मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. गौरी गोडसे आणि न्या. सोमाशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने नुकतेच खदिजा शेख या विद्यार्थिनीच्या वकिलाला तिच्या जामिनासाठीचा अर्ज तातडीने दाखल करण्यास सांगितले. "या विद्यार्थिनीला परीक्षेला बसता येईल, यासाठी हा अर्ज आम्ही आजच मंजूर करू,” असेही न्यायालयाने आश्वासन दिले. तसेच, न्यायालयाने म्हणे सरकार आणि महाविद्यालयाला फटकारले की, विद्यार्थिनीला सुधारण्याची संधी द्या. तिला गुन्हेगार का ठरवता? थोडक्यात, भारताची निंदा पाकिस्तानीचे पाय चाटूनही खदिजा आता निष्पाप रस्ता चुकलेली विद्यार्थिनी आहे बरं! भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. न्यायव्यवस्थेने त्यांचे काम केले. पण, समाजव्यवस्थेच्या नजरेतून पाहिले तर?
ही खदिजा शेख कोण? तर नुकतेच युद्धात भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळ नष्ट केले. १०० दहशतवाद्यांना भारतीय सेनेने कंठस्नान घातले. या सगळ्यामुळे खदिजा शेख भयंकर संतापली. तिने समाजमाध्यमांवर भारतविरोधी विधाने केली. तसेच, ‘पाकिस्तान जिंदाबाद’ लिहिले. भारताच्या सैन्याने देशप्रेमाची पराकाष्ठा करत जीव पणाला लावला आणि शत्रू राष्ट्राला धुळ चारली. तेव्हा खदिजाचा जीव कळवळला तो पाकपुरस्कृत दहशतवाद्यांसाठी! अर्थात, तिच्या या कृत्याचा देशभरातील नागरिकांनी विरोध केला. तसेच, ती ज्या महाविद्यालयात शिकत होती. त्या महाविद्यालयाने तिला परीक्षेला बसू दिले नाही. महाविद्यालयातून तिला काढून टाकण्यात आले. यावर तिने न्यायालयात तक्रार केली. तेव्हा न्यायालयाने तिचे भवितव्य उद्ध्वस्त होऊ नये, या अर्थाने म्हणे न्यायनिर्णय दिला.
खदिजा कुठे राहते? तर भारतातल्या महाराष्ट्रातल्या पुण्यामध्ये. तिचे पूर्वज अरबस्थानातले मूळचे मुस्लीम आहेत का? नक्कीच नाही. तिच्या मागच्या आणि पुढच्या पिढ्याही भारतात उपलब्ध असलेल्या सगळ्या सुविधा घेत, भारताच्या मातीतच जन्मल्या आणि जन्मणार आणि मरणारही. थोडक्यात, भारतातच राहून भारताचेच खाणारी आणि भारतविरोधी असणारी खदिजा. तिने म्हणे तिचे भारतविरोधी ‘ट्विट’ दोन तासांत डिलीट केले. ‘ट्विट’ डिलीट करता येतात. पण, मन आणि बुद्धीच जर नासकी असेल, तर ती डिलीट करता येते का? खदिजा शेखची पाकिस्तानप्रेमी मानसिकता आणि संस्कार डिलीट झाले का?
आता विचार करायची ‘पाळी’
गायत्री कोळी या २६ वर्षांच्या महिलेचा खून तिच्या सासरच्यांनी केला. कारण, मासिक पाळी आली असताना तिने स्वयंपाक केला. ही घटना कधीची तर गेल्या महिन्यातील. तीसुद्धा जळगावची. ‘मासिक पाळी’ हा शब्द जरी उच्चारला तरी समाज काय विचार करतो? लैंगिक विषयावर बोलणे टाळले जाते, तसेच मासिक पाळीबद्दलही बोलणे टाळले जाते. स्त्रियांच्या धैर्याची आणि सहनशीलतेची परीक्षा घेणारे आणि साक्ष देणारे मासिक चक्र. मात्र, अनादि काळापासून स्त्रीशक्तीने मासिकधर्माच्या वेळी होणार्या कधी थोड्या, तर कधी जास्तच होणार्या त्रासावर मात केली. त्यामुळे तिच्या पाळीबद्दल बोलायलाच हवे. काही प्रातिनिधीक घटना पाहू. शाळेत असताना मासिक पाळी आली आणि कपड्याला डाग लागले, तर भीतीने किंवा लाजेने आजही अनेक विद्यार्थिनी शाळा सोडतात. मासिक पाळी आली असेल आणि शाळा-महाविद्यालयात जर शौचालयाची व्यवस्था नसेल किंवा अत्यंत अस्वच्छ गैरसोईचे शौचालय असेल, तरीसुद्धा अनेक विद्यार्थिनी शाळा, महाविद्यालये सोडतात. अनेक ठिकाणी महिलांना देवघर, स्वयंपाक वगैरे यांना हात लावू दिला जात नाही. (अपवाद क्षमस्व) हे सगळे योग्य नाही. सगळ्या सृष्टीसह मासिक पाळीसुद्धा तर देवाची निर्मिती आहे. देवाने दिलेल्या गोष्टीचा देवाला विटाळ का होईल? मात्र, आणखी एक बाजू आहे. मासिक पाळीच्या दिवसात हिंदू समाजच महिलांशी कसे अमानवीय वागतो, असे सांगून हिंदू महिला-मुलींना समाजाविरोधात चिथावणार्या काही समाजविघातक शक्तीही सक्रिय आहेत. या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे, खरंच का पूर्वीपासून आपल्या समाजात मासिक पाळी आल्यावर महिलांना बहिष्कृततेची वागणूक दिली जायची? खरंच का हिंदू समाज महिलांविरोधी आहे? अर्थात तसे नाही. हिंदू समाज हा परिवर्तनशील, सृजनशील आहे. जे जे उदात्त आहे, त्याचा स्वीकार आणि जे समाजविघातक आहे, त्याचा त्याग करणे हे समाजाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे मासिक पाळी संदर्भात समाजात प्रथा, परंपरा, रूढी कशा आल्या, याचा मागोवा घेणे गरजेचे आहे. तसेच, मासिक पाळीबाबतच्या कालबाह्य रूढी तसेच, गैरसमजही आपण मनातून आणि कृतीतून दूर करूया.