पुण्यात बाजीराव पेशव्यांचा विषय तापविण्याचा काही नतद्रष्टांनी काही दिवसांपूर्वी प्रयत्न केला आणि आपल्या भारतभूवरील त्यांच्या संकुचित मानसिकतेचे प्रदर्शन घडविले. ज्या देशात आपण राहतो, त्या देशासाठी बलिदान देणार्या आणि स्वराज्यासाठी अभूतपूर्व कार्य केलेल्यांच्या पराक्रमाचे आदर्श आपल्या देशातील भावी पिढीला आचरणात आणायचे सांगण्याऐवजी, हे लोक अतिशय क्षुद्र अशा राजकारणात नेहमी स्वतःला गुंतवून ठेवतात आणि आम्ही अतिशय बढाया मारल्याचा आव आणून समाजाला खूप काही केल्याचे दर्शवितात. वस्तुतः हा त्यांचा नैतिक पराभव झालेला असतो, हे त्यांना अजिबात मान्य करायचे नसते. खा. मेधा कुलकर्णी यांनी रेल्वे विभागाच्या बैठकीनंतर हा विषय बोलून दाखविताना बाजीराव पेशव्यांच्या अजेय पराक्रमाची ओळख अमीट राहावी, म्हणून रेल्वे स्थानकाला नाव द्यावे, अशी मागणी केली होती.
मात्र, काहींना ती रूचली नाही. त्यामुळे त्यांचा थयथयाट सुरू झाला. अर्थात, त्याला काहीही अर्थ नाही, हे समाजालादेखील माहीत होते. त्यामुळे जेव्हा केव्हा रेल्वे स्थानकाचे नामकरण होईल तेव्हा होईल; मात्र अजेय अशा बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याचे थेट राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतच अनावरण करून जो काही स्तुत्य असा प्रयास ‘थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान’च्या सहकार्यांनी केला, तो अभिनंदनीय तर आहेच, मात्र ज्या पिढीसाठी हे प्रेरक कार्य आवर्जून सांगणे आवश्यक होते, त्या परिसरात हा पुतळा उभारणे ही संकल्पनाच मुळी अतिशय स्तुत्य. या नतद्रष्टांच्या नाकावर टिच्चून भावी पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हे कार्य तडीसदेखील नेण्यात आले आणि या प्रबोधिनीतून बाहेर पडणारा प्रत्येकजण या अजेय प्रेरणेतून आपल्या मायभूमीच्या रक्षणासाठी सज्ज असेल, यात कोणतेही दुमत असण्याचे कारण नाही. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी नेमके हेच अधोरेखित करून आज देश ज्या तर्हेने शत्रूंशी लढताना रणनीती आखत आहे, त्यासाठी अशा योद्ध्यांची पराक्रमाची गाथा प्रेरक ठरते, हेच नमूद केले. नुकतेच यशस्वी केलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ याचे उत्तम उदाहरण आहे, हे आजच्या तरुणाईलादेखील उमजले आहे. त्यामुळे आधीच्या आपल्या संपन्न देशातील योद्ध्यांच्या पराक्रमाची गाथा त्यांना प्रेरणा देत असेल, तर केवळ विकृत विचार करणार्यांना कोण बरे किंमत देईल?
विकासाचे शिलेदार
सध्या विधिमंडळाचे अधिवेशन मुंबईत सुरू आहे आणि पुण्यातील भाजपचे लोकप्रतिनिधी सातत्याने आपल्या मतदारसंघांतील लोकहितासाठी प्रश्न उपस्थित करून सरकारला विकासाची कामे करण्यास भाग पाडत आहेत. यात कोणतेही लोभी, स्वार्थी राजकारण न आणता, पहिल्याच आठवड्यात पुण्यातील भाजपसह सर्वपक्षीय आमदारांनी लोकहितासाठी आपला आवाज उठविला. हे नमूद करण्याचे कारण एवढेच की, या आधीदेखील अशी अनेक अधिवेशने झाली आणि लोकप्रतिनिधी होऊन गेले. मात्र, आजएवढी सक्रियता पुण्याबाबतीत दिसून आली होती.
आज काळ झपाट्याने बदलत आहे. पुण्याची ओळख जशी ‘शिक्षणाची पंढरी’ म्हणून, तशी एक समृद्ध अशी उद्योगनगरी म्हणूनदेखील आहे. काही उद्योगांपुरती मर्यादित असलेली ही नगरी आता आपल्या विकासाच्या कक्षा विस्तारत आहे. त्यामुळे या भागात निवडून आलेला प्रतिनिधी काळाची पावले ओळखूनच विकासाला चालना देत आहे. आधी नजीकची गावे ग्रामीण भाग म्हणूनच परिचित होती. मात्र, आता नागरी भाग म्हणून होत असलेला पुण्याच्या सभोवतालचा विकास हा आपल्या अर्थव्यवस्थेला बळ देणारा आहे. येथे नित्य रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळापासून तर तरुणाई जणू आर्थिक हातभार लावण्यास सज्ज झाल्याचे बघायला मिळते. उद्योग क्षेत्रात आलेली तरुण पिढी ही केवळ स्वतःच्या विकासापुरती मर्यादित नाही, तर इतरांनादेखील रोजगार देण्यासाठी उत्सुक आहे. स्टार्टअपची वाढती संख्या आणि तरुणाईच्या कौशल्याला मिळत असलेले सरकारचे प्रोत्साहन यामुळे हे शक्य होत आहे. लोकांनीदेखील आणि राजकीय पक्षांनीदेखील आता नव्या दमाच्या तरुणांनाच सभागृहात पाठवल्याने त्यांच्या कामाचा उत्साह अधिक दिसून तर येतोच, पण त्यातील विकासाची तळमळ आणि सकारात्मकतादेखील महत्त्वाची आहे. जिल्ह्यातील 21 पैकी तीन ते चार आमदार वगळता सर्वच तरुण आहेत. त्यामुळे यांची विधानसभेतील आणि सभागृहाबाहेरील लोकप्रतिनिधी म्हणून कामगिरी ही आजतागायत विकासाचे व्हिजन असलेलीच दिसून येत आहे. विकासाचे शिलेदार म्हणून ते सक्रिय दिसतात.