मोठेसे मोठे मोठे आम्ही दोघे भाऊ भाऊ
मिळेल ते आम्ही वाटून खाऊ
बाबा नाही हं, मी नाही काही वाटून खाणार. तुम्ही म्हणाला होतात ना, ‘माझे कुटुंब, माझी जाबाबदारी,’ मग आता हे काय? संपलेल्या पक्षाबद्दल बोलणार नाही, असे म्हणालो ना मी? आणि ते पण आपल्याला हरवल्यावर म्हणाले होते, एकही मारा मगर सॉलिड मारा! मग आता परत त्यांच्यासेाबत विजयोत्सव साजरा करायचा? पण, खरंच विजयी झालो, हा शब्दही आता कोसो दूर झाला आहे. त्यामुळे असा खोटाखोटा विजयोत्सव केला पाहिजे. आपण हारलो, तरी जिंकलो असे म्हणूया! हार के जितने वालो को बाजीगर कहते हैं बाबा!
आपण मोर्चा-आंदोलन करून धमाल करणार होतो, तर कमळवाले काकांनी ती मजाच काढून घेतली. पण, तसेही बाबा या विजयोत्सवाचे खरे हकदार आपणच आहोत. कारण, अडीज वर्षे सत्तेत असताना त्रिसुत्री भाषेचा शासननिर्णय काढणारेही आपण आणि या शासन निर्णयानुसार कार्यवाही नको म्हणणारेही आपणच! बरं, बाबा काही लोक म्हणतात की, “हजारो कुटुंबाची तिसरी-चौथी पिढी आपल्यासाठी खपली. तीच मराठी कुटुंब आपल्या सत्ताकाळात मुंबईबाहेर हद्दपार झाली. बदलापूर, कल्याण आणि कुठे कुठे! इतकी वर्षे मराठी अस्मिता, महाराष्ट्र म्हणत, मराठी माणसाचा आपण वापर केला. आता मराठी माणूस जागा झाला. तो आपल्याला फसणार नाही.” जाऊ दे, यांना माहिती नाही, आपण उर्दू भवन बांधणे, अजान स्पर्धा ठेवणे, असे मराठी माणसासाठी काम केल्यामुळे आता आपल्यासोबत आपले लाडके शांतिप्रिय मतदार आहेत. हो बाबा, काही लोकांनी सूचना दिल्यात, “आपल्या विजयोत्सवामध्ये माईक सांभाळायला प्रियंका चतुर्वेदींना द्या आणि राजकाकांना अतिथी म्हणून जावेद साबना बोलवायला लावा. मराठी माणूस आहेच गर्दी करायला.” कुणी काहीही म्हणो, आम्ही म्हणजे मराठी माणूस, आम्ही म्हणजेच महाराष्ट्र ना बाबा? अरे हे कोण म्हणतेय की, काहीही केले तरी पुन्हा ‘मशाल’ पेटणार नाही आणि ‘इंजिन’चे ब्रेक फेल आहेत, ते कधीही कुठेही धडकेल. त्यामुळे आपण मुंबई महानगरपालिका हारणारच. असू दे हारलो, तरी आम्ही पुन्हा असाच खोटा खोटा विजयोत्सव करू. ‘हार के जितने वाले कोई बाजीगर कहते हैं। बाजीगर हम बाजीगर!’
पशू ते माणूस...
नुकतेच नांदुरा तालुक्यात शिक्षक वर्गात ओरडले म्हणून दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. दुसरीकडे सांगलीमध्ये ‘नीट’च्या विद्यार्थिनीला कमी गुण मिळाले. म्हणून तिच्या बाबांनी तिला इतके मारले की, तिचा मृत्यू झाला. काल-परवाची घटना काय तर, प्रेयसी लॉजमधून दुसर्या तरुणासोबत बाहेर येताना दिसली, म्हणून तिच्या प्रियकराने आत्महत्या केली, तर विवाह होऊ शकत नाही म्हणून बेळगावमध्ये प्रेमीयुगुलाने रिक्षामध्येच गळफास घेतला. लातूरमध्ये तर मुलीने चॉकलेटसाठी पैसे मागितले म्हणून रागाने तिच्या बापाने तिचा गळा आवळून खून केला. जरा काही झाले की, आत्महत्या... थोडे काही मनाविरोधात झाले की, राग अनावर होऊन तत्काळ खून करायचा, हे प्रकार जगभरात वाढले आहेत. माणूस पुन्हा पशू बनत चालला आहे का?
मुंबईमध्ये एका प्राध्यापिकेने 16 वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केले, तर सांगलीमधले तीन मित्र फिरायला गेले. ते तिघेही मजूर होते. तिघांमधल्या दोघांनी एकावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्याने नकार देताच त्या दोघांनी त्याचा खून केला. दौंडमध्ये पंढरीच्या वारीला जाणार्या अल्पवयीन मुलीवरही काही नराधमांनी अत्याचार केला! आत्महत्या, खून आणि बलात्कार. गुन्हेगारी वाढली आहे. समाजाची धारणा अशी व्हावी? शांती, करुणा, दया हे सद्गुण मानवी मूल्ये इतिहासजमा होत आहेत का? माझ्याशिवाय दुसरे कोणी नाही. तसेच, त्या त्यावेळी वाटणार्या इच्छांची पूर्ती होणे गरजेचे बस! नायक नहीं खलनायक हू मैं! किंवा दुनिया बुरा माने तो गोली मारो, ही वृत्ती जगभरात हळूहळू का भिनत चालली आहे? न्यूनगंड, नैराश्य आणि अपेक्षित जीवन जगता न येणे यामुळे आलेली विफलता आहे का? पण, विफलतेला पर्याय म्हणून गुन्हेगारी कृत्य करणे हे अतार्किकच.
समाजशास्त्र सांगते की, माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. त्याचे घर त्याची शाळा आणि मग समाज जे काही संस्कार करतील, ते त्याच्या जन्माचे सोबती असतात. मग जगभरातली वाढती हिंसात्मक किंवा निराशात्मक प्रवृत्ती वाढली, याचे कारण त्याच्यावरचे संस्कार हेच असेल का? माणसाचा पशू ते मानव बनण्याच्या प्रवास. या प्रवासामधले माणूस बनतानाचे संस्कार आता पुन्हा पुनरुज्जीवित करायला हवेत.