रामाच्या आराधनेसह रामभक्तांच्या आरोग्याचा अयोध्येत संगम

    03-Jun-2024
Total Views |
Ram Mandir

राम मंदिराची गरजच काय, त्याऐवजी इस्पितळ उभारा वगैरे वक्तव्ये विरोधकांकडून अगदी सर्रासपणे केली गेली. पण, आता राम मंदिर परिसरात उभ्या राहत असलेल्या इस्पितळ सुविधेमुळे राम मंदिराच्या उभारणीस विरोध करणार्‍या विविध विघ्नसंतोषी नेत्यांना परस्पर उत्तर मिळाले आहे.

राम मंदिर निर्माण समितीची एक बैठक अलीकडेच संपन्न झाली आणि त्या बैठकीत मंदिर परिसरात भव्य शेषावतार मंदिर उभारण्याचा, तसेच अत्याधुनिक इस्पितळाची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अपोलो इस्पितळाच्या मदतीने अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले इस्पितळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. राम मंदिर निर्माण समितीची दोन दिवसांच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये शेषावतार मंदिराच्या उभारणीसाठी वास्तुरचनाकार आशीष सोमपुरा यांची नियुक्ती करण्याचा निर्णयही घेण्यात आला. नवीन मंदिराच्या उभारणीबरोबरच न्यासाच्या कार्यालयासाठी वास्तू उभारण्याचा, तसेच ५०० लोक बसू शकतील असे सभागृह निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीपूर्वी राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेन्द्र मिश्रा यांनी मंदिर परिसरामध्ये जी विद्यमान बांधकामे सुरु आहेत, त्यांची पाहणी केली.

 बैठकीनंतर राम मंदिराचे एक विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा यांनी, सप्तमंडपम उभारण्यासाठीच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले. वास्तुरचनाकार आशिष सोमपुरा हे आता शेषावतार मंदिराची वास्तुरचना करण्याचे कार्य करीत असून, लवकरच या मंदिराच्या उभारणीस प्रारंभ होणार आहे. शेषावतार मंदिर शरयू नदीच्या किनार्‍यावर असून ते मंदिर त्रेतायुगापासून असल्याचे सांगण्यात येते. प्रभू रामचंद्राचा भाऊ म्हणून सदैव रामाच्या पाठीशी उभे राहण्याचा आदेश भगवान विष्णूने शेषनागास दिला होता. प्रभू रामचंद्राचा भाऊ लक्ष्मण हा शेषनागाचा अवतार असल्याचे मानले जाते. हे लक्षात घेऊन राम मंदिर परिसरात शेषनागाचे भव्य मंदिर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मंदिर निर्माण कार्याबरोबरच मंदिर परिसरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जाणार असून, त्यासाठी अपोलो हॉस्पिटल आणि रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास यांच्यामध्ये गेल्या २५ मे रोजी एका करारावर स्वाक्षर्‍या झाल्या आहेत. हे इस्पितळ यात्रेकरू सुविधा केंद्रामध्ये उभारले जात आहे. यामध्ये व्यापक अशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राम मंदिर परिसरात उभ्या राहत असलेल्या इस्पितळ सुविधेमुळे राम मंदिराच्या उभारणीस विरोध करणार्‍या विविध विघ्नसंतोषी नेत्यांना परस्पर उत्तर मिळाले आहे.

भोजशाला : उत्खननात वैशिष्ट्यपूर्ण खांब आढळले!
 
मध्य प्रदेशात परमार घराण्याची राजधानी असलेल्या धार येथे न्यायालयाच्याम आदेशानुसार भारतीय पुरातत्व विभागाकडून उत्खनन केले जात असून, त्यामध्ये नवनवीन माहिती उपलब्ध होत आहे. परमार घराण्यातील राजा भोज याने ११व्या तकात सरस्वती देवीचे मंदिर उभारले होते. हे मंदिर एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपास आले होते. पण, इस्लामी आक्रमकांच्या हल्ल्यात मंदिर उद्ध्वस्त केले गेले. आज त्या वास्तूचे अवशेष उरले आहेत. मुस्लीम समाज या वास्तूवर आपला दावा करीत आहे. भोजशाला म्हणून सध्या ओळखल्या जात असलेल्या या वास्तूवरून न्यायालयात कायदेशीर लढाई सुरु आहे. त्या अंतर्गतच या वास्तूचे पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण, उत्खनन केले जात आहे. उत्खनन करताना पुरातत्व खात्यास तीन वैशिष्ट्यपूर्ण खांब आढळून आले. भारतीय पुरातत्व विभागाप्रमाणे ‘जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया’च्या तुकडीकडून भोजशालेच्या परिसराची पाहणी, सर्वेक्षण केले जात आहे. या संस्थेने ग्राऊंड पेनेट्रेटिंग रडार मशीनच्या मदतीने काही भागांत सर्वेक्षण केले. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने भोजशालेचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचा आदेश गेल्या ११ मार्च रोजी दिला होता.

त्यानुसार हे सर्वेक्षण केले जात आहे. २७ जूनपर्यंत हे सर्वेक्षण केले जाणार आहे. अशा सर्वेक्षणाची मागणी ‘हिंदू फ्रंट फॉर जस्टीस’ या संघटनेने केली होती. पुरातत्व खात्याकडून जे उत्खनन करण्यात आले, त्यात देवदेवतांच्या मूर्ती, कोरीव काम केलेले दगड, एक तीन फुटी तलवार, काही नाणी आदी साहित्य आढळून आले. भोजशाला म्हणून ओळखला जात असलेला परिसर म्हणजे सुमारे एक हजार वर्षांपूर्वीचे सरस्वतीचे भव्य मंदिर असल्याचा हिंदू समाजाचा दावा आहे. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ हिंदू पक्षकारांनी न्यायालयास अनेक पुरावे सादर केले आहेत. मध्य भारतात १०व्या ते १३व्या शतकापर्यंत परमार घराण्याची सत्ता होती. त्या काळात सरस्वतीचे मंदिर उभारण्यात आले होते. हे हिंदू मंदिरच आहे, असा हिंदूंचा दावा आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून जे विविध पुरावे हाती लागत आहेत ते पाहता, त्यास पुष्टी मिळत आहे. ते पाहता खरे म्हणजे मुस्लीम समाजानेच आपली चूक मान्य करून या आणि अशा प्रकारच्या हिंदू समाजाच्या अन्य मंदिरे आणि वास्तूंच्यावरील आपला अधिकार सोडून दिला पाहिजे.

भारताने १०० टन सोने परत आणले!
 
भारतीय अर्थव्यवस्थेला आणखी मजबूत करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने इंग्लंडच्या ‘बँक ऑफ इंग्लंड’मध्ये ठेवलेले आपले १०० टन सोने परत आणले आहे. १९९१च्या दरम्यान भारताची आर्थिक स्थिती खूपच चिंताजनक होती. परकीय चलन गंगाजळीचा साठा आटत चालला होता. या संकटावर मात करण्यासाठी आणि निधी उभारण्यासाठी आपल्याकडील सोने ‘बँक ऑफ इंग्लंड’, ‘बँक ऑफ जपान’ अशा बँकांमध्ये ठेवण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला. या निर्णयास साहजिकच भारत सरकारची संमती होती. अत्यंत गोपनीयता बाळगून हे सोने नेण्यात येत होते. पण, माध्यमांना त्याचा सुगावा लागला आणि ही बातमी बाहेर फुटली आणि सर्वांनाच हे सोने विदेशात हलविले जात असल्याचे कळले. त्यावेळी भारताची जी हलाखीची स्थिती होती, त्यामध्ये आता खूपच सुधारणा झाली असल्याचे लक्षात घेऊन विद्यमान सरकारने १०० टन सोने भारतात पुन्हा आणण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय कृतीतही आणला. १९९१ मध्ये रिझर्व्ह बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडे सोन्याचा भरपूर साठा होता.

परकीय चलन उभारण्यासाठी त्यातील काही सोने गहाण टाकण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला होता. त्यातूनच हे सोने गहाण टाकण्यात आले होते. आता गेल्या काही वर्षांपासून रिझर्व्ह बँकेच्या सुवर्ण साठ्यात सातत्याने भर पडत चालली आहे. जगातील बरेच देश आपल्याकडील सोने ‘बँक ऑफ इंग्लंड’ किंवा अन्य महत्वाच्या बँकांमध्ये ठेवत आले आहेत. पण, भारताने ते सोने त्या देशामधून परत आणून आपल्या तिजोरीत ठेवण्याचा निर्णय घेतला. हे सोने भारतात परत आणण्यासाठी योग्य ती काटेकोर यंत्रणा उभारण्यात आली. तसेच या सोन्यावरील सीमा शुल्क पूर्णपणे माफ होईल, अशी व्यवस्था करण्यात आली. १९९१ मध्ये सोने गहाण टाकणारा आपला देश आज सोन्याचा चांगल्या प्रकारे साठा राखून आहे. तसेच आपले हक्काचे सोने आमच्याच देशामध्ये ठेवण्याची क्षमता राखून आहे, हे या उदाहरणावरून दिसून येते.

लोकसभा निवडणुका : प्राप्तिकर खात्याकडून ११०० कोटींचे दागिने, रोकड जप्त

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाल्यावर प्राप्तिकर खात्याने देशाच्या विविध भागांमध्ये ११०० कोटी रुपयांचे दागिने, रोकड जप्त केली. निवडणुकीच्या काळात पैशांचा वापर करून मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी काही राजकीय पक्ष किंवा त्यांचे नेते पैसे, दागिने आदींची उधळण मतदारांवर करत असतात.त्यास पायबंद घालण्याच्या हेतूने प्राप्तिकर खात्याकडून विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यामध्ये ही संपत्ती जप्त करण्यात आली. आदर्श आचारसंहिता १६ मार्च रोजी जारी झाली. ती जारी झाल्यापासून दि. २० मे या कालावधीत प्राप्तिकर खात्याने हे पैसे आणि दागिने जप्त केले होते. सर्वात जास्त रोकड व दागिने दिल्ली,कर्नाटकमधून जप्त करण्यात आली. त्यानंतर तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगण, ओडिशा या राज्यांचा क्रम लागतो. निवडणुकीच्या काळात पैसे, दारू अन्य मोफत वस्तू, दागिने आदींचे वाटप होणार नाही, यावर कडक लक्ष ठेवण्याचे आदेश शासकीय यंत्रणांना देण्यात आले होते. त्यानुसार एकट्या प्राप्तिकर खात्याकडून एवढी रक्कम जप्त करण्यात आली. २०१९च्या लोकसभा निवडणुकांचा विचार करता, अशी संपती जप्त होण्यामध्ये १८२ टक्के इतकी वाढ झाली आहे.


- दत्ता पंचवाघ