नरेंद्र मोदी यांचे युद्धनेतृत्व

    16-May-2025
Total Views |
नरेंद्र मोदी यांचे युद्धनेतृत्व

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचा पराक्रमी इतिहास पुनर्जागृत करणारे राजनेता ठरले आहेत. शांततेच्या काळात नेतृत्व करणार्‍या मोदींनी आपली गुणवत्ता सिद्ध केलेलीच आहे. त्याचवेळी युद्धजन्य परिस्थितीत नेतृत्व करण्याची शक्तीही त्यांनी प्रगट केली आहे.


'ऑपरेशन सिंदूर' समाप्त झाल्यानंतर दोन दिवसांनंतरच बुद्धजयंती होती आणि बुद्धजयंतीला एक संदेश न चुकता बहुतेक राजनेते देतात; ‘जगाला युद्ध नको, बुद्ध हवा!’ असा संदेश देणार्‍या राजनेत्याला भगवान बुद्ध किती समजले आणि युद्ध किती समजले? असा प्रश्न विचारण्याचे धाडस आपण करायचे नसते. कारण, राजनेता सर्वज्ञ असतो. परंतु, आपल्यासारखी अल्पज्ञ माणसे जेव्हा स्वतःशीच विचार करू लागतात, तेव्हा मानवी इतिहासाचे एक शाश्वत सत्य त्यांच्यापुढे येते. जगाचा इतिहास म्हणजे, युद्धांचा इतिहास आहे. भगवान गौतम बुद्ध हयात असताना युद्धे चालूच होती; ते गेल्यानंतरही युद्धे चालू आहेत आणि आता 21व्या शतकात दोन जबरदस्त युद्धे चालू आहेत. एक रशिया आणि युक्रेनचे आणि दुसरे इस्रायल आणि ‘हमास’चे.


भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’ हे पाकिस्तानविरुद्ध युद्ध नव्हते, तर दहशतवाद्यांविरुद्धची अत्यंत कडक कारवाई होती. पाकिस्तानी सैन्य आणि भारतीय सैन्य एकमेकांना येऊन भिडले नाही. काश्मीर सीमेवर थोडाबहुत गोळीबार झाला, त्याला ‘युद्ध’ म्हणता येत नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’ जरी झाले, तरी हे ऑपरेशन युद्धासारखेच होते. भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले केलेे, परंतु पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त करून टाकली. काही लष्करी विमानतळ नष्ट केले. पाकिस्तानची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन पाडले. या सर्व हकिकती आता आपल्या सर्वांना माहीत आहेत. त्याची माहिती न घेता पाकिस्तानशी वागताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या गुणांचा जगाला परिचय करून दिला, हे आपल्याला बघायचे आहे. यावेळी भारताने आणि जगाने नरेंद्र मोदी यांच्या युद्धनेतृत्वाचा चेहरा पाहिला. देशाचे नेतृत्व शांततेच्या काळात करणे, ही वेगळी गोष्ट आहे आणि देशाचे नेतृत्व युद्धकाळात आणि युद्धजन्य परिस्थितीच्या काळात करणे, ही गोष्ट वेगळी आहे. युद्धजन्य परिस्थितीच्या काळात नेतृत्व करणार्‍याकडे अतिशय वेगळ्या प्रकारची गुणवत्ता लागते. त्वरित निर्णय घेण्याची क्षमता लागते. युद्धजन्य परिस्थितीचे पूर्ण आकलन असावे लागते. आपल्या क्षमतांचे आणि शक्तिस्थानांचे यथार्थ मूल्यांकन असावे लागते. शत्रूच्या दुर्बळ स्थानांचा वेध घेण्याची क्षमता असावी लागते. युद्ध करणार्‍या सेनापतींना नेमके काय करायचे आहे, हे स्पष्टपणे सांगावे लागते. संघर्ष कुठपर्यंत न्यायचा आणि केव्हा थांबायचा, याची वेळ ठरवावी लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंगी असलेल्या या गुणशक्तीचा परिचय आपण सर्वांनी घेतलेला आहे.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचे ‘लीडर्स’ या शीर्षकाचे पुस्तक आहे. त्यात ते म्हणतात, “युद्धाचे आव्हान आपण सहजपणे मापू शकतो, अशी गुणवत्ता निर्माण करीत असते. शांततेच्या काळातील आव्हाने मोठी जरूर असू शकतात, परंतु नेता त्यांच्यावर जो विजय मिळवितो, तो नाट्यमयदेखील नसतो आणि दृश्यमयदेखील नसतो.” युद्धजन्य काळात शत्रूचे केलेले नुकसान सर्वजण बघू शकतात. शांततेच्या काळात विकासाची कामे फळरूप होण्यासाठी खूप वेळ लागतो. ते फळ लगेच चाखता येत नाही.


सुन त्जू या चिनी युद्धतज्ज्ञाचे ‘आर्ट ऑफ वॉर’ हे जगप्रसिद्ध पुस्तक आहे. त्यात सुन त्जू म्हणतो, ‘तुमच्या सर्व लढाया संघर्ष करून जिंकणे एवढे पुरेसे नाही आणि त्यात पराकोटीची पारंगततादेखील नाही, पराकोटीची पारंगतता शत्रूचा प्रतिकार संघर्ष न करताच मोडून काढण्यात असते. नरेंद्र मोदी यांनी सुन त्जू यांचे हे वचन पाकिस्तानच्या बाबतीत अमलात आणले. पाकिस्तानची हवाई हल्ला करण्याची सर्व शक्ती नरेंद्र मोदी आणि भारतीय सेनादलाने, हवाईदलाने नष्ट करून टाकली. पाकिस्तानचे आकाश भारतीय वायुदलासाठी आणि क्षेपणास्त्रांसाठी मुक्त झाले. पाकिस्तानचे राजनेते मग तो बिलावल असो अथवा इमरान खान असो किंवा शाहबाज शरीफ असो, मोठमोठ्याने भुंकत तर राहिले, परंतु त्यांचे भुंकणे दात पडलेल्या श्वानासारखे झाले.


आधुनिक युद्ध अवकाश, आकाश, जमीन, पाणी आणि पाण्याखालूनही लढले जाते. आकाशाची सुरक्षा ही किती महत्त्वाची असते, हे विन्स्टन चर्चिल यांच्या मुखातूनच ऐकण्यासारखे आहे. दुसर्‍या महायुद्धात जर्मन सेनेने काटेकोर परिपूर्ण योजना करून फ्रान्सच्या भूमीत प्रवेश केला. फ्रान्सला वाचविण्यासाठी 1940 साली फ्रान्सचे राजनेते, सेनापती आणि ब्रिटनचे राजनेते आणि सेनापती यांची दि. 12 जून 1940 रोजी बैठक झाली. या बैठकीत ब्रिटनने आपले सैन्य फ्रान्समध्ये उतरवावे, हवाईदल आणावे, असा विषय झाला आणि हाच निर्णायक क्षण आहे, असे म्हटले गेले. त्याला उत्तर देताना चर्चिल म्हणाला, “हा निर्णायक क्षण नव्हे आणि निर्णायक बिंदूदेखील नव्हे. हिटलरची विमाने जेव्हा लंडनवर बॉम्बवर्षाव करू लागतील, त्यावेळी निर्णायक क्षण येईल आणि त्यावेळी जर आपण आमच्या देशावरील आकाशावर नियंत्रण राखू शकलो, तर नंतरचे युद्ध आपण निश्चितपणे जिंकू.” लंडनवरील बॉम्बवर्षावाचा चित्रपट आहे; बहुधा त्याचे शीर्षक ‘बॅटल ऑफ ब्रिटन’ असे असावे. चर्चिलचे म्हणणे खरे झाले. 2025 म्हणजे 1940 नव्हे. आता विज्ञान आणि तंत्रज्ञान हे कुठच्या कुठे गेले आहे आणि त्या क्षेत्रात भारताने जागतिक महासत्तांशी बरोबरी करण्याची क्षमता प्राप्त केली आहे.


युद्धजन्य परिस्थितीमध्ये संघर्षाचा निर्णय करणार्‍या नेत्याला हा संघर्ष कशासाठी करायचा आहे, हे सुस्पष्ट करावे लागते आणि हे आवाहन भावनिक असावे लागते. वैचारिक आवाहनाचा फारसा उपयोग नसतो. 1984 साली अर्जेंटिनाने ब्रिटनच्या अधिपत्याखाली असणारी फॉकलंट बेटे आक्रमण करून आपल्या ताब्यात घेतली. ही बेटे दक्षिण अटलांटिक महासागरात, इंग्लंडपासून आठ हजार मैल दूर आहेत. आपल्या देशातील राजनेते मनमोहन, चिदंबरम ब्रिटनमध्ये असते, तर ते म्हणाले असते, “आठ हजार मैलांवर जाऊन कोण लढाई करेल? आणि ज्या बेटावर फक्त 1 हजार,800 लोक राहतात, तेथे लढाई करण्याचे काय कारण आहे? पण, ब्रिटनच्या पंतप्रधान होत्या मार्गारेट थॅचर; त्यांना ‘आयर्न लेडी ऑफ इंग्लंड’ असे म्हणतात. (ब्रिटनची लोहकन्या) त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक ‘गांधीभक्तांचा’ लढायला विरोध होता. काही युद्धतज्ज्ञांचा विरोध होता. तो सर्व विरोध त्यांनी गुंडाळून ठेवून फॉकलंड बेटे परत जिंकून घेण्यासाठी ब्रिटनची रॉयल नेव्ही पाठवली. कशासाठी? त्या म्हणाल्या, “हा आमच्या राष्ट्राच्या आत्मसन्मानाचा विषय आहे आणि त्याच्याशी तडजोड करता येणार नाही.” आत्मसन्मानाची किंमत पैशात मोजता येत नाही. युद्धात कितीजण मरतील, याचा विचार करून करता येत नाही. आत्मसन्मान हा आत्मसन्मान असतो.


पहलगाम येथे आमचे निर्दोष पुरुष मारले गेले. अनेक माता-भगिनींच्या कपाळावरील कुंकू पुसले गेले. हा राष्ट्राच्या आत्मसन्मानाचा विषय आहे. असे कुंकू असंख्य वेळा पुसले गेले आहे. त्या आत्मसन्मानाशी तडजोड करीत जगणं, भ्याडपणात जगणं, डरपोक जगणं आपला देश जगत राहिला. पण, नरेंद्र मोदींनी ठरवलं, असं जीवन जगायचं नाही. त्याचा सूड घ्यायचा. यापूर्वी त्यांनी तसा तो घेऊन दाखविला होता, पण ते ‘ट्रेलर’ होते. आताच्या सुडाची व्याप्ती खूप मोठी झाली. राष्ट्रीय सन्मानाचे रक्षण वाटेल ती किंमत देऊन केली जाईल, हे आता सर्वांच्या लक्षात आले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचा पराक्रमी इतिहास पुनर्जागृत करणारे राजनेता ठरले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा ते प्रामाणिकपणे जगत आहेत. मोघली तख्त सदाशिवराव पेशव्यांनी घाव घालून फोडले होते आणि दत्ताजी शिंदे यांना रणभूमीवर लाथ मारणार्‍या नजीब खानचे मुंडके छाटण्यात आले होते. हा पराक्रमाचा अगदी अलीकडचा इतिहास आहे. चापेकर बंधुंनी पुण्यात अत्याचार करणार्‍या रँडला गोळ्या घातल्या होत्या. अपमान सहन करायचा नसतो, अपमान करणार्‍याला त्याच्याच भाषेमध्ये अतिशय कडक उत्तर द्यावे लागते. शांततेच्या काळात नेतृत्व करणार्‍या मोदींनी आपली गुणवत्ता सिद्ध केलेलीच आहे. त्याचवेळी युद्धजन्य परिस्थितीत नेतृत्व करण्याची शक्तीही त्यांनी प्रगट केली आहे. चार दिवसांच्या या कार्यवाहीमुळे ते जागतिक स्तरावरील युद्धनेतृत्वाच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत, ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे.