इराण आणि इस्रायलमधील १२ दिवसांचा संघर्ष युद्धविरामामुळे तात्पुरता संपुष्टात आला असला, तरी यानिमित्ताने पुन्हा एकदा एकमेकांचे दोन कट्टर शत्रू आमनेसामने आले. या संघर्षाच्या केंद्रस्थानी जसे इराणची अणुशक्ती होण्याचे जुनेच मनसुबे आहेत, तसेच इस्लाम विरुद्ध ज्यू संघर्षाची पूर्वापार किनारही लाभलेली. त्याच धार्मिक अंगाने या संघर्षाचे चिंतन करणारा हा लेख...इराण-इस्रायल युद्धाचे कारण काय होते? राजनीतीशास्त्राचा नियम असा आहे की, युद्ध हा अंतिम पर्याय असतो. युद्ध टाळण्याचे सर्व प्रयत्न केले पाहिजेत. प्रश्न शांतीच्या मार्गाने सोडविले पाहिजेत. आपले महाभारत फार प्रसिद्ध आहे. युद्ध टाळण्यासाठी श्रीकृष्ण दूत बनून कौरवांच्या दरबारी गेला होता. दुर्योधनाने शांतीस नकार देऊन युद्धाचा पर्याय स्वीकारला. इस्रायल आणि इराण यांच्यात वाद आहेत, हा वाद मिटविण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर साहजिकच प्रयत्न झाले आणि अखेरीस ही युद्ध १२ दिवसांनंतर थांबले.
खरं तर हे असे युद्ध किती काळ चालेल, हे सांगता येेणे अवघड असते. दोन सैन्य परस्परांशी लढत असताना दोघांपैकी ज्याचा दम उखडतो, तो लढाई हरतो. युक्रेन आणि रशियातील लढाई सैनिकांची लढाई नाही. इराण आणि इस्रायलमधील लढाईदेखील सैनिकांची लढाई नाही. ही लढाई आधुनिक शस्त्रांची आहे. लढाई क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि फायटर जेट लढत आहेत. एका अर्थाने ही युद्धशास्त्रीय तांत्रिक क्षेत्राची लढाई आहे. या लढाईत ज्याचे तंत्रज्ञान वरचढ ठरेल तो श्रेष्ठ.
मूळ प्रश्न असा आहे की, हे युद्ध कशासाठी सुरू होते? इस्रायलला इराणचा प्रदेश जिंकायचा नाही, इराणला इस्रायलची भूमी जिंकायची नाही, एकमेकांच्या आर्थिक स्रोतांवर ताबा देखील मिळवायचा नाही, भूसामरिक वर्चस्व मिळवायचे नाही, मग ही लढाई होती तरी कशासाठी?
इराण हा शियाबहुल मुस्लीम देश, तर इस्रायल हा ज्यू धर्माचा देश. त्यामुळे ही लढाई ज्यू धर्मीय विरुद्ध शिया मुस्लीम यांच्यातील आहे. त्याला फार मोठी धार्मिक किनार आहे. मुसलमान शिया असो नाही तर सुन्नी असो, तो असहिष्णु असतो. ‘माझाच धर्म श्रेष्ठ, मी माझ्या प्रदेशात दुसर्या धर्माला जगू देणार नाही,’ हा इस्लाम धर्मीयांचा स्वभाव.
इस्रायलचे ज्यू धर्मीय (ज्युडाईझम) देखील असेच कडवे आणि असहिष्णू आहेत. ते स्वतःचा धर्म जगातील सर्वश्रेष्ठ धर्म मानतात. त्यांच्याच जमातीत जन्मलेल्या येशू ख्रिस्ताने धर्मविषयक वेगळे मत मांडायला सुरुवात केल्यानंतर त्याला क्रूसावर चढविण्यात आले. इ. स. पूर्व ७२२ असेरियन साम्राज्याने इस्रायल साम्राज्याचा नाश केला. पुढील २०० वर्षे ज्युडा येथे या साम्राज्याचा दक्षिण भाग टिकला. पण, तोही पुढे नष्ट झाला. ज्यू जमात आपल्या भूमीतून उखडली गेली आणि ती युरोपात पांगली, त्यातील काहीजण भारतात आले. यानंतर इस्लाम आणि ज्यूंचा तसा संघर्ष झाला नाही. पण, १९४८ साली ब्रिटिशांनी अरब भूमीत ज्यू लोकांना त्यांची प्राचीन भूमी दिली आणि तेथे इस्रायल नावाच्या राष्ट्राचा जन्म झाला. जन्मापासूनच त्याचा इस्लामी जगताशी संघर्ष सुरू झाला.
आतापर्यंत इस्लामी जगताने ज्यूंचे इस्रायल नष्ट करण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. १९४८, १९६७, १९७१ अशी तीन भयानक युद्धे झाली. या युद्धात मुस्लीम देशांचा सणकून पराभव झाला. इराणने इस्रायलला नष्ट करण्याचा वारसा पुढे चालविला. इराण हा अरब देश नाही. इराण या शब्दाचा अर्थ होतो, आर्य लोकांचा देश, अरब वंशाच्या लोकांचा देश नव्हे. अरबस्तानच्या भूमीशी इराणचा काहीही संबंध नाही. इराणकडे अफाट तेलसाठे आहेत. त्यातून अगणित संपत्ती इराणकडे येते. या संपत्तीचा वापर इराणने ‘हमास’, ‘हिजबुल्ला’, ‘हुती’ या दहशतवादी संघटना पोसण्यासाठी केला. त्या इस्रायलशी सतत संघर्ष करीत असतात. इस्रायलही साहजिकच आपल्या बचावासाठी संघर्ष करीत असतो. इस्रायलचे प्रतिहल्ले अतिशय निर्दयी आणि क्रूर असतात. ‘तुम्ही आम्हाला जगू देत नाहीत, मग आम्ही तुम्हाला जगू देणार नाही,’ हा भाव त्यामागे असतो. इस्रायलचे युद्ध तंत्रज्ञान अतिशय प्रगत आहे. या युद्ध तंत्रज्ञानाशी लढणे मुस्लीम देशांना शय नाही.
म्हणून इराणने अणुबॉम्ब बनविण्याचा कार्यक्रम सुरू केला. इस्रायल हा चिमूटभर देश आहे. एक अणुबॉम्ब टाकला की, सगळा देश संपून जाईल. इस्रायलचे पंतप्रधान त्याला ‘न्यूलियर होलोकास्ट (आण्विक नरसंहार)’ असे म्हणतात. इराणने अणुबॉम्ब बनविण्यापूर्वी त्याची अणुबॉम्ब बनविण्याची क्षमता नष्ट करण्यासाठी हे युद्ध लढले गेले. दोन असहिष्णू देश एकमेकांशी लढले. दोघांनाही एकमेकांना जगू द्यायचे नाही. इस्रायलचा पक्ष घेऊन अमेरिकाही युद्धात उतरली. अमेरिका-इराण यांच्यात पूर्वीपासून वैर आहेच. हे वैरदेखील सांस्कृतिक आणि धार्मिक. अमेरिकेच्या दृष्टीने खोमेनी हे खलनायक आहेत आणि या दोघांच्या दृष्टीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष खलपुरुष आहेत.
या युद्धात भारत कोठे होता? आज तरी भारताला काही भूमिका आहे हे दिसत नाही. कृष्ण शिष्टाई भारत करू शकत नाही. शिष्टाईसाठी गेलेला कृष्ण सर्वशक्तिमान होता. दोन हातांनी तो कौरव आणि पांडवांचे कान धरू शकत होता, ते सामर्थ्य आपल्याकडे नसले तरी वैचारिक सामर्थ्य प्रचंड आहे. शिकागोच्या सर्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंद हे सामर्थ्य असे प्रकट केले. ते म्हणाले होते की, "जो धर्म समस्त जगताला ‘सहिष्णुता’ आणि ‘सर्वच मतांना मानणे’ या दोहोंचीही शिकवण निरंतर देत आला आहे, त्या धर्मात जन्मास आल्याबद्दल मला गौरव वाटतो. अन्य धर्मीयांविषयी आम्ही केवळ सहिष्णुताच बाळगतो, असे नव्हे, तर सर्वच धर्म सत्य आहेत, असा आमचा दृढ विश्वास आहे. परकीयांच्या छळामुळे देशोधडीस लागलेल्या कोणत्याही जातीच्या आणि कोणत्याही धर्माच्या निराश्रितांना आश्रय देणार्या जातींत जन्मास आल्याबद्दल मला अभिमान वाटतो. ज्या वर्षी यवनांच्या निष्ठुर अत्याचारांनी यहुदी लोकांचे पवित्र देवालय भग्न होऊन मातीस मिळाले, त्याच वर्षी काही जातिवंत यहुदी आश्रयार्थ दक्षिण भारतात आले असता, माझ्याच जातीने त्यांना सादर हृदयाशी धरिले, हे सांगताना मला भूषण वाटत आहे. वैभवशाली पारशी जातीच्या उरलेल्या लोकांना ज्या धर्माने आसरा दिला आणि आजही जो धर्म त्याचे प्रतिपालन करीत आहे, त्याच धर्मांत मी जन्मास आलो आहे.”
भाषणाच्या शेवटी विवेकानंद म्हणाले, "ते असे आहे; ‘पंथाभिमान, स्वमतान्धता आणि तज्जन्य अनर्थकारी धर्मवेड’ यांनी या आपल्या सुंदर वसुंधरेवर दीर्घकाल अंमल गाजविला आहे. त्यांनी जगामध्ये अनन्वित अत्याचार माजविले असून, कितीदा तरी ही पृथ्वी नररक्ताने न्हाऊन काढली आहे. संस्कृतीचा विध्वंस करून त्यांनी कधीकधी राष्ट्रेच्या राष्ट्रे हताश करून सोडली आहेत. हे भयंकर राक्षस नसते, तर मानवसमाज आज आहे, त्यापेक्षा किती तरी अधिक उन्नत होऊन गेला असता.”
विवेकानंदांनी हे विचार मांडून १३२ वर्षे झाली आहेत. या १३२ वर्षांच्या कालखंडात आपण जर मानवधर्मी शक्तिशाली झालो असतो, तर विध्वंस करणारी युक्रेन आणि रशिया, इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धे थांबवू शकलो असतो. आपण केवळ ‘जगाला युद्ध नको, बुद्ध हवा किंवा जगाला महावीरांची अहिंसा हवी अथवा महात्मा गांधीजींचा अहिंसक सत्याग्रही मार्ग हवा’ असा संदेश देत आहोत. युद्ध करणार्या देशांना हे ऐकण्याची फुरसतदेखील नाही. यासाठी या युद्धाचा आपल्यासाठी एकच धडा आहे, तो म्हणजे आमचा जीवनमार्ग मानवजातीच्या सुखाचा मार्ग आहे आणि तो जगाने स्वीकारावा, इतके सामर्थ्य आपण मिळविले पाहिजे.
रमेश पतंगे
९८६९२०६१०१