हेगारी तसेच, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड समाज-देशविरोधी विचार मांडणारे टोळके सध्या सक्रिय आहे. याचा आणि छांगूर व त्याच्या माणसांचा पुण्यात वाढलेला वावर, याच्याशी काही संबंध असू शकतो का? हे तपासले पाहिजे.

भयंकर! हिंदू मुली महिलांच्या आयुष्याचा बाजार करणार्या या छांगूरने, स्वतःला पिरबाबा घोषित केले होते. या छांगूरची प्रेयसी नसरीन. तिच्या नावावर तब्बल १२ कोटींचा आलिशान महाल होता. त्यात ७० खोल्या होत्या. या खोल्यांमध्ये आलिशान खर्चिक वस्तू, त्यात लैंगिक शक्ती वर्धक सिरप, तेल वगैरे यांचे प्रमाण जास्त. एक दशकापूर्वी छांगूर मुंबईच्या हाजी अली येथे जादूई अंगठ्या विकत असे. तिथे नितू आणि नवीन रोहरा या सिंधी दाम्पत्यांशी त्याची भेट झाली. या जोडप्याला मुल होत नव्हते. छांगूरने यांना पिरबाबाच्या आशीर्वादाची म्हणून अंगठी दिली. हळूहळू या दाम्पत्याशी ओळख वाढवली. रोहरा दाम्पत्य मुलुंडला राहायचे. मुंबईत आला की, छांगूर त्यांच्या घरी राहायचा. या सगळ्या कालावधीमध्ये नितूला मुलगी झाली. छांगूरबाबाच्या आशीर्वादाने ही मुलगी झाली, असे या रोहरा कुटुंबीयांना वाटले. छांगूरच्या प्रभावाने हे दाम्पत्य मुंबईतले घरदार सोडून बलरामपूरला गेले. पुढे दुबईमध्ये या कुटुंबाने धर्मांतरण केले. नवीनचे नाव जलालउद्दीन तर नितूचे नाव नसरीन करण्यात आले. जलालउद्दीन कायम दुबई आणि इतर मुस्लीम देशाच्या वार्या करू लागला, तर नसरीन छांगूरसोबत राहू लागली. ती असाहाय्य हिंदू महिलांशी मैत्री करून त्यांना सांगत असे की, मी मुस्लीम झाले आणि माझे सगळे दुःख संपले, आता करोडपती आहे. तुम्हालाही सुख संपत्ती हवी असेल, तर छांगूर पिरबाबांकडून धर्मांतरण करून घ्या. तिच्या या म्हणण्याने शेकडो गरीब मुली महिला फसायच्या. या सगळ्या घटनेत एक मेख आहे, ती म्हणजे नितू उर्फ नसरीन हीचे माहेर बलरामपूरमध्येच होते. लग्न करून ती मुंबईमध्ये आली होती. पुढे मुंबईत छांगूरचे तिच्या घरी येणे जाणे आणि राहणे वाढल्यावरच तिला मुलगी झाली होती, हे सगळे संशयास्पद आहे.

असो! छांगूरची शेकडो बँकामध्ये खाती होती. तो ४० देशांमध्येही गेला होता. त्याचे स्विस बँकेतही खाते होते. काही वर्षांत त्याने ५०० ते ७०० कोटींची उलाढाल केली. त्यापैकी सगळ्यात जास्त रक्कम त्याने २०२३ साली अयोध्येमध्ये वापरली. अयोध्येत का बर वापरली असेल? तर याचे उत्तर २०२४ सालची लोकसभा निवडणूक आणि अयोध्येचा निकाल हेच आहे. या छांगूरने स्वतःच्या संरक्षणासाठी ५० कमांडोची फोर्सही ठेवली होती. पुढे छांगूरचे धर्मांतराचे षडयंत्र उघड झाले. त्याचे आणि सीमेपारच्या धर्मांध दहशतवाद्यांचे संबंध असावेत, अशी शंका पोलिसांनाच काय लोकांनाही येऊ लागली. त्याच्यावर उत्तर प्रदेश पोलिसांनी कारवाई सुरू केली. त्यामुळे छांगूर आणि नितू उर्फ नसरीन लखनौच्या एका हॉटेलमध्ये ७० दिवस लपून राहिले. शेवटी उत्तर प्रदेश पोलिसांनी या दोघांना शोधलेच आणि त्यांना अटकही झाली. अधिक तपासात छांगूरचे परदेशातील धर्मांध कट्टरपंथी संस्था आणि लोकांशी संबंध उघड झाले.

पिरबाबाच्या नावाने आशीर्वादाच्या अंगठ्या विकणारा जलालउद्दीन म्हणजेच छांगूर हा प्रत्यक्षात बलरामपूर, उत्तर प्रदेश आणि त्यानंतर पूर्ण भारताला इस्लाम राष्ट्र बनवण्याच्या तयारीत होता. गरीब असाहाय्य हिंदूंचे तो धर्मांतरण करायचा, देशाबाहेरील मुस्लिमांना आणून देशात वसवायचा. त्या परिसरातल्या मुस्लिमांनी त्याच्याविरोधात आवाज उठवण्याचे कारणच नव्हते; पण त्याचा खेळ ना त्या गरीब असाहाय्य हिंदूंनी ओळखला, ना त्या परिसरातल्या सधन आहेरे गटातील हिंदूंनी ओळखला. हिंदू कधीपर्यंत देशविघातक शक्तींवर असा अंधविश्वास ठेवणार आहेत? भाईचारा निभवताना हिंदू हे कधीपर्यंत केवळ धर्माध शक्तींचा चारा होऊन राहणाार आहेत? जलालउद्दीन, पिर छांगूरचे हे देशाविरोधातले, धर्माविरोधातले षड्यंत्र केवळ हिमनगाचे टोक आहे. असे कितीतरी जलालउद्दीन उर्फ पिर छांगूर बाबा प्रत्येक शहरात गावात असू शकतील. त्यामुळे स्वतःच्या देश, धर्म, समाज आणि कुटुंब भविष्यासाठी तरी आता हिंदूंनी क्षात्रतेजाने जगायलाच हवे!

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.