जैनांचे इराणी कनेक्शन...

    29-Jun-2025
Total Views |

इराण-इस्रायल संघर्षाचे दुष्परिणाम त्या-त्या देशातील खेळाडूंनाही सहन करावे लागले. या दोन्ही देशांमध्ये खेळांविषयी विशेष प्रेम दिसते. इराणमधील धार्मिक अटींना सांभाळूनही तेथील महिला खेळांमध्ये चमकदार कामगिरी बजावतात. त्यांना कबड्डी शिकवून, सुवर्णपदकाचे मानकरी करणार्या शैलजा जैन यांच्या तेहरानमधील अनुभवांचा घेतलेला आढावा...

युद्ध म्हटल्यावर त्याचा फटका क्रीडाविश्वाला बसतोच. कोणकोणत्या युद्धांचे कोणाला आणि कसे कसे फटके बसले आहेत, हा लेखाचा स्वतंत्र विषय ठरू शकेल. या लेखात आपण आताच्या घटनेचा विचार करू. काही जणांना शांतता असतानाचा तो देश आठवतो, तर काहीजण युद्धजन्य स्थितीला नाहक बळी पडतात. हा प्रकार युद्धातील दोन्ही पक्षांनाही लागू पडतो.

तायक्वांदो क्रीडाप्रकारातील इराणी खेळाडू आजच्या युद्धजन्य स्थितीला नाहक बळी पडले. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, ‘इराणी तायक्वांदो फेडरेशन’शी संबंधित अनेक व्यक्ती, ज्यामध्ये एक तरुण खेळाडू आणि राष्ट्रीय संघाचा ‘इमाम’ यांचा समावेश आहे. यावर जागतिक तायक्वांदो समुदायाकडून प्रतिक्रिया उमटली आहे. तायक्वांदो महासंघाने, १२ वर्षांचा तायक्वांदो ज्युनियर राष्ट्रीय संघातील खेळाडू अमीर अली अमिनी याच्या शहीद होण्याला दुजोरा दिला आहे. अहवालात त्याच्या वडिलांचे निधन झाल्याचेही त्यांनी सूचित केले. याव्यतिरिक्त, ‘तायक्वांदो फेडरेशन’चे ‘इमाम’ (धार्मिक नेते) म्हणून काम करणारे, होजातोलेस्लाम अहमदपौर यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.

इराण- इस्रायल संघर्षाचा दुसर्या देशातील क्रीडाजगतावरही खोल परिणाम झाला. दोन्ही देशात आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आली असून, हवाई प्रवासावर निर्बंध आले आहेत. यामुळे हंगेरीच्या बुडापेस्ट येथे होणार्या ‘ज्युडो वर्ल्ड चॅम्पियनशिप’मध्ये देशातील ज्युडोकाचा सहभाग कठीण झाला आहे. इस्रायली ज्युडो शिष्टमंडळाचा फक्त एकच भाग, स्पर्धेसाठी हंगेरीच्या राजधानीत जाऊ शकला. काही स्पर्धक अजिंक्यपद स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पोहोचले असले, तरी आठवड्याच्या उत्तरार्धात स्पर्धेतील इतर प्रमुख खेळाडू इस्रायल सोडू शकले नाहीत. इस्रायलने बुडापेस्टमध्ये नऊ सदस्यांचा संघ पाठवण्याची योजना आखली होती. हे सर्व खेळाडू सुरुवातीच्या टप्प्यातच स्पर्धेतून बाहेर पडल्याने, त्यांच्या पदकाच्या आशा मावळल्या. मात्र, सध्याच्या प्रवास निर्बंधांमुळे ते आता मायदेशी परतू शकत नाहीत.

या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जर्मनी, झेक प्रजासत्ताक, हंगेरी, रोमानिया आणि पोर्तुगालसह अनेक युरोपीय देशांनी तात्पुरती मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. या युरोपातील राष्ट्रांनी अडकलेल्या शिष्टमंडळांना आसरा देण्यची तयारी दर्शविली आहे. तसे झाल्यास त्या खेळाडूंच्या प्रशिक्षण आणि दिनचयत व्यत्यय येणार नाही.

जागतिक अजिंयपद स्पर्धेत त्यांच्या अनुपस्थितीचा अर्थ असा आहे की, ते स्वतःसाठी आणि त्यांच्या व्यावसायिक संघांसाठीची असलेली संभाव्य पदके आणि आर्थिक बक्षिसे गमावतील. महत्त्वाचे म्हणजे, स्पर्धेत सहभागी न झाल्यामुळे त्यांच्या रँकिंग पॉईंट्सदेखील घसरण होणार आहे. यामुळे त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत घसरण होऊ शकते. त्यामुळे कठीण ड्रॉ होऊ शकतात आणि भविष्यातील स्पर्धांमध्ये जोखीम वाढू शकते. गेले काही दिवसांपासून सर्व इराणी विमानतळांवरील उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. फुटबॉल लबचा इंटर मिलानचा फॉरवर्ड मेहदी तारेमी तेहरानमध्ये अडकल्यामुळे तो अमेरिकेत होणार्या ‘लब वर्ल्ड कप’मध्ये, त्याच्या सहकार्यांसह सामील होऊ शकणार नाही. ‘आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशन’ अर्थात ’एएफसी’ने सांगितले की, जॉर्डनची राजधानी अम्मान येथे दि. २३ जून ते दि. ५ जुलै रोजीदरम्यान होणार्या पात्रता गट अ मधील सामने, कतारमध्ये हलवण्यात आले आहेत. हे सामने आता दि. ७ ते दि. १९ जुलै रोजीदरम्यान होतील.

इराण- इस्रायलच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने दि. १८ जून रोजी ‘ऑपरेशन सिंधू’ सुरू केले. केंद्र सरकारने या ‘ऑपरेशन सिंधू’अंतर्गत इराणमधून अनेक भारतीयांना, मायदेशी सुखरूप परत आणले. दि. २४ जून रोजी ते वृत्त ऐकले आणि मला तत्काळ आठवण झाली ती नागपूर-नाशिक व्हाया तेहरान अशा एका व्यक्तीची, अर्थातच ज्येष्ठ कबड्डीपटू असलेल्या शैलजा जैनेंद्र जैन यांची. मी तत्काळ त्यांच्याशी संपर्क साधून, त्यांची ख्यालीखुशाली घेऊन आम्ही त्यांच्या इराण भेटीच्या आठवणी ताज्या केल्या. काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध भारतीय कबड्डी प्रशिक्षक शैलजा जैन, इराणच्या महिला कबड्डी संघाला प्रशिक्षण देण्यासाठी तेहरानला दीर्घकाळासाठी गेल्या होत्या. तेथून दोन वर्षांनंतर जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत इराणी मुलींनी सुवर्णपदक जिंकले.

शैलजा जैन यांच्या इराणी राजधानीच्या अत्यंत आनंददायी आठवणी आहेत. एका क्रीडा पत्रिकेला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या सांगत होत्या की, "त्यांच्या धार्मिक प्रथेमुळे इराणी महिला खेळाडू पश्चिमेकडील किंवा भारतातील खेळाडूं इतया परदेशी जा-ये करत नसतील. मला तेहरान हे एक उच्च दर्जाचे आधुनिक शहर वाटले.” जैन यांना आठवते की, "सुरुवातीला खेळाडू आणि माझ्यामध्ये भाषेचा अडसर होता. संघातील मुलींना फारसे इंग्रजी समजत नसे आणि मला फारसी. संघासोबत संवाद साधण्यासाठी मला दुभाषी महिला उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, संघातील मुलींसोबत स्वतःला जोडून घेण्याच्या दृष्टीने, ही गोष्ट मला अपुरी वाटली. अखेर मी फारसी भाषा शिकण्याचे ठरवले आणि मुलींना कामचलाऊ इंग्रजी शिकविले. त्यामुळे आमच्यात एक नाते निर्माण झाले. मी त्यांची भाषा शिकल्यामुळे, माझ्यावरचा त्यांचा विश्वास दृढ झाला आणि त्यामुळेच मला निकालही चांगला मिळाला.”

जैन सांगतात की, "मी ऑटोबर २०१६ साली तेहरानला गेले होते आणि सप्टेंबर २०२३ सालापर्यंत त्यांची प्रशिक्षक म्हणून तेथेच मुक्कामी होते. मी अजूनही त्या मुलींच्या संपर्कात आहे. आम्ही कधीकधी बोलतोही किंवा नोट्सची देवाणघेवाणही करतो. सध्या असलेल्या लष्करी कारवाईच्या काळात निर्बंध असल्याने, आमचा संपर्क होऊ शकला नाही.”

इराण मुक्कामी असताना स्वतःच्या आहाराबद्दल जैन सांगतात की, "मी शाकाहारी आहे. मात्र, तेथील लोकांना शाकाहार काय असतो, तेच ठाऊक नव्हते. त्यामुळे ‘इराणी कबड्डी संघटने’ने मला शाकाहार मिळत राहावा म्हणून वेगळे गॅस कनेशन, राईस कुकर आणि स्वतंत्र स्वयंपाकी माझ्या दिमतीला देऊ केला होता.”

तेथील पोशाखासंदर्भात त्या सांगत होत्या की, "हाताचे पंजे आणि डोयावरील केस वगळता उर्वरित चेहरा हे सोडून, स्त्रीचे संपूर्ण शरीर झाकणारा पोशाख वापरण्याचा कठोर नियम इराणमध्ये आहे. इराणी खेळाडूंसाठीही हाच पोशाख असतो. मात्र, मैदानावर प्रतिस्पर्धी संघांचा पोशाख हा अडसर ठरू नये, यासाठी मी एक मार्ग शोधला. सरावादरम्यान, मी मुलींचे दोन संघ बनवायचे. यातील एकाला इराणी पोशाख असायचा, तर दुसर्या संघाला महिला कबड्डीपटूंचा नेहमीचा पोशाख. यामुळे सामन्यात चढाई वा पकड करताना उद्भवू शकणारी प्रतिस्पर्ध्यांच्या पोशाखासंदर्भातील समस्या दूर झाली होती.”

इराणसाठी शैलजा जैन यांच्या सुवर्ण कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय मुलींनी सुवर्णपदक गमावल्याबद्दल त्यांना काहीसे दुःख झाल्याचे सांगितले होते. पण, "माझे ध्येय हे सिद्ध करणे होते की, मी सर्वोत्तम प्रशिक्षक आहे. अंतिम फेरीपूर्वी मी इराणी मुलींना सांगितले की, मला सुवर्णपदकाशिवाय भारतात परत पाठवू नका आणि सामन्यानंतर त्यापैकी काही माझ्याकडे आल्या आणि मला म्हणाल्या, मॅडम, तुम्हाला जे हवे होते ते आम्ही तुम्हाला दिले आहे.”

इराण कबड्डी संघटना महिला प्रशिक्षकाच्या शोधात असताना, शैलजा जैन यांची ‘एनआयएस’ सहकारी केवलचंद सुतार यांनी शैलजा जैन यांना तेहरानचा मार्ग सूचवला. "सप्टेंबर २०१४ साली महाराष्ट्र क्रीडा आणि युवा संचालनालय सेवांमधील माझा कार्यकाळ संपला आणि मी इराणच्या कामासाठी पुढे गेले,” असे जैन सांगत होत्या. तेहरानमधले आजचे काळे ढग कोणत्याही व्यक्तीला नकोसेच वाटत असतील, तर याउलट शैलजा जैन यांनी व्यतित केलेला तो तेहरानमधील काळ एक क्रीडाप्रेमी म्हणून त्यांना कधीच विसरता येणार नाही. आपणास माहीत आहेच की, ‘अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम’ हा राष्ट्रीय स्तरावर ‘एकलव्य खेलकूद प्रतियोगिता’ आयोजित करतो. त्या स्पर्धांमध्ये मैदानी स्पर्धा, खो-खो, कबड्डी, फुटबॉल अशा अनेक क्रीडाप्रकारांचा सहभाग असतो. या बहुविध क्रीडा प्रकारांत धनुर्विद्येचा सहभाग तर अनिवार्यच. त्याच्याच जोडीने दरवर्षी अजून एका क्रीडाप्रकाराचा सहभाग असतो. त्यानुसार दि. २५ डिसेंबर ते दि. १ जानेवारी २०२० या काळात कानपूर येथील स्पर्धेत कबड्डीचा समावेश केला होता.

कबड्डी खेळायला आलेल्या इराणी युवतींनी एका हिंदुस्थानी हिंदू महिलेला देऊ केलेली ती भेट आपल्या मनात सांभाळून ठेवत, शैलजा जैन भारतात परतल्या. त्यानंतर माझी आणि शैलजा जैन यांची भेट नाशिकमधील एका बैठकीत, ‘क्रीडाभारती’चे ज्येष्ठ आणि पहिला ‘शिवछत्रपती पुरस्कार’ मिळवणार्या साहेबराव पाटील यांनी घडवून आणली. "पश्चिम आशियातील भारताव्यतिरिक्त वेगळ्या देशात कबड्डीचा डंका पिटल्यानंतर, पश्चिम महाराष्ट्रातील जनजातीय युवतींना कबड्डीत निष्णात करण्याचे ठरवत जैन यांनी नाशिकमध्ये माझी भेट घेतली होती.”

"परराज्यातील स्पर्धेत मुलांचा पालक म्हणून मी तर मुलींची आई म्हणून माझी पत्नी मंजिरी, असे पदाधिकार्यांसह आम्ही कानपूरला जाण्याचे ठरवले. आपल्या मुलामुलींना शाळेत कबड्डीची जुजबी तोंडओळख होतीच पण, स्पर्धेत उतरून कबड्डीत विजय संपादन करायचा असेल, तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज असते आणि शैलजा जैन यांनी प्रशिक्षक आणि मेंटॉर म्हणून ती जबाबदारी स्वेच्छेने स्वीकारली. धनुर्विद्या आणि कबड्डीचा प्रशिक्षण वर्ग आम्ही गुही येथे आयोजित केला. गुही प्रशिक्षण शिबिरातूनच आम्ही नाशिकला गेलो. थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेऊन आमचा चमू कानपूरला रवाना झाला.” अल्प वेळात प्रशिक्षण घेतलेल्या पश्चिम महाराष्ट्राच्या मुलींनीदेखील त्यांच्या जैन मॅडमना नाउमेद केले नाही. ‘वनवासी कल्याण आश्रम’ जिथे जिथे आहे, तेथील ठिकाणच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत कांस्यपदक पटकावले. सुप्रसिद्ध क्रिकेटपटू चेतन चौहान यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाकडून मिळवलेले ते पदक, मुलींनी जैन मॅडमना समर्पित केले. जैन मॅडमने शिबिरात ऐकवलेल्या इराण कथा पश्चिम महाराष्ट्रातील खेलकूदच्या सगळ्यांना खचितच आठवत असतील.

श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०