
कितीही नाकारलं, तरी उबाठा गटाला ‘संजय’ नावाचं ग्रहण लागलंय. ते सुटतही नाही, सोडवताही येत नाही. एक संजय कमी होते म्हणून की काय, आता दुसर्या संजयने उबाठा गटाची डोकेदुखी वाढवली आहे. पक्ष फुटण्यापासून, जवळपास संपण्याच्या मार्गावर येऊन ठेपला. मात्र संजय यांचा सकाळचा भोंगा बंद झालेला नाही. विधानसभेत पानिपत झाल्यानंतरही अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली की, मग राज्यात देवेंद्र फडणवीसांवर टीका करायची इतकाच नाममात्र उद्योग आता विश्वप्रवक्ते संजय राऊत यांच्याकडे उरला आहे! किमान हे संजय अधिकृत तरी आहेत, मात्र तिकडे गुप्ता आडनाव असलेले संजय मात्र, स्वतःला उबाठा गटाचे समर्थक तथा प्रवक्ता म्हणवून घेत माध्यमांमध्ये उबाठा गटाची बाजू मांडत असतात. मात्र, युवराज आदित्य यांनी संजय गुप्ता आमचे प्रवक्ते नसून, त्यांच्या मताशी आमचा कसलाही संबंध नसल्याचे सांगत संताप व्यक्त केला. तसेच, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला. तसं पाहिलं तर, पक्षाच्या घसरणीला कारणीभूत असणार्या खर्या संजय यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. मात्र, तसे होणे शक्य नाही. कारण, ‘सिल्वर ओक’शी पुन्हा संबंध बिघडण्याची शक्यता अधिक. समर्थक का असेना, मात्र तो पडती बाजू मांडत होता. मात्र, उबाठा गटाला तो संजय फसवणूक करणारा वाटत असून, तो नकोसा झाला आणि खरा संजय आपलासा. तिकडे कोस्टल रोडचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, आदित्य यांनी कौतुक करण्याऐवजी विरोधी सुरांची मशाल पेटवली. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असते, तर 2023 मध्येच कोस्टल रोडचे काम पूर्ण झाले असते, असे आदित्य यांनी सांगितले. सध्या स्वबळावर लढण्याची भाषा करणारा उबाठा गट अजूनही, मविआ अस्तित्वात असल्याच्या भ्रमात आहे. मविआ बाहेरून जरी ठीकठाक दिसत असली, तरी आतून मात्र पुरती उद्ध्वस्त झाली आहे. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार उठसूट नाना पटोलेंना धारेवर धरतात, तर नाना संजय राऊतांना खडेबोल सुनावतात. मुळात, वरळीचे आमदार असूनही युवराज आदित्य यांना कोळी बांधवांच्या मागण्या सोडवता आल्या नाहीत. तसेच, त्यांचे समाधानही करता आले नाही. त्यामुळेच कामाचा कालावधी वाढला. मात्र, महायुती सरकार आल्यानंतर कामाचा वेग वाढला. आता आदित्य यांनी संजयपुराणात लक्ष घातल्याने, खरे संजय आणखी किती नुकसान करतील हे पाहावे लागेल.
सरस्वतीपूजेचा पोटशूळ
झारखंडमध्ये सोरेन सरकार आल्यानंतर हिंदू विचारधारेची गळचेपी पुन्हा सुरू होणार, हे तर निश्चित होते. मुख्यमंत्रिपदी हेमंत सोरेन विराजमान झाल्यानंतर पुन्हा एकदा, लक्ष्य हिंदू धर्मच आहे. राजधानी रांची येथील ‘राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ अर्थात ‘रिम्स’ येथे, सरस्वतीपूजेचे आयोजन करण्यास बंदी घालण्यात आली. गेल्या अनेक दशकांपासून हा कार्यक्रम घेतला जात होता. मात्र, ‘रिम्स’ प्रशासनाने विद्यार्थ्यांना सर्व तयारी थांबवण्याचे आणि देणगीचे पैसे परत करण्याचे आदेश जारी केले. मात्र, याविरोधात ‘रिम्स’च्या एका वरिष्ठ डॉक्टरसह इतरांनी हा मुद्दा लावून धरल्यानंतर, अखेर सरस्वतीपूजनाला परवानगी देण्यात आली. न्यूरोसर्जन डॉ. विकास कुमार यांनीही, या आदेशाविरुद्ध आवाज उठवला. ‘रिम्स’मधील उच्चपदस्थ अधिकार्यांकडून, देशाच्या सांस्कृतिक परंपरांवर थेट हल्ला केला जात आहे, जो निषेधार्ह असल्याचे डॉ. कुमार यांनी म्हटले. दरवर्षी, विद्यार्थी एकत्रितपणे ‘रिम्स’मध्ये, सरस्वतीपूजा आयोजित करतात. हा कार्यक्रम ‘एमबीबीएस’च्या दुसर्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केला. त्यासाठी देणगीच्या माध्यमातून निधी उभा केला. सर्व तयारी झालेली असताना, ऐनवेळी ‘रिम्स’ प्रशासनाने सरस्वतीपूजेवर बंदी घातली. मात्र, विरोधाचे सूर उमटू लागल्यानंतर ही बंदी मागे घेतली. झारखंडचे आरोग्यमंत्री इरफान अन्सारी यांच्या जातीय मानसिकतेमुळे, ही बंदी घालण्यात आल्याचा आरोप झारखंडचे भाजपनेते बाबूलाल मरांडी यांनी केला. एकीकडे ‘मोहब्बत की दुकान’ म्हणत फिरायचे आणि दुसरीकडे मात्र हिंदू धर्माची आणि हिंदू धर्मीयांची कुचंबणा होईल, असे निर्णय घेणार्यांना सहकार्य करायचे अशी काँग्रेसची नीती. भ्रष्टाचाराचे भरमसाठ आरोपअसतानाही, जनमताचा कौल त्यांच्याबाजूने गेला. मात्र, त्याचा अर्थ हिंदूंवर अन्याय होईल, अशी भूमिका घेणे असा मुळीच होत नाही. सरस्वतीपूजेवर आरोग्यमंत्री इरफान अन्सारी यांनी कायदा-सुव्यवस्था बिघडण्याचे कारण देऊन, पूजेला परवानगी नाकारली. मात्र, विरोधानंतर परवानगी दिली. बहुसंख्य हिंदू असलेल्या आपल्या देशात, आजही हिंदू-देवतांच्या पूजा-उत्सवांवर हिंदूंनाच नियमाचे पाठ शिकवले जातात. भ्रष्टाचाराच्या मोहात बुडालेल्या सोरेन सरकारला, याचे सोयर-सुतकं तरी कशाला असेल म्हणा!