युरोपने सगळ्या जगावर राज्य केले. जग पादाक्रांत करण्याच्या शर्यतीत युरोपातील अनेक देशांनी गुलाम देशांतील लोकांचा निरवंश केला व तिथे कामासाठी दुसर्या गुलाम देशांतील लोक आणून वसवले. त्यामुळे साहजिकच त्या गुलाम देशांची संस्कृती आणि अर्थव्यव्स्थाच बिघडली. क्यूबा हा देश त्याचे उत्तम उदाहरण ठरावे. त्यानिमित्ताने या देशाच्या प्रवासाचा घेतलेला आढावा...
कॅरेबियन बेटे म्हटल्यावर आपल्याला लगेच वेस्ट इंडिज आणि त्यांचे क्रिकेट आठवते. जमैका, किंगस्टन, त्रिनिदाद वगैरे नावे आठवतात पण, क्यूबा काही आपल्याला आठवत नाही. कारण, तो क्रिकेट खेळत नाही.
याची कारणे ऐतिहासिक आहेत. "पृथ्वी गोल आहे नि त्यामुळे पूर्वेकडे जाण्याऐवजी आपण सतत पश्चिमेकडे जात राहिलो, तर अखेरीस भारतात पोहोचणारच,” असा सिद्धांत ख्रिस्तोफर कोलंबसने मांडला. त्यानुसार तो सन १४९२ मध्ये युरोपमधून पश्चिम दिशेचा रोख धरून निघाला. अटलांटिक महासागर पार केल्यावर त्याला जी भूमी दिसली, ती म्हणजेच आजचा क्यूबा देश. त्यावेळी कोलंबसाला तो ‘इंडिया’ वाटला होता. नंतर चूक कळून आली आणि क्यूबासह आसपासच्या सगळ्याच बेटांना नाव देण्यात आले, ‘वेस्ट इंडिज’ म्हणजे पश्चिमेकडचा भारत.
सन १५११ साली ख्रिस्तोफर कोलंबसचा मुलगा डायगो कोलंबस याने, क्यूबामध्ये वसाहत करायचे ठरवले. सर्व युरोपीय देशांमध्ये स्पेन हा कडवा कॅथालिक देश आणि स्पॅनिश हे वृत्तीने अतिशय क्रूर लोक. डायगो कोलंबसने क्यूबामध्ये वसाहत केली म्हणजे तोपर्यंत तो देश ओसाड होता, असे नव्हे. उलट ती भूमी अत्यंत सुपीक आणि निसर्गसुंदर होती. म्हणून तर डायगो कोलंबसाने बंदुकीच्या बळावर ती ताब्यात घेतली. तिथे स्पेनचा झेंडा फडकवला आणि स्थानिक लोकांना गुलाम बनवले. यातून स्थानिक लोकांशी संघर्ष उद्भवला. स्पॅनिशांनी स्थानिक लोकांची इतकी बेसुमार कत्तल केली की, त्यांचा वंशच संपला. आजही क्यूबामध्ये मूळ स्थानिक वंशाचे लोक जवळपास नाहीतच. हे महान कृत्य करत असतानाच, प्रथम स्पॅनिशांनी १५१४ साली सँटिअॅगो व १५१९ साली हॅवाना ही शहरे वसवली. हॅवाना हीच आज क्यूबाची राजधानी आहे. सुमारे एक हजार, ६०० लहानमोठ्या बेटांचा बनलेला हा देश अतिशय मोक्याच्या जागी आहे. त्याचे तोंड मेक्सिकोच्या आखातात आहे नि शेपूट कॅरेबियन समुद्रात आहे. अमेरिका आणि मेक्सिको यांच्यापासून तो अगदी नजीक आहे.
स्पेनने तिथे वसाहत उभारली; पण त्या सुपीक जमिनीवर राबायचे कुणी? स्थानिक लोक तर मारून संपवून टाकले. चिंता कशाला? स्पेनच्या कॅथलिक साम्राज्याची काळजी घ्यायला आकाशातला बाप आहेच की! चला, आफ्रिकेत चला. तिथले काळे लोक अतिशय गरीब, पण मोठे कष्टाळू, कामसू आहेत. फुकट राबायला त्यांच्यासारखे उत्तम लोक सापडायचे नाहीत.
झाले! स्पॅनिश जहाजे आफ्रिकेच्या पश्चिम किनार्यावर जाऊन थडकू लागली. गलबते भरभरून काळे लोक; कधी बंदुकीच्या धाकाने, कधी आर्थिक प्रलोभनाने क्यूबात आणि कॅरेबियन बेटांमधल्या इतरही स्पॅनिश वसाहतींमध्ये आणले जाऊ लागले. त्यांच्या श्रमांवर वसाहतींमध्ये मळे पिकू लागले नि स्पेन समृद्ध होऊ लागला.
मग युरोपातल्या इतर देशांनी का मागे राहावे? ते ही धडाडीने उद्योगाला लागले. अमेरिका खंडातले नवेनवे भूप्रदेश शोधून काढू लागले. तिथल्या स्थानिकांची कत्तल उडवू लागले किंवा त्यांना बाटवू लागले. नंतर या सुपीक प्रदेशाच्या स्वामित्त्वासाठी त्यांच्यात आपसातच मारामार्या सुरू झाल्या. स्पेन, ब्रिटन, फ्रान्स, हॉलंड, पोर्तुगाल ही सगळी राष्ट्रे या कत्तलबाज साम्राज्यविस्तारात अहमहमिकेने भाग घेत होती. क्यूबा या सर्व सत्तांनी केव्हाना केव्हा जिंकला पण, शेवटी तो स्पेनकडेच राहिला. म्हणून तिथे क्रिकेट खेळले जात नाही. वेस्ट इंडिज द्वीवसमूहामध्ये जिथे जिथे स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स, हॉलंड यांची सत्ता होती, तिथे क्रिकेट नाही. कारण, या देशांमध्ये मुळात तो खेळ नाही. फक्त ब्रिटिश युनियन जॅकखाली असलेल्या बेटांवरच क्रिकेट खेळला जातो.
सन १८८९ साली क्यूबा स्पेनपासून स्वतंत्र झाला. पण, म्हणजे तिथे स्थानिक लोकांची सत्ता आली, असे नव्हे. कारण, स्थानिक लोक शिल्लकच नव्हते. मूळचे स्पॅनिश किंवा असेच वेगवेगळ्या युरोपीय देशांमधून आलेले लोक क्यूबामध्ये गेली ३००-३५० वर्षे राहत होते. त्यांना आता स्पेनची सत्ता सहन होईना. त्यांनी स्पॅनिश प्रभुत्व झुगारून दिले आणि स्वतंत्र क्यूबन प्रजासत्ताक स्थापन केले.
किती नवलाची आणि अभ्यसनीय गोष्ट आहे पाहा! मूळचे स्पॅनिशच; पण तीन-साडेतीन शतके कयूबात राहिल्यावर त्यांना स्पेनचे वर्चस्व सहन होईना. अमेरिकन लोक मूळचे ब्रिटिशच; पण दीड-दोनशे वर्षांतच त्यांना ब्रिटनचे वर्चस्व सहन होईनासे झाले. त्यांनी चक्क युद्ध पुकारले आणि आपले स्वतंत्र राष्ट्र स्थापन केले. म्हणजे मूळ देशापासून शतकभरापेक्षा काही काळ वेगळ्या भूमीत राहिल्यावर, त्या लोकांच्या मनात वेगळी अस्मिता निर्माण झाली. त्या अस्मितेतून त्यांनी नवे राष्ट्र निर्माण केले. आम्ही ब्रिटिशांचे वर्चस्व झुगारून दिले. मुळात ते आणि आम्ही वेगळेच होतो. त्यांना हाकून दिल्यावर आमचे राज्य निर्माण झाले पण, राष्ट्र काही अजून निर्माण होत नाहीये. कारण, अस्मिताच नाही; आम्ही मनाने, विचाराने, चिंतनाने ब्रिटिशच आहोत. काळे ब्रिटिश!
आधुनिक काळात आणि विशेषतः दुसर्या महायुद्धानंतर क्यूबाचे सामरिक महत्त्व अतोनात वाढले. कारण, जागतिक राजकारणातले ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी यांचे प्रभुत्व संपले. अमेरिका आणि सोव्हिएत रशिया हे दोन बलाढ्य देश महासत्ता म्हणून उदयाला आले. त्यांच्यात जीवघेणे शीतयुद्घ सुरू झाले. सोव्हिएत रशिया साम्यवादी तत्त्वज्ञान जगभर पसरवून, विविध देशांना आपल्या पंखाखाली आणण्याचा प्रयत्न करू लागला. या कार्यक्रमाला ‘क्रांतीची निर्यात’ असे गोंडस नाव देण्यात आले. अमेरिकेला शह देण्यासाठी ही क्रांतीची निर्यात दक्षिण अमेरिका, मध्य अमेरिका इथल्या देशांमध्ये करण्याचा रशियाचा विशेष प्रयत्न होता. कारण, हे देश गरीब होते.
१९५२ साली क्यूबामध्ये फिडेल कॅस्ट्रो या तरुणाने बंड केले. अर्नेस्टो उर्फ चे गव्हेरा हा अर्जेंटाईन क्रांतिकारक तरुण त्याला येऊन मिळाला. पण, या दोघांना सपाटून मार खावा लागला. परंतु, त्यामुळे खचून न जाता कॅस्ट्रोने गनिमी काव्याने युद्ध चालूच ठेवले. अखेर १९५९ साली त्याला सत्ता संपादन करण्यात यश मिळाले. १९६१ साली त्याने क्यूबाला साम्यवादी देश म्हणून घोषित केले. सोव्हिएत रशियासाठी हा एक फार मोठा विजय होता नि अमेरिकेला हा फार मोठा धक्का होता. कारण, १९६१ साली अमेरिका वैभवाच्या ऐन शिखरावर होती. अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतापासून जेमतेम १०० किमी अंतरावर असणारा म्हणजेच अक्षरशः अमेरिकेच्या अंगणातला क्यूबा, रशियन अस्वलाच्या ताब्यात गेला होता.
यावरून पुढे भरपूर बोंबाबोब झाली. १९६३ साली रशियाने क्यूबात क्षेपणास्त्रे आणून ठेवणार्या मुद्द्यावरून, तिसरे महायुद्घ पेटण्याची शक्यता निर्माण झाली होती पण, ती वेळ निभावून गेली. सोव्हिएत रशियाच्या बलाढ्य पाठिंब्यावर फिडेल कॅस्ट्रो टिच्चून सत्ता गाजवत राहिला.
१९८५ साली सोव्हिएत रशियात मिखाईल गोर्बाचेव्ह सत्तेवर आले. त्यांनी क्रमशः सोव्हिएत साम्राज्याचे विसर्जन चालू केले. त्यामुळे सोव्हिएत मांडलिक सत्ताधार्यांची पंचाईत झाली. पोलंडचे कर्नल जारूझेल्स्की पदच्युत झाले. रुमेनियाचा निकोलाय चिसेस्कू लोकांच्या हातून ठारच झाला. फिडेल कॅस्टो या सर्व पडझडीतही टिकून राहिला.
क्यूबाची आर्थिक स्थिती मात्र बिघडली. वास्तविक क्यूबा हा जगातला साखरेचा सर्वांत मोठा उत्पादक आहे. त्या खालोखाल तिथला तंबाखूही उत्तम दर्जाचा असतो. पण, वर्षानुवर्षे रशियावर अवलंबून राहिल्यामुळे ती कुबडी निघाल्यावर क्यूबन अर्थव्यवस्था कोलमडली.
याचा सर्वांत जास्त फटका जाणवतो आहे तो रशियन महिलांना. एखाद्या देशातल्या पुरुषांना आपल्या अंकित ठेवायचे असेल, तर त्यांना रशियन महिलांच्या प्रेमात पाडायचे, या सोव्हिएत राजकीय धोरणामुळे म्हणा किंवा क्यूबन पुरुषांच्या खरोखर प्रेमात पडून म्हणा, असंख्य रशियन स्त्रिया क्यूबाच्या सासुरवाशिणी बनलेल्या आहेत. आज त्यांचा आपल्या माहेराशी काहीही संबंध उरलेला नाही. क्यूबाच्या कोसळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे त्यांना आता रशियाचा विमानप्रवास परवडत नाही. रशियन वृत्तपत्रे, मासिके मिळणे केव्हाच बंद झाले आहे. इंटरनेट सेवा चांगली नाही आणि ती परवडत नाही. क्यूबा हा भारतासारखाच समुद्री हवामानाचा देश आहे. तिथे सारखा घाम गळत असतो. थंड हवामानातून आलेल्या रशियन स्त्रियांना आतापर्यंत एसीमध्ये राहता येत होते. आता एसीदेखील परवडेनासा झाला आहे. एका स्त्रीची कहाणी तर गंमतीदारच आहे. रशियात आलेल्या एका क्यूबन वैमानिकाच्या प्रेमात पडून, ती लग्न करून क्यूबात आली. आता तो वैमानिक अमेरिकेत पळून गेला. तिकडे त्याने राजकीय आश्रय घेऊन, नवीन अमेरिकन बायको पटकावली. इकडे ही बाई क्यूबात अडकून पडली आहे. रशियात परतायला तिच्यापाशी पैसा नाही आणि हॅवानामधली रशियन वकिलात तिला काहीही मदत करत नाही, अशा अनेकींच्या अनेक कथा आहेत.