भारतीय शैक्षणिक चिंतन

    20-May-2025
Total Views | 16
Indian ancient educationA

भारतीय विचार आणि पाश्चात्य विचार यांमध्ये प्रचंड तफावत आहे. भारतीय विचारांत व्यक्तीचा सर्वांकष विकास निहित असून, पाश्चात्य विचारांबाबत तसे म्हणता येत नाही. शिक्षणव्यवस्थादेखील या न्यायाला अपवाद नाही.त्यानिमित्ताने  भारतीय शिक्षण व्यवस्था आणि आधुनिक शिक्षण पद्धती यांचा घेतलेला तुलनात्मक आढावा...


गेले काही लेखांक आपण भारताची ऐतिहासिक काळातील वैज्ञानिक प्रगती आणि या विज्ञानातील प्रगतीच्या बरोबरीनेच विकसित होत गेलेला वैज्ञानिक दृष्टिकोन यांची चर्चा करीत आहोत. वैज्ञानिक संशोधन हा समाजाच्या अत्युच्च प्रतिभेचा आविष्कार असतो. परंतु, तो घडून येण्यासाठी समाजात सर्वसामान्यांच्या शिक्षणाची काही व्यवस्था आवश्यक असते. एका सुदृढ शिक्षणव्यवस्थेच्या पायावरच, उच्च संशोधनासारखे प्रगत विषय हाताळण्यास सक्षम व्यक्ती तयार होत असतात. वेदकाळापासून सिद्धांत कालखंडापर्यंत चालत आलेली ज्योतिष, आयुर्वेद, रसायनशास्त्र इत्यादींची परंपरा पाहिल्यास, त्याच्या पाठीशी भक्कम शिक्षणव्यवस्था उभी असणार हे स्पष्ट आहे. भारतातील शिक्षणव्यवस्थेचा आणि त्यासंबंधीच्या परंपरांचा मागोवा आपण यापुढील काही लेखांत पाहू.

भारतीय शिक्षणव्यवस्थेचा संबंध ज्याप्रकारे उच्च विद्यांच्या अभ्यासाशी आहे, तसाच तो पिढ्यानपिढ्या जोपासल्या गेलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाशीसुद्धा आहे. या भरतखंडात जी वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती गेल्या हजारो वर्षांच्या इतिहासातून निर्माण झाली आहे, त्या संस्कृतीचा ठेवा पुढील पिढ्यांकडे अक्षय्यपणे पोहोचवण्यात, भारतीय शैक्षणिक चिंतनाचा आणि त्यासंबंधीच्या व्यवस्थांचा मोठाच हातभार आहे. आपण या लेखमालेतून पाश्चात्य वसाहतीकरणाच्या धोरणाचा सांस्कृतिक प्रभाव आणि निर्वसाहतीकरण याची चर्चा करत असताना, या सर्व प्रक्रियांची मुख्य वाहकव्यवस्था म्हणजे शिक्षणव्यवस्था, तिचा सर्वांगीण विचार आवश्यक आहे. अनेक विचारवंतांनी आपल्या वैचारिक गुलामगिरीचे प्रमुख कारण शिक्षणव्यवस्थेचे परकीयकरण असल्याचे म्हटले आहे. मात्र, भारताच्या वैचारिक चिंतनाशी सुसंगत अशी शैक्षणिक व्यवस्था उभी करायची असेल, तर सर्वप्रथम भारतात शिक्षणविषयक काय विचार मांडला गेला? त्याची तोंडओळख करून घेणे आवश्यक आहे.

भारतातील सर्व सामाजिक क्षेत्रांच्या रचनेप्रमाणेच शिक्षणव्यवस्थेच्या रचनेचा पाया हा, धर्म आणि अध्यात्म हाच आहे. भारतीय समाज हा व्यक्तीचे सर्वोच्च उन्नयन, प्रत्येक व्यक्तीस आत्मतत्त्वाची अनुभूती आणि त्याद्वारे परमेश्वर तत्त्वाचे यथार्थ ज्ञान हे परम ध्येय मानत असल्याने, स्वाभाविकपणे या आत्मज्ञानाची प्राप्ती हे भारतीय चिंतनानुसार शिक्षणाचे परमोच्च ध्येय आहे. संपूर्ण व्यवस्थेची रचना ही प्रत्येक व्यक्तीस तिच्या क्षमतेप्रमाणे या ध्येयाच्या अधिकाधिक जवळ कसे जाता येईल, या उद्देशाने स्वाभाविकपणे बनवली गेली असावी. साहजिकच भारतीय शिक्षणव्यवस्था ही व्यक्तिकेंद्रित आहे. प्रत्येक व्यक्तीच्या क्षमता आणि आवश्यकता यांची सांगड घालत योग्य तो अभ्यासक्रम निश्चित करून आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण आविष्कार करण्याचा प्रयास या व्यवस्थेत अपेक्षित होता. या प्रकारच्या शिक्षणपद्धतीची व्यवस्थात्मक रचना असावी, यासाठीच भारतात गुरुकुल शिक्षणव्यवस्था निर्माण झाली. बहुतेक गुरुकुले ही एकांड्या शिक्षकांनी त्यांच्या घरी चालवलेली निवासी पद्धतीची विद्यालये होती, ज्यात सर्व विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण मिळण्याची सोय असे. गुरूच्या कीर्तीवर गुरुकुलाची कीर्ती होती. शिक्षणाचे प्रमाणीकरण नसल्याने ‘शाळा’ आणि त्यातील वर्ग आणि तुकड्या अशी व्यवस्था नव्हती. परंतु, प्रमाणीकरण नव्हते म्हणजे प्रमाण अभ्यासक्रमही नव्हता, सर्व गुरूंना आपापल्या पद्धतींनी वाटेल तो विषय शिकवण्याची मुभा होती, अशी अनागोंदीची कल्पना कोणी केल्यास ते वास्तवाच्या अगदी विरुद्ध जाईल. भारतीय शिक्षणव्यवस्थेच्या संकल्पनेत काही साधारण अभ्यासक्रमाची निश्चिती करून, स्नातकाच्या आकलन क्षमतेनुसार त्यास त्या अभ्यासक्रमाच्या एकेक टप्प्यामधून पुढे नेण्यात येत असे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार प्राथमिक अभ्यास पूर्ण झाल्यावर, त्यास विशेष विषयांचे शिक्षण गुरू देत असे. शिक्षण हे गुरुगृही राहूनच होत असल्याने, गुरूच्या विषयी प्रगाढ असे स्नेहसंबंध निर्माण होत असत आणि गुरूही त्याच्या शिष्यांना पुत्रवत मानूनच विद्या देत असे. किंबहुना अनेक शास्त्रे ही गुरूने शिष्याला शिकवणे हा त्याचा धर्मच असल्याचे आणि शिष्यास विद्या नाकारणे हे पापाचरण असल्याचे प्रतिपादन करतात. गुरुदक्षिणा हा जरी गुरूचा अधिकार असला, तरी शिक्षण पूर्ण झाल्यावरच ती मागता येत असे आणि गुरुदक्षिणा किती असावी, याविषयी काही विशिष्ट नियम नव्हता. मात्र, शिक्षण सुरू करण्यापूर्वीच दक्षिणा ठरवून घेणे हे निषिद्ध होते. आजच्या प्रवेशाच्या वेळेसच संपूर्ण शुल्क भरण्याच्या पद्धतीशी, ही भारतीय दक्षिणा पद्धती पूर्ण विसंगत आहे.


गुरुगृही राहून शिक्षण संपादन करण्याची भारतीय परंपरा, गुरूशिष्य नात्यास एक विशिष्ट स्थान देते. उपनयन संस्कार झाल्यानंतर ब्रह्मचारी व्रताची दीक्षा घेऊन, गुरूच्या आज्ञेनुसार विद्यार्थीदशेतील काळ व्यतीत करावा हा शिष्याचा धर्म होता. या काळात शिष्याकडून कठोर अशा व्रतस्थ जीवनाची अपेक्षा असे. हिंदू संस्कृतीत शिक्षण म्हणजे केवळ विविध विषयांची माहिती संकलित करून ती स्मरणात ठेवणे असा संकुचित विचार नव्हता, तर आयुष्याच्या पुढील टप्प्यावर गृहस्थाश्रमाचा स्वीकार केल्यानंतर, समाजजीवनात आवश्यक असणार्‍या विविध कौशल्यांच्या प्राप्तीची, तसेच सांस्कृतिक जीवनात आवश्यक मूल्यांच्या प्राप्तीची साधना करणेही शिक्षणात अंतर्भूत होते. गृहस्थाश्रमी व्यक्ती स्वतःच्या आचरणाने केवळ तत्कालीन सामाजिक गतिविधींचा भाग होत नसतो, तर समाजाच्या सांस्कृतिक संचिताची जपणूक करणे आणि पुढील पिढ्यांना हा वारसा संक्रमित करणेही त्याची जबाबदारी असते. या जबाबदारीचे वहन समर्थपणे करण्यासाठी केवळ उपजीविकेच्या विषयांचे नव्हे, तर त्यासंबंधीच्या तत्त्वविचाराचे आणि मूल्यप्रणालीचे शिक्षणही आवश्यक आहे. यासाठीच स्नातकांनी आचरण्याचा दिनक्रम, परिधान करण्याची वस्त्रे, अभ्यासाव्यतिरिक्त काळात पाळायचे यमनियम अतिशय कठोर असे होते. विद्यार्थ्यांना श्रमप्रतिष्ठा आणि सामूहिक परिश्रमांचे महत्त्व यामुळे स्वाभाविकपणे लक्षात येत असे. गुरुगृही केवळ अभ्यासच नसे, तर घरातले एक सदस्य होऊन राहताना घरच्या कामांमध्येही मदत करणे अपेक्षित होते. हे सर्व करत असताना शिक्षणाचा जो मूळ उद्देश म्हणजे आत्मतत्त्वाची ओळख, तोही ध्यानात घेऊन स्नातकाचे लक्ष ऐहिक विषयवस्तूंकडून दूर कसे राहील, याचा विचार केला जात असे. ब्रह्मचर्याश्रमात प्रवेश करून शिक्षण प्रारंभ केल्यानंतर, भिक्षा मागण्याचा प्रघात या विचारातूनच सुरू झाला असेल.


या गुरुकुलांमध्ये प्रत्यक्ष शिक्षणपद्धती नेमकी कशी होती, त्यांचा अभ्यासक्रम काय होता, प्रवेशपद्धती किंवा परीक्षपद्धती कशी होती या सर्वांचा सखोल अभ्यास जर आपणास या ज्ञानाच्या आधारे शिक्षणात आज काही नवीन प्रयोग करायचे असतील, तर आवश्यक आहेच. मात्र, त्याआधी भारतीय शिक्षणपद्धतीच्या मुळाशी ज्या तत्त्वज्ञानात्मक संकल्पना होत्या त्यांचा परिचय आपणास असणे आवश्यक आहे. कुठल्याही नवीन प्रयोगांचा आधार हा संकल्पनात्मक पाया हाच असू शकतो. योगशास्त्रात ज्ञानप्राप्तीसाठी तीन टप्पे सांगितले जातात श्रवण, मनन आणि निदिध्यासन. भारतीय शिक्षणसंकल्पनेच्या मुळाशीही हेच तीन टप्पे आहेत. गुरूमुखातून ज्ञानविषयाचे श्रवण करायचे, दिलेल्या पाठाचे मनन करून तो पाठ आत्मसात करायचा आणि हा एक पाठ किंवा विषयच केवळ नाही, तर सर्व विषयांच्या संदर्भात या पाठाचे आकलन करून, घेऊन विविध विषयांच्या मागील एकत्व जाणून घ्यायचे आणि व्यवहारात आचरायचे. भारतीय शिक्षणविचारात कोणत्याही विषयाचे मूळ स्वरूप केवळ ग्रंथांच्या अध्ययनातून प्राप्त होत नाही, असे मानले गेले. जितके महत्त्व सैद्धांतिक शिक्षणाला होते, त्याहून अधिक प्रत्यक्ष अनुभूतीला होते.
आज प्रचलित शिक्षणव्यवस्था ही शिक्षककेंद्रित नसून, शाळाकेंद्रित झाली आहे. त्याहीपुढे जाऊन खरी निर्णयाची सत्ता ही शाळेकडेही नसून, शिक्षणबोर्डाकडे आहे. या व्यवस्थेत गुरूला काही महत्त्वाचे स्थान उरले नसून, केवळ दिलेला विषय शिकवणारा पगारी नोकर इतकेच त्याचे महत्त्व राहिलेले आहे. गुरू हा भविष्यातील पिढी घडवणारा आणि समाजाच्या सांस्कृतिक चलनवलनातील महत्त्वाचा असा घटक राहिलेला नसून, अनेक अन्य व्यवसाय करून उपजीविका करणार्‍या लोकांसारखाच एक सामान्य समाजघटक झाला आहे. ही परिस्थिती आपल्या हिंदू जीवनपद्धतीशी मेळ खाणारी आहे का? याचा विचार संपूर्ण समाजाच्या पातळीवर होणे आज आवश्यक आहे. जवळपास दोन शतकांच्या वैचारिक गुलामगिरीतून आलेल्या ठोकळेबाज शिक्षणपद्धतीत तयार झालेला शिक्षकवर्ग प्राचीन, विकेंद्रित, अधिक अपेक्षा करणार्‍या, पण अधिक सन्मानही देणार्‍या अशा भारतीय शिक्षणपद्धतीस आत्मसात करण्यास तयार आहे का? हाही विचार कोणत्याही धोरणात्मक बदलापूर्वी आवश्यक आहे. अनेक दशके पाश्चात्य प्रभावातून निर्माण झालेली कारखान्यांशी साधर्म्य सांगणारी शिक्षणव्यवस्था, समाजातील प्रत्येक व्यक्तीस तिच्या अंगभूत अभिव्यक्तीस वाव देऊन सर्वांगीण विकास साधणारी नाही हे स्पष्ट आहे. पण, या चाकोरीबद्ध व्यवस्थेतून आपल्याला संपूर्ण समाजास पुढे नेण्यासाठीची मूल्ये प्राप्त होत आहेत का, किंबहुना तो तिचा उद्देश तरी आहे का, असे मूलभूत प्रश्न विचारणे आवश्यक तर आहेच; पण त्याची उत्तरे शोधण्यासाठी प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्थेचा तिची बलस्थाने आणि आजच्या काळाच्या सापेक्ष कमकुवत दुवे दोन्ही लक्षात घेऊन साकल्याने अभ्यास करण्याचीही आवश्यकता आहे.
(लेखकाने मुंबईतील ‘टीआयएफआर’ येथून खगोलशास्त्रात ‘पीएच.डी’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून, ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.)


डॉ. हर्षल भडकमकर
9769923973
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121