‘मिठी’चे धागेदोरे

    29-May-2025   
Total Views |
‘मिठी’चे धागेदोरे

मुंबईतील एका माजी मंत्र्याची आणि त्याच्या वडिलांची अवस्था सध्या ‘घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे,’ अशीच झालेली दिसते. मुंबई पालिकेत एक लाख कोटींची लूट करून ती पचवल्याच्या आनंदात असताना, एका प्रकरणाने त्यांच्या आनंदावर विरजण घातली. मिठी नदी स्वच्छता घोटाळा! तब्बल १ हजार, २०० कोटींच्या या घोटाळ्यात या पिता-पुत्राचा उघड सहभाग आजवर कुठेच सापडत नव्हता. ना कोणत्या कागदावर सही, ना मर्जीतील ठेकेदारांना कंत्राट मिळवण्यासाठी दिलेली शिफारसपत्रे. त्यामुळे भाजप आणि सत्ताधारी पक्ष आपल्याला भ्रष्टाचाराच्या खोट्या प्रकरणांत गोवत असल्याचा आव आणून त्यांनी वेळोवेळी सहानुभूती मिळवली. पण, आता १०० अपराध भरल्यामुळे त्यांचे बिंग फुटेल, हे निश्चित!

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने परवा अभिनेता दिनो मोरियाला चौकशीसाठी बोलावले. ड्रग्जशी संबंधित ही चौकशी असेल, असा अंदाज बांधत अनेकांनी प्रकरण हलयात घेतले. पण, मिठी नदी घोटाळ्यात त्याची जबानी नोंदवल्याचे कळताच भल्याभल्यांची झोप उडाली. या प्रकरणात आतापर्यंत ज्या १३ जणांना अटक करण्यात आली, त्यातील प्रमुख आरोपीशी त्याचे ‘कनेशन’ जुळले. मुख्य आरोपी केतन कदम याचे कॉल रेकॉर्ड्स आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी केल्याबरोबर दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो यांची नावे समोर आली. सँटिनो मोरिया संचालक असलेल्या कंपनीचे कार्यालय निघाले केतन कदमशी संबंधित कंपनीच्या पत्त्यावर. त्यामुळे संशय बळावल्याने दोन्ही भावांना बँक खात्यांच्या तपशीलासह दुसर्यांदा चौकशीसाठी बोलावण्यात आले. तेव्हापासून युवराजांच्या म्हणे डोळ्याला डोळा लागलेला नाही.

दिनोशी युवराजांचे किती घनिष्ठ संबंध आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. आधी सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन मृत्यूप्रकरणाशी दोघांची नावे जोडली गेली; आता ‘मिठी’ घोटाळा. सिनेविश्वातून बाहेर फेकला गेलेला एक अभिनेता, कोणाच्या सांगण्यावरून मिठी नदीच्या कंत्राटदाराच्या संपर्कात येतो? त्या दोघांमध्ये वारंवार दूरध्वनी संभाषण का होते? त्याच्या भावाची आणि आरोपीची कंपनी एकाच पत्त्यावर कशी नोंदवली जाते? याचे कोडे उलडगण्यासाठी कोणा तज्ज्ञाची गरज नाही. महाराष्ट्रातील जनता तितकी सूज्ञ आहे. आता फक्त कोणत्याही दबावाविना आरोपींना शिक्षा व्हावी, इतकीच अपेक्षा!

नालेसफाईचे अर्थशास्त्र

बईतील नालेसफाई म्हणजे शोधनिबंधाचा विषय. गाळ आहे, पण काढलेला दिसत नाही; पाणी आहे, पण वाहत नाही; पैसा गेला, पण उपयोग काय झाला ते कळत नाही. वर्षानुवर्षांची हीच स्थिती. त्यास जबाबदार कोण, हे मुंबईकरांना नव्याने सांगायला नको. परवा मुंबई पुन्हा तुंबली. ही घटना नवीन नव्हती, पण आठवण करून देणारी होती, गेली २५ वर्षे सत्तेत असलेल्या उबाठाच्या कारभाराची. त्यांचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने या पार्श्वभूमीवर नालेसफाईच्या कामांची श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी केली. ‘घाणीत पाय भिजू नयेत’ म्हणूनच कदाचित काँग्रेसने विरोधी भूमिका घेतली असावी. असो, काँग्रेसच्या मागणीने का होईना, एकदा काळ्याचे पांढरे होऊनच जाऊ दे!

इथली नालेसफाईची कामे वर्षाकाठी एकदा नव्हे, कमीतकमी तीन वेळा होतात, एकदा फाईलमध्ये, दुसर्यांदा कंत्राटदाराच्या बिलात आणि तिसर्यांदा जाहिरातीत! पुढे मे महिना लागताच दरवर्षी ९० टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला जातो. त्यावर मुंबईकरांना एकच प्रश्न पडतो, ‘कोणत्या शहरात?’ अधिकार्यांचे हे उत्तर म्हणजे बालपणी ‘मी अभ्यास केला आहे,’ हे बळेच सांगण्यासारखे! मुंबईतील नालेसफाईमागचे आकडे इतके मोठे आहेत की, हा विषय अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करावा. पालिकेचे काही ‘द्रष्टे’ अधिकारी आणि कंत्राटदार मिळून भ्रष्टाचाराचा ‘गाळ’ कसा तयार करतात आणि तो कागदोपत्री कसा उपसतात, याचीही तपशीलवार माहिती द्यावी. बॉलिवूडमधील अभिनेता, त्याचा भाऊ, कंत्राटदार आणि काही ‘प्रेमळ’ लोकप्रतिनिधी एकाच नावेत बसून नाल्यातून ‘लोणी’ कसे उपसतात, हे त्यात समाविष्ट करावे.

मुंबईतील नालेसफाईचे एका वायात वर्णन करायचे झाल्यास, ‘सोप्या कामात मोठे बजेट घालवण्याचा सण!’ असे करता येईल. या सगळ्या गोंधळात मुंबईकर मात्र कायम संयमी भूमिका घेतो. पहिल्या पावसात गुडघाभर पाण्यात उभा राहून सेल्फी काढतो, ट्रेन बंद असताना व्हॉट्सअॅपवर मीम्स पाठवतो आणि दुसर्या दिवशी पुन्हा कामावर हजर होतो. बहुधा मुंबईकरांचा संयम या घोटाळेबाज मंडळींना आपली ‘गुंतवणूक’ वाटत असावी, अन्यथा निर्लज्ज व्यक्तीदेखील या पातळीवर कधी उतरणार नाही. असो. आता काँग्रेसने मागणी केलीच आहे म्हटल्यावर, सत्ताधार्यांनी तिची पूर्तता करून मुंबईची लूट करणार्यांचा भांडाफोड करावा, इतकेच!

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.