शुभेच्छा आणि मौन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2019   
Total Views |



काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर व शिवेंद्रसिंहराजे भोसले, संदीप नाईक, वैभव पिचड या राष्ट्रवादीच्या तीन आमदारांनी आज आपले आमदारकीचे राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केले. त्यावर माध्यमांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रतिक्रिया विचारली असता, राष्ट्रवादीचे 'जवळपास' सर्वेसर्वा असलेल्या अजित पवारांनी अत्यंत नाईलाजाने का होईना, या जाणाऱ्या त्यांच्या शिलेदारांना हतबलतेने 'शुभेच्छा' दिल्या, तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळत 'मौन' बाळगले. पाटलांसारख्या बोलक्या नेत्याचे मौन बरेच काही सांगून जाते. या होलसेल पक्षांतराच्या भीतीमुळे त्यांच्यासह सर्व काँग्रेसी नेते अक्षरशः निःशब्द झाले आहेत. कोणतीही निवडणूक जवळ येते, तेव्हा साधारणपणे सत्ताधारी पक्ष तणावात असतो तर विरोधक उत्साहात असतात, हा आजपर्यंतचा सर्वसाधारण इतिहास आहे. पण, सध्या राज्यात नेमकी उलट परिस्थिती असून सत्ताधारी 'जोमात' तर विरोधक 'कोमात' अशी अवस्था आहे. सर्व विरोधी पक्ष संपून जातात की काय, अशी राजकीय शक्यता महाराष्ट्रात सध्या वर्तवली जात आहे. भाजप-शिवसेनेच्या सरकारचा कारभार जरी चांगला असला तरी विरोधी पक्षांची एवढी वाताहत होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. पण, देशात 'नरेंद्र' आणि राज्यातील 'देवेंद्र' सरकारने विविध लोकोपयोगी कामांचा विक्रम केल्याने राज्यात विरोधी पक्षांची अवस्था 'न भूतो...' झाली आहे. कदाचित भविष्यात विरोधी पक्षांची अवस्था यापेक्षाही गंभीर होऊ शकते, याचे सूतोवाचही नुकतेच गिरीश महाजनांनी दिले आहेत. विरोधी पक्षांचे तब्बल ५० आमदार पक्षप्रवेशासाठी आमच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य करून महाजनांनी विरोधकांना घाम फोडला आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये आपापसात संशयी वातावरण निर्माण झाले असून कोण कधी सत्ताधाऱ्यांना जाऊन मिळेल, हे समजेनासे झाले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष लढाईआधीच विरोधक पराभूत झाले आहेत, असे म्हटल्या वावगे ठरणार नाही. काँग्रेसची परिस्थिती राष्ट्रवादीसारखीच भयंकर आहे. किंबहुना, या दोन पक्षांपैकी कोणत्या पक्षाची स्थिती जास्त बिकट, याबाबत दिवसाआड अपडेट्स येत आहेत. आगामी दोन महिन्यांत काँग्रेस-राष्ट्रवादीचे किमान अर्धे आमदार हाती 'कमळ' घेतील किंवा 'शिवबंधन' बांधतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीचा निकाल सांगायला आता ज्योतिषाची गरज नाही.

 

कर्नाटकात 'कमळ' फुललेच!

 

कर्नाटकात दोन महिन्यांच्या राजकीय नाट्यानंतर अखेर 'कमळ' फुलले आणि येडियुरप्पा चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदी आरूढ झाले. सोमवारी विश्वासदर्शक ठरावही जिंकून त्यांनी आपल्या सरकारचा मार्ग सुकर केला. महत्प्रयासाने भाजपला पुन्हा एकदा दक्षिण दिग्विजय मिळाला. खरं म्हणजे गेल्या वर्षी झालेल्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक आमदार भाजपचेच निवडून आले होते. पण बहुमताला काही जागा कमी पडल्याचा फायदा येथे संधीसाधू काँग्रेस व माजी पंतप्रधान देवेगौडांच्या (निधर्मी जनता दल) पक्षाने घेतला आणि अनैसर्गिक पद्धतीने सरकार स्थापन केले. कर्नाटकातील या तीन पक्षांमध्ये सर्वाधिक कमी आमदार (३९) निजदचे होते. पण, गंमत म्हणजे कानडी जनतेने विरोधात बसवायचा कौल दिलेल्या या पक्षाचाच सदस्य (कुमारस्वामी) मुख्यमंत्री झाला. निजद व काँग्रेसची येथील आघाडी मात्र कानडी जनतेच्या काही केल्या पचनी पडत नव्हती. एकमेकांच्या उरावर बसून नंतर हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने हे सरकारही जेमतेम वेगानेच चालले होते. या अनैसर्गिक आघाडीमुळे गेल्या वर्षभरात कर्नाटकात मोठे भरीव काम झाले नाही. नोकरशाहीही कुमारस्वामी सरकारच्या मंत्र्यांना दाद देत नव्हती. सरकारच्या मंत्र्यांमधील भांडणे तर रोजचीच होती. १५० अशा प्रतिकूल परिस्थितीत आमदारांची कामेही होत नव्हती. त्यांना मतदारसंघातील लोकांना तोंड द्यायचे असल्याने त्यांचीही अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत होती. त्यामुळे सहा महिन्यांपासून प्रचंड धुसफूस सुरू झाली. उत्तर कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील गोकाकचे काँग्रेस आमदार रमेश जारकीहोळी यांनी या स्फोटक परिस्थितीला काडी लावली. सर्व अस्वस्थांचे संघटन करून त्यांनी थेट भाजपचा रस्ता पकडला. पण, प्रत्यक्षात हा प्रवास एवढा सोपा नव्हता. कुमारस्वामी सर्व बाजूंनी जारकीहोळी व त्यांच्या सहकाऱ्यांवर दबाव टाकत होते. काँग्रेसचे संकटमोचक म्हणवल्या जाणाऱ्या डी. के. शिवकुमार यांनीही जारकीहोळी यांना विविध आमिषे दाखवली. पण, जारकीहोळी बधले नाहीत. त्यांचे एक बंधू काँग्रेसमध्ये तर एक भाजपमध्ये अशी रंजक राजकीय स्थिती. कसोटीच्यावेळी रमेश जारकीहोळी यांनी थेट मुंबई गाठली आणि अखेर कुमारस्वामी अमेरिकेत आठ दिवसांच्या दौऱ्यासाठी जाताच कर्नाटकातील सत्ता उलथवली.

@@AUTHORINFO_V1@@