तृणमूल काँग्रेसचा नेता प्रवक्ता रिजू दत्ता याने म्हटले आहे की, “शर्मिष्ठा ही माझी मुलगी असती, तर तिचे श्राद्ध घातले असते, तिच्याशी संबंध तोडले असते, ती काही लहान नाही,” तर दुसरीकडे शर्मिष्ठा पानोली हिला ममता बॅनर्जीच्या सरकारने अटक केली आहे. शर्मिष्ठाने मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत म्हणेे. सर्व धर्माचा आदर करावा, हे मान्यच आहे. मात्र, सदोदित एकाच धर्माचा आदर कसा राखण्यासाठी संपूर्ण कायदा-सुव्यवस्था यंत्रणा राबवणे, म्हणजे लोकशाहीला कलंक आहे. हा कलंक ममता बॅनर्जीचे सरकार दिमाखात मिरवतही आहे. मात्र, त्याचवेळी हिंदूंच्या आणि इतर गैरमुस्लिमांच्या भावना दुखावणार्यांवर ममता बॅनर्जीचे सरकार काय कारवाई करते, तर उत्तर आहे शून्य!ममतांच्या राज्यात हिंदूंना दुय्यम नागरिकत्व आहे की काय, असेच चित्र आहे.
तृणमूल सरकारचे मंत्री आणि नेते शर्मिष्ठाच्या विरोधात प्रसारमाध्यमांवर गरळ ओकत आहेत. शर्मिष्ठाने जे काही म्हटले त्याचे समर्थन करण्याचे प्रयोजन नाही. मात्र, ती जे काही म्हणाली त्यात काही सत्य आहे का? सत्य असेल तर त्याला विरोध कशासाठी? याचा विचार करायलाच हवा. मागे नुपूर शर्माच्या विधानावरूनही असाच गदारोळ माजला, हिंसेचे प्रकार घडले. नुपूरच्या विधानाचे समर्थन केले म्हणून देशभरात हिंदूंचे खूनही झाले. रा. स्व. संघ, मोदी-शाह-योगी-फडणवीस आणि भाजप यांच्या विरोधात बोलणार्यालाच काय केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे? किंवा हिंदू धर्माची, हिंदूंच्या श्रद्धेची टिंगलटवाळी करणार्यांनाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? हिंदू धर्माची चिकित्सा म्हणत, धर्माबद्दल निखालस खोटे आणि द्वेषपूर्ण विधान करणार्यांनाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? अगदी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ बोलत शत्रूराष्ट्रासोबत निष्ठा असणार्या त्या मुलीलाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य होते. मात्र, कोणत्याही गैर हिंदू पंथाची चिकित्सा किंवा त्यातील सत्य, तथ्य मांडणे म्हणजे भयंकर जीवघेणा अपराध आहे? अनेक प्रश्न आहेत आणि हे प्रश्न ममता बॅनर्जीच्या सत्ताकाळात उद्भवले आहेत. हे प्रश्न प. बंगालमध्ये हिंदूंना चिरडत आहेत. शर्मिष्ठाने लिहिलेले ‘ट्विट’ डिलीट केले, माफीही मागितली. तरीसुद्धा तिला तुरुंगात टाकण्यात आले, का? कारण, तिने ममतांच्या लाडक्या मतदारांना न पटणारे मत व्यक्त केले होते. ममताची ही मुस्लीमधार्जिणी आपली आवड किती काळ खपवून घ्यायची?
गुलाबराव काय म्हणाले?
2027 साली नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे. हिंदूंच्या श्रद्धेचा आस्थेचा हा मेळा. कोट्यवधी भाविक लोक या मेळ्याला येतील. पण, चिंतातूर जंतूंना आताच शंका निर्माण झाल्या आहेत. भाजप सत्तेत असताना आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कुंभमेळा यशस्वी होऊ नये, यासाठी काही लोक आतापासून कुरापती करत आहेत. उदाहरणार्थ, संजय राऊत यांनी नाशिकमध्ये होणार्या कुंभमेळ्याबाबत त्यांची विशिष्ट मते व्यक्त केली आहेत. त्यांचे मत आहे, कुंभमेळ्याचा फायदा नाशिककरांना नाही, तर गुजरातला होईल.
प्रत्येक गोष्टीत प्रांतवादाची फूट ते का पाडत असतील? ते म्हणतात, “स्थानिक लोकांना नफा व्हायला हवा. या कुंभमेळ्याचा फायदा गुजरातला होणार आहे.” लहान मुलही सांगेल की, नाशिकला कुंभमेळा झाला, तर तिथल्या मूळच्या विक्रेत्यांना, विविध सेवा देणार्यांना त्याचा उपयोग होणार आहे. कुंभमेळ्यामुळे नाशिकचे रूप पालटेल. येणार्या भक्तांच्या सोयीसुविधेच्या निमित्ताने इथे विकास होईल. त्यामुळे स्थानिकांना उत्तम रोजगार मिळून स्वयंरोजगाराचे मोठे दालनही उघडणार आहे. पण, या सगळ्या सकारात्मक उज्ज्वल पटलावर राऊत यांच्या ध्यानीमनी केवळ गुजरातला विरोध करण्याची प्रवृत्ती आहे.
या अशा विघातक लालसेपोटी ते प्रांतभेदाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत का? कुंभमेळा हा जगभरातल्या हिंदूंचा आहे, असे असताना स्थानिक हिंदूविरुद्ध नाशिकबाहेरील हिंदू असे वर्गवारी ते का करत आहेत? कदाचित त्यांना वाटत असेल की, गुजरातचा असा द्वेष केला की, स्थानिक मराठी माणूस त्यांचे समर्थन करेल. नशीब त्यांच्या नेत्यांचे वरळीमध्ये ‘केम छो वरली’ म्हणत पोस्टर्स, बॅनर्स लागतात. असो. संजय राऊत नेहमी विरोधासाठी विरोध करतात आणि सत्तेसाठी वाटेल ते बोलतात. अनेक लोकांचे म्हणणे आहे, त्यांच्या या सगळ्या कृतीविचारांमुळेच मूळच्या शिवसेनेत फूट पडली आणि उबाठा गटाची निर्मिती झाली. आता तर काय गुलाबराव पाटील म्हणाले की, “संजय राऊत हा पांढर्या पायाचा माणूस आहे. जिथे जातात तिथे सगळे संपते.” कुंभमेळ्यात जे होणार नाही, त्या अघटिताबद्दल चर्चा करण्याऐवजी संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील जे म्हणाले, त्यावर चिंतन केले तर?