महाराष्ट्राच्या भूमीवर भक्तिरसाची अमृतवृष्टी करणारे, अज्ञानाचा अंधार भेदून ज्ञानाचा प्रकाश देणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे केवळ एक नाव नाही, तर ते एक चैतन्य आहे. देहूच्या पावनभूमीत अवतरलेल्या तुकोबारायांनी त्यांच्या अमृतमय अभंगांच्या माध्यमातून, सामान्यातील सामान्य माणसालाही परमार्थाची सोपी आणि सरळ वाट दाखवली. ज्ञानदेवांनी रचलेल्या या भागवत धर्माच्या मंदिराचा कळस म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराज होय! अशा तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे सुख अवर्णनीयच!
तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची सुरुवात तुकोबारायांचे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांनी इसवी 1685 मध्ये सुरू केला. यापूर्वी प्रत्येक गावातून दिंडीच्या स्वरूपामध्ये अनेकजण पंढरीला जात होते. तुकोबारायांच्या नंतर वारकरी संप्रदायाची धुरा, तुकोबारायांचे बंधू कान्होबाराय यांच्या खांद्यावर आली. ज्यावेळी कान्होबाराय पंढरपूरला दिंडीसाठी जात असत, तेव्हा लहानगे नारायण महाराज त्यांच्या समवेत असत. दिंडीदरम्यान एका ठिकाणी कीर्तन करताना कान्होबारायांनी रामायणातील पादुकांचा आणि भरत भेटीचा प्रसंग वर्णन केला. ते ऐकून नारायण महाराजांना अशी कल्पना स्फुरली की, आपणही तुकोबारायांच्या पादुका दिंडीबरोबर आणल्यास सगळ्याच वारकर्यांना तुकोबारायांची सोबत मिळेल. यानुसार त्यांनी तुकोबारायांच्या पादुका घेऊन दिंडीसमवेत प्रस्थान करण्याचे ठरवले. त्याचवेळी त्यांना देहूपासून जवळ असलेल्या आळंदी येथील संत ज्ञानोबारायांच्या पादुकाही समवेत घेण्याची तीव्र इच्छा झाली. त्याकाळी पालखी हा मोठा सन्मान होता. म्हणून नारायण महाराजांनी तुकोबाराय आणि ज्ञानोबारायांसाठी पालखी तयार केली आणि ती घेऊन ते पंढरपूरकडे निघाले. वाटेत अनेकांनी त्यांना याबाबत विचारले असता, त्यांनी हे तुकोबाराय आहेत, तर हे ज्ञानोबाराय आहेत असे सांगितले. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे.
यंदाचे तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे 340वे वर्ष आहे. बुधवार, दि. 18 जून रोजी पालखीने प्रस्थान केले आहे. आषाढ शुद्ध दशमी अर्थात दि. 5 जुलै रोजी हा पालखी सोहळा पंढरपुरात पोहोचेल. वाटेमध्ये तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे उभे, गोल आणि बकरी रिंगणाचे नेत्रदीपक सोहळे साजरे होतात. तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यासमवेत 400 दिंड्या चालतात. वाटेमध्ये तुकोबाराय आणि संत ज्ञानेश्वर तसेच, संत निळोबाराय यांची भेट होते. एकादशीच्या दिवशी नगरप्रदक्षिणा होते. त्यानंतर पौर्णिमेला गोपाळपूरला काल्याचा सोहळा होतो. त्यानंतर तुकोबारायांच्या पादुका पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात. त्यानंतरच पालखीचा परतीचा प्रवास सुरू होतो.
-नितीन महाराज मोरे,
मा.अध्यक्षसंत तुकाराम महाराज संस्थान,श्रीक्षेत्र देहू
आषाढी एकादशी जसजशी जवळ येते, तसतसे सर्व भक्तांचे मन पांडुरंगांच्या भेटीसाठी आतूर होते. वर्षभर याच क्षणाची वाट पाहिलेली पाऊले पंढरीच्या दिशेने धावू लागतात. मुखामध्ये विठ्ठलनामाचा जयघोष करत, अनेक संतांच्या पालख्या परंपरेनुसार पंढरीच्या दिशेने चालू लागतात. अनेक संतांच्या मध्ये एक मानाची पालखी अजून निघते, ती म्हणजे आई रुख्मिणी यांची!
विदर्भातील कौंडण्यपूर येथून ‘श्री रुख्मिणी संस्थान’ यांची पालखी निघते. आई रुख्मिणी यांच्या माहेरची पालखी म्हणून विदर्भात ही पालखी प्रसिद्ध आहे. या पालखीला 431 वर्षांची परंपरा लाभली आहे. विदर्भातील कौंडण्यपूर ही भीमक राजाची राजधानी. या कौंडण्यपुरात रुख्मिणी मातेचे जन्मस्थान आहे. त्यापासून एक किमी अंतरावर असलेल्या अंबामातेच्या मंदिरातून भगवान श्रीकृष्णांनी आई रुख्मिणींचे हरण केले होते. सन 1594 मध्ये पहिल्यांदाच श्री सदाराम महाराजांनी कौंडण्यपूर ते पंढरपूर अशी पायदळ वारी सुरू केली. वृद्धापकाळामुळे सदाराम महाराजांना वारी करणे अशक्य झाल्याने पांडुरंगाने स्वप्नात येऊन मीच आषाढ आणि कार्तिक पौर्णिमा व प्रतिपदेला कौंडण्यपुरात येईन, असे सांगितले. आजही ती प्रथा कौंडण्यपुरात सुरू आहे.
दि. 31 मे रोजी आई रुख्मिणी यांच्या पालखीने यावर्षीच्या वारीसाठी पंढरपूराकडे प्रयाण केले असून दि. 3 जुलै रोजी ही पालखी पंढरपुरात पोहोचणार आहे. 33 दिवसांच्या या प्रवासात ही पालखी दररोज 15 ते 20 किमीचा प्रवास करते. या पालखीचा प्रवास अमरावती, कारंजा, वाशीम, बीड, परभणी, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यांतून प्रवास करते. निवडक मानाच्या पालख्यांमध्ये रुख्मिणी मातेच्या पालखीचा समावेश आहे. पालखी सोहळ्यात दररोज भजन, हरिपाठ, कीर्तन यांसारखे दररोज कार्यक्रम असतात. पालखीच्या प्रवासादरम्यान गावागावातील लोक येऊन रुख्मिणीचे दर्शन घेतात आणि वारकर्यांची सेवा करतात.
पंढरपुरामध्ये आई रुख्मिणीच्या पालखीला विशेष मान आहे. आषाढ शुद्ध दशमी ते आषाढ शुद्ध पौर्णिमेपर्यंत ‘कौंडण्यपूर संस्थान’कडून भगवंताला नैवेद्य दाखवला जातो. तसेच, पौर्णिमेच्या दिवशी श्री रुख्मिणी मातेला पंढरपूर संस्थानकडून आहेर केला जातो. पंढरपुरात पोहोचल्यावर चंद्रभागेच्या पाण्याने रुख्मिणीमातेचा अभिषेक होतो, पादुकास्नान होते. नंतर टाळ-मृदुंगाच्या गजरात नगर प्रदक्षिणा झाल्यावर ‘श्री विठ्ठल रुख्मिणी संस्थान’च्या भक्त निवासामध्ये दररोज हरिपाठ, कीर्तन होते. गोपाळपुरी येथे काला झाल्यानंतर पालखीच्या सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरू होतो.
-सदानंद साधु,
सचिव तथा सोहळा प्रमुख, श्री रुख्मिणी माता पालखी सोहळा
आषाढ महिना जसा जवळ येतो, तशी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यांत एक लगबग दिसू लागते. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यांतून निघालेल्या संतांच्या पालख्या म्हणजे जणू चैतन्याचा अखंड स्रोत, जो थेट विठ्ठलाच्या चरणांपाशी येऊन विसावतो. पंढरीच्या वाटेवर विठ्ठल नामाचा जयघोष करत चालणारा प्रत्येक वारकरी हा केवळ एक भक्त नसतो, तर तो असतो ब्रह्मरसाच्या प्राप्तीसाठी निघालेला साधक! हा सोहळा म्हणजे सामूहिक आत्मशुद्धीचा यज्ञ; जिथे प्रत्येक भक्त अद्वैताचा अनुभव घेतो. आषाढी वारीच्या या परंपरेमध्ये संत निळोबाराय यांच्याही पालखीचा समावेश होतो. संत निळोबाराय हे जगद्गुरू तुकाराम महाराजांचे शिष्य. त्यांचा कालखंड हा साधारण 17व्या शतकाच्या पूर्वार्ध मानला जातो. निळोबारायांनी तपोनिधी नारायण महाराज यांच्याबरोबर 1709 साली आषाढीची वारी सुरू केली. त्याआधी माघ महिन्यातील वारीची परंपरा सुरू होतीच. पुढे ही दोन्ही वारींची परंपरा काही काळ सुरू राहिली. मात्र, कालपरत्वे आषाढ वारीची परंपरा खंडित झाली होती. पुढे समाजसेवक अण्णा हजारे आणि रामदास बुवा मनसुख यांनी ‘श्री निळोबाराय सेवा मंडळा’ची स्थापना करून त्यायोगे आषाढीची वारी पुन्हा सुरू केली. आजही हा पालखी सोहळा अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातल्या पिंपळनेर येथून निघतो.
यावर्षी या पालखी सोहळ्याचे प्रस्थान शनिवार, दि. 21 जून रोजी होणार आहे. परंपरेप्रमाणे सुरुवातीला संत निळोबारायांच्या राहत्या वाड्यातून पालखी समाधी मंदिराकडे येते, त्यानंतरच तिचा पंढरपूरच्या दिशेने प्रवास सुरू होतो. निळोबारायांची पालखी साधारण 15 दिवसांचा प्रवास करते. दरम्यानच्या काळात दोन गोल रिंगण, एक पालखी रिंगण तसेच, एक उभे रिंगणदेखील होते. निळोबारायांच्या पालखीचे वैशिष्ट्य म्हणजे तुकोबारायांची आणि त्यांचे शिष्य असलेल्या निळोबारायांची वारीत होणारी भेट होय. गुरू-शिष्य भेटीचा हा सोहळा प्रत्येकालाच आनंद देऊन जातो. पुढे निळोबारायांच्या पादुकांना चंद्रभागेच्या पाण्याने स्नान घालण्यात येते. संत निळोबारायांच्या पालखी सोहळ्याबरोबर 67 दिंड्याही चालतात. एकादशीच्या दिवशी पंढरपुरात निळोबारायांची नगर प्रदक्षिणा होते. पंढरपुरात द्वादशीच्या दिवशी देवदर्शनानंतर सर्व संतांच्या पालख्यांचे दर्शन निळोबाराय घेतात. यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी गोपाळपूरला काल्याचा महाप्रसाद झाल्यानंतर पालखी सोहळ्याची सांगता होते.
-ह.भ.प श्री गोपाळबुवा मकाशीर
कार्याध्यक्ष आणि पालखी सोहळा प्रमुख, संत निळोबाराय संस्थान संत निळोबारायांचे वंशज