सपकाळ, जागे व्हा...

    01-Jul-2025
Total Views |

Congress appointed Harshvardhan Sapkal as the state president 
 
नाना पटोलेंना डच्चू देऊन काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती केली. मात्र, सपकाळ अद्याप काँग्रेस संघटनेला बळकटी द्यायचे सोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य करताना दिसतात.
 
आपली निवड काँग्रेसला राज्यात उभारी देण्यासाठी झाली असल्याचे त्यांना अजूनही उमगले नसून, सध्या ते टीका-टिप्पण्या करण्यातच मश्गुल आहेत. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष असलेले नाना पटोले विधानसभेला पराभूत होता होता वाचले. अवघ्या 200 मतांनी त्यांनी विजय मिळवला आणि त्यानंतर काँग्रेसने राज्यातील आपला शिलेदारच बदलला. कारण, नवीन शिलेदाराकडून काहीतरी भरीव आणि ठोस कामगिरी होईल, अशी अपेक्षा काँग्रेसच्या वरिष्ठांना होती. मात्र, ही अपेक्षा साफ फोल ठरली. त्यातच अलिबाग येथील युवा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरानंतर माध्यमांशी बोलतानाही त्यांनी पुन्हा जुन्या चुका उगाळल्या. आघाडीच्या तडजोडीमुळे काँग्रेसला मोठी किंमत चुकवावी लागली, त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत जिल्हा आणि तालुका कमिट्यांना आघाडी करण्याबाबत पूर्ण अधिकार दिले जातील, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. त्यामुळे महाविकास आघाडीत पुढील काळात आणखी बेबनाव होणार, हे जवळपास निश्चित आहे. मागील विधानसभेवेळी निवडणूक जवळ येऊनही, महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाले नव्हते. काँग्रेस, उबाठा गट आणि शरद पवार गटामध्ये तेव्हाही जागावाटपासाठी प्रचंड चढाओढ पाहायला मिळाली. यातून अनेकदा अन्य मित्रपक्षांनी संजय राऊत यांच्यावर थेट नाराजीदेखील व्यक्त केली. आता पुन्हा त्या जखमेवरील खपली सपकाळ यांनी उकरून काढली आहे. आताही महाविकास आघाडी अस्तित्वात असताना उबाठा गट हिंदीविरोधात राज ठाकरे यांच्या पक्षासोबत युती करण्याची स्वप्ने रंगवत आहे. अप्रत्यक्षरित्या उबाठा गट आपल्या मित्रपक्षांना धोका देण्याचे काम करत आहेत. या सगळ्या गोंधळात काँग्रेस तर पूर्णतः दुर्लक्षित आहे. काँग्रेसला उबाठा गट फाट्यावर मारत असताना त्याची प्रदेशाध्यक्षांना कसलीही चिंता नाही. उबाठा गटाला खडसावण्याऐवजी सपकाळ जुन्या उखाळ्या-पाखाळ्या काढत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभेत मविआची दाणादाण उडवली, तरीही काँग्रेस अजून झोपेतच आहे.
 
‘शांतिप्रिय’ तेजस्वी चेहरा
 
बिहार विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे बिहारमधील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. नेहमीप्रमाणे, राष्ट्रीय जनता दलाने आपला ‘शांतिप्रिय’ अजेंडा पुढे रेटण्यास सुरुवात केली आहे. राजद हा अतिशय शांतिप्रिय पक्ष आहे, हे काही लपून राहिलेले नाही. इतका की, तेजप्रताप यादव यांनाही कुठलाही आततायीपणा न करता पक्षातून लालू यादव यांनी अगदी शांततेत बाहेरचा रस्ता दाखवला. अशाच पद्धतीने शांततेत मीसा भारती खासदार झाल्या. चारा घोटाळादेखील असाच कुणाला न कळता अगदी शांततेतच झाला. तेजप्रताप नावाचा काटा अलगद बाजूला केल्यानंतर आता तेजस्वी यादव यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यासाठी पुन्हा शांतिप्रियतेला आपलेसे करण्याचा प्रयत्न तेजस्वी यांनी सुरू केला. “मी बिहारमधील माझ्या मुस्लीम बांधवांना हे सांगतो की, बिहारमधून एनडीए सरकार बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. नोव्हेंबरमध्ये, राज्यात एक नवीन गरीब समर्थक सरकार स्थापन होईल आणि ते ‘वक्फ कायदा’ कचर्‍याच्या डब्यात टाकेल,” असे तेजस्वी यादव यांनी सांगितले. केंद्रात राज्य करणार्‍या आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने हे लक्षात ठेवले पाहिजे की, स्वातंत्र्य हिंदू, मुस्लीम, शीख आणि ख्रिश्चन यांनी दिलेल्या बलिदानाच्या आधारे मिळाले आहे आणि कोणीही देश आपल्या वडिलांची मालमत्ता असल्यासारखे वागू नये, असेही ते म्हणाले. आता तेजस्वी यांचे वडील आणि आई मुख्यमंत्री असताना बिहारमध्ये सामान्यांची मालमत्तादेखील सुरक्षित नव्हती. ‘जंगलराज’ म्हणून संपूर्ण बिहारची ओळख देशामध्ये निर्माण करण्यात यादव कुटुंबाचा हातभार. हिंदूंविरोधातील निर्णयांना पाठिंबा देण्यात लालूंच्या राजदचा क्रमांक पहिलाच असतो. ‘शांतिप्रिय’ समाजाचे लांगूलचालन करून सत्तेचा सारीपाट कसा जिंकता येईल, याच प्रयत्नात नेहमी राजद राहिली आणि आताही पुन्हा हिंदूंच्या भावनांचा अनादर करून लालूंचे सुपुत्र तेजस्वी ‘वक्फ कायद्या’ला कचर्‍याच्या डब्यात टाकण्याची भाषा करत आहेत. एकूणच जसजशा बिहार विधानसभेच्या निवडणुका जवळ येतील, तसतसे असे लांगूलचालनाचे नवनवे अध्याय जनतेसमोर येणार आहेत. ही तर फक्त सुरुवात आहे, ‘पिक्चर अभी बाकी हैं...’