
लोकसभा विरोधी पक्ष नेते आणि राहुल गांधी यांनी नुकतीच ‘मेक इन इंडिया’ धोरणावर टीका करताना असे म्हटले की, देशात उत्पादन घटले आहे, चीन नफ्यात आहे आणि भारतीय युवक मात्र बेरोजगार आहेत. राहुल गांधी यांचे हे विधान निख्खळ राजकीय अजेंड्यावर आधारित असून, त्याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने देशाच्या विकासात्मक प्रयत्नांची हेटाळणी केली जाते, तीही कोणत्याही तथ्यात्मक विश्लेषणाशिवाय. ‘मेक इन इंडिया’ हे धोरण केवळ घोषणाबाजी नसून, गेल्या दहा वर्षांत यामुळेच भारताच्या उत्पादन क्षेत्राने अभूतपूर्व प्रगती केली आहे. गेल्या दहा वर्षांत भारत जगामध्ये दुसर्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश झाला आहे. २०१४ साली दोन असलेल्या निर्मिती कारखान्यांची संख्या आता ३००च्या घरात आहे. देशात ७.१५ लाख कोटींचे उत्पादन होते असून, ३.९ लाख कोटींच्या घरामध्ये निर्यात होत आहे. इलेक्ट्रॉनिक उत्पादन २०१४ साली १८ हजार, ९०० कोटी इतके होते. २०२४ साली ते चार लाख कोटींवर पोहोचले आहे. यामुळे जवळपास एक लाख, ३९ हजार तरुणांना रोजगारही मिळाला. देशात जवळपास दहा हजार, ९०५ कोटींची गुंतवणूक आली आहे. हे ‘मेक इन इंडिया’चे यश आहे.
राहुल गांधी हे कायमच चीनच्या प्रगतीचे, नफ्याचे गोडवे गातात. चीनपेक्षा भारत मागे असण्याचे प्रमुख कारण काँग्रेस काळात उद्योग क्षेत्राकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष. काँग्रेसने फक्त सेवा क्षेत्राला चालना दिल्याने हवा तसा विकास उद्योगाचा झाला नाही, हे सत्य आहे. मात्र, ‘मेक इन इंडिया’मुळे नवे स्टार्टअप्स निर्माण झाले, ‘एफडीआय’ वाढला आणि स्थानिक उद्योगांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरविण्याचे मार्ग खुले झाले. गेल्या २०२३-२४ सालीच एक लाख, ८० हजार नवीन कंपन्यांची नोंदणी भारतात झाली. या सगळ्या यशाला जर राहुल गांधी ‘अपयश’ म्हणत असतील, तर एकतर त्यांना अर्थशास्त्र समजत नाही, अथवा त्यांची ते समजून घेण्याची मानसिकता नाही, या दोन्हीपैकी एकावर शिक्कामोर्तब होईल. भारताचा विकास जग थक्क होऊन पाहत आहे, समजून घेत आहे आणि सहभागीही होत आहे. राहुल गांधी यांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की, कोंबडे कितीही झाकले, तरी तांबडे उगवायचे राहणार नाही.
चोर तो चोर...राजकारणात भाषा हे एक शस्त्र असते, त्यामुळे त्याचा जपून वापर करणेही आवश्यक होते. टीका करण्याचेही संकेत कित्येक वर्षे भारतीय राजकारणात महत्त्वाचे स्थान राखून आहेत. मात्र, या संकेतांचा विसर तेजस्वी यादव यांना पडला. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना वापरलेला ‘पाकिटमार’ हा शब्दप्रयोग हेच दर्शवतो. ‘बिहारमधील जाहीरसभांसाठी गेल्या दहा वर्षांत २० कोटी रुपये मोदी यांनी खर्च केले. जनतेच्या खिशातील पैसा स्वतःच्या प्रचारासाठी वापरला असा आरोप करताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांना पाकिटमार संबोधले. अर्थात गेले कित्येक दिवस संपूर्ण लालूप्रसाद यादव यांचा परिवार, लालूंनी केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानामुळे बिहारमध्ये चर्चेत आहे. लालूंनी केलेल्या अपमानामुळे निवडणुकीच्या तोंडावर राजद पक्षाची अवस्था अतिशय कठीण झाली आहे. कारण, जनमत प्रक्षुब्ध आहे. अशावेळी जनतेचे लक्ष हटवण्यासाठी ही खालची पातळी तेजस्वी यांनी गाठल्याची शक्यता आहे.
तेजस्वी यांच्यासाठी एकच म्हण लागू होते, ती म्हणजे ‘चोर तो चोर वर शिरजोर.’ इतरांना पाकिटमार संबोधण्याआधी जर तेजस्वी यादव यांनी स्वतःच्या कुटुंबाचा इतिहास चाळला जरी असता, तरी हे विधान करण्याचे धाडस त्यांना करताच आले नसते. ज्यांनी जनावरांचा चाराही घोटाळा करण्यासाठी सोडला नाही, त्यांनी बाकीच्यांवर टीका करावी हे योग्य नाही. बिहारी जनतेची फसवणूक तर तेव्हा झाली, जेव्हा रेल्वेत नोकरी देतो सांगून गरीब जनतेच्या जमिनी हडपण्यात आल्या. या जमिनी हडपण्यात लालू यांचेच कुटुंब पुढे असल्याचा आरोप आहे. लालू यांच्याच काळात बिहारने ‘जंगलराज’ही पाहिले. अपहरण, विकासाचा अभाव आणि शिक्षण-आरोग्य क्षेत्रातील ढासळलेली स्थिती यांचा मारा जनतेने त्याकाळी सोसला आहे. तेव्हा कुठे गेला होता बिहारी जनतेचा कैवार? तो येण्याची शक्यताच नव्हती. कारण, सत्तेचा अमरपट्टा असल्याचा भ्रम झाल्याने ‘हम करे सो कायदा’ हाच न्याय होता. आज जेव्हा नरेंद्र मोदी यांच्यासारखा पंतप्रधान सामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवतो, तेव्हा अशा व्यक्तीला ‘पॉकेटमार’ म्हणणे म्हणजे जनतेच्या विवेकाचाच अपमान आहे. ज्यांनी आयुष्यभर लोकशाही लुटली, त्यांनी इतरांवर आरोप करताना थोडे आरशात पाहावे. एक गोष्ट मात्र निश्चित, लालूंचे जंगलराज अनुभवलेल्या बिहारच्या जनता खरे ‘पाकिटमार’ कोण, हे चांगलेच ओळखून आहे.