नाटक म्हटले की साधारण रंगमंच, त्यावर उभारलेले एक विश्व आणि त्या विश्वात रमणारे आणि रमवणारे कलाकार आणि प्रेक्षक. पण, हे सगळे नसतानाही निसर्गाच्या सान्निध्यात उत्तम कलाकृती जन्म घेत असतात. याचाच अनुभव नुकताच ‘थिएटर टुरिझम’च्या माध्यमातून घेतला. या नवसंकल्पनेचे हे अनुभवकथन...
उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आल्या आहेत. एव्हाना मुलांनी शाळेचे दप्तर भरायला घेतले असेल. काहींचे कोर्या करकरीत वह्यांनी दप्तर भरलेही असेल. संमिश्र भावनांनी एक एक पुस्तक दप्तरात भरत, ते उन्हाळ्यातल्या सुंदर दिवसांच्या आठवणी रिकाम्या करीत असतील. शाळेत गेल्यावर काय केलेस उन्हाळ्यात असा प्रश्न विचारल्यावर मनाच्या पुस्तकाची काही पाने चाळत, एका पानावर मुलं रेंगाळणार आणि ते म्हणजे नाट्यमय प्रवास आणि निसर्गात राहून तिथे केलेला अभिनय. ही मुलं अर्थातच नाटक करणारी, नाटकात भाग घेणारी, नाट्यगृहात काम केलेली. बालरंगभूमीचे बालकलाकार जे नुकतेच माझ्याबरोबर सहलीला आले होते. थिएटर म्हणजेच नाट्यगृह आणि टुरिझम म्हणजे पर्यटन. ज्या मुलांना नाटकाची आणि पर्यटनाची आवड आहे, अशा मुलांना घेऊन मी या उन्हाळ्यात सहल नेली, असे करणे आवश्यक होते आणि आहे.
आम्ही सहलीला ‘टाईम ट्रॅव्हल विथ रॅडी’ असे नाव दिले कारण, खरं पाहिले, तर नाटकात काम करताना भान हरपून कलाकार काम करतो आणि मग तो पोहोचतो एका वेगळ्याच प्रदेशात, जिथे तोच नव्हे, तर अभिनय कौशल्याने तो प्रेक्षकांनाही त्या स्थळी, त्या वेळी आणि त्या काळी नेऊन पोहोचवतो. माझ्यासकट माझ्या बालकलाकार मित्रांनाही अशी सहल घडवून आणायची होती, जी थिएटरच्या चार भिंतींपर्यंत मर्यादित न राहता त्याचा विस्तार व्हावा, शयता वाढवता आणि विकास व्हावा म्हणून नेलेली ही सहल असावी. आऊट ऑफ द बॉक्स विचार करण्यासाठी ही सहल महत्त्वाची ठरली. ‘थिएटर टुरिझम’चा वेगळाही अर्थ लावू शकतो. जसे की, पूर्वी आपली कला नाटकाचा प्रयोग जागोजागी, गावागावातून लागायचा, त्यात लावणीचे खेळसुद्धा आले. पूर्वी असे प्रयोग होत असत. गावाच्या वेशीवर लावणीचा फड मांडला जात असे आणि गावकरी लावणी बघायला जात. आजही तसेच केले जाते पण, फारच कमी.
इथे मात्र त्याचा काही संबंध नाही. इथे मी नाटकातल्या मुलांना घेऊन प्रवासाला गेले आणि तिथे त्यांनी नाट्य खेळ सादर करत, त्यांचे आणि इतरांचे मनोरंजन केले. हा विद्यार्थ्यांना अभिनयाचे धडे शिकवण्याचा वेगळा प्रयत्न होता. ज्यामध्ये अवलोकन, सिंहावलोकन, विहंगावलोकन यांवर भर होता.
अनोळखी, प्रतिकूल परिस्थितीतही नाट्य शोधणे, ते प्रस्तुत करणे, हे इथे आलेल्या मुलांना नाटकात काम करायला आवडत होते पण, सहभाग घेतलेली ३० मुले एकमेकांना ओळखत नव्हती. दोन दिवसांत ओळख करून, मैत्री करून नाटक सादर करायचे म्हणजे मजेदारच प्रवास पण, तितकाच अवघडही. कारण, अनोळखी जगात वावरत असताना, अल्पशा वेळात काम करणे सोपे नाही पण, मुलांना जमले. त्यांनी उत्साहाने काम केले, मज्जा केली, धमाल करत छोटेसे सादरीकरणही केले. कल्पनाशक्तीला ताण देत, आजूबाजूच्या निसर्गाशी संलग्न होत काम करायचे, इथे रुसवे, फुगवे, मारामारी करायला वेळ कोणाला! आपले सादरीकरण उत्तम व्हायला पाहिजे, तेही वेळ न दवडता.
‘थिएटर टुरिझम’अंतर्गत माझा हा दुसरा प्रयत्न. या अगोदर मी मुलांना प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा स्थित ‘लोक बिरादरी’ प्रकल्पात नेले होते. तेव्हाही पुण्यातली साधारण ३० मुलं होती. आम्ही तिथल्या आदिवासी मुलांसमोर दोन एकांकिका सादर केल्या होत्या आणि मग तिथल्या आदिवासी मुलांबरोबर एक दिवसीय नाट्यशिबीर घेतले होते. काय भन्नाट मजा आली म्हणून सांगू! शहरी ३० मुलं आणि आदिवासी ३० मुलं मिळून नाटुकली सादर करणार. निसर्गात असलेली फुलं-पानं तोडून आणायची आणि त्याचा वापर करून, एका मुलाला झाड म्हणून सजवायचे आणि त्यातून नाटक उभे करायचे. पर्यावरण, त्याचे संगोपन, त्याच्याशी मैत्री हा भाग तर आलाच पण, त्याचबरोबर आपल्यापासून दूर एका वेगळ्याच जगात राहणार्या मुलांबरोबर एकत्र येऊन, नाट्य कलाकृती सादर करायची. एसी नसलेल्या सभागृहात चिकचिक होत असलेल्या गर्मीत, आदिवासी मुलांबरोबर काम करणे एक वेगळाच अनुभव. तर आदिवासी मुलं एक दडपणाखाली सुरुवातीला दिसली. शुद्ध मराठी आणि फाडफाड इंग्रजी बोलणार्या, उंचीचे कपडे परिधान केलेल्या मुलांसमोर आपण कसे बोलायचे? पण, नाटक आणि दोन संमिश्र गटात विभागल्यामुळे, सगळा संकोच गळून पडला. त्यांच्यासमोर एकच प्रश्न होता आणि तो म्हणजे, एकमेकाना कसे घेऊन चालायचे आणि प्रस्तुतीकरण कसे उत्तम करायचे. मुलांना मुलांबरोबर मिसळायला फार वेळ लागत नाही आणि निसर्गात ते अधिक सुंदर खुलतात. त्यांच्या विचारांना बहार येतो कारण, कोणाचेच दडपण नसते. सहवासातून प्रेम, आपुलकी निर्माण होते. अर्थातच सारे काही सोपे नसतेच मुळी. राग, लोभ, मोह, मत्सर अशा भावना निर्माण होतात. पण, त्या नाट्यमयी प्रवासात विरघळतात आणि ‘अमृताहूनी गोड’ असा नाट्यरस तयार होतो. सतत हवाहवासा वाटणारा.
हा प्रवास विलोभनीय आहे, इथे पालकांचे काही काम नाही. पालक असले की, मुलांना वेगळेच दडपण येते. मुलं नैसर्गिक वागायचे सोडून एकतर अती शहाणी, नाहीतर अस्वस्थ, अवघडल्यासारखी वागायला लागतात. मुलांना मोकळे खेळू द्यावे. निसर्गात मनसोक्त बागडू द्यावे आणि हे करता करता, परिसरातील नाट्य शोधून त्यावर आधारिक मुलांनीच नाट्य कलाकृतीच्या माध्यमातून प्रकट व्हावे. हे करत असताना मी एक निरीक्षक म्हणून सगळा खेळ बघत असते. कुठे काही अडलं, तर मार्ग शोधून देण्याचे काम करते. कल्पनेइतकाच प्रवासही भन्नाट होतो. मुलं घरदार विसरून, एका वेगळ्याच जगात असतात. नाटकाची आवड जोपासलेल्यांना हा निराळा अनुभव मोठं करून जातो. कोणी झाड बनून आपली व्यथा सांगतो, तर कोणी पक्षी बनून आपली कथा. कोणी फूल बनून आनंदाने बागडतो, तर कोणी कुत्रा होऊन जागेचे राखण करतो.
मुलांबरोबर असे प्रयोग करायला हवेत. यंदा निसर्गात होतो, वेल्ह्याला. ऑगस्टमध्ये आम्ही जाणार तोरणा गडावर. तिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग तिथेच त्यातूनच एका नाटकाचा जन्म होणार. ‘नाट्यम् भावानु कीर्तनम्’ सर्व ठिकाणी नाट्य, भाव आणि कीर्तन, कशी वाटते आहे कल्पना! चला तर मग नाट्यमयी प्रवास घडवू या. थिएटरला टुरिझमची जोड लावू या!