मुरुगनचा आशीर्वाद भाजपला मिळणार?

    26-Jun-2025   
Total Views |


पुढील वर्षी होणार्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात घडामोडींना वेग आला आहे. भाजपची सहयोगी संघटना ‘हिंदू मुन्नानी’ने पुढील वर्षी एप्रिलमध्ये होणार्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत हिंदूंना आपल्या मतांची ताकद दाखविण्याचे आवाहन केले आहे. या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या संघटनेने आयोजित केलेल्या भगवान मुरुगन भक्त संमेलनात ‘हिंदू मुन्नानी’ने ‘हिंदू एकता’ आणि हिंदूंच्या हक्कांचे आणि मंदिरांचे रक्षण करण्याचा ठरावही मंजूर केला. त्यानिमित्ताने आगामी विधानसभा निवडणुकीत मुरुगनचा आशीर्वाद भाजपला मिळणार का, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे

हिंदू मुन्नानी’ या संघटनेतर्फे नुकत्याच संपन्न झालेल्या भगवान मुरुगन भक्त संमेलनात आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि तामिळनाडू भाजपचे नेते के. अण्णामलाई यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. परिषदेत मंजूर झालेल्या ठरावात म्हटले आहे की, द्रमुक सरकारने मंदिरांना महसूलाचे स्रोत म्हणून पाहणे थांबवावे आणि या निधीचा वापर भाविकांच्या हितासाठी करावा.

परिषदेला संबोधित करताना आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदू धर्माला लक्ष्य करणार्या ‘बनावट धर्मनिरपेक्षतावाद्यां’वर टीका केली आणि सर्व धर्मांचा आदर करण्याचे आवाहन केले. भगवान मुरुगन मुरुगा भक्तरगल मानडू यांच्या भक्तांच्या विशाल मेळाव्याला संबोधित करताना पवन कल्याण म्हणाले की, "ते धर्मांध हिंदू नाहीत, तर एक समर्पित हिंदू आहेत. धर्मनिरपेक्षता हा शब्द अनेक लोकांसाठी सोयीचा शब्द आहे. विशेषतः नास्तिकांसाठी, जे देवावर विश्वास ठेवत नाहीत. भारतात ते हिंदू देवतांवर विश्वास ठेवत नाहीत. धर्मनिरपेक्षता म्हणजे कोणत्याही धर्माविरुद्ध कोणताही भेदभाव नाही. परंतु, त्यांच्यासाठी धर्मनिरपेक्षता म्हणजे हिंदू धर्माशिवाय कोणत्याही धर्माविरुद्ध कोणताही भेदभाव नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदू देवतांना लक्ष्य करणे सामान्य झाले आहे. तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांना अरबस्तानातून आलेल्या धर्माबद्दल बोलण्याची हिंमत नाही.”

ते असेही म्हणाले की, "आपल्या देवतांना कमी लेखणे ही नास्तिकांची सवय झाली आहे. हे बदलले पाहिजे. जर ते बदलले नाही, तर हिंदू धर्म टिकवणे कठीण होईल.” तामिळ भाषेत बोलताना पवन कल्याण यांनी थेवर समुदायाचे आदर्श मानले जाणारे पसुम्पोन रामलिंग थेवर यांना भगवान मुरुगन यांचे अवतार आणि जगातील पहिले क्रांतिकारी नेते म्हणून संबोधित केले. आम्ही तुम्हाला सांगतो की, थेवर समुदाय हा दक्षिण तामिळनाडूमधील एक प्रभावशाली मतपेढी आहे.

परिषदेला संबोधित करताना भाजपचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई म्हणाले की, "हिंदू धर्मातून कोणत्याही प्रकारचे धर्मांतर होऊ नये आणि ज्यांनी धर्मांतर केले आहे, त्यांनी हिंदू धर्मात परत यावे. भगवान मुरुगनच्या भक्तांच्या परिषदेत हिंदूंची प्रचंड उपस्थिती ही सत्तेत असलेल्यांसाठी एक इशारा आहे. भगवान मुरुगनच्या प्रत्येक मंदिरात एक विशेष संदेश आहे; प्रेम, ज्ञान, वैवाहिक जीवन, वाईटावर विजय आणि शांती. हिंदूंना कसे पाहायचे आहे, हे सत्तेत असलेल्यांनी ठरवायचे आहे. हिंदू अनेकदा त्यांना लहान किंवा मोठे नुकसान करणार्यांना माफ करतात. परंतु, आज हिंदूंना त्यांच्या जीवनशैलीवर सतत हल्ले सहन करावे लागत आहेत. हिंदू मतांनी सत्तेत येणारे राजकीय नेते हिंदूंविरुद्ध अपशब्द वापरतात. कारण, त्यांना वाटते की हिंदू कधीही एकत्र येणार नाहीत.”

भाजपचा मित्रपक्ष अण्णाद्रमुकने या परिषदेवर मौन बाळगले. परंतु, पक्षाचे चार माजी मंत्री आरबी उदयकुमार, सेलूर के. राजू, राजेंद्र बालाजी आणि कदंबूर राजू हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. याशिवाय केंद्रीय मंत्री एल. मुरुगन आणि भाजपचे वरिष्ठ नेते एच. राजा, तमिलिसाई सुंदरराजन आणि वनथी श्रीनिवासन हेदेखील या कार्यक्रमात उपस्थित होते. दुसरीकडे, विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावरून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांवर निशाणा साधला आहे. तामिळनाडूचे हिंदू धार्मिक आणि धर्मादाय अनुदानमंत्री पीके शेखरबाबू म्हणाले की, "भगवान मुरुगन कधीही चुकीच्या लोकांना आशीर्वाद देणार नाहीत. भगवान मुरुगनला माहीत आहे की, कोणता कार्यक्रम राजकीय आहे आणि कोणता आध्यात्मिक आहे. ते बरोबर आणि चूक यात फरक करू शकतात. म्हणूनच ते कधीही चुकीच्या लोकांसोबत राहणार नाहीत.” दुसरीकडे, ‘एनटीके’ प्रमुख सीमन म्हणाले की, "भाजप तामिळनाडूमध्ये भगवान राम आणि गणेश यांच्या माध्यमातून राजकीय फायदा घेण्यात अपयशी ठरला, म्हणून आता ते भगवान मुरुगन यांना दत्तक घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.”

या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या तामिळनाडू दौर्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांनी आपल्या दौर्यात यंदा भाजप सत्तेत येईल, असा दावा केला आहे. गेल्या चार दशकांपासून तामिळनाडूमध्ये द्विध्रुवीय राजकारण सुरू आहे, यात शंका नाही. एका बाजूला अण्णाद्रमुक आणि दुसर्या बाजूला द्रमुक. अमित शाह यांच्या दाव्याचा एक प्रमुख आधार म्हणजे भाजप आणि ‘अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम’ (एआयएडीएमके) यांच्यातील पुन्हा युती. २०२६ सालच्या तामिळनाडूतील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने राज्यातील एक प्रमुख द्रविड पक्ष असलेल्या अण्णाद्रमुकशी युतीची घोषणा केली आहे. २०२३ साली ही युती तुटली होती. परंतु, अलीकडच्या काही महिन्यांत दोन्ही पक्षांनी पुन्हा हातमिळवणी केली आहे. ही युती महत्त्वाची आहे. कारण, तामिळनाडूमध्ये, विशेषतः ग्रामीण आणि दक्षिणेकडील भागात ‘एआयएडीएमके’चा मजबूत जनाधार आहे.

त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी द्रमुकवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. अण्णामलाई यांनीही सरकारविरुद्ध मोठी मोहीम सुरू केली आहे. भाजप आणि अण्णाद्रमुक द्रमुकवर घराणेशाहीचा आरोपही जोरदारपणे करत आहेत. एमके स्टॅलिन यांनी आपले पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांना उपमुख्यमंत्री बनवल्यामुळे तर या आरोपास अधिकच धार मिळाली. याशिवाय काही मंत्री आणि स्थानिक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत, ज्यामुळे जनतेमध्ये नाराजी आहे. त्यामुळे यंदा हिंदुत्वासह द्रमुकच्या गैरकारभाराच्या मुद्द्यावरून द्रमुकला धक्का देण्याची तयारी भाजपने चालवली आहे, हे निश्चित.